The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुकुमारा कुरूप – तीन दशकांपासून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात कि*लर

by द पोस्टमन टीम
12 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘कुरूप… सुकुमारा कुरूप’. नुकत्याच रिलीज झालेल्या एका मल्याळम चित्रपटात अभिनेता दुलकर सलमानच्या तोंडात हा डायलॉग आहे. काही दिवसांपूर्वी सहज या चित्रपटाचा टिझर पाहण्यात आला. त्यातील ‘कुरूप… सुकुमारा कुरूप’ या डॉयलॉगनं माझं लक्ष वेधून घेतलं. चित्रपटाबद्दल सर्च केल्यानंतर हा एका खऱ्याखुऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असल्याचं समजलं. जसजशी या सुकुमारा कुरूप नावाच्या व्यक्तीची माहिती मिळत गेली तसतशी मी वाचत गेले.

हा माणूस गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून फरार आहे. चाको नावाच्या व्यक्तीचा खून करून फरार झालेला हा सुकुमारा त्याच्या नावाच्या एकदम विरूद्ध व्यक्तिमत्व असलेला माणूस आहे. पोलिसांनी त्याच्या मागावर अनेक लोक लावले मात्र, अद्याप त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. केरळमधील लोकांच्या मनात हळूहळू त्यानं दंतकंथेचं रुप घेण्यास सुरुवात केली आहे.

तीन दशकांहून अधिक काळापासून केरळमधील लोकांना या सुकुमारा कुरूपबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे. इतकं की, दुलकर सलमानसारखा मल्याळम इंडस्ट्रीतील एक आघाडीचा अभिनेतासुद्धा आगामी चित्रपटात सुकुमाराची भूमिका करायला तयार झाला. हा सुकुमारा कुरुप नेमका आहे तरी कोण? याबाबत सविस्तर माहिती देणारा हा लेख…

सुकुमारा कुरुपचं मूळ नाव गोपालकृष्णन आहे. त्यानं अबू धाबी येथील मरीन पेट्रोलियम कंपनीत अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्यापूर्वी त्यानं काही दिवस हवाई दलात अधिकारी म्हणून देखील सेवा दिली होती. म्हणजेच तो एक माजी वायूसेना अधिकारी आहे.



मरीन पेट्रोलियम कंपनीत असताना जर्मनीमध्ये घडलेल्या एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्याचं नाव आलं. यातून त्याला काहीही करून बाहेर पडायचं होतं. नंतर त्यानं गोपालकृष्णन हे नाव सोडून दिलं आणि तो सुकुमारा कुरूप म्हणून वावरू लागला.

विम्याची मोठी रक्कम मिळवण्याच्या हेतूनं त्यानं १९८४ मध्ये आपल्याशी शारीरिक साधर्म्य असणाऱ्या एका माणसाला मारण्याचा निर्णय घेतला. आपल्या कटामध्ये त्यानं ड्रायव्हर असलेला मेहुणा भास्करा पिल्लाई आणि आपले मित्र, पोनाप्पन, शाहू यांना देखील सामिल करून घेतलं. दोघांच्या मदतीनं एक निरपराध व्यक्तीला मारून आपल्या मृत्यूचा बनाव रचला. विम्यातून आठ लाख रुपये मिळणार होते. या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्याला पैशांची तातडीची निकड नव्हती. त्यानं केवळ लालसेपोटी हे काम केलं होतं. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या कुटुंबासाठी बांधत असलेल्या एका भव्य, आलिशान बंगल्यासाठी त्याला पैशांची गरज होती. म्हणून त्यानं विम्याच्या पैशांवर चुकीच्या पद्धतीनं डल्ला मारला.

या सर्व नाट्याची सुरुवात २२ जानेवारी १९८४ रोजी झाली. केरळमधील मावेलीकाक्कारा कुन्नम येथे भल्या पहाटे रस्त्यावर एक ॲम्बेसेडर कार जळताना दिसली. कारच्या चाकाजवळ एका माणसाचं जळालेलं शरीर देखील होतं. प्राथमिक तपासात ती व्यक्ती सुकुमारा कुरूप असल्याचं समोर आलं. मात्र, ते फार काळ टिकला नाही.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

शवविच्छेदनानंतर ती व्यक्ती सुकुमारा नसल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय, मृत व्यक्तीच्या श्वसन प्रणालीमध्ये चारकोलचा कोणताही मागमूस नव्हता याचा अर्थ त्या व्यक्तीचा मृत्यू आगीत झालेला नव्हता. त्यावेळी चेंगन्नूरचे डीवायएसपी असलेल्या हरिदास यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

२०१४ मध्ये या प्रकरणाविषयी डेक्कन क्रॉनिकलनं त्यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखती दरम्यान त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली होती. हरिदास २२ जानेवारीच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता घटनास्थळी पोहोचले होते. तिथे तपास करताना त्यांना एक मॅच बॉक्स, हँडग्लोव्ह आणि पेट्रोलचे काही डाग दिसले होते. त्यानंतर अधिक तपास केला असता ती कार सुकुमारा कुरुपची असल्याचं समोर आलं. त्यावरून मृतदेह देखील त्याचाच असावा, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला होता.

