आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक लागतो. पॅसेंजर व्हेईकल कमर्शियल व्हेईकल आणि छोट्या कारच्या उत्पादनासाठी भारत ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. याबाबतीत आपण जर्मनीलासुद्धा मागे टाकले आहे.
आजच्या घडीला अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवलेले आहे. याच्यामध्ये मारुती, सुझुकी, हुंदाई, फोर्ड, हिरो मोटोकार्प, टोयोटा अशा कंपन्यांचा समावेश होतो. याबरोबर आपल्या भारतीय अशा महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अशोक लेलँड या कंपन्यांची घोडदौड देखील सुरू आहे.
तसं बघायला गेलो तर भारतामध्ये मोटर उद्योगाची खरी सुरुवात ही आर्थिक उदारीकरण अर्थात १९९१ नंतरच झाली. त्या अगोदर ‘कोटा परमिट लायसन्स राज’मुळे भारतात फोर व्हिलर गाड्या रस्त्यावरून फारशा धावत नसत. भारतातील पहिली मोटर कंपनी म्हणजे हिंदुस्थान मोटर्स. या कंपनीची स्थापना १९४२ साली करण्यात आली.
त्यानंतर काही वर्षातच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची स्थापना झाली. १९४७ नंतर हिंदुस्थान मोटर्स या कंपनीने भारताच्या रस्त्यावर राज्य केले.
या कंपनीची सगळ्यात प्रसिद्ध आणि आयकॉनिक मोटर म्हणजे ॲम्बॅसिडर. ही गाडी त्याकाळी प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याकडे राजकारण्याकडे, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांकडे दिसत असे. त्यामुळे हिंदुस्थान मोटर्स या कंपनीने अनेक वर्षे भारताच्या ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर राज्य केले.
त्या काळात लोकांना हिंदुस्थान मोटर्सशिवाय इतर दुसरे कुठलेही जास्त ऑप्शन नसायचे. नाही म्हणायला इंपाला, पॉंटेक, इंपीरियल या कंपनीच्या गाड्या रस्त्यावरून धावत असत. शिवाय गाड्यांचे उत्पादनही जास्त प्रमाणात होत नसे. भारतातला जो अतिश्रीमंत म्हणवला जाणारा वर्ग होता त्या वर्गाकडे त्याकाळी चारचाकी गाड्या असत. त्यामध्ये प्रामुख्याने क्रिकेटर्स, राजकारणी, चित्रपट अभिनेते, उद्योगपती इत्यादी लोकांचा समावेश होता.
ॲम्बेसिडर ही गाडी हिंदुस्थान मोटर्सचे एकमेव प्रमुख उत्पादन. त्या काळामध्ये जे लोक परदेशी जात तेव्हा परदेशातील गाड्यांचे त्यांना प्रमुख आकर्षण असे. ८०च्या दशकात फोर्डच्या गाड्या आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त प्रमाणात प्रसिद्धीला आलेल्या होत्या.
दिसायला लांबलचक, चकचकीत, आकाराने मोठ्या अशा सेडन गाड्या लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत होत्या. ते पाहून भारतात अशा प्रकारच्या गाड्यांची निर्मिती आपण करावी असे हिंदुस्थान मोटर्स यांनी ठरवले. अशी गाडी जी पूर्णपणे भारतीय बनावटीची असेल परंतु तिचा थाट एखाद्या परदेशी मोटर कारसारखा असेल असे मॉडेल या कंपनीने लॉन्च करायचे ठरवले.
ॲम्बेसिडरनंतर हिंदुस्थान मोटर कंपनीची दुसरी मोटर ऐंशीच्या दशकात बाजारामध्ये आली. तिचे नाव होते कॉन्टेसा!
ही मोटर बाजारामध्ये लॉन्च झालेल्या झालेल्या लोकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली. तोपर्यंत लोकांना ॲम्बेसिडरसारखी छोट्या आकाराची गाडी पाहायची सवय होती परंतु परदेशातील मोटरच्या धर्तीवर बनवलेले हे देशी लक्झरी मॉडेल लोकांना पसंत पडले.
हिचा कलर, बसण्यासाठी प्रशस्त जागा, पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशनर, मोठ्या क्षमतेचे इंजिन, खाचखळगे असलेल्या रस्त्यावरून देखील धावण्याची तिची क्षमता या गोष्टी लोकांना आवडल्या. त्याकाळात या गाडीची इनिशियल बुकिंग अमाउंट होती १५ हजार. गाडीची संपूर्ण किंमत होती ८४ हजार. थोडक्यात ही गाडी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हतीच.
