The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालविवाहानंतर सासूरवास भोगल्यानंतर या ताई आता एक यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत

by द पोस्टमन टीम
3 May 2025
in संपादकीय
Reading Time: 1 min read
0
kalpana saroj story in marathi
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


सातवीत असताना शिक्षण अर्धवट सोडून लग्न करावं लागलं. सासरकडच्यांनी अतोनात अ*त्याचार केले. एवढ्या कमी वयात इतक्या नरकयातना भोगून आता “ताई” २००० करोडच्या मालकीण आहेत. आज ताईंच्या स्वतःच्या ६ कंपन्या आहेत ज्यामध्ये ६०० लोक काम करतात.

फक्त एवढंच नाही तर, समाजाचं आपण काही देणं लागतो ही भावना जोपासून ताईंची संस्था सुशिक्षित बेरोजगारांसाठी दिवस रात्र झटत असते. कोण आहेत या “ताई ?” तर आज आपण जाणून घेणारे “कल्पना सरोज” यांच्याबद्दल ज्यांना सर्व “ताई” म्हणून ओळखतात .

कल्पना यांचा जन्म अकोल्यातील रोपरखेडा या गावी झाला. त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. दलित-बौद्ध समाजात जन्म झाल्याने मुलींना शाळेत जाण्याची मुभा नव्हती तरी वडिलांनी हट्ट केला आणि मुलीने निदान मॅट्रिक तरी व्हावं म्हणून वडिलांनी शाळेत नाव घातलं.

पण अवघ्या बाराव्या वर्षी, सातवीत असताना त्यांना शाळा सोडावी लागली आणि एका अनोळखी माणसासोबत लग्न करावं लागलं. “मुंबईचं स्थळ आहे. परत परत अशी स्थळं येत नाहीत. बिनलग्नाची मुलगी घरात ठेवणं म्हणजे चांगली गोष्ट नाही. लावून दे हिचं लग्न”, असं सख्खा मामा म्हणतोय म्हटल्यावर नाईलाजाने घरच्यांनाही ऐकावंच लागलं. पण घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती की लग्नानंतर आपल्या कोवळ्या पोरीला नरकासमान जीवन जगावं लागेल.



लग्नानंतर कल्पना त्यांच्या नवऱ्यासोबत त्यांच्या सासरी उल्हासनगरच्या झोपडपट्टीत राहायला आल्या. १० बाय ५ची खोली. खोलीमध्ये १२-१५ जणं, अतिशय घाणेरडी परिस्थिती, स्वच्छता तिथे नावालासुद्धा नव्हती. ही तर फक्त सुरुवात होती. दिवसेंदिवस परिस्थिती अजून वाईट होत चालली होती.

सासू आणि नवरा क्षुल्लक गोष्टींवरून शारीरिक छळ करत होते. एकदा तर, भाजीत मीठ कमी पडलं म्हणून त्यांच्या नवऱ्याने त्यांना खूप मारलं. बरं, असे अ*त्याचार होतायत हे कोणाला सांगायची पण सोय नाही. कारण लग्न झाल्यापासून माहेरच्यांशी सगळा संवाद बंद करून टाकला होता सासरच्यांनी.

हे देखील वाचा

बेरोजगार भूमिपुत्र आणि उद्योजक यांच्यातला दुवा ठरतंय महाराष्ट्र शासनाचं ‘महाजॉब्स’ पोर्टल!

आईन्स्टाइनपेक्षा हुशार असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी करिअरचा त्याग केलाय

अमेरिकेत या १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला गुन्ह्याच्या संशयावरून मृत्युदंडाची शिक्षा दिली होती

सुदैवाने ६ महिन्यांनी काही कामानिमित्त वडील मुंबईत आले. लेकीला भेटून तिची विचारपूस करावी म्हणून ते उल्हासनगरला आले तेव्हा, त्यांनी आपल्या मुलीचे होणारे हाल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तडक तिला तिथून घेतलं आणि गावाकडे निघाले.

सासरच्यांनी खूप विरोध केला पण लेकीला अशा अवस्थेत ते पाहूच शकत नव्हते. त्यांनी तिला घेऊन सरळ गावचा रस्ता धरला. नरकातून मोकळे झालो यामुळे ताईंना खूप हायसं वाटलं. पण, त्यांना हे माहिती नव्हतं की पुढे अजून वाईट परिस्थिती वाढून ठेवलीये.

