आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आपल्याला रोज जेवायला अन्न, प्यायला पाणी लागतं, डोक्यावर छप्पर लागतं. कधी एक दिवस आपल्याला हे काहीच मिळालं नाही तर आपण तग धरू शकू? त्यातही आपण समुद्रात एकटेच असलो तर? चहुबाजूंनी फक्त आणि फक्त पाणी असताना आपण जिवंत राहू शकू?
पून लिम नामक इसमाच्या आयुष्यात असं नेमकं काय घडलं की तो म्हणाला, “माझा रेकॉर्ड ब्रेक करण्याची वेळ कधीही, कोणावरही येऊ नये”?
पून लिम हा चीनमधल्या हैनानमध्ये जन्माला आलेला एक सामान्य मुलगा. जरा मोठा झाल्यावर पैसे कमवायला एका जहाजावर कामाला जायला लागला. जहाजातून प्रवास करणाऱ्या लोकांची देखभाल करणं हे त्याचं काम.
त्या जहाजाचं नाव होतं ‘बेन लोमंड’. ते एक ब्रिटिश जहाज होतं. त्या जहाजात त्याकाळच्या सगळ्या आधुनिक सुखसोयी उपलब्ध होत्या.
ते एकुलतं एक जहाज हळूहळू केप टाऊन ते सरीनाम असा प्रवास करत होतं. हा काळ होता जगातल्या दुसऱ्या महायु*द्धाचा! अशा तणावाच्या परिस्थितीत समुद्रातून जाणारं ते एकुलतं एक जहाज जर्मनीच्या नजरेतून सुटलं नाही. जर्मनीने आपल्या U-172 या U-boat च्या साहाय्याने त्यावर ह*ल्ला केला. काही क्षणातच जर्मनीने पाणबुडीतून सोडलेले २ बॉ*म्ब या ब्रिटिश जहाजावर येऊन धडकले. काही सेकंदातच जहाज बुडायला लागलं. सगळीकडून त्यात पाणी भरायला लागलं.
पून लिमने पटकन लाईफ जॅकेट अंगावर चढवलं आणि पाण्यात उडी मारली. थोड्याच वेळात जहाजाच्या बॉयलरचा मोठा स्फो*ट झाला ज्याने समुद्रात एक मोठी लाट तयार झाली. या भयानक स्फो*टामुळे पून लिम समुद्रात फार दूरवर फेकला गेला. या ब्रिटिश जहाजावर एकूण ५३ जण प्रवास करत होते. या ५३ जणांपैकी ५२ जणांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. पून लिम हा एकटाच झाल्या प्रसंगातून थोडक्यात बचावला. या घटनेतून पून बचावला असला तरी त्याची खरी कसोटी पुढील काही दिवसांत लागणार होती.
सुरुवातीचे २ तास पून लिम समुद्रातच तरंगत राहिला. सुदैवाने २ तासांनंतर त्याला समुद्रात एक ८ फुटी लाकडी तराफा तरंगताना दिसला. पून त्यात चढला. त्या तराफ्यात त्याला पिण्यायोग्य पाणी, काही चॉकलेट्स, साखरेचं पाकीट, बिस्किटं आणि टॉर्च सापडला. काही दिवस हे पाणी पिऊन आणि तराफ्यावर सापडलेली बिस्किटं खाऊन त्याने स्वतःला जिवंत ठेवलं पण हे सगळं काही दिवसातच संपून गेलं.
इथे पूनने शक्कल लढवली. तराफ्याला मारलेला एक खिळा काढला आणि त्यापासून मासे पकडायला गळ बनवला. टॉर्चमधून वायर काढली आणि ती गळाला दोरी म्हणून जोडली.
खायची व्यवस्था झाली पण प्यायच्या पाण्याची व्यवस्थाही त्याला बघायची होती. आजूबाजूला शेकडो किलोमीटर्स पाण्याशिवाय काहीच नव्हतं पण ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं. मग पूनने पावसाचं पाणी साठवायला सुरुवात केली. लाइफ जॅकेटच्या कव्हरमध्ये तो पावसाचं पाणी साठवायला लागला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूनला पोहता येत नसे. त्यामुळे त्याने तराफ्याला एक दोरी बांधून ठेवली होती, जिचं दुसरं टोक नेहमी त्याच्या मनगटाला बांधलेलं असायचं.
तराफ्यावर सापडलेली बिस्किटं एका पत्र्याच्या डब्ब्यात होती. त्या डब्ब्यापासून त्याने एक चाकूही बनवला. गळाच्या साहाय्याने पकडलेले मासे तो या चाकूने कापत असे. त्यांचे कापलेले तुकडे तो सूर्यप्रकाशात वाळवून खात असे.
