आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘Daydreaming allows you to build a brand that will be consistent with your goals and dreams’, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ता असणाऱ्या ॲमी डिक्सचं हे वाक्य. केरळमधील एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या मुलानं दिवास्वप्न देखील पाहिलं अन् त्या स्वप्नातून ब्रँड देखील निर्माण केला. कधीकाळी एक शिक्षक म्हणून काम केलेल्या या मुलानं आता कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.
बायजू रविंद्रन, असं या कोट्यधीशाचं नाव आहे. कोविड -१९ महामारीमुळं देशासमोर अनेक नवीन संकटं उभी राहिली. शिक्षणाचा प्रश्न देखील याच संकटांपैकी एक होता. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला अन् शैक्षणिक क्षेत्रातील अनेक स्टार्ट-अप लोकप्रिय झाले. त्यात बायजूचं प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल.
बायजू रवींद्रन यांच्या नेतृत्वाखालील या ऑनलाइन शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीला मोठं यश मिळालं. इतकचं काय त्यावेळी कंपनीचे संस्थापक रवींद्रन राकेश झुनझुनवाला आणि आनंद महिंद्रा यांच्या पेक्षाही जास्त श्रीमंत झाले होते. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार, रवींद्रन यांची संपत्ती १९ टक्क्यांनी वाढून २४ हजार ३०० कोटी रुपये झाली. ऑनलाइन शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी उभी करण्याची कल्पना रवींद्रन यांना कशी सुचली? अल्पावधीत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा पल्ला कसा गाठला? असे काही प्रश्न नक्कीच तुम्हाला पडले असतील. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा आढावा घेणारा हा लेख..
केरळच्या आझिकोड गावात १९८१ साली बायजू रविंद्रन यांचा जन्म झाला. गावातील मल्याळम माध्यमाच्या शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या शाळेत त्यांची आई गणिताच्या शिक्षिका होत्या तर वडील भौतिकशास्त्राचे शिक्षक होते. शाळेत असताना बायजू साधारण विद्यार्थी होते. त्यांना हॉकी आणि फुटबॉल खेळण्याचं वेड होतं. त्यासाठी ते अनेकदा वर्गातून पळूनही जातं.
कन्नूरच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी बी.टेक. पूर्ण केलं आणि एका मल्टिनॅशनल शिपिंग कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनीयर म्हणून नोकरी सुरू केली. २००३ साली सुट्टी दरम्यान कॅट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आपल्या काही मित्रांना त्यांनी मदत केली. त्यानंतर त्यांनी स्वत:देखील कॅटची परीक्षा दिली. त्यात त्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले.
आपल्याला इतके गुण मिळालेच कसे याचं स्वत: बायजूंना आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि गंमत म्हणजे त्यांना पुन्हा शंभर पर्सेटाईल मिळाले. त्यानंतर त्यांनी कॅट परीक्षेसाठी अभ्यास करण्याऱ्या मुलांना मदत करणं सुरू केलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा मुलांना फायदा होऊ लागला. आपण नोकरी सोडून पूर्णवेळ कोचिंग सुरू केलं तर नक्कीच आपल्याला यश येईल, असा विचार करून बायजूंनी नोकरी सोडली.
सुरुवातीला लहानशा वर्गांमध्ये शिकवण्या सुरू केलेल्या बायजूंनी नंतर मोठ-मोठ्या ऑडिटोरियम्समध्ये जाऊन शेकडो विद्यार्थ्यांना शिकवण्या दिल्या. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेता येत नाही अशांसाठी त्यांनी ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली यातूनचं २०११ साली ‘थिंक अँड लर्न’ची स्थापना केली. या कामात त्यांची पत्नी दिव्या यांनी देखील सहकार्य केलं.
बायजू रविंद्रन यांनी आपल्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IIT-JEE, NEET, CAT आणि IAS सारख्या भारतीय परीक्षांसाठी आणि GRE आणि GMAT सारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षांचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. २०१५ साली कंपनीनं स्वतंत्र ॲप लॉन्च केलं. २०११ पासून ते २०२१ या दहा वर्षांच्या काळात बायजू एज्यूटेक कंपनीचं मूल्य १६.५ अब्ज डॉलर्स इतकं झालं. व्हेंचर कॅपिटलिस्टच्या फंडनं बायजू कंपनीनं मागील एक वर्षात अनेक नवीन शैक्षणिक संस्थाचं सुविधांचं अधिग्रहण केलं आहे.
एप्रिल २०२१ मध्ये, बायजूनं ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या रोख आणि स्टॉक डीलमध्ये ‘आकाश शैक्षणिक सेवा’ विकत घेतली. याव्यतिरिक्त, सिंगापूरस्थित ‘ग्रेट लर्निंग’ ४ हजार ५०० कोटी रुपयांना आणि कॅलिफोर्नियास्थित ‘किड्स डिजिटल रीडिंग प्लॅटफॉर्म’ ३ हजार ७०० कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. याशिवाय, अनेक छोटे स्टार्टअप्स देखील खरेदी केले आहेत.
सुरुवातीला उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलेल्या बायजूनं आता अगदी लहान मुलांना देखील शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. २०२० पासून बायजू ॲपनं डिस्नीसोबत देखील टायअप केलं आहे. या माध्यमातून बायजू रविंद्रन यांनी सर्वात मोठं पाऊल टाकलं आहे. नवीन ॲपमध्ये, डिस्ने स्टेपल, द लायन किंगमधील सिम्बा, फ्रोझनमधील एल्सा आणि ॲना पहिल्या ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजीचे धडे देतात.
याशिवाय ॲपमध्ये अनिमेटेड व्हिडिओ गेम्स, स्टोरीज आणि क्विझ देखील आहेत. डिस्नेसोबत काम करण्याचा बायजूचा दृष्टिकोन अतिशय साधा सोपा आहे. डिस्नेच्या कार्टून्सचं लहान मुलांना मोठं आकर्षण आहे. त्यातील पात्र लहान मुलांना आकर्षित करतील, असे शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्याची योजना आहे. अंगणवाडी ते बारावीपर्यंतचं ऑनलाईन शिक्षण हे सध्या देशाच्या इंटरनेट मार्केटमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्यांपैकी एक आहे. याचा फायदा भारतीय बाजारपेठेतील एज्युकेशन स्टार्टअप्सला होत असल्याचं मत बायजू रविंद्रन यांनी व्यक्त केलं आहे.
आपल्या डोक्यात आलेल्या एका साध्या कल्पनेपासून बायजू रविंद्रन यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोविडच्या काळात त्यांनी त्यांच्या एज्युकेशन मॉडेलची उपयुक्तता सिद्ध देखील झाली आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठांनी बायजूच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास सुरू केला आहे. बायजूचं ॲप सध्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलं आहे.
सध्या काही दिवसांपासून बायजू यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप होत आहेत, पण या आरोपांनाही यशस्वीरीत्या खोदून काढण्यात ते यशस्वी ठरत आहेत.
बायजू रवींद्रन यांचा हा प्रवास नक्कीच आजच्या अनेक नवउद्योजकांना प्रेरणादायी ठरेल..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










