The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अ सुटेबल बॉय: भारतीय दिग्दर्शिकेच्या परदेशात रिलीज झालेल्या सिरीजने जगाचं लक्ष वेधलंय

by सोमेश सहाने
27 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगदी ४ वर्षांनंतर १९५१ साली भारत आणि भारतीयांचं भावविश्व कसं असेल हे पुराव्यांसह तपशीलवार बघण्याची पर्वणी म्हणजे “अ सुटेबल बॉय”. जाणकार सांगतात की काही पुस्तकांमधून त्यावेळच्या परिस्थितीबद्दल माहिती मिळते. पण विक्रम सेठ यांच्या कादंबरीत महितीसोबत भावविश्वसुद्धा उलगडून सांगितलं आहे आणि त्यामुळेच या जगप्रसिद्ध कादंबरीच्या प्रकाशनापासूनच मीरा नायर त्या विश्वाच्या चाहत्या होत्या. बीबीसीसाठी ही 8 एपिसोड्सची इंग्रजी टेलिव्हिजन मालिका त्यांनी दिग्दर्शित केली.

हासुद्धा एक लाजिरवाणा योगायोग आहे की एकप्रकारे भारतीयत्व साजरं करणारी ही मालिका भारतात नाही तर विदेशात दाखवली जात आहे. कदाचित भारतीय प्रेक्षक तेवढे सजग नाहीत. किंवा काळाशी अगदी असुसंगत भारतीय सेन्सॉरशिपशचे नियम अडथळा तयार करत असतील.

ही कथा ब्रम्हपुर या काल्पनिक शहरात घडत असते. हा तो काळ आहे जेव्हा हिंदुत्ववादी आणि समाजवादी दोन्ही गटातील नेते काँग्रेसमध्येच होते. भारतीय लोक रेल्वे प्रवास, टेलिफोन या गोष्टींशी जोडले गेले होते, महाविद्यालयातील विद्यार्थी जागतिक साहित्य वाचत होते. पण गावातील गोरगरीब अजूनही कितीतरी किलोमीटरवरून मडक्यात पाणी आणून शेतीला पुरवत होते, ज्या शेतीचे मालकी हक्क त्यांच्याकडे नाहीत.

फाळणीमुळे हिंदू मुस्लिम प्रश्न गंभीर बनला होता, या पार्श्वभूमीवर मुख्य कथा सुरू होते. मिसेस मेहरा स्वतःच्या कनिष्ठ कन्येसाठी-लतासाठी चांगलं स्थळ – A Suitable Boy शोधत असतात.

लता विद्यापीठात इंग्रजी विषयात पदवी घेत असते. इंग्रजी साहित्यात तिचा असणारा रस सोडता समजूतदारपणा आणि सौंदर्य यामुळे चांगली स्थळं येणं सुरूच असतं. ही भूमिका “तान्या माणिकतला” हिच्या आयुष्यातील पहिलीच भूमिका आहे, हजारो मुलींच्या ऑडिशन नंतर मीरा नायर यांना खरंच लता सापडली असं म्हणावं लागेल.



तिची भाषा, हावभाव यातून तिने स्वतःची एक हुशार आणि उत्तम अभिनेत्री म्हणून छाप पाडली आहे. याशिवाय महेश कपूर (अभिनेते-राम कपूर) या चांगल्या राजकीय नेत्याच्या प्रवासातून आपल्याला त्यावेळच्या राजकीय- सामाजिक गोष्टी समजतात.

