आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ती एक काळीकुट्ट भयानक अंधारी रात्र. ओलसर कुंद वातावरणानं भरलेलं तळघर. काळा स्कार्फ आणि काळा ड्रेस असलेली एक वृद्ध महिला टेबलच्या मागे उभी राहून आपलं जादूचं पाणी बनवण्यासाठी विषारी वनस्पती आणि आर्सेनिक एकत्र करत आहे. नाही, नाही हा काही एखाद्या टिपीकल भयपट किंवा एखादं भयानक स्वप्न नाही.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २९व्या शतकाच्या सुरूवातीला, युगोस्लाव्हिया साम्राज्यातील व्लादिमीरोवाक या छोट्या गावात कित्येक खून झाले. गावातील प्रत्येकाला प्रश्न पडला होता खूनसत्रामागे नेमकं आहे तरी कोण? अनेक लोकांचा जीव घेणारी व्यक्ती होती अनुज्का! वर दिलेलं वर्णन याचं आजीबाईचं आहे. ही म्हातारी इतिहासातील सर्वात यशस्वी सिरियल कि*लर्सपैकी एक आहे.
बाबा अनुज्काच्या सुरुवातीच्या आयुष्याबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. तिचं मूळ नाव ‘ॲॲना ॲदी पिश्टोनिया’ होतं मात्र, ती बाबा अनुज्का या नावानच ओळखली जाई.
१८३८ साली रोमानियात तिचा जन्म झाला असावा, असं मानलं जातं. ती किशोरवयात असताना तिचं कुटुंब आधुनिक सर्बियातील व्लादिमीरोवाक या गावात गेलं होतं. तिचं कुटुंब गर्भश्रीमंत होतं त्यामुळं तिला महागडं खाजगी शिक्षण मिळालं होतं. वयाच्या २०व्या वर्षी सुरळीत चाललेली तिच्या आयुष्याची गाडी रुळावरून घसरली. अनुज्का आणि एका ऑस्ट्रियन सैन्य अधिकाऱ्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्याच्याकडून तिला सिफलिस(लैंगिक आजार)ची लागण झाली. मात्र, काही काळातचं तो तिच्यापासून वेगळा झाला. यामुळे तिला मोठा धक्का बसला.
प्रेमभंगातून बाहेर पडण्यासाठी तिनं एकांत शोधला. तिला औषधं आणि रसायनशास्त्रात रूची निर्माण झाली. तिला पाच भाषा बोलता येत होत्या. नंतर एका तिच्यापेक्षा वयाने जास्त मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न केलं. त्यांना ११ मुले झाली, त्यापैकी एक वगळता सर्व मुले म्हणून मरण पावली.
लग्नाच्या २० वर्षांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर तिनं आपली रसायनशास्त्रातील आवड जोपासली. घराच्या एका कोपऱ्यात आपली प्रयोगशाळा बनवली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात तिनं एक ‘हर्बलिस्ट’ म्हणून नावलौकिक मिळवला. विशेषत: शेतकर्यांच्या बायकांमध्ये ती लोकप्रिय होती. त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी ती त्यांना मदत करत असे. त्यातून तिला चांगलं उत्पन्न देखील मिळत होतं ज्यामुळे ती आरामात आपलं आयुष्य जगत होती.
रसायनशास्त्रातील आवडीमुळं तिनं अनेक चांगले-वाईट प्रयोग केले होते. तिनं काही अशी औषधं तयार केली होती, जी खाऊन लष्करी सेवेतील लोक आजारी पडून सेवेतून बाहेर पडतं. अनुज्कानं ‘जादूचे पाणी’ किंवा ‘प्रेमाचे औषध’ यानावानं एक विषारी मिश्रणही विकलं. ज्या महिलांचे पती आपल्या बायकांचा छळ करत अशा बायका तिच्याकडून हे मिश्रण घेऊन जात. हे औषध खाल्ल्यानंतर साधारण आठ दिवसातचं त्या व्यक्तीचा मृत्यू होई.