काहीच दिवसात त्याच्याकडे पुरेसं अन्न आणि पाणी तयार झालं. आता पुढचे काही दिवस तरी पोटापाण्याची चिंता करायचं कारण नव्हतं पण कदाचित निसर्गाला हे मंजूर नव्हतं. एके दिवशी समुद्रात भलं मोठं वादळ आलं, या वादळात पूनच्या तराफ्यावरचं बहुतेक सामान समुद्रात वाहून गेलं. या वादळानंतर पून हताश झाला, त्याने जगण्याची इच्छा सोडून दिली.
एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने पक्षी पकडायला सुरुवात केली. जगण्यासाठी तो पक्ष्यांना मारून त्यांचं रक्त पित असे.
अशाच एका दुपारी पूनने काही शार्क माशांना आपल्या तराफ्याच्या आजूबाजूला फिरताना बघितलं पण तो अजिबात घाबरला नाही. उलट या शार्क माशांनाच पकडायचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याने मारलेले पक्षी गळाला लावले आणि गळ समुद्रात सोडला. समुद्रातली शार्कची पिल्लं हे त्याची शिकार होते.
एकदा पकडलेल्या शार्कनेच पूनवर ह*ल्ला केला तेव्हा पूनने तराफ्यावर असलेल्या पाण्याच्या जगचा वापर शस्त्र म्हणून केला. शार्क पूर्णपणे मेल्यावर पूनने त्याला कापलं आणि त्याच्या लिव्हरमधून त्याचं रक्त काढून पिऊन टाकलं. त्या भागात बरेच दिवस पाऊस पडला नव्हता त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेल्या पूनची तहान या रक्तानेच भागली.
या सगळ्या प्रकारामुळे पूनचे खाण्यापिण्याचे हाल तर होत होतेच पण त्यासोबत त्याला कडक उन्हाचाही सामना करावा लागत होता. सतत समुद्रात राहून होणारी मळमळ, जगण्यासाठी रोज करावी लागणारी मेहनत यामुळे तो वैतागला. समुद्रात दुरून जाणारी जहाजं दिसायची पण कोणाचंही त्याच्याकडे लक्ष जायचं नाही आणि लक्ष गेलंच तर ते त्याला मदत करत नसत.
यामागेही एक कारण होतं, दुसरं महायु*द्ध सुरू असताना काही गुप्तचर मुद्दाम समुद्रातून जाणाऱ्या जहाजांकडे मदत मागायचे. त्यांच्या जहाजावर चढायचे आणि शत्रू राष्ट्रात प्रवेश करायचे. हे सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे पूनला कोणीही मदतीचा हात देत नव्हतं. जसजसे दिवस जाऊ लागले तसे दिवस मोजण्यासाठी पून दोरीला गाठ बांधू लागला.
समुद्रात बरेच दिवस घालवल्यावर त्याला समजलं आता एक एक दिवस मोजून काही फायदा नाही मग त्याने पौर्णिमेचे दिवस मोजायला सुरुवात केली.
एके दिवशी एका ब्राझीलियन मच्छीमाराला त्याचा तराफा समुद्रात तरंगताना दिसला. समुद्रात एकट्याने तब्बल १३३ दिवस घालवल्यावर पूनची सुटका झाली!
या १३३ दिवसांत पूनचं वजन ९ किलोंनी कमी झालं होतं. सुटकेनंतर त्याला ४ आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आलं. ४ आठवड्यांनी त्याची प्रकृती सुधारली.
पून ठणठणीत बरा झाल्यावर त्याला ब्रिटिश एम्पायर मेडल देऊन गौरवण्यात आलं. ब्रिटिशांच्या ‘रॉयल नेव्ही’च्या अभ्यासक्रमात पूनने कठीण काळात जगण्यासाठी वापरलेल्या सगळ्या तंत्रांचा समावेश करण्यात आला.
पून लिमने जेव्हा हे १३३ दिवस एकट्याने समुद्रात काढले त्यापूर्वी असा रेकॉर्ड कोणीही केला नव्हता. पून लिमला याबद्दल विचारले असता तो म्हणाला “हा रेकॉर्ड मोडण्याची वेळ कधीही कोणावर येऊ नये”
आपण एक दिवसही अन्न-पाणी-निवारा नसताना कुठे राहू शकत नाही, अशात एकट्याने, हाताशी काहीही नसताना तब्बल १३३ दिवस समुद्रात काढणं, येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत जगण्यासाठी धडपड करणं म्हणजे किती धाडसाचं काम आहे! अशी ही पून लिमची धाडसी गोष्ट ऐकून आजही लोक थक्क होतात!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










