आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
साल १९८८.
हंगेरीमध्ये त्यावेळी कम्युनिसझमचं वारं वाहत होतं. लोकशाहीचा त्यामुळं तसा पत्ताच नव्हता. त्यावेळी एका २५ वर्षांच्या ‘अँग्री यंग मॅन’नं त्यावेळच्या सगळ्यात धनाढ्य माणसाला, म्हणजेच जॉर्ज सोरोसला (तेच, ज्यांनी ब्लॅक वेन्सडेला बँक ऑफ इंग्लंडला मातीत घातलं होतं) एक पत्र लिहिलं, अर्थात आर्थिक मदतीसाठी. त्यात लिहिलं होतं, की हंगेरीतली हुकूमशाही लवकरच संपणार आहे आणि त्यासाठी तुमची मदत लागणार आहे.
दि. १६ जून १९८९.
एव्हाना हंगेरीयन लोक कम्युनिसझमविरुद्ध पेटून उठले होते. सगळीकडं हुकूमशाही विरोधात वातावरण पेटलं होतं. सोव्हिएत विरोधात राजधानी बुडापेस्टच्या हिरोज स्क्वेअरजवळ अडीच लाख लोक निदर्शनं करत होते. त्याच समुदायासमोर त्या ‘अँग्री यंग मॅन’नं साडे सहा मिनिटांचं तडफदार भाषण देताना निष्पक्ष निवडणूक घेऊन सोव्हिएतच्या सैन्याला देशाबाहेर जायला सांगितलं.
काही दिवसांतच हंगेरीत लोकशाही प्रस्थापित होते आणि हा मुलगा रातोरात प्रसिद्ध होतो. यथावकाश राजकारणात येतो, तिथल्या ‘फिडेस पार्टी’चा मुख्य होतो, आणि पुढं काळाच्या ओघातबरोबर नऊ वर्षांनी, १९९८ साली देशाचा पंतप्रधान होतो. तोच मुलगा, ज्याला वयाच्या १५ व्या वर्षी अंघोळीला पहिल्यांदा गरम पाणी आणि ४ भिंतींचं बाथरूम मिळालं होतं.
नाव व्हिक्टर ओर्बन.
सोव्हिएतमधून बाहेर पडत असताना त्यावेळी हंगेरीतले सगळेच पक्ष डाव्या विचारसरणीचे. पण एखाद्या हुशार कॅप्टननं अचानक वेगळाच बॉलर आणावा, तसं, काहीतरी वेगळं म्हणून आणि कट्टरपंथी मतांवर डोळा ठेऊन ओर्बन यांनी चक्क विचारसरणीचं तोंडच उजवीकडं फिरवलं. आणि ती रुजवण्यासाठी शक्य ते सगळं केलं.
एवढंच नाही तर, १९८६ मध्ये कोर्टात लग्न झालं असतानाही त्यांनी परत १९९६ साली पत्नीशी पुन्हा धार्मिक रितीरिवाजात लग्न केलं. हे सगळं बरोबर दिशेनं गेलं, आणि १९९८ साली ते पंतप्रधान झाले. तिथला कार्यकाळ ४ वर्षांचा असतो.
पुढं २००२, २००६ च्या निवणुकात त्यांनी अपयश बघितलं. २००८ ची मंदी त्यांच्या पथ्यावर पडली, आणि आर्थिक घडी परत बसवण्याचं आश्वासन देऊन २०१० साली परत पंतप्रधान झाले, ते अगदी आजपर्यंत.
२०१० पासून आजतागायत त्यांनी ‘सॉफ्ट ऑटोक्रसी’ करत मीडियापासून न्यायव्यवस्था आणि हळूहळू लोकशाहीच ताब्यात घेतली. दरम्यान त्यांना जग युरोपियन युनियनमधला सगळ्यात खतरनाक माणूस म्हणून ओळखू लागले होतेच.
आणि मग ह्या सगळ्यांत उजाडतं २०२०. चीनच्या वूहानपासून सुरू झालेल्या कोरोनानं एकेक करत सगळं जग कव्हर केलं. सगळे देश लॉकडाऊन झाले. सगळं जग काळजी करत असताना, कोरोनाशी यथाशक्ती लढत असताना, ३० मार्चला व्हिक्टर ओर्बन यांनी देशात आणीबाणी लागू केली.
निमित्त कोरोनाचं असलं, तरी हे एक दिवस होणार, हे नक्की होतं. त्यांनी आता देशाची लोकशाही संपुष्टात आणली आहे. संसद विसर्जित केली. ते आता अनिश्चित काळासाठी देशाचे एकाधिकारशाहीनं सर्वशक्तिमान पंतप्रधान, म्हणजेच हुकूमशहा असतील.
ज्या मुलानं १९८८ साली हुकूमशाही उलथवून लोकशाहीचं स्वप्नं बघितलं होतं, तोच मुलगा आज आडवयात लोकशाहीचा बिमोड करून हुकूमशहा झालाय. देशाच्या हितापेक्षा माणसाचं व्यक्तिगत हित ज्याक्षणी मोठं होतं, त्या क्षणापासून वाताहतीला सुरुवात होती. व्हिक्टर ओर्बन चूक की बरोबर हे येणार काळ सांगेलच, पण तोपर्यंत अजून एखादा लोकशाहीचं स्वप्नं बघणारा १९८८ चा व्हिक्टर ओर्बन काळाच्या पोटात तयार होत असेल, हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