तिसरी कथा महेश कपूरच्या मुलाची आहे – मान कपूर. मान त्याच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या सईदा बाई या ‘तवायफ’च्या प्रेमात पडतो. मान या मालिकेतल्या फ्री स्पिरिटचं प्रतिनिधित्व करतो. ईशान खट्टरने माजिद माजिद यांच्या “बियॉन्ड द क्लाऊड्स” नंतर या मालिकेतून हे सिद्ध केलंय की रणवीर कपूर, आलिया भटप्रमाणेच तो देखील नेपोटीझममधून इंडस्ट्रीत आलेल्या महान कलाकारांपैकी एक आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्याचा अभिनय मानमधला बेबाकपणा अजूनच आकर्षक करतो आणि त्याचे डोळे मानचा चांगुलपणा अधोरेखित करत राहतात. परिस्थिती कितीही पारंपरिक साच्यातील, संकुचित मानसिकतेतील असली तरी मान सारखी काही लोक विद्रोही असतातच.

मानचं पात्र तर नीट विद्रोही पण नाहीये. तो फक्त हुशार, कौशल्यपूर्ण, पण ध्येय नसलेला आयुष्याविषयी, प्रेमाविषयी पॅशनेट असलेला तरुण असतो.

काहीही करून फक्त सईदाच्या जवळ जायचंच या त्याच्या पॅशनभोवतीच ही सिरीज गुंफली आहे.

त्याशिवाय मानच्या पात्राचे बरेच पैलू उलगडता आले असते. बेधुंद, बंधन तोडून वागणारा मान आणि संयमी, औपचारिकता नीट पाळून वागणारी लता या दोघांचं मिळून काही होतं का? हे शेवटपर्यंत वाटत राहतं.

मानची कथा एकार्थाने जास्त वळणांची आहे, पण लताच्या तपशीलवार उलगडत जाणाऱ्या पात्रामुळं कथेतलं भारतीयपण साजरं करणारा धागा जिवंत राहतो. तिच्या पात्राच्या प्रवासामुळे ही कथा पात्रांची नसून १९५१च्या भारताची आहे हे अधोरेखित होत जातं. हे नोंदवणं ही आवश्यक आहे की लताचं भावविश्व, तिच्या समस्या, भीती सगळंच २०२०च्या कुठल्याही सामान्य मुली सारखंच आहे.

म्हणजे ६९ वर्षात सामान्य भारतीय महिलांच्या भावविश्वात सुरक्षा, विश्वास, स्थैर्य येईल यासाठी आपण काहीच करू शकलो नाही याची जाणीव होते.

तसंच मैफिलीत गाणाऱ्या आणि नंतर वे*श्याव्यवसाय करणाऱ्या सईदाबाईच्या पात्राचं. अजूनसुद्धा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना हा समाज सामान्य माणूस म्हणून जेवढा किमान मान द्यावा तेवढासुद्धा देत नाही. हे पात्र द ग्रेट तब्बूने साकारलं आहे म्हणून वेगळ्याने अभिनयाची स्तुती करण्याची गरजच नाही.

आज जरी भारत एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून उभा असला तरी फाळणीनंतर मुस्लिमांचा पाकिस्तान आणि हिंदूंचा हिंदुस्तान असाच समज त्याकाळी बहुतांश लोकांमध्ये होता. त्या अनुषंगाने असणारी धार्मिक तेढ, दं*गल, अल्पसंख्यांक मुस्लिमांमधली भीती, वतन गेलं तरी स्वभावातला थाट न गेलेले राजघराणे आणि शांततेत प्रगतशील विचार करणारे समाजवादी असं सगळं यात आपल्याला बघायला मिळतं.

यात हिंदू लता मेहराला मुस्लिम कबीर दूरानीशी प्रेमसंबंध ठेवता येत नाही ही तुलनेने छोटी, पण खूप वैयक्तिक असल्याने मोठी वाटणारी, समस्या फाळणीचे वैयक्तिक घाव दाखवून देते.

सोबतच महेश कपूर मंत्री असून स्वतःच्या मित्राचा – नवाब साहबचा स्वाभिमान वाचवू शकत नाही हे ही आहेच. आणि या सगळ्यात सकारात्मक बदल म्हणून जमीनदारी कायद्यामुळे जो कसेल त्याची जमीन असा काहीसा कायदा आणून बदलता भारतही दाखवला आहे. लोकप्रिय नसणारे प्रगतशील मतं असणारी लोक का महत्त्वाची असतात हे यात ठळकपणे दिसतं.

