The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?

by द पोस्टमन टीम
26 February 2025
in वैचारिक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘‘मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?’’
काही वेळेस या प्रश्‍नाचे उत्तर ‘ज्योतिष रत्नमाला’, ‘विवेकसिंधु’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘लीळाचरित्र’, ‘धवळे’ असे मिळते.
‘‘मराठीतील पहिला ग्रंथ ‘लीळाचरित्र’चे लेखक कोण होते?’’
या प्रश्‍नाचे उत्तर ‘म्हाइंभट’ असे चटकन मिळते.
‘‘त्यांचे गाव कुठले?’’
या प्रश्‍नाचेही उत्तर ‘सराळे’ असे लगेच मिळते!
पण ‘‘हे गाव कुठे आहे?’’ या प्रश्‍नाचे उत्तर बर्‍याचवेळा मिळत नाही.
अगदी आंतरजालवर शोधले तरी या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही.
अशावेळी दुसरा एक प्रश्‍न विचारून पहा.
‘‘शेक्सपियर यांचा जन्म कुठला?’’

समजा उत्तर आले नाही तर आंतरजालवर शोधा. त्यावर लगेच उत्तर येते. ऍव्हन नदीच्या किनार्‍यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-ऍव्हन या गावी शेक्सपियर यांचा जन्म झाला. त्यांच्याविषयी आणखी माहिती विचारली की लगेच त्यांचे गाव, त्यांचे घर, इतर वास्तू नेटवर दिसायला लागतात.

असा शोध मराठीतील पहिल्या लेखकाचा, म्हाइंभट यांचा घेऊन पहा. उत्तर मिळत नाही. ना नेटवर, ना पुस्तकामध्ये, ना लोकांमध्ये. कटू असले तरी हे एक सत्य आहे.

या प्रश्‍नाचे नेमके उत्तर मराठी वाङ्मयाच्या इतिहासात मिळत नाही कारण त्याचे लेखन होऊन अनेक वर्षे झाली. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास डिजिटल विश्‍वकोशाच्या ‘प्राचीन मराठी साहित्य’ या नोंदीत ‘ज्योतिष रत्नमाला’, ‘विवेकसिंधु’ अशा क्रमाने ‘लीळाचरित्र’ या मराठीतील पहिल्या ग्रंथाचा उल्लेख येतो. तेथे सरळ ‘लीळाचरित्र’ असे लिहिलेले दिसत नाही.

आजही या नोंदी अद्ययावत होत नाहीत, त्यामागे निश्चित काही कारणे असतील.



प्रश्‍न त्याचा नाही. अद्ययावत नसणे ही जर विश्‍वकोशाची अवस्था असेल तर इतर ग्रंथांची काय परिस्थिती असेल? म्हणून तुम्ही कोणती माहिती वापरता, कोणते साधन वापरता, ती किती अस्सल आणि अद्ययावत आहे त्यावर माहितीचा दर्जा ठरत असतो.

माहितीचा दर्जा हा जसा ग्रंथातून स्पष्ट होतो तसा तो माहितीशी असणार्‍या पूरक नोंदीवरही ठरत असतो. इतिहासातील माहितीला स्थानिक इतिहासाची जोड मिळाली तर ती अधिक नेमकी होत असते. एका मुद्याच्या आधारे ही बाब स्पष्ट होईल. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाचे लेखक हे कोणत्या गावचे? हे गाव सध्या कोठे आहे? यासारख्या प्रश्‍नांची उत्तरे नेमकेपणाने सापडत नाहीत.

हे देखील वाचा

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

वरवर हे प्रश्‍न सर्वसामान्य वाटावे असे आहेत पण हे प्रश्‍न वरवरचे नाहीत. हेच प्रश्‍न जरा वेगळ्या पद्धतीने विचारले की त्यांचे महत्त्व समजून येईल.

मराठीतील पहिल्या लेखकाचे गाव कोणते? मराठी भाषा, मराठी साहित्याचा हा मानबिंदू कोणत्या गावी जन्मला? कोणत्या भूमीने मराठी भाषेची पहिली सर्जनशीलता जन्माला घातली? त्या भूमीची माहिती सर्वांना असणे, त्या भूमीवर, भूमिपुत्राच्या गौरवाची एखादी नोंद असणे किंवा त्या भूमीविषयी आपण कृतज्ञ असायला हवे की नको? इतकी माफक अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? पण आजवर म्हणजे साडेसातशे वर्षे होऊन गेली तरी ही अपेक्षा आजही पुरी झाली नाही हे कटू असले तरी एक सत्य आहे.

इतिहास निर्माण करणे आणि तो प्राणपणाने जपणे यामध्ये ब्रिटिशांचा हात धरता येणार नाही पण इतिहास निर्माण केल्यानंतर तो विसरण्यात आपला हात कोणी धरणार नाही. आता तर इतिहास विसरला गेलाच आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठीच्या पहिल्या लेखकाची गोष्ट वाचू.

‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हाइंभट उर्फ महिंद्र भट यांनी रिद्धपूर, ता. मोर्शी, जि. अमरावती येथे लिहिला. हा चरित्र ग्रंथ तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक अशा विविध पैलूंचा साक्षीदार आहे. भालचंद्र नेमाडे हे ‘लीळाचरित्रा’ला आद्य कादंबरीचा मान देतात.

‘लीळाचरित्र’ हा आपल्या गुरूंच्या विरहात स्मरण भक्तीतून लिहिलेला ग्रंथ आहे. म्हाइंभट हे प्रकांडपंडित होते. त्यांना ग्रंथनिर्मितीची अभिलाषा नव्हती. त्यांच्या लेखनात पांडित्यप्रदर्शनाचा आविर्भाव नव्हता.

म्हाइंभट यांच्याविषयीची माहिती ‘लीळाचरित्र’, ‘श्रीगोविंदप्रभुचरित्र’ आणि ‘स्मृतीस्थळ’ या ग्रंथांमध्ये येते. म्हाइंभट हे नगर जिल्ह्यातील सराळे या गावाचे होते. त्यांच्या पत्नीचे नाव देमाइसा होते. गणपत आपयो हे त्यांचे गुरू, मामा आणि सासरे होते.

गणपती आपयो या विद्वान पंडिताजवळ त्यांनी पाच शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना प्रभाकर नावाच्या सहाव्या शास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा झाली. म्हणून ते तेलंगणात गेले.

पुढे सहा शास्रात प्रवीण झाल्यामुळे म्हाइंभटांना आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला. त्यामुळे इतर विद्वानांची लायकी आपल्या पायाजवळ राहण्याची आहे म्हणून ते पायात गवताची वाकी घालायचे. आकाशातील सूर्यही आपल्यासमोर निष्प्रभ आहे म्हणून ते दिवसाढवळ्या आपल्यासमोर दिवटी पाजळू लागले. त्यांनी अनेक पंडितांना वादविवादात निष्प्रभ केले होते. एकदा गणपती आपयो म्हाइंभटांना म्हणाले की, ‘‘डोंबेग्रामी असलेल्या श्रीचक्रधरांची आणि तुमची भेट झाली तर तुमच्या विद्येचे चीज होईल.’’

या संदर्भानुसार श्रीचक्रधरांना वादविवादात पराभूत करण्याच्या ईर्ष्येने म्हाइंभट हे सरल्याहून जवळच असणार्‍या डोंबेग्रामला जातात मात्र होते उलटे! म्हाइंभटांचे गर्वहरण होते. त्यांना स्वत:च्या ज्ञानाचा, विद्वत्तेचा फोलपणा लक्षात येतो. संसार की विरक्ती? संन्यास कधी घ्यावा? सर्व व्यवस्था करून जावे की जाऊ नये? असे अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण होतात.

या विचारचक्रात एकदा शौचाला जाताना ते हातात मातीचा ढेकूळ घेतात, त्यावर पाणी पडताच ढेकूळ विरघळून जातो.

म्हाइंभटांना ढेकळाच्या विरघळण्यातून मानवी जीवनाची नश्वरता पटते. त्यांचा श्रीचक्रधरांना अनुसरण्याचा निर्णय पक्का होतो. त्याच क्षणी घराचा त्याग करून म्हाइंभट रिद्धपूरला जायला निघतात. वाटेत धोतराचा भाग फाडून भिक्षा मागतात. धोतराच्या घामट वासामध्ये मिसळलेले जेवण त्यांना जाईना.

काही दिवस गेल्यानंतर सवय होते. ते अशा भिक्षान्नावर निर्वाह करू लागतात. पुढे रिद्धपूरला जाऊन श्रीगोविंदप्रभू यांना अनुसरतात.

म्हाइंभट हे श्रीमंत होते. ते श्रीगोविंदप्रभूंकडे येणार्‍या-जाणार्‍यांची व्यवस्था पाहत. ते रिद्धपूरला असताना श्रीगोविंदप्रभूंच्या सेवेसाठी सोन्या-चांदीचा व्यापार करीत असावे.

रिद्धपूरला श्रीगोविंदप्रभूंचा राजमठ आणि त्याभोवतीची जागा म्हाइंभटांनी आपल्या पैशाने विकत घेऊन दिली होती. ते श्रीचक्रधरांच्या सेवेतील नागदेवाचार्य आदींना सुंटदेव समजत असत. प्रारंभी नागदेवाचार्यांना ते नमस्कार देखील करत नसत. म्हाइंभटांच्या श्रीमंतीचा गर्व श्रीगोविंदप्रभूंनी नाहीसा केला तर विद्येचा अहंकार श्रीचक्रधरांनी नाहीसा केला.

