आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
वर्तमान भारतात जेवढे शास्त्रं आहे त्याची मुळे भारताच्या वेद आणि उपनिषदांमध्ये आढळून येतात. ज्यावेळी आयुर्वेदावर चर्चा होते, त्यावेळी भगवान धन्वंतरीचे नाव प्रामुख्याने उल्लेखण्यात येते. धन्वंतरींना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. असे म्हणतात की धन्वंतरी त्यांच्या शक्तीच्या बळावर आजारी व्यक्तीला नवजीवन प्रदान करू शकत होते. त्यांच्या औषधाने कुठल्याही रोगापासून सुटका मिळवता येते असे म्हणतात.
हिंदू धर्मशास्त्रात फक्त आयुर्वेदाच्या प्रणालीच्या प्रथम पुरस्कर्त्याला धन्वंतरी म्हटले नसून ज्यांनी हजारो वर्षे आयुर्वेदाचा वारसा चालवला आहे, अशा लोकांना धन्वंतरी संबोधण्यात येते. कालचक्राच्या विभिन्न कालखंडात तीन धन्वंतरी होऊन गेले आहेत. ब्रम्हवैवर्त पुराणांनुसार धन्वंतरीने भगवान सूर्यदेवापासून औषधी विज्ञानाचे धडे गिरवले होते.
पुराणात लिहिले आहे की, धन्वंतरीने या सृष्टीला आयुर्वेदाच्या विज्ञानाची ओळख करून दिली होती. आजही धन्वंतरीची विज्ञानाची देवता म्हणून लोक पूजा अर्चना करतात.
दुसरे काशीनरेश दिवोदास यांना देखील धन्वंतरी मानले जाते. ते भगवान विष्णूचे अवतार होते, असे मानले जाते. दिवोदास यांचा उल्लेख विष्णुपुराण आणि चरक संहितेत करण्यात आला आहे. विष्णुपुराणानुसार दिवोदास धन्वंतरी हे चंद्रवंशीय काशी नरेश होते. त्यांनी आयुर्वेदाचे आठ भागात वर्गीकरण केले होते. यात चिकित्सातत्ववीजनामा, चिकित्सादर्शन यांचे लेखन दिवोदास यांनी केले असल्याचे मानले जाते.
तिसरे धन्वंतरी हे राजा विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. उज्जैनच्या लोकांना उत्तम आरोग्य आणि निरोगी आयुष्य मिळावे यासाठी विक्रमादित्य यांनी त्यांचा आपल्या नवरत्नांमध्ये समावेश केला होता. ‘धन्वंतरी निघांतू’ या आयुर्वेदावरील ग्रंथाचे लेखन याच धन्वंतरीने केले असे मानले जाते. धन्वंतरी निघांतू हे आयुर्वेदावर लिहिलेले सर्वात उत्तम पुस्तक आहे. या पुस्तकाचे तीन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. यात ३७३ प्रकारच्या औषधींचा व रोगांवरील उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी दैत्यांच्या जाचाला कंटाळलेल्या देवतांना अमरत्व प्रदान करण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला. योजनेनुसार असुर आणि देवांनी एकत्रितपणे केलेल्या समुद्र मंथनात भगवान धन्वंतरी हातात अमृतकलश घेऊन प्रकटले होते. धन्वंतरी यांच्या हातात अमृतकलश बघून देवांच्या आणि असुरांच्या मनात अमर होण्याची इच्छा जागृत झाली.
आणि अचानक भगवान धनवंतरीच्या हातातून अमृतकलश चोरून काही राक्षसांनी पळ काढला. देवता आणि असुरांमध्ये सुरु असलेल्या ओढाओढीमध्ये अमृत कलशातुन अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले.
असे म्हणतात की ज्या चार ठिकाणी या अमृताचे थेंब कोसळले होते. त्याठिकाणी आता कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. प्रयाग, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार असे त्या चार ठिकाणांचे नाव आहे. याठिकाणी आळीपाळीने प्रत्येक सहा वर्षांनी अर्धकुंभमेळा, बारा वर्षांनी कुंभमेळा आणि १४४ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित होत असते. गुरु ग्रहाने सूर्याभोवती अर्धी प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर (६ वर्षांनी) अर्धकुंभ मेळा होतो, तर एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर कुंभ मेळा होतो, तर गुरु ग्रहाने सूर्याभोवती १२ प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर महाकुंभ मेळा होतो.
