आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भावनांना सीमा नसते. त्या स्वच्छंदी असतात. त्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. त्यांना कधी आपण शब्दबद्ध करू शकत नाही. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या अलीगड या चित्रपटाची कथा देखील अशीच काहीशी आहे. ही कथा एका प्रोफेसरच्या अवतीभवती फिरते ज्याला समलैंगिक असल्यामुळे शिक्षा करण्यात आली होती. हे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्र*मण होते. अखेरीस हा धक्का न पचवू शकल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले होते. या चित्रपटाची कथा काल्पनिक नसून श्रीनिवास रामचंद्र सिरस नावाच्या एका माणसाची खरी कहाणी आहे.
श्रीनिवास रामचंद्र सिरस यांचा जन्म नागपूरात झाला होता. तिथेच त्यांचे बालपण गेले. सायकोलॉजी विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, यानंतर त्यांनी पीएचडीसाठी प्रयत्न सुरु केले, मराठी लेखक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या लिखाणाला त्यांनी आपल्या अभ्यासाचा विषय म्हणून निवडले. त्यांनी थिसीस पूर्ण केले. त्यांचा विषय कठीण असल्यामुळे त्यांना पीएचडी पूर्ण करायला १० वर्षांचा कालावधी लागला. यानंतर रांची विद्यापीठाच्या भाषा विज्ञान विभागात रिसर्च फेलो म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
सिरस हे मराठी भाषेचे तज्ज्ञ होते, यामुळे काही काळातच त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठात नोकरी मिळवली. तिथे मराठी भाषेचे धडे देणे हे फार कठीण कार्य होते, कारण तिथे शिकणारे बहुतांश मुलं हे मुस्लिम होते, ज्यांना उर्दू अवगत होती. ते अलीगड विद्यापीठातील मॉडर्न इंडियन लॅंग्वेज डिपार्टमेंटच्या चेयरमनपदी नियुक्ती करण्यात आली.
सिरस यांनी लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या “पायाखालची हिरवळ” या कथासंग्रहाला २००२ साली महाराष्ट्र साहित्य परिषदेने सन्मानित केले होते.
व्यक्तिगत आयुष्यात सिरस हे एक सामान्य व्यक्ती होते. युनिव्हर्सिटीच्या क्वार्टर्समध्ये ते एकटे राहत होते. त्यांचे लग्न झाले होते, पण काही कारणांमुळे पत्नीने त्यांची साथ सोडली होती.
असे म्हणतात की, तुमची प्रतिभाच कधीकधी तुमची शत्रू होऊन जाते. सिरस यांच्यासोबत देखील असंच झालं. वेगाने विस्तारणाऱ्या करियरच्या कक्षेत त्यांना त्यांच्या आसपासचे काही लोक अजिबात पसंत करत नव्हते. ते लोक नेहमी सिरस यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असायचे. याच काळात सिरस हे समलैंगिक असल्याची बाब त्या लोकांच्या लक्षात आली. ही सिरस यांच्यासाठी अजिबातच चांगली बातमी नव्हती. त्यांच्याविरूद्ध एक षडयंत्र आखण्यात आले.
८ फेब्रुवारी २०१० च्या रात्री सिरस एका रिक्षाचालकासोबत त्यांच्या खोलीत होते, त्यावेळी अचानक काही टीव्ही रिपोर्टर त्यांच्या खोलीत घुसले. यानंतर सर्वत्र बातमी पसरली की सिरस एका रिक्षाचालकासोबत समलैंगिक संबंध ठेवत होते.
गोंधळ उडाल्यामुळे विद्यापीठातील लोक देखील त्याठिकाणी येऊन पोहचले. सिरस हे खरंच समलैंगिक होते. पण त्यांनी आपली ही ओळख कधीच जगासमोर येऊ दिली नव्हती. या घटनेनंतर मात्र सिरस यांचे एकाकी आयुष्य लोकांसाठी चर्चेचा विषय बनले होते. समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. लोक त्यांना तुच्छतेने बघू लागले होते.
