आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातला एक महत्त्वपूर्ण आर्थिक घोटाळा म्हणून ओळखला जातो तो साउथ सी बबलचा घोटाळा. या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेली कंपनी होती- साऊथ सी कंपनी. आज आपण याच घोटाळ्याचा आढावा घेणार आहोत.
आधी आपण साऊथ सी कंपनीची स्थापना कशी झाले हे जाणून घेऊया. फ्रांसविरुध्दच्या यु*द्धात ब्रिटनचे भरपूर आर्थिक नुकसान झाले होते. या यु*ध्दाचा परिणाम म्हणूनच ब्रिटनच्या तिजोरीवर ७० लाख पाऊंड एवढ्या मोठ्या कर्जाचा ताण पडला होता. ब्रिटनच्या तिजोरीवर आलेला हा ताण बघता त्यावेळी ब्रिटनची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघण्याची नामुष्की सरकारवर आली होती.
सरकारला पैसे पुरवणारी बँक ऑफ़ इंग्लंड ही बँकसुद्धा सरकारला पैसे देण्याच्या स्थितीत नव्हती. त्याचवेळी रॉबिनसन कृसोचा लेखक डैनिएल डेफो याने ब्रिटन सरकारला दक्षिणी समूद्रात व्यापार करणाऱ्या कंपनीची स्थापना करण्याची कल्पना सुचवली. सरकारकडे त्यावेळी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने डेफोची ही कल्पना स्विकारण्यात आली आणि इथूनच साऊथ सी कंपनीची स्थापना झाली. साल होते इ.स. १७११.
कंपनीचे काम होते कर्जाचे व्यवस्थापन करणे. थोडक्यात अर्थव्यवस्थेवर असणाऱ्या कर्जाच्या रकमेएवढे शेअर्स विकण्याची परवानगी कंपनीला दिली गेली. त्याचबरोबर दक्षिण समुद्रात मुक्तपणे व्यापार करण्याची मुभा देखील कंपनीला देण्यात आली.
ज्यावेळी कंपनीची स्थापना झाली त्यावेळी दक्षिण अमेरिकेवर स्पेन आणि पोर्तुगीज लोकांची सत्ता होती. त्यामुळे ब्रिटिशांचे नियंत्रण या भागात जवळजवळ नव्हतेच. या स्थितीमुळे सरकारची परवानगी असली तरीही या भागात कंपनीला मुक्तपणे व्यवहार करता येणे आता शक्य नव्हते. पण ही परिस्थिती स्पेनच्या यु*द्धाचा शेवट झाला तेव्हा बदलली. युट्रेटच्या तहानुसार स्पेनने साऊथ सी कंपनीला दक्षिण अमेरिकेत व्यापार करण्याची मुभा दिली.
साऊथ सी कंपनीच्या व्यापाराचे मुख्य साधन काय होते..? तर ते होते गुलाम. ही कंपनी गुलामांची खरेदी-विक्री करत असे. कंपनीच्या स्थापनेवेळीच ही बाब स्पष्ट केली गेली होती. स्पेन आणि पोर्तुगीज कॉलन्यांमध्ये या गुलामांना भरपूर मागणी होती. सोने, चांदी इत्यादीच्या उत्पादनासाठी खाणीत काम करु शकतील असे आफ्रिकन गुलाम ही कंपनी दक्षिण अमेरिकेत पोहचवत असे.
या कंपनीने अंदाजे ३४ हजार गुलामांची विक्री केल्याची नोंद आहे. दुर्दैवाने यातील बरेचसे गुलाम मृत पावल्याचेही सांगितले जाते. केवळ अटलांटिक समुद्र पार करत असतानाच यातल्या १५ टक्के गुलामांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
समुद्रातील व्यापार धोकादायक होता. चाचेगिरीमुळे कधीकधी सगळा माल वाया जात असे. वादळांनी कधी कधी जहाजांना हानी पोहचत असे. अशा वेळी समुद्री व्यापारासाठी हमी विमा गरजेचा होता. १७२० मध्ये पहिल्यांदा इंग्लंडने विमा कंपनी स्थापण्यास परवानगी दिली. यामुळे व्यापारात गुंतवणूक करणे अजून सुरक्षित झाले.
साऊथ सी कंपनी व्यापारात प्रगती करत असतानाच फ्रांसमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे सुरू झाले होते. यामागे सगळ्यात मोठा हात होता ‘जॉन लॉ’ या अर्थतज्ञाचा. सोन्याची हमी न देता नोटा छापून बाजारात चलन खेळते ठेवण्याची कल्पना ‘जॉन लॉ’ याला सुचली आणि फ्रेंच अर्थव्यवस्था भरभराटीस यायला लागली.