गावाकडे आल्यावर त्यांच्या वडिलांनी पुन्हा त्यांना शिक्षण सुरू करण्यास सांगितलं. पण लग्न लावून दिलेली लेक पुन्हा घरी घेऊन येणं हा त्यांच्या समाजाच्या दृष्टीने खूप मोठा गुन्हा होता. त्यामुळे त्या जातील तिथे लोक त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलायला लागले, हिणवायला लागले. हा मानसिक छळ तर त्या सासरकडच्या शारीरिक छळापेक्षा वाईट होता.

दिवसरात्र लोक त्यांना त्रास देत. या जाचाला कंटाळून त्यांनी आत्मह*त्या करायचं ठरवलं. उंदीर मारण्याचं औषध पिऊन त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नशीब चांगलं म्हणून त्यांची काकू तिथे वेळेत पोहोचली आणि त्यांनी कल्पनांना सरकारी इस्पितळात दाखल केले.

त्या इस्पितळातल्या भयानक २४ तासांत त्यांना एक गोष्ट कळली होती, “आपल्या प्रति कळवळा कोणालाच नाहीये, उलट या आपल्या अशा वागण्याने त्यांना आपली लाज वाटतीये. त्यामुळे इथून पुढे जे काही जगायचं ते स्वतःसाठीच”.  हे नवचैतन्य घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याचा पुढचा दुसरा अध्याय सुरू केला .

सर्वप्रथम त्यांना असं काहीतरी करायचं होतं की जेणेकरून लोकं त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या नजरेनं बघायला लागतील. त्यांनी नर्सपासून ते अगदी पोलीस अधिकारी होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या परीक्षांचे अर्ज भरले पण प्रत्येकासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी होती. त्यामुळे त्यांना कुठल्याही परीक्षेला बसता आलं नाही. अशातच त्यांची ओळख दादरच्या चाळीत राहणाऱ्या काकांशी ओळख झाली. त्यांच्यासोबत मुंबईला जाण्याचा प्रस्ताव कल्पना ताईंनी घरच्यांसमोर ठेवला. पण एकट्या पोरीला असं आपल्यासोबत ठेऊन घेणं काकांनाच योग्य नाही वाटलं.

काका रेल्वे वसाहतीत राहणाऱ्या एका गुजराती कुटुंबाला ओळखत होते. आपल्या पुतणीला त्यांनी ठेवून घ्यावे अशी विनवणी त्यांनी त्या गुजराती कुटुंबाला केली त्या गुजराती कुटुंबानेही आनंदानं ताईंना आपल्या घरी ठेऊन घेतलं.

दादरला आल्यावर कल्पना लोअर परेल मधल्या एका कपड्याच्या गिरणीत हेल्पर म्हणून कामाला लागल्या तिथे त्यांना महिना ६० रुपये मिळत. लवकरच त्यांनी शिवणकाम आत्मसात केले आणि मशिनवर काम करू लागल्या. बढती मिळाल्यामुळे आता त्यांचा पगार महिना १०० रुपये झाला. दिवसेंदिवस त्या एक एक यशाची पायरी गाठत गेल्या. फक्त २ वर्षांतच त्यांनी कल्याणमध्ये एक छोटंसं घर भाड्याने घेतलं आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला कल्याणला राहायला घेऊन आल्या.

कल्याणमध्ये आल्यावर त्यांची छोटी बहीण अचानक आजारी पडली. तिच्या औषधांचा खर्च करण्यासाठीसुद्धा ताईकडे पैसे नव्हते. फक्त २००० रुपये नव्हते म्हणून तिला जीव गमवावा लागला होता. ताईंच्या हातात तिने “ताई मला नाही जायचंय, प्लीज मला वाचव” असं म्हणत प्राण सोडला होता. या एका घटनेने ताईंच जीवनच बदलून गेलं. त्या आता पुरेसे पैसे कमावण्याच्या आणि गरजवंतांना मदत करण्याच्या दृष्टीनेच काम करू लागल्या. हीच सुरुवात होती त्यांच्या उद्योजक बनण्याच्या कारकिर्दीची.

याच विचाराने काम करता करता त्यांना १९७५ साली शासनाकडून “महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय विकास योजने”अंतर्गत ५०,००० रुपयांचे कर्ज मिळाले. या मिळालेल्या कर्जातून त्यांनी कल्याणमध्ये कपड्याचे आणि फर्निचरचे दुकान चालू केले. यातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले. दोनच वर्षांत त्यांनी कर्जाची परतफेड केली. पण पैसे कमावणे हे एकच उद्दिष्ट नव्हते. पैसे कमवून त्यांना त्यांच्यासारख्याच परिस्थितीने मागे पडलेल्या लोकांना मदत करायची होती.

यातूनच उदय झाला “सुशिक्षित बेरोजगार युवक संघटनेचा”.

