आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय संस्कृतीशी आपलं नातं सांगणाऱ्या हिंदू धर्मात मद्य अर्थात दारू ही वर्ज्य नसली तरी तिला कायमच अनैतिकतेच्या घेऱ्यात अडकवलं जातं. दारू ही मंगलप्रसंगी प्यायची चीज नाही, असं वारंवार ठसवलंही जातं आणि तिला अमंगल, अपवित्रही ठरवलं जातं. हीच दारू वेगळ्या स्वरुपात प्रसाद म्हणूनही चालते पण पुन्हा तिला ‘धर्मग्रंथां’त न सांगितलेल्या रुढींचा एक भाग म्हणून कोंदण लावलं जातं ते वेगळंच!
सुरा, सोमरस अश्या ‘गोंडस’ नावांनी धर्मग्रंथांमध्ये वर्णिली गेलेली दारू आज रम, व्हिस्की, वाईन, बिअर अश्या नावांनी बाजारात सहज मिळते. अश्याच एका सुप्रसिद्ध कंपनीने हिंदू धर्मातील पवित्र आणि पूज्य चिन्हांपैकी एक असलेल्या ‘स्वस्तिक’ या चिन्हाचा वापर आपला लोगो म्हणून केल्याची इतिहासात नोंद आहे. चला तर, जाणून घेऊयात या कंपनीविषयी!
या कंपनीचं नाव आहे ‘कार्ल्सबर्ग’! मूळचा डेन्मार्कचा रहिवासी असलेल्या जेकब सी. जेकबसन या कलाप्रेमी आणि दानशूर व्यक्तीने १८४७मध्ये या बिअरचा पहिला अर्क बनवला आणि तब्बल २१ वर्षांनी तो स्कॉटलंडमध्ये निर्यात करण्यात आला. आजच्या घडीला ही पेल लेगर बिअर सुमारे १४०हून अधिक देशांमध्ये विकली जाते.
जेकबने या बिअरचं नाव कार्ल या आपल्या पहिल्या मुलावरून ठेवलं होतं. जेकब हा काही प्रोफेशनल मद्यनिर्माता नसला तरी त्याला या विषयात प्रचंड रस असल्याने तो नवनवीन प्रयोग करत राहिला. १८७५ मध्ये जेकबने आपल्या ब्रँडवर अधिक संशोधन व्हावे आणि त्याची गुणवत्ता सुधारावी या हेतूने ‘कार्ल्सबर्ग’ लॅबोरेटरी उभारली. कालांतराने कोपनहेगनच्या अंगणात सुरु झालेला हा व्यवसाय जेकबने वृद्धिंगत केला आणि १८७६मध्ये ‘कार्ल्सबर्ग फाउंडेशन’ नावाची एक संस्था स्थापन करून तिच्यावर या व्यवसायाचा कार्यभार सोपवला.
या संस्थेमध्ये ‘रॉयल डॅनिश ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स’मधील विश्वस्तांचा समावेश होता. वास्तविक जेकबच्या पश्चात त्याच्या या व्यवसायाची जबाबदारी त्याच्या थोरल्या मुलावर, कार्लवर येणं अपेक्षित होतं पण कार्ल आणि जेकबमधील काही खाजगी वादांमुळे कार्लने स्वतःचा वेगळा मद्यनिर्मितीचा व्यवसाय सुरु केला होता.
१८८२ साली ‘वेल्बी ब्रूअरी’ नावाने सुरु झालेल्या कार्लच्या कंपनीला त्याच्या वडिलांच्या संमतीने ‘नी (नवीन) कार्ल्सबर्ग’ असं नामाभिधान प्राप्त झालं तर जेकबने बनवलेल्या ब्रँडला ‘गॅमल (जुनी) कार्ल्सबर्ग’ हे नाव मिळालं. १८८७ साली जेकब यांच्या मृत्यूनंतर ‘कार्ल्सबर्ग’ची मालकी जेकबने स्थापन केलेल्या कार्ल्सबर्ग फाउंडेशनकडे राहिली. पुढे १९०६ साली नी आणि गॅमल या दोन्ही व्यवसायांचं एकत्रीकरण झालं आणि कार्ल जेकबसनची ‘कार्ल्सबर्ग’च्या सीईओ पदी निवड करण्यात आली.
या दोन्ही व्यवसायांचं एकत्रीकरण ही फक्त ‘कार्ल्सबर्ग’च नव्हे तर बिअर या मद्यप्रकाराच्याही इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. या एकत्रीकरणानंतर कार्ल्सबर्ग बिअरला एक नवा लोगो मिळाला जो गॅमल आणि नी ‘कार्ल्सबर्ग’च्या जुन्या लोगोंचा वापर करून बनवला होता.
