आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनामुळे आपल्या आयुष्यात आयसोलेशन हा एक नवा शब्द रुजू झाला. नेहमी समाजात वावरलेल्या माणसांना अशा प्रकारे सलग काही दिवस अलिप्त राहण्याची कल्पना सहन देखील होत नाही. लॉकडाऊनमुळे तर जवळपास सर्वच जग स्थानबद्ध झाले आहे. सामाजिक वावरावर अशा प्रकारे निर्बंध घालून जगणे सर्वांनाच कष्टप्रद वाटत असले तरी, तेव्हा कोणताच पर्याय नव्हता.
मात्र, जिथे आपल्याला फक्त ४० दिवस घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय जाचक वाटत होता. तिथे सायबेरियातील एक कुटुंब मात्र गेली कित्येक दशके आयसोलेशनमध्ये राहत आहे.
या दशकांमध्ये बाहेरच्या जगात किती मोठ्या घडामोडी घडल्या, किती विकास झाला, नागरिकीकरण किती झपाट्याने बदलले याचा मागमूसही या कुटुंबाला नाही.
याचं कारण काय? कार्प हा या घराण्याचा ज्ञात प्रमुख व्यक्ती. “रशियन क्रांती” म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या, बोल्शेविकांच्या क्रांतीत, १९३६ साली कार्पच्या भावाला कम्युनिस्ट सैन्याने विनाकारण ठार मारले.

कम्युनिस्ट सैन्याने कार्प लायकोव्ह यांच्या भावाची ह*त्या केल्यानंतर बोल्शेविक सत्तेत होणाऱ्या छळाला कंटाळून या कुटुंबाने गाव सोडले. फक्त गावच नाही तर मानवी समाजाचा सहवासच सोडला. कार्प लायकोव्ह, त्याची पत्नी अकुलिना, आणि त्यांची दोन मुले सॅविन आणि नतालिया. असे चार व्यक्तींचे हे कुटुंब तैगाच्या जंगलात राहण्यास गेले. त्यानतंर परत कधीच त्यांनी गाव किंवा नातेवाईकांशी संपर्क ठेवला नाही.
जंगलात राहणे तितके सोपे नव्हते तरी, फक्त जिवंत राहण्यासाठी खायला मिळाले एवढेच अन्न खाऊन हे कुटुंब दिवस ढकलत राहिले. या ४२ वर्षाच्या विलगीकरणात त्यांना आणखी दोन अपत्ये झाली. ते तैगाच्या जंगलात जन्मले आणि तिथेच वाढले. १९७८ मध्ये अगदी अपघाताने या कुटुंबाचा छडा लागला.
१९७८ मध्ये रशियन भूगर्भशास्त्रज्ञांची एक टीम सायबेरियाच्या मोहिमेवर गेली असताना त्यांना या कुटुंबाचा शोध लागला. असे कुटुंब जे दशकानुदशके अज्ञातवासात राहत आहे. या वर्षांत ते इतर कोण मनुष्य प्राण्याच्या संपर्कातही आलेले नाहीत. इतकेच काय पण या जगात दुसरे महायु*द्ध झाले याचीही त्यांना कल्पना नाही.
त्यादिवशी या टीमला घेऊन जाणाऱ्या वैमानिक, विमान उतरवण्यासाठी जागा शोधत असताना, त्याला एक जंगल दिसले. थोड्या दूरवर लक्ष पूर्वक पहिल्यानंतर जंगलात एक झोपडीही दिसली. यावरून या जंगलात मनुष्य वस्ती असल्याचा त्यांनी अंदाज लावला. सोव्हिएतच्या अधिकाऱ्यांना मात्र अशा वस्तीविषयी काहीच कल्पना नव्हती.
जंगलाला लागूनच असलेल्या गावापासून ही वस्ती २५० किलोमीटर अंतरावर होती. पण, अजूनही कुणाला याचा पत्ता लागला नव्हता. विमानात बसलेल्या भूगर्भशास्त्रज्ञांना मात्र याचे प्रचंड आश्चर्य वाटले. त्यांनी स्वतःसोबत काही खाद्यपदार्थ व सुरक्षेसाठी एक बंदूक घेतली आणि ते या झोपडीवजा घरा जवळ आले.
झऱ्याला लागूनच असणाऱ्या या झोपडीत पाच व्यक्ती राहत होत्या. त्या झोपडीला एक छोटीशी खिडकी होती. मात्र कोणत्याही अर्थाने ते घर वाटत नव्हते. त्या झोपडीत राहणाऱ्या ७७ वर्षीय वृद्धाने या संशोधकांचे स्वागत केले. तेव्हा तिथे कार्प आणि त्याची चार मुले सॅविन, नतालिया, दमित्री आणि अगाफिया होते. कार्पची पत्नी अकुलिना १५ वर्षांपूर्वीच भुकेमुळे मरण पावली होती.