या संस्थेमध्ये ताई सुशिक्षित तरुणांना उद्योगकर्जासाठी लागणारे मार्गदर्शन देऊ लागल्या. या कार्यात त्यांना पोलीस अधिकारी, बँकेतील अधिकारी, स्थानिक राजकारणी ह्यांचीसुद्धा मदत लाभली. या संस्थेमार्फत त्यांनी जवळपास ३,००० लोकांना ४० कोटी रुपायांचे कर्ज वितरित केले. मिळालेल्या कर्जातून बऱ्याच लोकांनी कपड्याची दुकाने, मूर्तीचे कारखाने, केश कर्तनालय असे छोटेमोठे व्यवसाय सुरू केले.

कल्पनाजींच्या कामामुळे आजूबाजूचे लोक त्यांना आता “ताई” म्हणून ओळखू लागले होते . कारण सगळ्याच लोकांसाठी कल्पनाजी एका मोठ्या बहिणीचाच आधार होत्या. सर्व आता व्यवस्थित चालू होतं. पण थोडक्यात समाधान मानणाऱ्यांपैकी ताई नव्हत्या. त्यांना यशाचे मोठे मोठे शिखर गाठायचे होते.

१९९५ साली कल्पना ताईंनी कल्याणमध्ये जमीन विकत घेतली. जमीन व्यवहारातलं त्यांना काहीच कळत नव्हतं, पण ती जमीन अतिशय कमी किमतीत मिळाल्याने त्या खूश होत्या. खरी मेख तर पुढे वाढून ठेवली होती. जी जमीन ताईंना अतिशय कमी किमतीत मिळाली होती तिच्यावर बांधकाम करण्याची अनुमती शासन देणार नव्हतं कारण ती शेतजमीन होती. लँड सिलिंग कायद्यानुसार ती जमीन फक्त शेतीसाठीच वापरण्यात यावी असा निर्बंध होता आणि हा निर्बंध फक्त कलेक्टरला उठवता येत होता. हा एक धक्काच होता ताईंसाठी.

पण असे खूप धक्के पचवूनच कल्पना आज “ताई” झाली होती. ती शांत बसणाऱ्यातील अजिबात नव्हती. अडीच वर्षे कलेक्टरचा पाठपुरावा केल्यानंतर शेवटी त्यांनी तो निर्बंध उठवला आणि बांधकामासाठी परवानगी दिली. एक लाखात विकत घेतलेल्या जमिनीची किंमत आता पन्नास लाख झाली होती. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्या लँड माफियांच्या नजरेत ती जमीन खुपयाला लागली. ताईंनी अनिल होतचंदानी नावाच्या बिल्डरला आपला पार्टनर बनवला जमिनीच्या बदल्यात ताईंनी ३५% नफ्यातील हिस्सा त्याला मागितला आणि होणाऱ्या बिल्डिंगला नाव पण कल्पना ताईंचं राहणार ही अट ठेवली. हे सर्व मान्य करून “कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स” ह्या कंपनीच्या नावाखाली उभी झाली बिल्डिंग “कोहिनुर प्लाझा”.

पण मागासवर्गीयांमधून आलेली काल-परवाची पोरगी आज कोट्यवधी रुपये कमावतीये हे कळल्यावर ताईंना खूप साऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या पण अशा पोकळ धमक्यांना घाबरून घरात बसतील त्या ताई कुठल्या.

त्यांनी पोलीस सुरक्षा नाकारून स्वतःच बंदुक वापरण्याचा परवाना काढून घेतला.

हळूहळू ताईंची ख्याती साऱ्या उद्योगजगतात पसरायला लागली होती. ह्यातूनच दिवाळखोरीत निघालेल्या “कमानी ट्युब्स”च्या कामगारांनी ताईंना संपर्क केला आणि कल्पना ताईंना कंपनी विकत घेऊन चालवण्याची विनवणी केली. तोपर्यंत कल्पना ताईंचा उद्योग व्यवस्थित चालू होता “कल्पना बिल्डर्स”, “साईकृपा साखर कारखाना” हे सगळे उद्योग चांगले चालू होते. “कमानी ट्युब्स” विकत घेणे म्हणजे व्यावसायिक आत्मह*त्या करण्यासारखेच होते. कारण ती कंपनी दोन कामगार संघटना आधी चालवत होत्या. म्हणजे तिला ३,५०० मालक होते.

दहा वर्षांपासून ती कंपनी बंद होती. १४० करोडचं कर्ज होतं, १०० पेक्षा अधिक खटले कंपनीवर दाखल होते. म्हणचे एकदम सगळा गोंधळच होता.