जेकबने गॅमलसाठी सूर्याच्या प्रतिकृतीशी साधर्म्य दर्शवणारा एक बारा टोकांचा तारा आपला लोगो म्हणून वापरला होता तर कार्लने स्वस्तिक या हिंदू धर्मातील पवित्र चिन्हालाच आपला लोगो बनवलं होतं. १९०६ नंतर नव्या बिअरवरच्या लोगोसाठी त्या सूर्यामध्ये स्वस्तिक वापरण्यात आलं पण त्यामधील बिंदू हटवले गेले. शुभ आणि पवित्र प्रसंगाचं द्योतक म्हणून हिंदू धर्मात प्रसिद्ध असलेला स्वस्तिक ‘कार्ल्सबर्ग’च्या बाटल्यांवर विराजमान झाला. हा लोगो म्हणजे त्या बिअरच्या निर्मितीप्रक्रियेच्या शुद्धतेचं प्रमाण मानला जाऊ लागला. पण कालांतराने हा लोगोही एका दुर्दैवी परिस्थितीतून हटवण्यात आला.
हा लोगो हटवण्यामागे धार्मिक भावना दुखावलेल्या कोण्या हिंदूचा हात नव्हता. ‘कार्ल्सबर्ग’ला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणारा हा लोगो हटवण्यासाठी जर्मन हुकुमशहा ॲडॉल्फ हि*टल*रच कारणीभूत ठरला. हि*टल*र आणि त्याच्या ना*झीवादाने प्रेरित झालेल्या जर्मन सैन्याने तिरप्या अवस्थेतील स्वस्तिक आपल्या संघटनेची निशाणी म्हणून घोषित केली आणि जगभरात शुभ समजल्या जाणाऱ्या स्वस्तिकच्या अर्थाला अतिशय तुच्छ वळण लावलं.
हि*टल*रच्या सैन्याने केलेल्या अनन्वित अ*त्याचारामुळे स्वस्तिक हे चिन्ह जुलमी वंशवर्चस्ववादाचं आणि ना*झीवादाचं प्रतिक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. १९४० साली दुसऱ्या महायु*द्धात तटस्थ राहू पाहणाऱ्या डेन्मार्कवर हि*टल*रने ताबा मिळवल्यावर कार्ल्सबर्गने लोकांच्या मनात ना*झींविषयी वाढत चाललेला रोष ओळखून चाणाक्ष व्यावसायिक बुद्धीचं प्रदर्शन करत लोगोमधून स्वस्तिक हटवून टाकलं.
त्यानंतर ‘कार्ल्सबर्ग’चा लोगो म्हणून हत्तीची प्रतिकृती वापरण्यात आली आणि यावरूनच प्रेरित होऊन ‘कार्ल्सबर्ग’मध्ये पुढे जाऊन १९५९ साली सुप्रसिद्ध ‘एलिफंट बिअर्स’ची निर्मिती सुरु झाली. हा नवा लोगो कार्लच्या मृत्यूपश्चात बदलला गेला असला तरी याचं श्रेय कार्ललाच देण्यात येतं.
१९०१ साली कार्लने आपल्या कंपनीच्या इमारतीसाठी एका अशाच गेटची निर्मिती केली होती आणि त्या गेटवर चार हत्तींची प्रतिकृती स्थापन करण्यात आली होती, ज्यांच्या झुलीवर स्वस्तिक कोरले गेले होते. कार्लच्या मते, हत्ती हा स्थैर्य, निष्ठा आणि सामर्थ्याचे प्रतिक होते आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये कंपनीला पुन्हा उभं करण्यासाठी याच नीतिमूल्यांची नितांत आवश्यकता होती.
दुसरं महायु*द्ध समाप्त झाल्यावर ‘कार्ल्सबर्ग’ने कंबर कसली आणि जागतिक बाजारपेठेत मुसंडी मारायला सज्ज झाली. १९६६ साली पहिल्यांदाच डेन्मार्कच्या बाहेर सायप्रस येथे कार्ल्सबर्ग बिअरची निर्मिती करण्यात आली. हे पहिलं-वहिलं विदेशी कंत्राट ही ‘कार्ल्सबर्ग’च्या आगामी व्यवसायवृद्धीची नांदी होती.
चारच वर्षांनी ‘कार्ल्सबर्ग’ने ‘ट्युबर्ग’ कंपनीशी हात मिळवत अमेरिकेतील सर्वात मोठी ब्रूअरी बनण्याचा मान मिळवला. यानंतर ‘कार्ल्सबर्ग’ने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पुढच्या अकरा वर्षांतच मलेशिया आणि हाँगकाँगमध्ये आपला जम बसवून आशिया खंडातील बाजारपेठेत ‘कार्ल्सबर्ग’ने दिमाखात प्रवेश केला.
१९९२मध्ये ‘टेटली’वर ताबा मिळवत ‘कार्ल्सबर्ग’ने जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला. आजच्या घडीला ‘कार्ल्सबर्ग’ हे नाव बिअर उद्योगविश्वातील अग्रगणी ब्रँड्सपैकी एक आहे. एकविसाव्या शतकातील जीवघेण्या स्पर्धेच्या युगात ‘Probably not the best beer in the world’ अशी नवी टॅगलाईन मिरवणाऱ्या ‘कार्ल्सबर्ग’च्या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमीच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