याच सध्याच्या परिस्थितीशी असणारं साधर्म्य हा एक योगायोगच आहे. लोकप्रियतेच्या विरोधातली मतं असणारे पुरोगामी नेते, पत्रकार ही सिरीज बघून त्यात स्वतःला नक्की बघतील. जसं राजकीय विचारात तत्कालीन भारताचं प्रतिबिंब आलंय, तसंच जुनाट भारतीय विचारांचं प्रतिबिंब तितकंसं नीट उमटलं नाहीये असं लताला दिल्या जाणाऱ्या बऱ्याच (त्या काळाच्या मानाने) स्वातंत्र्यावरून वाटतं.

पण ही मुलगी एका खूपच श्रीमंत, प्रतिष्ठीत घरची आहे. त्या अगदी वरच्या एक टक्क्यातील मुलीलाही जे सहन करावं लागतंय त्यावरून बाकी लोकांबद्दल विचार करणंच नको. पण बाकी मुलींचं किमान प्रतिनिधीत्व असायला हवं होतं ही रुखरुख राहते.

रस्त्यावर किस करणारी, नाटकात मुलांसोबत काम करणारी लता १९५१ ची वाटत नाही (कदाचित आपण त्या एक टक्क्यात नाही म्हणून). पण तिचे तीन प्रियकर मात्र अगदी सुसंगत वाटतात. लग्न करण्यासाठी आर्थिक स्थैर्य आणि ऑफिसचं वसतिगृह मिळविण्यासाठी झगडणारा, स्वतःची औकात दाखवायला एक महिन्याचा पगार मुलीच्या घरच्यांच्या पाहुणचारावर खर्च करणारा हरेश लताच्या आईसाठी आदर्श मुलगा असतो.

पण, उच्चभ्रू समाजात प्रतिष्ठा टिकवायला लताच्या भावाची निवड असते ती वंशपरंपरेने श्रीमंत असणारा उत्तम कवी, जो उदरनिर्वाहासाठी विशेष काही करत नसतो.

आणि लता सोडून कुणालाच न आवडणारा कबीर, मध्यमवर्गीय असतो, अजूनही सायकलवर फिरत असतो, शिक्षण संपल्यावर नोकरी शोभेल यातच त्याच जास्त आयुष्य जाणार असतं. पण त्याचा धर्म मुस्लिम असल्यामुळे या प्रेमकथेला सगळ्यांचाच विरोध असतो. या तीन पर्यायांपैकी लता कोणाला निवडते, का निवडते ही मुळ कथा मंद गतीने पुढे सरकत जाते. लता स्वतःसोबत हे बघणाऱ्या प्रेक्षकानांही एकप्रकारे गाईड करत असते.

मान कपूर, नवाब साहबच्या जुन्या हवेलीत जातो, तेव्हा तिथली भव्यता बघून अवाक् झालेल्या त्याच्या नजरेसोबत कॅमेरा फिरतो, वाईड लेन्स एवढ्या गतीने सहज फिरवली आहे की ती भव्यता एका शॉटमध्येच समजते.

लता आणि कबीर पहाटे एका मंदिराकडे भेटतात तेव्हाचा ड्रोन शॉट, अशा बऱ्याच जागा सिनेमॅटोग्राफरने उत्तम साधल्या आहेत. वडिलोपार्जित वैभव, सामान्य कुटुंबातील फर्निचर, सांडपाण्याने भेलरलेले गावातील रस्ते, रंग नसलेली गरिबांची घरं, गडद रंग असणारी मेहफिलीची जागा, हे सगळं शंभर टक्के खरं दाखवलं आहे.

