The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मलेरियाच्या डासानं या डॉक्टरला थेट नोबेल पुरस्कार मिळवून दिला!

by द पोस्टमन टीम
14 September 2025
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


२०२०-२०२१ मध्ये कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला होता. कधी काळी मलेरियानं (हिवताप) देखील असाच धुमाकूळ घातला होता. भारताचा विचार केला तर मलेरियाच्या अस्तित्वाचे दाखले अथर्ववेद आणि चरक संहितेमध्ये देखील पहायला मिळतात. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतातील जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या हिवतापानं ग्रस्त होती. पंजाब आणि बंगालसारखी राज्ये तर पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकली होती. १९३५ साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मलेरियामुळे भारताला दरवर्षी १०० कोटींचे नुकसान होत होते.

जगभरातील अनेक देशांची स्थिती अशीच होती. मलेरियाचा प्रसार नेमका कसा होतो? हे शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. मलेरियाच्या प्रसारासाठी एक डास (मच्छर) कारणीभूत असल्याचं १८९७ साली लक्षात आलं. भारतात काम करणाऱ्या एका ब्रिटिश डॉक्टरनं ही गोष्ट शोधून काढली आणि मलेरियावरील संशोधनाला एक वेगळी दिशा मिळाली! गंमत म्हणजे मलेरियाच्या डासानं या डॉक्टरला थेट नोबेल पुरस्कार मिळवून दिला! सर रोनाल्ड रॉस, असं या डॉक्टरचं नाव आहे.

ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अनेक ब्रिटिश अधिकारी आपल्या कुटुंबांसह भारतात वास्तव्य करू लागले. जनरल सी. सी. जी. रॉस अशाच अधिकाऱ्यांपैकी एक होते. ते आपली पत्नी मॅटिल्डासह अलमोरामध्ये राहत होते. १८५७ साली जेव्हा भारतात स्वातंत्र्ययु*द्धाची पहिली ठिणगी पडली, त्याच वेळी जनरल रॉस यांच्या घरी पाळणा हलला. त्यांच्या पत्नीनं अलमोरामध्येच एका मुलाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजेच रोनाल्ड रॉस! आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. असाच विचार करून जनरल रॉस यांनी लहानग्या रोनाल्डला वयाच्या आठव्या वर्षी इंग्लंडला पाठवलं.

इंग्लंडमधील आयल ऑफ विट याठिकाणी राहणाऱ्या काका-काकूसोबत रोनाल्डनं आपलं बालपण घालवलं. शालेय जीवनात त्याला कविता, साहित्य, संगीत आणि गणितामध्ये रस होता. मात्र, आपल्या मुलानं डॉक्टर होऊन भारतात परत यावं, अशी जनरल रॉसची इच्छा होती. त्यामुळं आज्ञाधारक आणि गुणी मुलाप्रमाणं रोनाल्डनं आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यानं लंडनमधील ‘सेंट बार्थोल्योमू हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेज’मध्ये प्रवेश मिळवला. १८७९ साली तो इंग्लंडमधील ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन’च्या परीक्षेला बसला. रोनाल्डनं ट्रान्सअटलांटिक स्टीमशिपवर सर्जनचं पद स्वीकारलं. सोबतच ‘सोसायटी ऑफ अपोथेकरी’चा (औषध निर्मिती) परवाना देखील मिळवला. यामुळे त्यांना १८८१ साली भारतीय वैद्यकीय सेवेत प्रवेश करण्याची संधी मिळाली.

या अंतर्गत सुरुवातीला रोनाल्डला मद्रास, बर्मा आणि अंदमान येथे तात्पुरत्या नियुक्त्या मिळाल्या. जून १८८८ ते मे १८८९ या एक वर्षाच्या काळात रोनाल्डला सुट्टी मिळाली. याकाळात त्यांनी इंग्लंडमधील ‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन ॲण्ड सर्जन’मधून एक डिप्लोमा पूर्ण केला. त्यात त्यांनी प्रोफेसर ई. ई. क्लेन यांच्या मार्गदर्शनाखाली बॅक्टेरियोलॉजीचा अभ्यास केला. याच दरम्यान रोनाल्डनं रोसा ब्लोक्सॅम नावाच्या मुलीसोबत लग्न केलं. त्यानंतर ते दोघे भारतात आले. यावेळी स्टाफ सर्जन म्हणून रोनाल्डची नियुक्ती बंगळुरूमध्ये झाली होती.

त्या सुमारास भारतात मोठ्या प्रमाणात मेलरियाचा प्रसार झाला होता. लोक व आरोग्य यंत्रणा त्रस्त झाली होती. १८९२ साली रोनाल्डला मलेरियाच्या संशोधनात रस वाटू लागला. अल्फोन्स लेवरन आणि मॅन्सन या दोन संशोधकांनी, मलेरियाच्या प्रसाराशी डासांचा संबंध असल्याचं गृहितक मांडलेलं होतं. ते सिद्ध करण्यासाठी रोनाल्डनं संशोधन सुरू केलं. मात्र, भारतीय वैद्यकीय सेवेनं त्यांच्या संसोधनात अडथळा आणला. कारण त्यांची नियुक्ती राजपुतानामधील मलेरियामुक्त वातावरणात करण्यात आली होती. अशा वातावरणात संशोधन करता येणार नव्हतं, म्हणून रोनाल्डनं राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पण, मॅन्सनच्या सांगण्यावरून सरकारनं मलेरिया आणि काळ्या आजारावर (व्हिसरल लीशमॅनियासिस) संशोधन करण्यासाठी रोनाल्डची विशेष ड्युटी लावली.