संशोधकांनी त्यांना स्वतः जवळील थोडा खाऊ दिला. पण, म्हातारा कार्प सोडला तर इतर कुणालाही यावर विश्वास बसला नाही की, चहा, ब्रेड, हे खाण्याचे पदार्थ आहेत. या कुटुंबातील मुलांनी त्यांचे आई-वडील सोडल्यास इतर कुणालाही पहिले नव्हते. पण, त्यांना माहित होते की दूरवर मनुष्य वस्ती आहे, जिथे मोठमोठ्या इमारती आहेत. रशियाच्या बाहेरही अनेक देश आहेत, जिथे माणसे राहतात.
त्यांना लिहिता-वाचता येत होते. त्याच्या आईने त्यांना बायबल आणि गोस्पेल वाचायला शिकवले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी फक्त याच वस्तू स्वतःसोबत घेतल्या होत्या.
जंगलात या कुटुंबाने घालवलेली ४२ वर्षे फारच कष्टप्रद होती. अत्यंत प्रतिकूल वातावरणात जगणे फारच कठीण होते. शिवाय, त्याच्याजवळ फारशी साधनेही नव्हती. त्यांच्या जवळ पुरेसे अन्न नव्हते. जंगलातून जे काही मिळे ते सर्वाना पुरत नसे. राय, बटाटे आणि झाडांच्या बिया हेच त्यांचे मुख्य अन्न होते. उन्हाळ्यात थोड्या फार बेरी मिळत पण तेही पुरेसे नव्हते. जेमतेम तग धरता येईल एवढेच अन्न त्यांना मिळत होते. उपासमार आणि उपजीविका या दोन्हींच्या मध्यात राहून त्यांनी दिवस काढले.
दमित्री थोडा मोठा झाल्यावर बापलेक मिळून शिकारीला जात. पण, शिकारीसाठीही पुरेशी साधने जवळ नसल्याने तेही मिळत नसे. शिकारीसाठी ते जाळे लावत आणि जाळ्यात सापडणाऱ्या शिकारीवरच समाधान मानत.
पण, दिमित्रीमध्ये काही अमानवी गुण असल्याचेही संशोधकांना आढळले. तो चपलाविना बर्फावरून चालू शकत होता. जंगलात दूरवर भटकत जात होता. कधी कधी घरी परतायला त्याला कित्येक दिवस लागत. पण, गोठवणाऱ्या थंडीत तो कुठेही सहज झोपू शकत होता.
संशोधकांनी त्यांना बाहेरच्या जगात घडलेल्या काही घटना सांगितल्या. माणसाने चंद्रावर पाउल ठेवल्याचेही सांगितले. या गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी जणू चमत्कार होते. पण, पुन्हा मानवी वस्तीत येण्यास त्यांनी नकार दिला. यापेक्षा चांगल्या सोयीसुविधा मिळत असल्या तरी, बाहेरचे जग दुष्ट आहे, असा लायकोव्ह कुटुंबाचा विश्वास होता.
परंतु, हे कुटुंब या संधोधाकांच्या संपर्कात राहिले. १९८१ पर्यंत या कुटुंबातील तीन अपत्ये मरण पावली. सॅविन आणि नतालिया दोघेही किडनीच्या त्रासाने गेले. लहानपणापासून ज्या पद्धतीचे अन्न त्यांनी खाल्ले होते, हा त्याचा परिणाम असावा. दिमित्री मात्र न्यूमोनियाने गेला.

जंगलातील आयुष्य कितीही कठीण असले तरी, ते सुखाचे आहे असाही लायकोव्ह कुटुंबाचा विश्वास आहे. बाहेरच्या जगात राहण्यापेक्षा त्यांना हेच जग सुंदर वाटते. या कुटुंबातील अगफिया आजही इथे एकटी राहते. १९८८मध्ये कार्पही या जगातून निघून गेला.
अगाफिया लायकोवा ही कुटुंबातील एकमेव जिवंत सदस्य आहे. ती अजूनही तैगाच्या जंगलांमध्येच राहते, ती वैद्यकीय उपचारांसाठी किंवा दूरच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी क्वचितच बाहेर जाते. तिला बाहेरची हवा मानवत नाही, बाहेरील हवेमुळे आजारी पडते असे तिचे स्वतःचे मत आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या राहण्याची जागा अत्यंत जीर्ण झाली होती, परंतु आता ती जागा सुधारवण्यात आली आहे.
कम्युनिस्ट चळवळींचा फायरब्रॅन्ड असलेल्या सोव्हिएत-प्रणित रशियामध्ये अशी असंख्य निष्पाप कुटुंबं असतील, ज्यांचा काहीही दोष नसताना फक्त चर्चशी संबंधित असल्याने त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय होत राहिला आहे.
लाल क्रांतीच्या या “गुडी गुडी” चित्रात मात्र प्रचंड प्रमाणात रक्त वहिलंय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