सी जी आय, स्टुडिओ अशा ट्रिक्स न वापरता प्रोडक्शन टीमने अगदी १९५१ चा भारत साकारला आहे. निर्मितीपासूनच या मालिकेतील बारकाव्यांबद्दल बरीच चर्चा होत होती. ज्या गोष्टी फ्रेममध्ये ओळखूही येणार नाहीत, त्यासुद्धा फक्त खरेपणा टिकवायला, अभिनयात मदत होईल म्हणून, मुद्दाम ठेवल्या आहेत.

जसं की एका मेकिंग व्हिडीओत राम कपूर सांगतात की “महेश कपूर- काँग्रेस लीडर” असे त्यांचे व्हिजिटिंग कार्डही त्यांना दिले गेले होते- जे कुठेच फ्रेममध्ये दिसत नाही. जुने मर्फी कंपनीचे रेडिओ, गाड्या, द सन बिस्कीटचे कापडी फ्लेक्स, जुन्या गाड्या, जुन्या पद्धतीचा बुटांचा कारखाना, या फारशा अधोरेखित न केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी साकारायला बरेच कष्ट घेतले गेले आहेत.

कथा, नेपथ्य आणि अभिनय यात एक प्रवाहीपणा आणण्यासाठी संगीताचा, प्रसिद्ध कवितांचा वापर केला गेला आहे. मुळात भारतीय जीवन पद्धतीत कविता, अभंग, गझल, सिनेमातली गाणी यांचा सहभाग इतर देशांच्या  तुलनेत खूप आहे, ते विशेषत्वही यातून दिसतं.

पण त्यासाठी काही लिपसिंकिंग वगैरे केलं नाहीये तर, अनुषंगाने जे कोणी गाणं म्हणेल तेवढाच भाग घेतलाय. जसं की, सईदा बाई “हमे बुरा कहीये” ही गझल गातात, बंगाली परिवारात जेवणानंतर एका ब्रिटिश मित्राला “एकला चलो रे” शिकवलं जातं, असे बरेच सुंदर प्रसंग यामुळं बघायला मिळतात.

पण यातला एक गाण्याचा प्रसंग मालिकेचा दर्जा खूपच वाढवतो. युट्युबवर लता मंगेशकर यांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ आहे. त्यात “गोरे गोरे ओ बाके छोरे” या गाण्याबद्दल बोलताना त्या म्हणतात की हे गाणं १९५१ साली आलं तेव्हा त्याला संकुचित लोकांकडून खूप विरोध झाला, पण विवादास्पद झाल्याने प्रसिद्धीही मिळाली.

या मालिकेत महिनाभराच्या सरावानंतर कॉलेजमधला एक गट नाटक सादर करतो. नाटक सगळ्यांना आवडतं, आणि यानंतर सेलिब्रेट करायला हे तरुण-तरुणी नाट्यगृहाच्या मागच्या ग्रीन रूममध्ये एकत्र येतात. तेव्हा ते गाणं म्हणतात, गिटार वाजवतात, आणि त्यावर नाचतात, ते हेच गाणं “ओ बाके छोरे”.

या सिनमधलं दिग्दर्शन आणि त्यांचं रँडम, पण लयातलं गायन यामुळे मालिका संपली तरी आपण ते गाणं ऐकायला परत युट्युबवर जातो, आणि कमेंटमध्ये कोणी तरी लिहिलेलं असतं “who is here after watching A Suitable Boy?”. मूळ गाण्यापेक्षा यातल्या गाण्याची धूनच लक्षात राहते, “सनम”ने रिमेक केलेल्या (काही) गाण्यांसारखी. अशाप्रकारे या मालिकेत भारतीयपणाला एक उच्च दर्जाचं संगीतमय ट्रिब्युट आहे.

आठ एपिसोड्सची ही मालिका सहज ७ एपिसोड्सची करता आली असती पण एडिटरने मंद गती शेवटपर्यंत सांभाळून एक सुंदर काम केलंय, त्यामुळं त्याकाळच्या स्लो लाईफ आणि जुनाटपणाचा फील येतो.

