आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
हिंदू संस्कृतीचा सखोल अभ्यास केला तर त्याची व्याप्ती ही केवळ एका धर्मापेक्षा खूप जास्त असल्याचं लक्षात येतं. जगभरातील अनेक लोकांसाठी हिंदू धर्म हा एक जीवनशैली आहे. शास्त्र आणि इतर अनेक वैविध्यपूर्ण विस्तृत धार्मिक श्रद्धांमधून हिंदू तत्त्वज्ञानाची निर्मिती झालेली आहे.
विशेष म्हणजे इतर धर्मांप्रमाणं हिंदू धर्माचा कुणी एक निर्माता नाही. आपली हिंदू संस्कृती प्रेम आणि आदर दोन मुलभूत गोष्टींभोवती फिरते. यासर्व गुण वैशिष्ट्यांमुळं जगभरातील इतर धर्मीय लोक देखील हिंदू परंपरांचा आदर-सन्मान करतात. विशेषत: हॉलिवूडमधील कलाकार हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरांपासून मोठ्या प्रमाणात प्रभावीत झालेले आहेत.
हॉलिवूडस्टार ज्युलिया रॉबर्ट्स, पॉपस्टार मॅडोना, मिली सायरस, प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेता रसेल ब्रँड, आयर्नमॅन रॉबर्ट डाउनी जूनियर आणि वुल्वोरिन ह्यू जॅकमन यांनासुद्धा हिंदू धर्मातील काही गोष्टींनी भूरळ घातलेली आहे. काही वर्षांपूर्वी यात आणखी एका मोठ्या स्टारचा समावेश झाला आहे. हा स्टार दुसरा तिसरा कुणी नसून ‘द सिल्वेस्टर स्टेलॉन’ आहे. सिल्वेस्टर आणि हिंदू संस्कृतीचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल ना?
१९९९ मध्ये ‘द सिक्सथ सेन्स’ नावाचा अमेरिकन सुपरनॅचरल सायकोलॉजिकल थ्रिलरपट रिलीज झाला होता. एम नाइट श्यामलन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात ब्रुस विलिसनं बाल मानसशास्त्रज्ञाची भूमिका केली आहे. त्याचा जो रुग्ण असतो (हॅली जोएल ऑस्मेंट) तो मृत व्यक्तींशी बोलू शकत असल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. असाच काहिसा अनुभव सुपस्टार सिल्वेस्टर स्टेलॉनला आल्याचं स्वत: त्यानं सांगितलं आहे. त्याचा मृत मुलगा सेज, वारंवार त्याच्या स्वप्नात दिसत होता. या गोष्टीचा सिल्वेस्टरला प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्याला हिंदू धर्माचा आधार घ्यावा लागला.
२०१२ मध्ये सिल्वेस्टरचा मुलगा सेज स्टेलॉनचा वयाच्या ३६व्या वर्षी अचानक मृत्यू झाला. त्यानंतर सिल्वेस्टरला स्वप्नांचा त्रास सुरू झाला. सुरुवातीपासून हिंदू धर्माबद्दल आदर आणि अभ्यास असलेल्या सिल्वेस्टरनं ही गोष्ट ऋषिकेशमधील एका पंडिताच्या कानावर घातली. हिंदू धर्मामध्ये, एखाद्या तरुण मुलाचा अपघाती किंवा बिना लग्न करता मृत्यू झाला तर त्यासाठी विशेष श्राद्ध घालावे लागते. नाहीतर त्या व्यक्तिचा आत्मा आपल्या आजूबाजूला भटकतो आणि तो आपल्याला त्याच्या अस्तित्त्वाचे विविध संकेत देतो, असा समज आहे. सिल्वेस्टरच्या बाबतीत देखील हाच प्रकार होत असावा, अशी शंका पंडितानं व्यक्त केली.
स्टेलॉन कुटुंबातील मृत सेज स्टेलॉन सोबत रक्ताचं नातं असलेल्या एका व्यक्तीनं हरिद्वारमध्ये येऊन एक विशेष श्राद्ध पुजा करावी, असा सल्ला पंडितानं सिल्वेस्टरला दिला. आपल्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सिल्वेस्टरनं तत्काळ आपला भाऊ मायकल, त्याची पत्नी आणि इतर दोघांना भारतात पाठवलं. पंडित प्रतीक मिश्रापुरी यांच्या सल्ल्यानुसार स्टेलॉन कुटुंबियांनी हरिद्वारमधील कनखल येथे गुप्त भेट दिली आणि विशेष ‘तिथी श्राद्ध’ घातलं. त्यानंतर त्यानं आपल्या मृत बहिणीसाठी देखील पुजा केली. पुजा केल्यानंतर ते तत्काळ फिलाडेल्फियाला परतले.
