The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठवाड्याच्या धुळीत अत्रे साहेबांनी दिलेला वसा पुलंनी आयुष्यभर टाकला नाही

by द पोस्टमन टीम
7 November 2024
in ब्लॉग
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


पु. ल. देशपांडेंचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचं कारंजं सुरू होतं. वक्तृत्त्व, साहित्य, नाट्य, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणार्‍या पुलंनी, तुकोबांच्या “सेवितो हा रस वाटितो आणिकां ।” या उक्तीप्रमाणे स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंना ‘आनंदयात्री’ म्हणतो. श्री. म. माटे मास्तर म्हणत, ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.’ महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही. इतकं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही कायम आहे.

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ‘काय हे मराठवाड्यातले रस्ते आणि काय ही धूळ! या धुळीनेच मी हैराण झालो आहे.’

नंतर पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही. अशा मराठवाड्यात अत्रे साहेब आपण आहात.’ लोकांनी टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट केला.

सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे’’. आचार्य अत्रेंचे शब्द खरे ठरले. अत्रेंच्या नंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.

पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर, १९१९ रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाव जवळच्या चंदगड गावचे. त्यांचं घराणं बेळगावजवळच्या जंगमहट्टीचं. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते ते कदाचित यामुळेच असेल.



पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी ‘ऋग्वेदी’ या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी ‘आर्यांच्या सणाचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले.  नातवाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि मुलाने गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.

शाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिलं होतं. ‘आजोबा हरले’ नावाचं प्रहसन लिहिलं होतं. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटकं लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टींतून पुलंचं व्यक्तिमत्त्व विकसित होत गेलं. १९४१ साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिर्‍हाड आवरून पुण्याला स्थलांतरीत व्हावे लागले.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

१९४२ साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्याकाळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. १९५० साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती विद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. १९४३ साली बडोद्याच्या अभिरूची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकीर्द सुरू झाली.

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पु.ल. काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘कुबेर’ या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. ‘जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा’ हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकीर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटांत कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात पुलंची कामगिरी घडली.

‘तुका म्हणे आता’ हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग १९४८ साली पुण्यात झाला पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन ‘वसंत’ होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही असं पु.ल. म्हणत. त्यानंतर अंमलदार हे नाटक आलं, ‘तुका म्हणे आता’ हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. अंमलदार हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असं पु.ल. म्हणाले.

२६ जानेवारी, १९५७ रोजी ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तीॆमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या भाग्यवान, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, एक झुंज वार्‍याशी, ती फुलराणी, राजा ओयरीपौस यांसारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही. आपल्याला जे आवडते तेच लोकापर्यंत पोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता.

पुल स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते. म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले. १९५५ साली पुल आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रूजू झाले. १९५१ ते १९६१ या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकीर्द संस्मरणीय ठरली. याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून ‘बटाट्याच्या चाळी’तल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. ते खूप गाजत होते. १९५८ साली मौज प्रकाशनगृहाने ‘बटाट्याची चाळ’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध केले.

पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात बटाट्याची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन त्यांनी केले. त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ प्रत्यक्ष अवतरली. पुढे वार्‍यावरची वरात, असा मी असामी, वटवट, हसवणूकच्या माध्यामातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. ‘बटाट्याची चाळ’मधून पन्नास-साठ बिर्‍हाडांचा एक मानस समूह त्यांनी निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची त्यांनी मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

एका व्यक्तिला चारच तिकीटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुल आणि सुनीताबाई दोघेही खूप दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये. याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. ‘रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये’ अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ‘पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखे आहे’ असं पुल म्हणत.

त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रूपये तिकिट ठेवले असते तरी लोक आले असते पण पुलंनी पाच रूपयेच तिकिट ठेवले. ‘बटाट्याची चाळ’ फॉर्मात असतानाच पुलंनी ‘वार्‍यावरची वरात’चे प्रयोग सुरू केले. नवे-नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, दम लागतोय हे लक्षात येताच त्यांनी प्रयोग बंद केले. सदाभिरूची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली.

‘गर्दी खेचण्यासाठी सदाभिरूचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते’ हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरूचीवर स्वार होणार्‍या कलावंताना खूप काही सांगणारे आहे.

इंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले ‘अपूर्वाई’ हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाले. १९६० मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर आलेल्या ‘पूर्वरंग’, ‘जावे त्यांच्या देशा’, ‘व्यंगचित्रे’ या प्रवास वर्णनांतून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला. पुल गुणग्राहक होते. चांगलं काम करणार्‍या सर्व क्षेत्रांतील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रं लिहिली ती – ‘व्यक्ती आणि वल्ली’, गणगोत, गुण गाईन आवडी आणि मैत्री या पुस्तकात संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रं शब्दशिल्पच आहेत.

‘माझं पहिलं प्रेम संगीतावर आहे’ हे पुलंनी अनेकदा सांगितलं. संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो त्याची सर दुसर्‍या कशालाही नाही असं पुल म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुल म्हणाले, ‘‘माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडं पुरेसं लक्ष देता आलं नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर ‘याने कुमारगंधर्वांचे गाणे ऐकले आहे’ एवढेच लिहा.’’

पुलंच्या वाढदिवसाला किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ‘पुल तुमच्यासाठी काय करू?’ पुलं म्हणाले, ‘‘गा’’. किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या. पुल म्हणत, ‘‘कालचक्राबरोबर फिरणारं ध्वनीचक्र माझ्या मनात नेमकं राहतं. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने! ज्या वयात लहान मुलांचं प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचं, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये, ते गात असलेल्या अभंग, श्‍लोक, आर्या यांच्या गायनामध्ये असायचे.’’

पुल समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ‘माझ्या हातात प्रथम पेटी पडली त्याऐवजी सतार पडली असती तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती. पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ‘‘मी इथं अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.’’

गीतरामायणात व्हायोलिन वाजविणार्‍या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला तेव्हा पुल म्हणाले, ‘‘माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीतरामायणात ऐकलं होतं पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलिन ऐकल्यानंतर समजलं.’’

संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येतं. पुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरावरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरं चित्रपटगीतासाठीचं. पुलंनी बोलपटातील ८८ गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्सर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना, सुरांवर तरंगतात. त्यात बुडून जात नाहीत, म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडतं, हे पुलंच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे.

पुलंच्या सर्व आविष्कारांमध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचं आणि विनोदबुद्धीचं मर्म प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणानं उलगडलं. त्या सांगतात, ‘‘पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुल स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले.’’ पुलंची दृकसंवेदना, नाट्यसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती तर ती अनेकांगी आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचं साहित्य अनुभवसमृद्ध आहे.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रातील संदर्भांची समृद्धी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळं पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायु*द्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणार्‍या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसं पुलंचं लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळं ढाकळं केलं. जीवनोन्मुख केलं.

खोगीरभरती, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक, खिल्ली, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकापर्यत पोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केलं ते रसिक मनांचा ठाव घेणारं ठरलं. जीवनातील विसंगती आणि विकृतीकडं त्या बुद्धीनं पाहणार्‍या पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विनोदानं कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारलं नाही आणि रक्तही काढलं नाही.

पुलंच्या विनोदानं मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेनं चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीनं जावं तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडं आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपं पुलंवर प्रसन्न होती. बोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणं सहज उसळून येत असे. याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणापासूनच येत होता.

पुलं दहा-अकरा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळकमंदिरात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांचे ‘गर्व्हमेंट ऑफ इंडिया ॲक्ट’ या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंका निरसनासाठी प्रश्न-उत्तरं सुरू झाली. पुलं म्हणाले, ‘‘फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का?’’ पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ‘‘बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे?’’ त्यावर न. चिं. केळकर यांनाही हसू आवरलं नाही.

पुलंनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. एका मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ‘‘यांचं मन वकिलीत रमलं नाही.’’ त्यावर पुलं म्हणाले, ‘‘माझं मन वकिलीत रमलं नाही असं म्हणण्यापेक्षा अशिलाचं मन माझ्यात रमलं नाही असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. ’’

पुल आणि सुनीताबाईंनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा. सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन पुल आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडंस काहीतरी खायला लागायचं. तशा सूचना त्यांनी संयोजकांना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुल म्हणाले, ‘‘लोक ‘मर्ढेकर’ ऐकायला आले आहेत. ‘ढेकर’  ऐकायला नाही.’’

