आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गाव म्हणून त्यासोबत एक विशिष्ठ अशी संथ जीवनशैली असते. फार काही घाई नसते, आणि वर्षानुवर्षे उगळलेली तीच तीच दुःख असतात. प्रत्येकाला आधार हवा असतो तरीही प्रत्येकात स्वाभिमान जिवंत असतो. पैसा हे परिमाण एका मर्यादित अंतरापर्यंतच चालतं, तिथून पुढं भाऊबंदकी, तत्व, धर्म या गोष्टींना अमाप महत्व देणारी ही लोकं असतात.
प्रत्येकाला वारसा असतो, प्रत्येकजण अस्मितावादी असतो. अशा सगळ्या ऑथेंटिक ग्रामीण गोष्टींचा अंतर्भाव असल्याने “बनगरवाडी” हा चित्रपट तांत्रिक गोष्टींचा विसर पाडून आपल्याला कथेत अडकवुन धरतो. चित्रपट व्यंकटेश माडगूळकरांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण भागाचं सगळ्यात समर्पक प्रतिबिंब आहे असं बऱ्याच वाचकांकडून मी ऐकलंय.

चित्रपट मास्तरच्या भूमिकेत असणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णीच्या भोवती फिरत असतो. या गावात त्याची बदली झाल्यापासून कथा पुढे सरकते. एक छोटं धनगर समाजाचं गाव कम वस्ती म्हणता येईल अशा बनगरवाडीत लोक पशुपालन आणि शेतीवर अतिसामान्य आयुष्य जगत असतात. चंद्रकांत मंदारे यांनी कारभारीची (गावचा प्रमुख) भूमिका चोख बजावलीये.

या कारभारीच्या मदतीने मास्तर त्याच्या पातळीवर शाळा सांभाळून गावातले प्रश्न हाताळत असतो. कोणाला बंद झालेली नाणी बदलून पाहिजेत, कोणाचा एक बैल मेलाय, कोणाला सहारा नाही, शिक्षणासाठी मदत, तर कोणाची फक्त करमणूक असा बहुउपयोगी माणूस म्हणजे हा मास्तर, सगळ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील.
आयबु, चंद्रा, यांची पात्रं मुख्य प्रवाहाला आधार म्हणून काम करतात. यातल्या प्रत्येक पात्राचा आयुष्याकडे बघण्याचा असा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे, आणि तो कथा पुढे सरकताना आपल्याला समजत जातो.
गावातला प्रत्येक जण आपाआपल्या दृष्टीकोनाची भर कथेत घालतो. मास्तरच्या नजरेतून आपण प्रेक्षक म्हणून त्याची सहज प्रतिक्रिया बनतो, म्हणूनच आपण कथेत गुंतत जातो आणि चित्रपट संपल्यावर त्याचा विचार करताना या गोष्टी सापडतात.
मानवी स्वभावाच्या सहज भावना, प्रतिक्रियांतुन कथा फुलते. “चित्रपटाची कथा” म्हणून घटनाक्रमात येणारे काही चढउतार बाजूला ठेवले तर चढउतार ज्या संवादातून समोर येतात ते अत्यंत नैसर्गिक वाटतं. सटलनेसचं उत्तम उदाहरण म्हणजे या चित्रपटाचा प्रवाहीपणा.
अधिश्री अत्रे हिने अंजिची भूमिका साकारली आहे. ग्रामीण तरुणीचं अवास्तव चित्रण करण्याचा ट्रेंड सध्या सुरू असताना हे पात्रं आपल्याला वास्तवाच्या जवळ घेऊन जातं.
किशोर कदम यांनी रामा हे पात्र साकारलं आहे. उपेंद्र लिमयेने साकारलेलं शेकूचं पात्र तर बऱ्याच स्थित्यंतरातून जातं. किंबहुना यातील प्रत्येकच पात्र साकारणारा नट आज प्रस्थापित मराठी नट आहे.
यातला प्रत्येकाचा अभिनय उत्कृष्ट पातळीचा झालाय. एका पॉईंटला तर मी शॉक झालो की एवढे कौशल्यपूर्ण नट आपल्याकडे असताना अजूनही आपल्याकडे त्याप्रमाणात चांगले सिनेमे का बनत नाहीत? हा चित्रपट म्हणजे अभिनयाचा खजाना आहे.
तरीही विशेष आकर्षण म्हणजे चंद्रकांत मंदारेने साकारलेली कारभारीची भूमिका. नटाचा संयम कसा असावा याच ते उत्तम उदाहरण. बाकी सगळी पात्रं मला उत्तम साकारलेली वाटली पण हे पात्रं म्हणजे त्या व्यक्तीशी पूर्णपणे समरूप झालेलं वाटलं. बाकीच्यांच्या बोलण्यातला लेहजा जरासा नाटकी वाटतो पण या पात्राची भाषा आपल्या ऐकण्यातली वाटते. बॉडी लँग्वेज सोबतच कुठं अभिनय नकरता फक्त स्क्रीनवर दिसायचंय, ऐकायचंय हे या नटाला चपखल जमलंय.
जास्त पात्रं असणारे चित्रपट बरेच आहेत पण लगानपेक्षाही या चित्रपटातले सगळेच पात्रं विशेष लक्ष देऊन लिहिले गेलेत, हे एक दुर्मिळ समीकरण आहे.
चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे आणि याची कथा, कॅरॅक्टरायझेशन, अभिनय या गोष्टी तांत्रिक चुकांवर पांघरून घालतात. म्हणून या चुकांबद्दल नको लिहायला असं वाटतं.
1995 ला प्रदर्शित झालेला असल्याने त्या काळाच्या मर्यादेनुसार काही कमी महत्वाच्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही तरी खटकणाऱ्या चुका सांगणं अपरिहार्य वाटतं. पुस्तक आणि चित्रपट यातला फरक दिग्दर्शकाने तितकासा विचारात घेतलेला दिसत नाही.
पुस्तकात एक संवाद वाचून झाल्यावर दुसरा संवाद असतो. चित्रपटात जर विषय गंभीर असेल तर समोरचं पात्र तुमचे अवघड, गंभीर डायलॉग संपण्याची वाट बघणार नाही तो थांबवले, अडवेल. तसं बनगरवाडीत होत नाही. गाव आपल्या समोर तितकंसं नीट साकारलं जात नाही. अमोल पालेकरसारखा ग्रेट दिग्दर्शक असल्याने अपेक्षाही वाढलेल्या असतात.
शेवटचा सीन धीरगंभीर करतो. चित्रपट संपल्यावर तो आपल्यासोबत बराच काळ टिकतो. बनगरवाडीबद्दलची आपली उत्सुकता वाढते. त्या दुर्दैवी काळात घडलेला हा घटनाक्रम आपल्याला चकीत तर करतोच पण त्यात असणारं सौंदर्यही आपल्या मनात घर करतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