हे प्रकरण इतके हाताबाहेर गेले. शेवटी, एक दिवस अलीगड विद्यापीठाने त्यांची हकालपट्टी केली. समलैंगिकतेच्या आरोपामुळे त्यांच्याकडचे आधुनिक भाषा मंडळाचे अध्यक्षपद देखील हिरावून घेण्यात आले. सिरस यांना त्यांचे क्वार्टर सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्या घरातील विजेचे कनेक्शन कापण्यात आले. त्यांना दुसरे घर मिळवण्यात अडचणी उत्पन्न करण्यात आल्या.
वयाच्या ६४व्या वर्षी ते एकदम एकटे आणि असहाय्य झाले होते. त्यांची जीवनावरील इच्छाच उडाली होती.
हे प्रकरण अनेक दिवस चर्चेत होते, यानंतर इंडियन एक्स्प्रेसने या घटनाक्रमावर प्रामुख्याने स्टोरी करण्याची जबाबदारी दीपू सेबॅस्टियन एडमंड यांच्यावर सोपविली. दीपू एक पत्रकार होते पण ते त्यांच्या या स्टोरीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत होते. सिरस समलैंगिक होते यापेक्षा काही लोक त्यांची परवानगी न घेता त्यांच्या खाजगी घरात कॅमेरे घेऊन कसे घुसले, यावर दीपू यांचा आक्षेप होता. त्या पत्रकारांच्या विरोधात कोणी ॲक्शन का घेत नाही, यावर दीपू यांना आक्षेप होता.
दीपू यांनी सिरस यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरुवात केली, पण सिरस हे फोनवर बोलण्यास कचरत होते. पण दीपू यांनी कवितेच्या माध्यमातून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. यात दीपू सफल झाले. दीपू यांनी सिरस यांची बाजू जगासमोर आणली. दीपू यांची कव्हरस्टोरी छापून आल्यानंतर अनेक लोक सिरस यांच्या मदतीसाठी पुढे आले.
सिरस त्यांच्या सस्पेन्शनच्या विरोधात कोर्टात गेले. एप्रिल २०१० मध्ये अलाहाबाद कोर्टाने सिरस यांच्या बाजूने निकाल लावला. सिरस यांना त्यांची प्रोफेसरशीप परत मिळाली. काही काळाने विद्यापीठातील काहींनी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याची बातमी जगासमोर आली. पण असं असलं तरी समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. त्यांना सन्मानाचे आयुष्य जगता येत नव्हते, कायम लोकांपासून नजर चोरून रहावे लागत होते. अखेरीस ही वेदना सहन न झाल्यामुळे त्यांनी मृत्यूला कवटाळले.
मृत्यूच्या अगोदर त्यांनी दीपू यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांना अमेरिकेत जायची इच्छा असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की अमेरिका एकमेव असे ठिकाण आहे, जिथे मला माझी ओळख लपवून जगावे लागणार नाही. मी पूर्णपणे स्वातंत्र्याने जगू शकेल.
२००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने आयपीसी सेक्शन ३७७ नुसार समलैंगिकतेला अपराधमुक्त केले होते. पण २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली कोर्टाचा निर्णय रद्द केला. पण ६ सप्टेंबर २०१८ ला कोर्टाने कलम ३७७ ला पुन्हा अपराधमुक्त करत, त्याला असंवैधानिक ठरवले होते.
आजवर हिंदी चित्रपटात समलैंगिक लोकांना फार हस्यास्पद स्वरूपात समोर प्रस्तुत करण्यात आले आहे. परंतु २०१६ सालच्या अलीगड चित्रपटात या परंपरेला छेद देत, एक वेगळे रूप दाखवण्यात आले आहे. समलैंगिकांकडे समाजाने चांगल्या नजरेने बघावे यासाठी चित्रपटात विशेष काळजी घेण्यात आली आहे. या चित्रपटात प्रोफेसर सिरस यांची भूमिका मनोज वाजपेयीने साकारली असून राजकुमार रावने या चित्रपटात पत्रकार दीपूची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात काही काल्पनिक दृश्ये देखील दाखविण्यात आली आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