अनुज्काच्या कथित प्रेमाच्या औषधामध्ये काही प्रमाणात आर्सेनिक आणि काही वनस्पतींचं विष होतं. त्या विषाचा शोध घेणं अतिशय कठिण होतं. जेव्हा तिच्याकडे कुणी हे औषध मागण्यासाठी येई तेव्हा ती औषध घेणारा व्यक्ती किती जाड आहे हे विचारतं असे. असं म्हटलं जातं यावरून ती किती प्रमाणात विष मिसळायचे याचा अंदाज लावायची. तिच्या विषारी औषधामुळं जवळपास १५० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध आहे.
१९२० च्या दशकात, अनुज्काकडं लुजुबिना मिलानकोव्ह नावाची एक महिला ‘सेल्स एजंट’ होती. संभाव्य ग्राहक शोधून अनुज्काच्या घरी नेण्याचं काम तिच्याकडं होतं. अनुज्काच्या प्रेमाच्या औषधाची किंमत २ ते १० हजार युगोस्लाव्ह दिनार दरम्यान होती.
अनुज्कासाठी सर्व काही एकदम सुरळीत सुरू होतं. मात्र, प्रत्येक वाईट गोष्टीचा एक ना एक दिवस शेवट होतोच हा निसर्गाचा नियम आहे. या नियमाप्रमाणं अनुज्कादेखील एक दिवस संकटात सापडली. तिची नियमित ग्राहक असलेल्या स्टॅना मोमीरोव्ह नावाच्या महिलेमुळं ती अडचणीत सापडली. स्टॅनानं अनुज्काचं औषध वापरून तिच्या पतीची ह*त्या केली होती. याशिवाय तिच्याकडून वारंवार इतर हर्बल उपचार देखील घेतले होते. पहिल्या पतीचा खू*न केल्यानंतर स्टॅनानं आपल्या एका श्रीमंत नातेवाईकाशी लग्न केलं आणि त्याला देखील त्याच औषधाचा वापर करून ठार केलं. पोलिसांनी स्टॅनाला अटक करून केलेल्या चौकशीत पहिल्यांदा अनुज्काचं नाव समोर आलं होतं. मात्र, तिला अटक झाली नाही.
हे प्रकरण निवळल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर आणखी एक मृत्यू झाला. अनुज्काचं औषध वापरून एका महिलेनं आपल्या पतीच्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर जवळजवळ १८ महिन्यांनंतर अनुज्काला अटक करण्यात आली. तिच्यासह अटक केलेल्या लोकांनी सगळा दोष तिच्या माथी मारला. अनुज्काच्या औषधामध्ये विष असल्याचं आपल्याला माहिती नव्हते, असा दावा त्यांनी केला.
अनुज्कानं सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं. मात्र, रसायनशास्त्रातील तिचं ज्ञान पाहता तिच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. सर्वांना माहिती झालेल्या दोन खू*नांव्यतिरिक्त तिनं जवळपास १५० लोकांना ठार केल्याचं देखील चौकशीत समोर आलं. त्यामुळे अनुज्काला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र, तिचे वय पाहता आठ वर्षांनंतर तिची सुटका करण्यात आली. १९३८ मध्ये वयाच्या १००व्या वर्षी व्लादिमीरोवाक गावातचं तिचा मृत्यू झाला.
अनुज्का अतिशय हुशार महिला होती. रसायनशास्त्राबाबत तिला असणारे ज्ञान खरोखर वाखाणण्याजोगं होतं. मात्र, तरुणपणात आलेल्या काही वाईट अनुभवांचा तिचा मनावर वाईट परिणाम झाले. त्यामुळे तिच्या मनात पुरुषांविषयी रोष निर्माण झालेला होता आणि आपल्या ज्ञानाचा वापर करून तिनं अनेकांचा जीव घेतला. अनुज्कासारखे कितीतरी हुशार व्यक्ती आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करू न शकल्यामुळं चुकीच्या मार्गावर जातात. अशा व्यक्तींना वेळीच सावरण्याची गरज आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