८० च्या दशकात फॉरेन्सिक सायन्स आता जितके प्रगत आहे तितके प्रगत नव्हते. मात्र, मृतदेह सुकुमारा नाही हे शोधून काढण्याइतपत तर नक्कीच पुढारलेलं होतं. सुकुमारानं पोलिसांना कमी लेखण्याची चूक केली होती.

मृत माणसाच्या पोटात विष असल्याचं तज्ज्ञांच्या अहवालात समोर आलं. यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की मृत व्यक्तीला अगोदर ठार मारण्यात आलं आणि नंतर कारमध्ये बसवण्यात आलं. जसा तपास पुढे सरकला तसं तो मृतदेह सुकुमाराचा नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळं हा मृतदेह नेमका आहे तरी कोणाचा, हा मोठा प्रश्न पोलिसांना पडला होता.

२१ जानेवारी रोजी, चाको नावाचा एक फिल्म रिप्रेझेंन्टेटीव्ह करूवट्टा येथील हरी थिएटरमधून बाहेर पडला होता. त्याचं एका वर्षापूर्वीच लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी संथम्मा गर्भवती होती. आलेपुझ्झाला जाण्यासाठी एखादी गाडी मिळते का? या शोधात चाको रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी सुकुमारा, भास्करा, पोनाप्पन आणि शाहू हे चौघे त्याला भेटले. त्यांनी त्याला लिफ्ट दिली. चाको काहीही विचार न करता ॲम्बेसेडरमध्ये बसला. त्यांनी त्याला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर त्याचा गळा दाबून जीव घेतला.

या ‘चांडाळ चौकडीनं’ चाकोचा मृतदेह भास्करनच्या घरी नेला आणि तिथे त्याचे कपडे बदलून त्याचा चेहरा जाळला. नंतर कार कुन्नमच्या रस्त्यावर नेऊन तिला आग लावली. इकडे संथम्माला, चाको बेपत्ता असल्याची जाणीव उशीरा झाली. कारण, चाको त्याच्या कामानिमित्त कायम बाहेर जात असे. मात्र, जेव्हा तिनं वर्तमानपत्रामध्ये कारमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याच्या बातम्या पाहिल्या तेव्हा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर तिनं आणि चाकोच्या भावानं जाऊन तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. जेव्हा तिला जळालेला मृतदेह पाहण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा, संथम्मानं चाकोच्या अर्धवट जळालेल्या इनरवेअर वरून तो आपला पतीच असल्याची ओळख पटवली.

संथम्माच्या मदतीनं आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मिसिंग डॉट्स जोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुकुमाराचा कट समोर आला. क्राईम ब्रांचनं ही केस आपल्या हातात घेतली. त्यांनी शाहू, भास्करन आणि पोनाप्पन यांना ताब्यात घेतलं. शाहूनं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. तर भास्करन आणि पोनाप्पन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

सुकुमारा कुरूपच्या कुटुंबाला त्यांच्या गुन्ह्याची किंमत मोजावी लागली. त्याची पत्नी सरसम्मा हिची अबू धाबीतील नर्सची नोकरी गेली. त्यांना समाजाने बहिष्कृत केलं होतं. पण या सर्व गोंधळात सुकुमारा कुरूप कुठे होता आणि त्याच काय झालं? पोलिसांनी त्वरीत कारवाई केली असली तरी, सुकुमारा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. तरी तो अनेक राज्यांच्या पोलिसांसाठी एक कोडं बनून राहिला आहे.

त्याला मुंबईत सांताक्रूझ विमानतळाजवळ, भोपाळ याठिकाणी पाहण्यात आलं होतं. पोलिसांनी तिथे त्याचा शोध घेतला. त्यानंतर तो गुजरातमध्ये दिसल्याची टीप हवाई दलाकडून मिळाली होती. म्हणून गुजरातमध्ये देखील त्याचा शोध घेण्यात आला. आजपर्यंत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अगदी २०१० मध्ये त्याच्या मुलाच्या लग्नावर देखील पोलिसांनी पाळत ठेवली होती. मात्र, तो काही हाती लागला नाही.

जवळपास गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून सुकुमारा कुरूप नावाचा हा व्यक्ती पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

वयाच्या पन्नाशीत महिलांचा एक ब्रँड उभा केला, संपत्तीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

Next Post

सेलिब्रिटी किड्स ज्यांनी अभिनय सोडून इतर क्षेत्रात आपला ठसा उमटवला..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सेलिब्रिटी किड्स ज्यांनी अभिनय सोडून इतर क्षेत्रात आपला ठसा उमटवला..!

'फ्रेंच टोस्ट'चा शोध फ्रांसमध्ये लागला असं वाटत असेल तर हा लेख वाचा..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.