कोणत्याही शहाण्या माणसाने ती कंपनी चालवायला घ्यायचं दिव्य केलं नसतं. पण तरी ताईंनी या आगीत हात घातलाच. २०००-२००६ या सहा वर्षांत ताई त्या सर्वांना भेटल्या ज्यांनी कंपनीला कर्ज दिलं होतं. ताईंनी त्यांना पटवून दिलं की जर तुम्ही कंपनीला दिवाळखोरीत काढलं तर कोणालाच यातून फायदा होणार नाही. त्यावेळच्या महाराष्ट्र राज्याच्या वित्तमंत्र्यांच्या मदतीने त्यांनी बँकांना कंपनीवर असलेले व्याज आणि दंड माफ करायला लावला आणि सोबत कंपनीच्या पुनरूज्जीवितेसाठी मुख्य कर्जातील २४% रक्कम सुद्धा माफ करून घेतली.

२००६ साली ताई “कमानी ट्युब्स”च्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. सर्वांत आधी ताईंनी कंपनीला कर्जमुक्त करण्यासाठी पावले उचलली कारण कर्जाच्या ओझ्याखाली कधीच मोकळेपणाने काम करता येत नाही असं ताईंचं म्हणणं होतं. कर्जाची परतफेड करण्यासाठी ताईंनी जमेल ते सर्व केलं. त्यासाठी त्यांनी कल्याणमधील त्यांची एक जागासुद्धा विकली. २००९ साली म्हणजे फक्त ३ वर्षांत “कमानी ट्युब्स” कर्जमुक्त झाली. एवढंच नाही तर “कमानी ट्युब्स” SICA म्हणजेच “Sick Industrial Companies Act “मधून सुद्धा बाहेर आली होती.

एक एक करता करता आज ताईंच्या सहा कंपन्या आहेत.”कल्पना बिल्डर्स”, “कमानी ट्युब्स”, “कमानी री-रोलिंग स्टीलस”, “कल्पना सरोज अँड असोसिएटस”, “साईकृपा साखर कारखाना”, “के एस क्रिएशन्स फिल्म प्रोडक्शन”.

कल्पना सरोज : एक हेल्पर म्हणून काम करणारी मुलगी आज २००० करोडची मालकीण आहे.

साठीमध्ये असलेल्या ताई आजसुद्धा शांत बसत नाहीत. सध्या त्यांनी राजस्थानमध्ये हॉटेल सुरू करण्यासाठी गुंतवणूक केलीये. सलाम आहे कल्पना ताईंना आणि त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीला. कल्पना सरोज यांना २०१३ साली व्यापार आणि उद्योग क्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारद्वारे त्यांची भारतीय महिला बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली, ही बँक प्रामुख्याने महिलांसाठी आहे. याशिवाय त्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर’च्या गव्हर्नर बोर्डच्या सदस्या देखील आहेत.

कल्पना ताई कायम सांगतात, “मेहनत करणे कधीच कमीपणाचे लक्षण नसते. तुम्हाला जे हवंय ,भले ते काहीही असो. ते तुम्हाला निश्चितच मिळेल जर ते मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून फक्त आणि फक्त त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तरच”.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: kalpana saroj
ShareTweet
Previous Post

भारतातील याठिकाणी आजही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मानवंदना दिली जात नाही

Next Post

भारताचा पराकोटीचा द्वेष करणारा ब्रिटीश पंतप्रधान

Related Posts

विश्लेषण

बेरोजगार भूमिपुत्र आणि उद्योजक यांच्यातला दुवा ठरतंय महाराष्ट्र शासनाचं ‘महाजॉब्स’ पोर्टल!

13 July 2020
विज्ञान तंत्रज्ञान

आईन्स्टाइनपेक्षा हुशार असलेल्या त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी करिअरचा त्याग केलाय

18 December 2025
इतिहास

अमेरिकेत या १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला गुन्ह्याच्या संशयावरून मृत्युदंडाची शिक्षा दिली होती

7 December 2024
विश्लेषण

..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

29 March 2024
विश्लेषण

काय आहे भारत आणि नेपाळच्या सीमावादाचा सुगौली करार..?

23 May 2025
मनोरंजन

बासू चॅटर्जी- अप्रतिम कलाकृती मागे ठेवून गेलेला दिग्दर्शक

9 January 2026
Next Post

भारताचा पराकोटीचा द्वेष करणारा ब्रिटीश पंतप्रधान

sam maneckshaw The Postman

राजकारण्यांनी भित्रा म्हणून हिणवलेल्या आर्मी चीफने तेरा दिवसांत पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.