मुलाच्या मृत्यूचा स्विकार करणं आणि त्याला सामोरं जाणं सिल्वेस्टरसाठी खूप कठीण झालं होतं. तो प्रचंड अस्वस्थ होता. असं सांगितलं जातं, त्याने आपल्या मुलाशी संवाद साधण्यासाठी प्रेतआत्म्यांशी संपर्क साधण्याचा कथित प्रयत्न करण्याऱ्या लोकांची देखील मदत घेतली होती. त्यानंतर त्याला स्वप्नांचा त्रास देखील सुरू झाला.
भारतातील ज्योतिषी प्रतीक मिश्रापुरी लॉस एंजेलिसच्या भेटीवर असताना सिल्वेस्टरनं त्यांची भेट घेऊन आपली अडचण सांगितली. मिश्रापुरी यांच्या माध्यमातूनचं स्टॅलोनला श्राद्धाच्या विधीची माहिती मिळाली होती.
स्टेलॉन कुटुंबियांनी भारतात येऊन सेजचं श्राद्ध घातलं की नाही याबाबत माध्यमांमध्ये विविध अफवा होत्या. त्यानंतर ज्योतिषी प्रतीक मिश्रापुरी यांनी स्वत: पुढे याबाबतचे अनेक गैरसमज दूर केले होते. जेव्हा सिल्वेस्टरनं मुलाचं श्राद्ध घालण्याची इच्छा दाखवली तेव्हा मिश्रापुरी यांनी पंचाग पाहून त्याला श्राद्धासाठी योग्य मुहुर्त सांगितला होता. सिल्वेस्टर स्वत: भारतात येणार होता. मात्र, काही कारणास्तव त्याला येणं शक्य झालं नाही. श्राद्ध योग्य मुहुर्तावरच व्हावे यासाठी त्याने आपल्या भाऊ मायकलला भारतात पाठवलं.
सेज मूनब्लड स्टेलॉन हा सिल्वेस्टरचा सर्वात मोठा मुलगा होता. आपल्या वडिलांप्रमाणं सेज देखील अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता होता. १९९० मध्ये रॉकी फाईव्ह या चित्रपटाच्या माध्यमातून त्यानं वडील सिल्वेस्टर स्टॅलोनसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यात सेजनं सिल्वेस्टरच्या मुलाचीच भूमिका केली होती.
नंतर मात्र, रॉकीच्या सहाव्या भागात त्याला काम करता आले नाही कारण त्यावेळी तो स्वत: च्या ‘विक’ या चित्रपटामध्ये व्यस्त होता. त्यानंतर १९९६मध्ये ‘डेलाइट’ या चित्रपटात तो आपल्या वडिलांसोबत मोठ्या पडद्यावर झळकला होता.
१३ जुलै २०१२ रोजी लॉस एंजेलिसच्या ‘८१०० ब्लॉक’मधील घरी सेज मृतावस्थेत सापडला होता. मृतदेह सापडण्यापूर्वी चार दिवसांपासून तो कुणाच्याही संपर्कात नव्हता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी प्रिस्क्रिप्शनच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या.
शवविच्छेदन आणि टॉक्सिकॉलॉजी चाचण्यांनंतर, त्याचा मृत्यू एथेरोस्क्लेरोसिसमुळे झाल्याचा अहवाल मिळाला होता. लॉस एंजेलिसमधील सेंट मार्टिन ऑफ टूर्स कॅथोलिक चर्चमध्ये सेज स्टेलॉनचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. २०१४ मध्ये पुन्हा हिंदू रितीरिवाजानुसार त्याच्या नावानं हरिद्वार येथे श्राद्ध घालण्यात आलं
हरिद्वार येथे घातलेल्या श्राद्धानंतर सेज स्टेलॉनच्या आत्म्याला शांती मिळाली की नाही ते माहित नाही. मात्र, त्याचे वडिल सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या मनाला नक्कीच समाधान मिळालं. यानिमित्त पुन्हा एकदा हिंदू रितीरिवाज आणि परंपरांचं महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित झालं.
संदर्भ:
Sylvester Stallone’s Kin Visited India To Pray For His Dead Son’s Soul | HuffPost null
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