समुद्र मंथनातून प्रकट झाल्यावर धन्वंतरी यांना देवतांचा चिकित्सक म्हणून नेमण्यात आले आणि त्यांना आयुर्वेदाच्या देवतेचा दर्जा मिळाला.
समुद्र मंथनातून प्रकट झाल्यावर भगवान धन्वंतरीला प्रमुख देवता म्हणून मान्यता मिळाली नव्हती. पण भगवान विष्णूंनी त्यांच्यावर पृथ्वीवर आयुर्वेदाचा प्रसार करण्याचे दायित्व सोपविले होते. इसवी सन पूर्व १००० मध्ये दिवोदास या काशीराजाच्या द्वितीय पुत्राच्या रुपात भगवान धन्वंतरीने जन्म घेतला, असे मानले जाते.
जन्मानंतर महर्षी भारद्वाजांकडून त्यांनी आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यांनी पुढे त्याचे आठ भागात विभाजन करून त्याचा प्रचार केला होता. याच काळात सुश्रुताने भगवान धन्वंतरींकडून शल्य चिकित्सेचे ज्ञान प्राप्त केले, असे मानले जाते.
श्रीमद् भागवत पुराणात धन्वंतरींला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. असे म्हणतात की धन्वंतरी हे भगवान विष्णूच्या २४ अवतारांपैकी १२वे अवतार आहेत. गरुडपुराण आणि अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये भगवान धन्वंतरीचा उल्लेख करण्यात आला आहे.
गरुड पुराण, मार्कंडेय पुराण, विष्णु पुराण, ब्रम्ह पुराण याबरोबरच चरक संहिता, धन्वंतरी संहिता, कश्यप संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांगहृदय अशा ग्रंथांमध्ये धन्वंतरींचा उल्लेख करण्यात आला आहे.
पुराणात लिहिले आहे की ब्रम्हदेवाने मनुष्याच्या आधी वेदांची निर्मिती केली होती. याच वेळी अथर्ववेदाच्या रुपात आयुर्वेदाची रचना करण्यात आली आणि धन्वंतरी यांना याचे देवपद बहाल करण्यात आले.
ब्रम्हवैवर्त पुराणानुसार ब्रम्हदेवाने चार वेदांपैकी अथर्ववेदाचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान सूर्य देवाला दिले. सुर्यदेवाने त्या ज्ञानाच्या आधारावर स्वत:ची एक संहिता रचली. जीचे ज्ञान त्यांनी आपल्या १६ शिष्यांना दिले. यापैकी एक शिष्य धन्वंतरी होता.
अजून एका लोककथेनुसार भगवान ब्रम्हदेवाने वेद पुराणांचे ज्ञान सर्वप्रथम त्याचा पुत्र प्रजापती दक्ष याला दिले. त्याने ते ज्ञान अश्विनीकुमारांना दिले. इंद्राने आश्विनीकुमारांकडून ते ज्ञान मिळवले व त्याने ते ज्ञान धनवंतरीला दिले. ते ज्ञान घेऊन धन्वंतरी पृथ्वीवर प्रकट झाले.
दिवाळीच्या दिवसांत, धत्रयोदशीला भगवान धन्वंतरींचा आजपासून तब्बल ७००० हजार वर्षांपूर्वी जन्म झाला होता असे मानले जाते. त्यामुळे आपल्याकडे धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात येते. कार्तिक मासाच्या कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटले जाते. यादिवशी पूजापाठ करण्यात येतात. उत्तर भारतात भगवान धन्वंतरीचे एकही देऊळ नाही. पण दक्षिण भारतात विशेषतः केरळ आणि तमिळनाडू या भागात भगवान धन्वंतरीचे देऊळ आहे. लोक या देवळांमध्ये उत्तम आरोग्य व निरोगी आयुष्यासाठी कामना करत असतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