मीरा नायर यांना बीबीसीसारख्या खंबीर निर्मात्यांची साथ मिळाली तर काय घडू शकतं, हे त्यांनी दाखवून दिलंय. यातली एकही गोष्ट बदलावी वाटणार नाही, एवढं काटेकोर दिग्दर्शन त्यांनी केलंय.

भारताचे आत्तापर्यंत तीन सिनेमे ऑस्कर नामांकनाच्या शेवटच्या पाच सिनेमांच्या यादीत गेले आहेत, त्यापैकी एक सिनेमा (बॉंम्बे टाइम्स) हा मीरा नायर यांचा आहे. त्यातला दुसरा सिनेमा – लगान नामांकन यादीत आला तेव्हाही मीरा नायर यांचा “मॉन्सून वेडिंग” हा सिनेमा स्पर्धेत होता. आणि आता “अ सुटेबल बॉय”मधून तर त्यांनी दिग्दर्शनाची नवी उंची गाठली आहे.

ज्या गोष्टी जुळून आल्यासारख्या वाटत नाहीत किंवा आपण त्यांच्याशी रिलेट करू शकत नाही किंवा हे वेगळं असायला हवं होतं असं वाटतं, ते सगळे मुद्दे विक्रम सेठ यांच्या लिखाणातले आहेत. पण दिग्दर्शनात तशी कुठलीच खोड काढता येत नाही. कुठल्या तरी महान कलाकाराने भारतीयपणाला प्रेमपत्र लिहावं तशी ही मालिका आल्हाददायक आणि अंतर्मुख करणारा अनुभव देते. नक्की बघा.

अभिनयाच्या अंगाने ही मालिका खूप मजबूत आहे. इतर पात्रांमुळे आपण भारतीयत्वाचे आणखी पैलू उलगडत जातो. मुख्य पात्रांचीच संख्या १९ आहे, आणि ही पात्रं खूप चांगल्या कलाकारांनी साकारली आहेत. त्यामुळे लिहीत गेलो तर लेख मोठा होईल आणि नाही लिहिलं तर त्यांच्या कामाचा अपमान अशा दुविधेतून पर्याय काढत थोडक्यात लिहतोय.

नमित दासला यानंतर त्याच्या टॅलेंटला साजेसे पात्रं मिळतील अशी अपेक्षा आहे, कारण यात त्याने साकारलेल्या सद्गुणी, हुशार शु मेकरच्या पात्राचं पावित्र्य त्याने खूप नीट जपलंय.

मिहिरा कक्कर यांनी साकारलेली टिपिकल आई, विवेक गोम्बरने साकारलेला गर्विष्ठ भाऊ, मनोज पहावा यांनी साकारलेला राजा, रसिका दुग्गलने साकारलेली आधार देणारी बहीण लक्षात राहतात. रणवीर शौरीने साकारलेला वारीस खान (राजकीय प्रभाव असणारा स्थानिक नेता) आणि रणदीप हुडाने साकारलेला बिल्ली इराणी (विवाहित महिलेसोबत शरीर संबंध ठेवणारा श्रीमंत) हे अर्थातच त्यांच्या कामामुळे थोडा काळच स्क्रीनवर दिसले तरी प्रभाव टिकवून ठेवणारं काम करतात.

ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेहरू, शेख अब्दुल्ला आणि काश्मीर: नेमकी भानगड काय आहे?

Next Post

पुण्यात जन्म झालेला ‘पुना गेम’ आज जगभर ‘बॅडमिंटन’ या नावाने प्रसिद्ध आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पुण्यात जन्म झालेला 'पुना गेम' आज जगभर 'बॅडमिंटन' या नावाने प्रसिद्ध आहे

जमीनदारी विरोधात नक्षलवाद पुकारणारा स्वतःसुद्धा जमीनदार होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.