१७१९ साली हीच कल्पना अवलंबण्याचा विचार साऊथ सी कंपनीच्या संचालक मंडळाने घेतला आणि देशाचं सगळं कर्ज स्वत: भरुन काढण्याचा निर्णय घेतला. आता कंपनीच्या संचालकांनी त्यावेळी ब्रिटनच्या संसदेत असणाऱ्या नेत्यांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या नेत्यांना फायदा व्हावा यासाठी कंपनीच्या शेअर्सच्या किंमती वाढत जाणे गरजेचे होते आणि यातूनच बबलचा जन्म झाला. नेत्यांना फायदा पोहचत राहावा म्हणून कंपनी स्वत: फायद्यात असल्याचा आव आणत राहिली आणि यातूनच त्यांना मोठमोठे गुंतवणूकदार मिळत गेले.
पैसा येत असल्याने कंपनीच्या संचालक मंडळाने बबल वाढवू दिले. त्यातून कंपनीच्या शेअर्सच्या किंमती गगनाला भिडत गेल्या. त्याच वेळी डॅनिएल डेफो याने आपले रॉबिनसन कृसो नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात त्याने आपल्या पालकांच्या निर्णयाला झुगारून दक्षिणी समुद्रात काम करुन श्रीमंत झालेल्या एका तरुणाची गोष्ट लिहिली होती. या पुस्तकामुळे दक्षिण समुद्राचे आर्थिक महत्त्व अजून वाढले. याचाच परिणाम म्हणून साऊथ सी कंपनीमध्ये लोकांचा विश्वास अजून वाढत गेला.
१७२० साली पुन्हा इंग्रज-स्पेन यु*द्धास सुरुवात झाली आणि कंपनीच्या व्यापारावर बंधने आली. व्यापारातून कसलाही नफा मिळत नसतानाही कंपनीने आपण नफ्यात असल्याचे दाखवले आणि याचाच परिणाम म्हणून जानेवारी १७२० मध्ये असलेली एका शेअरची किंमत १२८.५० पाऊंड वरुन जून महिन्यात ८९० पाऊंडवर जाऊन पोहचली.
कंपनीची ही प्रगती बघून बाजारात अशाच कितीतरी कंपन्या निर्माण झाल्या. यातील बऱ्याच कंपन्या केवळ नावापुरत्या तयार केल्या गेल्या होत्या. कुठलाही व्यापार नसताना निव्वळ नावाच्या आधारावर लोकांना लुबाडले जात होते.
असे असले तरीही साऊथ सी कंपनी या सगळ्यात वरचढ होती. डॅनिएल डेफो, अलेक्झांडर पोप, एवढेच नाही तर गलिव्हर्स ट्रॅवल्स या प्रसिध्द पुस्तकाचा लेखक जोनाथन स्विफ्ट, प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ न्यूटन यांनीसुद्धा कंपनीत आपला पैसा गुंतवला होता.
बाकीच्या खोट्या कंपन्या साऊथ सी कंपनीला आता धोका वाटू लागल्या होत्या. याला आळा घालण्यासाठी कंपनीच्या संचालकांनी संसदेवर दबाव आणला. यातूनच ११ जून १७२० रोजी बबल ऐक्ट अंमलात आणला गेला. या ॲक्टनुसार सगळ्या खोट्या कंपन्या बंद करण्यात आल्या. यामुळे साऊथ सी कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढून १०५० पाऊंड एवढी झाली.
पुढचा काही काळ कंपनीसाठी स्थिरतेचा होता. गुंतवणूक वाढत गेली तसा कंपनीतला भ्रष्टाचार वाढत गेला. संचालक मंडळाला हे नाटक सुरू ठेवणे आता अवघड जात होते. हळूहळू या तणावाचा परिणाम म्हणून शेअर्सच्या किंमती पुन्हा कमी होऊन पुर्ववत होत होत्या. सप्टेंबर महिन्यात ही किंमत १०५० पाऊंडवरुन १२४ पाऊंडवर येऊन थांबली आणि कंपनीचे कारस्थान जगासमोर आले. याच घटनेला साऊथ सी बबल असे नाव दिले गेले.
या घोटाळ्यात न्यूटनने स्वत:चे आत्ताच्या किमतीनुसार २ करोड पाऊंड गमावले. जोनाथन स्विफ्टनेसुद्धा यात पैसे गमावले होते. यावेळी विरोध करण्यासाठी त्याने त्याच्या शैलीत एक चारोळीसुद्धा लिहिली होती.
या घोटाळ्याचा परिणाम ब्रिटनच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात दिसून आला. कित्येक मंत्र्यांवर खटले दाखल करण्यात आले. एवढेच नाही तर ब्रिटनच्या कोषाध्यक्षास तुरुंगात डांबण्यात आले होते.
लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडता कसे येऊ शकते याचे हे एक उदाहरण होते. आर्थिक सुधारणा घडवून आणताना मोजक्या धनाढ्य लोकांना नाही तर जनतेला मध्यभागी ठेवण्याची गरज आहे हा महत्त्वपूर्ण धडा हा घोटाळा जगातील अर्थतज्ञांना आजही देत आहे एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