विजापूरला शाळेत पुलंचं भाषण होतं. टेबलावर पाणी नव्हतं. पुलंना ते हवं होतं. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ‘‘पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.’’ जालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ‘‘येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.’’ पुलंच्या लेखनाकडं आणि भाषणाकडं गांभीर्यानं पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, मराठी भाषेवर पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स. ह. देशपांडे म्हणतात, ‘‘पुलंचे भाषेवर प्रेम आहे तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे.’’

पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अनेक भाषांतले त्या स्मारकाजवळ माहिती देणारे फलक होते, पण मराठीतला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीतला फलक स्वत: लिहिला.

पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचं मानवीकरण हे पुलंच्या शैलीचं वैशिष्ट्य होतं. समाजात ज्यावेळी कसोटीचे प्रसंग येतात तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडं मोठ्या आशेनं पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचं सत्त्व पणाला लागलेलं असतं. आज कोणतीही भूमिका न घेणं, एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला पण त्यात तथ्य नव्हतं.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुल करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. या गोष्टीची पुल आणि सुनीताबाईंनी कधीही जाहिरात केली नाही. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही वीस अध्यायाची गीता आहे.’ त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ‘ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजय उवाच आहे.’ त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ‘यांना आता कंठ फुटला आहे.’ पुलं म्हणाले, ‘गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार?’ आपली ठाम भूमिका पुलंनी नेहमीच स्पष्टपणे मांडली.

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांत जनता पक्षाचा विजय झाला. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचं नाव वक्ता म्हणून बोलणार्‍यांच्या यादी टाकण्यात आलं होतं. लोकाग्रहाला पुलंनी बळी पडू नये असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली. पुल लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते.

जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का? असा विचार दुसर्‍या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचं ते घडून गेलं आहे. त्याचं चर्वितचर्वण कशाला? असा विचारही मनात आला असता पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही.

पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, त्यांच्या माणसं जोडण्याच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारं पुलंचं दर्शन आणि पती म्हणून घडणारं पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचं तेज लुप्त होऊन जातं. मग त्या तेजाचं लुप्त होणं हा कौतुकाचा विषय होतो. ‘पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन’ या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या, ते या पुस्तकात वाचायला मिळतं.

पुलंच्याकडं अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडं व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचं लेणं त्यांच्याकडेही होतं. पुलंचं यश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हे मात्र निर्विवाद. पुण्यात २००२ साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारलं. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्‍वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचं स्थान अगदी वरचं आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केलं त्याबद्दल मराठी माणसं नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळंच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुल आणि सुनीताबाईंनी केवळ भांड्याकुंड्यांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळंच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली.

पुलंची जयंती साजरी होत असताना सुनीताबाईंचं स्मरण केलं नाही तर ती कृतघ्नता ठरेल. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि भरभरून आनंद दिला. त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘विनोदबुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना नामोहरम करता येतं’ हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितलं.

भाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपात वावरणारे पु. ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातलं दु:खं नाहीसं करता येत नाही पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ अशा सगळ्या गोष्टींचा ध्यास होता. स्वत: पुलंना इतरांना फुलवायचं आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवलं नाही. उलट समाजाकडून घेतलेलं समाजालाच वाटून टाकलं. पुलंची जयंती साजरी करत असताना ही ‘पुलकितवृत्ती’ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर ते पुलंचं कृतज्ञ भावनेनं केलेलं खरं स्मरण ठरेल.

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
९८५०२७०८२३

सदर लेख साप्ताहिक ‘चपराक’मध्ये पूर्वप्रकाशित आहे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: pulapula deshpande
ShareTweet
Previous Post

अमेरिकेत या १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला गुन्ह्याच्या संशयावरून मृत्युदंडाची शिक्षा दिली होती

Next Post

चीनला कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानने बनवलेला प्लॅन नेहरूंनी धुडकावून लावला होता.

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

चीनला कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानने बनवलेला प्लॅन नेहरूंनी धुडकावून लावला होता.

काय आहे तामिळनाडूमधील मंदिरावर कोरलेल्या सायकलस्वाराच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.