काँटेसा १९८४ पासून भारतातील रस्त्यावर धावू लागली. भारतातील नवश्रीमंत वर्गाच्या घराच्या गॅरेजमध्ये ही गाडी दिसू लागली. अनेक लोकांना त्यावेळी आपल्याकडे काँटेसा ही गाडी आहे ही अभिमानाची गोष्ट वाटत असे. या गाडीच्या ज्या काही जाहिराती आल्या त्याच्यामध्ये ही गाडी एखादा ड्रायव्हर चालवत आहे आणि पाठीमागे एखादा मोठा राजकारणी किंवा बिझनेसमॅन आपल्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी चाललेला आहे अशा स्वरूपाची थीम घेऊन आल्या.
थोडक्यात ही गाडी म्हणजे एक प्रकारची लक्झरी आहे हे ठासवण्याचा त्या जाहिरातींमधून प्रयत्न झाला. शिवाय तेव्हा हिंदुस्थान मोटर्सला दुसऱ्या कुठल्या मोठ्या कॉम्पिटिशनची भीती नव्हती. दुसऱ्या कुठल्या परदेशी कंपन्यांची तेव्हा भारतामध्ये गुंतवणूक देखील नव्हती त्यामुळे या गाड्यांचे उत्पादन करून हिंदुस्थान मोटर्सने भरपूर नफा कमावला.
ऐंशीच्या दशकातील जे हिंदी सिनेमे येत असत त्याच्यामध्ये प्रत्येक श्रीमंत हिरोकडे अथवा त्याच्या मित्राकडे काँटेसा गाडी असे.
१९९१ साल उजाडले आणि भारतामध्ये आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली. मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव या जोडगोळीने भारतामध्ये खाजगीकरण आणले. भारतीय बाजारपेठ आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी खुली केली गेली. लायसन्स परमिट राज संपवले गेले.
सरकारने सर्वच बाबतीत आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबले. यात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये प्रचंड प्रमाणात बाहेरील कंपन्यांचा शिरकाव झाला. इतकेच नव्हे तर टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा या आपल्या स्वदेशी कंपन्यांनी देखील परदेशी कंपन्यांबरोबर हात मिळवणी करून नवीन मॉडेल बाजारात आणण्यासाठी तयारी केली.
टाटांनी इंडिका नावाचे आपले मॉडेल बाजारामध्ये लॉन्च केले. त्यापाठोपाठ मारुती सुझुकी, फोर्ड मोटर्स, हुंडाई या कंपन्यांनी आपल्या मोटर कार्स भारतामध्ये लॉन्च केल्या आणि लोकांकडे कमी पैशात अगदी लक्झरियस गाडी घेण्याचे अनेक ऑप्शन निर्माण झाले.
हिंदुस्थान मोटर्सची ॲम्बेसिडर हळूहळू कालबाह्य होऊ लागली. खरे पाहता ॲम्बेसिडर या एकमेव गाडीवर हिंदुस्थान मोटर्स गेल्या ७० वर्षांपासून भारतामध्ये टिकून होते. अनेक सरकारी कामांसाठी हीच गाडी वापरली जात असे परंतु जसजसे गाड्यांचे ऑप्शन येत गेले तसतशी नंतर ॲम्बेसिडरची गरज कमी भासू लागली.
काँटेसाचे उत्पादन चालू होते मात्र इतर कंपन्यांच्या तुलनेत आपले मॉडेल अपग्रेड करावे असे हिंदुस्थान मोटर्सला कधीही वाटले नाही. हळूहळू काँटेसा इतर गाड्यांच्या तुलनेत पाठीमागे पडू लागली. तिला बाजारामध्ये ग्राहकांची फारशी पसंती भेटेना.
तिचे दुसरे कुठलेही नवीन मॉडेल तोपर्यंत बाजारामध्ये येत नव्हते. इतर कंपन्यानी आपल्या मॉडेलमध्ये बदल केले. इंजिनची क्षमता वाढवली. पॉवर स्टिअरिंगचे नवनवीन प्रकार आणले. गाडीचे टायर कितीही खडबडीत रस्त्यावरून फुटणार नाहीत. गाडी अशा रस्त्यावरून देखील धावेल अशा प्रकारे संशोधन करून त्याच्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या.
नवनवीन जाहिराती आणून जोरदार मार्केटिंग केले गेले. यामध्ये आपली काँटेसा मागे पडली. 1984 साली सुरू झालेली काँटेसा 2002 साडी रस्त्यावर धावायची बंद झाली. त्यानंतर हिंदुस्थान मोटर्सने आपले उत्पादन पूर्णपणे थांबवले या कंपनीच्या दोन्हीही गाड्या आज दुर्दैवाने कालबाह्य झालेल्या आहेत परंतु कॉन्टेसाचे चाहते मात्र आजही हिंदुस्थान मोटर्स काँटेसाचे नविन अपग्रेड मॉडेल कधी घेऊन येते याची वाट बघत असतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









