The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

by Nitten Gokhaley
1 July 2026
in ब्लॉग, मनोरंजन, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


 

खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या मित्राला वाचवण्यासाठी राम गोपाल वर्मांनी चक्क ‘अंडरवर्ल्ड’ची मदत घेतली होती?

 

२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘फूँक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कोणताही बॉक्स ऑफिस हिट दिलेला नाही. तरीही, त्यांच्या मुलाखतींना लाखो व्ह्यूज मिळतात. याचे कारण काय? वर्मा त्यांच्या १९९० पासून २००५ पर्यंतच्या काळातील रंजक गोष्टी आणि आठवणी मुलाखतींमध्ये प्रेक्षकांसमोर मांडतात. त्याकाळात मुंबई पोलीस दलात त्यांचे अनेक मित्र असल्यामुळे त्यांना अंडरवर्ल्डच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती मिळत राहायची. यामुळे ते आजदेखील देशातील जनतेला माहिती नसलेले भूतकाळातील किस्से सांगत असतात. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हुसेन जैदी यांच्याशी झालेल्या अलीकडील संभाषणात, वर्मा यांनी एक रंजक किस्सा सांगितला.

त्यांच्या एका निर्दोष मित्रावर पत्नीकडून ‘४९८-अ’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा चक्क

अंडरवर्ल्डने मदत केल्याने मित्राला पटकन जामीन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक जाणून घेऊया.

 

४९८-अ ची पार्श्वभूमी

 

महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी, कलम ४९८-अ (जे आता बीएनएस कलम ८५ आणि ८६ आहे)  ची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या वाढत्या घटनांमुळे १९८३ मध्ये हा कायदा आणण्यात आला. सुरुवातीच्या काळात कुटुंबातील महिलांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यापासून पती आणि सासरच्या मंडळींना रोखण्यासाठी या कलमाचा चांगला उपयोग झाला. पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून पत्नीला दिली जाणारी क्रूर वागणूक, मारहाण, शारीरिक व मानसिक छळ, तसेच हुंडा किंवा मालमत्तेसाठी होणाऱ्या छळाविरुद्ध कलम ४९८-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. या कलमांतर्गत महिलेची तक्रार लिहून घेण्यास नकार दिल्यास पोलिसांवर देखील कठोर कारवाई होऊ शकते. ४९८-अ अंतर्गत नोंदवलेले गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतात. त्यामुळे, पोलीस आरोपींना वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि आरोपींना न्यायालयात स्वतःची निर्दोषता सिद्ध करावी लागते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये या कलमांतर्गत १.३३ लाख गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये अशा प्रकरणांची संख्या १.२० लाख इतकी होती. तथापि, या प्रकरणांमधील दोषसिद्धीचा दर (कन्विक्शन रेट) ४ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. न्यायालयात पती आणि त्यांच्या नातेवाईकांना दोषी ठरवण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. काही प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटवली जातात, तर काही कोर्टामार्फत पुराव्याअभावी रद्द केली जातात. सर्वोच्च न्यायालयाने पतीला त्रास देण्यासाठी पत्नींकडून या कलमाचा केला जाणारा गैरवापर म्हणजे “कायदेशीर दहशतवाद” असल्याचे म्हटले आहे. तरीही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्वच प्रकरणे खोटी असतात असे नाही.

 



खोट्या प्रकरणात अडकवलेल्या नवऱ्याला अंडरवर्ल्डची मिळाली मदत?

 

“माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राचा मला मध्यरात्री फोन आला. त्याने सांगितले की त्याच्या पत्नीने घरगुती छळाचा आरोप करत त्याच्यावर ४९८-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे त्याला आणि त्याच्या पालकांना थेट तुरुंगात पाठवले जाऊ शकते. म्हणून त्याला मदत करण्यासाठी, मी त्याकाळात वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या माझ्या मित्राला फोन केला. केसमध्ये अडकलेल्या माझ्या मित्राचे नाव सांगून परिस्थिती समजावून सांगितली आणि मदत करण्याची विनंती केली. सर्व काही ऐकल्यावर त्या पोलीस अधिकाऱ्याने माझ्या मित्राला त्याचा फोन बंद करून लोणावळा किंवा शहराबाहेर कुठेतरी निघून जाण्यास सांगितले. थोडा वेळ मिळाल्यावर ‘अँटिसिपेटरी बेल’ (अटकपूर्व जामीन) मिळवून घेण्यासाठी एखादा चांगला वकील शोधता येईल, असे तो म्हणाला. मला वाटले की केवळ एका फोन कॉलने हे प्रकरण न्यायालयात न जाता सुटेल. म्हणून, मी त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला खात्री दिली की माझा मित्र खूप चांगला माणूस आहे आणि त्याचे चारित्र्य निष्कलंक आहे. त्यावर तो अधिकारी म्हणाला, ‘तुम्ही त्याला घराबाहेर, अर्थात समाजात ओळखता, पण तोच मित्र घरात बायकोशी कसा वागतो हे आपल्याला माहीत नाही.’ म्हणूनच मदत म्हणून तो फार फार तर ‘अँटिसिपेटरी बेल’साठी चांगला वकील मिळवून देण्यास मदत करू शकत होता. यामुळे मी निराश झालो आणि अजून एका मित्राला मदतीसाठी फोन केला. तो तेव्हा मुंबई पोलीस स्पेशल स्क्वॅडमधून काही कारणांमुळे निलंबित होता. त्याने प्रकरण शांतपणे ऐकून घेतले आणि मला थोड्या वेळाने फोन करतो असे सांगितले. त्याने अंडरवर्ल्डमधील कुणालातरी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला फोन करायला लावला. केसची माहिती घेऊन मित्राच्या तक्रारदार पत्नीने नियुक्त केलेल्या वकिलाला फोन केला. वकिलाला थोडी धमकी तसेच थोडे पैसे देऊन कोर्टात सहज जामीन मिळण्याकरिता न्यायालयात सुनावणीदरम्यान बायकोची बाजू कमकुवतपणे मांडण्यास प्रवृत्त केले. कोर्टात जामीन मंजूर सुद्धा झाला. या कथेचे तात्पर्य असे की, ४९८-अ हे कलम इतके प्रभावी आहे की एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्यात काही करू शकत नाही. या कलमाचा गैरवापर करून कुणाला अटक होत असल्यास तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काहीच करू शकत नाही. इथेच ‘अंडरवर्ल्ड’ कामी येते, कारण ते कायदा आणि यंत्रणेच्या आवाक्याबाहेर जाऊन काम करतात. केवळ एखादा गुंडच वकिलाला धमकावू शकतो, कारण तो यंत्रणेच्या चौकटीबाहेर राहून काम करत असतो,” असे राम गोपाल वर्मा म्हणाले.

हे देखील वाचा

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

 

व्यवस्थेबाहेर राहून इतरांना मदत करण्याची क्षमता

 

मुंबई साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी (१९९३) लोक अंडरवर्ल्डकडे मदतीसाठी का धाव घ्यायचे. वर्मा यांच्या मते, या अंडरवर्ल्ड डॉन्सची प्रतिमा ‘रॉबिन हूड’ सारखी असायची. सरकारला जी कामे करणे शक्य नसायचे, ती कामे हे लोक इतरांसाठी करायचे. अगदी राजकारणी आणि पोलीसांनाही अंडरवर्ल्डची गरज भासायची, कारण त्यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काही गोष्टी कराव्या लागायच्या. उदाहरणार्थ, आजसुद्धा न्यायालयीन प्रक्रियेद्वारे भाड्याने दिलेले एखादे घर रिकामे करायचे झाल्यास त्याला कित्येक वर्षे लागतात. याउलट, एखादा अंडरवर्ल्ड डॉन ते घर अवघ्या एक-दोन दिवसांत रिकामे करून देऊ शकायचा. त्यांच्या कार्यपद्धती बेकायदेशीर होत्या, पण लोकांना मदत केल्यामुळे त्यांना प्रेम आणि प्रशंसा मिळायची. लोक अनेकदा या प्रभावशाली व्यक्तींना ‘भाई’ म्हणून संबोधत असत. अशा व्यक्तींशी संबंध जोडणे लोकांना आवडायचे. एखाद्या अंडरवर्ल्ड डॉनशी ओळख असणे म्हणजे स्वतःकडे बंदूक असण्यासारखे होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटांपूर्वी, चित्रपटसृष्टीतील कलाकार अंडरवर्ल्डशी असलेले संबंध म्हणजे काहीतरी वाईट असल्यासारखे मुळीच पाहत नसत. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री दुबईतील ‘डी-कंपनी’च्या कार्यक्रमांना हजेरी देखील लावायचे. परंतु १९९३ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारे काही बदलले. अंडरवर्ल्डच्या स्फोटातील भूमिकेमुळे लोकांना भाईंशी संबंध असणे म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध असल्यासारखे वाटू लागले.

 

एकूणच, कलम ४९८-अ सारखे कडक कायदे पीडितांच्या रक्षणासाठी बनवले गेले असले, तरी त्यांच्या गैरवापरामुळे निर्दोष व्यक्तींची कोंडी होते. राम गोपाल वर्मा यांनी मुलाखतीत सांगितलेला किस्सा केवळ एक रंजक आठवण नसून, तो देशातील पोलीस आणि न्यायव्यवस्था अधिक जलद, पारदर्शक तसेच निष्पक्ष बनवण्याच्या गरजेकडे लक्ष वेधून घेतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: 498a misuseanticipatory bailbns section 85bns section 86bombay mafiaconviction ratecourt baild companydomestic violence lawextortionfake dowry casehusain zaidiindian judiciarylaw vs underworldlegal terrorismmumbai policencrb datapolice special squadram gopal varmargv interviewunderworld help
ShareTweet
Previous Post

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

Related Posts

विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
ब्लॉग

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.