रोनाल्डनं आपल्या संशोधनासाठी हैदराबादची निवड केली. २० ऑगस्ट १८९७ रोजी सिकंदराबादमध्ये त्याला मेजर ब्रेक-थ्रू मिळाला. चार दिवसांपूर्वी एका मलेरिया रुग्णाला चावलेल्या ॲनाफेलिन डासाच्या शरीरातील ऊतींचं विच्छेदन करताना त्याला त्यात मलेरियाचा विषाणू आढळला. मानवामध्ये डासांच्या माध्यमातूनच मलेरियाच्या विषाणूंच संक्रमण होतं, ही गोष्ट त्यानं सिद्ध करून दाखवली. मात्र, यावरच शांत बसेल तो रोनाल्ड रॉस कसला! त्यानं पक्ष्यांचा वापर करून अधिक सोयीस्करपणे भारतातील मलेरियावर आपलं संशोधन सुरू ठेवलं. जुलै १८९८ पर्यंत त्यांनी हे दाखवून दिलं की, डास पक्ष्यांमधील मलेरियासाठीसुद्धा कारणीभूत ठरू शकतात. हे मलेरियाबाबत तोपर्यंतचं सर्वात महत्त्वाचं संशोधन होतं.

भारतातील संशोधन पूर्ण झाल्यानंतर १८९९ साली डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी भारतीय वैद्यकीय सेवेतून राजीनामा दिला आणि ते इंग्लंडला परत गेले. तिथे त्यांनी नव्यानं स्थापन झालेल्या ‘लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’ या संस्थेसाठी संशोधन केलं. नंतर ‘ट्रॉपिकल मेडीसन’चे प्राध्यापक म्हणून आणि ‘ट्रॉपिकल सॅनिटेशन’ विभागाचे प्रमुख म्हणून लिव्हरपूल विद्यापीठात काही काळ काम केलं.

पश्चिम आफ्रिकेतील मलेरिया स्थितीचा अभ्यास करून त्यावरील उपाययोजना तयार करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. १९०२ साली सुएझ कॅनाल कंपनीच्या विनंतीनुसार रोनाल्डनं इजिप्तमधील इस्माईलियाला भेट देऊन तेथील मलेरियाच्या स्थितीचा अभ्यास केला होता. त्यानंतर त्यांनी पनामा, ग्रीस आणि मॉरिशसमधील मलेरिया नियंत्रण उपायांची तपासणी मोहिम पूर्ण केली.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

मलेरियावरील संशोधनामुळं डॉक्टर रोनाल्ड यांना प्रचंड प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला. १९०१ साली इंग्लंडच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन’ आणि ‘रॉयल सोसायटी’चे फेलो म्हणून रोनाल्ड रॉस यांना निवडले गेले. रॉयल सोसायटीमध्ये तर ते तीन वर्ष उपाध्यक्ष देखील होते. १९०२साली त्यांना वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. त्याच वर्षी त्यांना ‘ऑर्डर ऑफ बाथ’ हे ब्रिटनमधील सन्माननीय मानद पद मिळालं.

१९११ साली ‘नाइट कमांडर’ पद मिळालं. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या शताब्दी समारंभात त्यांना स्टॉकहोममध्ये मानद एमडी पदवी देखील मिळाली होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना देखील रोनाल्ड आपली डॉक्टर असल्याची जबाबदारी विसरले नव्हते. पहिल्या महायुद्धात त्यांनी ब्रिटनच्या सैन्यात लढणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीच्या सैनिकांना सेवा दिली. डार्डेनेल्समध्ये असलेल्या सैन्याला त्रस्त करणाऱ्या डिसेन्ट्रीच्या उद्रेकाचा अभ्यास करण्यासाठी ते चार महिने अलेक्झांड्रियाला देखील गेले होते. १९१७ साली त्यांना वॉर ऑफिसमध्ये सल्लागार चिकित्सक म्हणून नियुक्त करण्यात आलं.

जगभरात रोनाल्ड रॉस यांना मलेरियावरील संशोधनासाठी ओळखलं जातं. मात्र रोनाल्ड एक गणितज्ज्ञ, संपादक, कादंबरीकार, नाटककार, कवी, हौशी संगीतकार, आणि कलाकार देखील होते. त्यांनी १९११ साली ‘द प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया’, ‘द चाइल्ड ऑफ द ओशन’, ‘स्पिरिट ऑफ द स्टॉर्म’ आणि ‘द रेव्हल्स ऑफ ऑर्सेरा’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. १६ सप्टेंबर १९३२ रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी रॉस इन्स्टिट्यूटमध्ये, दीर्घ आजारपण आणि अस्थमा ॲटॅकमुळं डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी अखेरचा श्वास घेतला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गणेशाला एकदंत म्हणतात त्याचं कारण छत्तीसगडच्या अरण्यात असलेल्या या गणेशमूर्तीत सापडतं

Next Post

शालेय अभ्यासक्रमात सम्राट ‘कारिकाला चोल’बद्दल शिकवलं जात नाही हे आपलं दुर्दैव आहे

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

शालेय अभ्यासक्रमात सम्राट 'कारिकाला चोल'बद्दल शिकवलं जात नाही हे आपलं दुर्दैव आहे

मलिंगासमोर खेळताना बॅट्समनला एकच प्रश्न असायचा, 'विकेट वाचवायची की जीव वाचवायचा?'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.