म्हाइंभटांचा संन्यासाचा निर्णय क्षणार्धात झाला असला तरी त्यांचा आसक्तीकडून विरक्तीकडे होणारा प्रवास अनेक वाटावळणांनी झाला. ते स्वत:च्या श्रीमंतीच्या आधारे मठात येणार्‍यांची व्यवस्था करीत. संन्यास घेतल्यावरही पत्नीच्या वर्तनावर आक्षेप घेतात.

विचार आणि विकल्प यातील द्वंद्वातून म्हाइंभटांच्या वैराग्याची जडणघडण होते. ते ज्ञानमोचक असतात तरीही मोक्ष मिळविण्यासाठी दास्यमोचकता स्वीकारतात. ती अंगी बाळगण्यासाठी प्रचंड कष्ट उपसतात. इतके की ते त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात नागदेवाचार्याना विचारतात, ‘‘भटो, मज देव प्रसन्न होईल?’’

नागदेवाचार्य चटकन उत्तर देत नाहीत. ते पाहून म्हाइंभट खंतावतात. त्यावर नागदेवाचार्य म्हणतात, ‘‘तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही तर कोणाला होईल?’’ म्हाइंभटांच्या जीवनातील हे सर्वात मोठे परिवर्तन मानावे लागते. त्यांचा अहंकारी ते निरहंकारी असा प्रवास कोणालाही थक्क करणारा वाटावा असा आहे. असा हा पहिला मराठी लेखक आपले गुरू श्रीगोविंदप्रभू यांच्या शेजारी रिद्धपूरला चिरनिद्रा घेत आहे.

म्हाइंभटांनी ‘लीळाचरित्र’, ‘श्रीगोविंदप्रभुचरित्र’, ‘धवळ्यांचा उत्तरार्ध, ‘चरणशरणपारं’ आणि ‘जातीचा दशकु’ अशा साहित्याची निर्मिती केली. ‘लीळाचरित्र’च्या एकांकमध्ये श्रीचक्रधर यांनी सांगितलेल्या आठवणींचे संकलन आहे तर उत्तरार्ध म्हणजे स्वतः नागदेवाचार्य यांनी केलेले निवेदन आहे. म्हणून म्हाइंभटांनी ‘लीळाचरित्र’मध्ये आठवणींचे संकलन, संपादन केले, त्यांनी लीळाचरित्राची निर्मिती केली नाही असे काहींना वाटते.

म्हाइंभट हे संकलक, लेखनिक की संपादक? ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाचे कर्तृत्व श्रीचक्रधरांचे, नागदेवाचार्यांचे की म्हाइंभट यांचे? असे प्रश्‍न उपस्थित केले जातात.

असे प्रश्‍न उपस्थित करून म्हाइंभट यांचे ग्रंथकर्तृत्व नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी ‘लीळाचरित्र’ची निर्मिती कशी झाली हे पाहणे अन्वयार्थक ठरेल. इ.स. १२९० साली ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवद्गीतेवर विलक्षण असा ग्रंथ रचला. त्यापूर्वी चार वर्षे ‘लीळाचरित्र’चे लेखन झाले. इ.स. १२७२ साली श्रीचक्रधरांचे उत्तरापंथे गमन झाले.

त्यानंतर सर्व शिष्य हे रिद्धपूरला गोविंदप्रभू यांच्या सेवेसाठी येऊन राहतात. श्रीचक्रधरांच्या विरहाचे दुःख असूनही नागदेवाचार्य हे गोविंदप्रभूची सेवा आटोपल्यानंतर एकांतामध्ये काहीतरी स्मरण करीत असायचे. ही बाब म्हाइंभटांच्या लक्षात आली. त्यावर ‘‘श्रीचक्रधरांच्या लीळांचे स्मरण करतो,’’ असे नागदेवाचार्यांनी सांगितले. त्यांनी श्रीचक्रधरांची हिवराळी येथील आठवण सांगितली. श्रीचक्रधर म्हणतात, ‘‘वानरेया: एथौनि निरोपीलें विचारशास्त्र: अर्थज्ञान : तयाचे श्रवण : मनन : निदिध्यसन करावे : तेही एक स्मरणाचिं कीं गा : एथीची चरित्रे आठवीजेति : आइकीजेति : उच्चारीजेति : तेंही एक स्मरण कीं गा : हे ऐकल्यानंतर दूरदर्शी आणि प्रज्ञावंत म्हाइंभटांनी हे सर्व लिहून ठेवावे असे नागदेवाचार्यांना सुचवितात कारण या लेखनाचा पुढे महानुभाव पंथीयांना उपयोगी होईल.

नागदेवाचार्यांनी होकार दिल्यावर म्हाइंभट या आठवणी संकलीत करण्याचा संकल्प करतात. त्यानंतर रिद्धपूर येथील वाजेश्वरी येथे सहा महिने नागदेवाचार्य आठवणी सांगायचे आणि म्हाइंभट लिहून घ्यायचे. याठिकाणी ‘लीळाचरित्रा’चा मूळ खर्डा तयार झाला. यामध्ये म्हाइंभट यांनी फक्त लेखनिकाचे काम केले पण एवढ्यावर काम पूर्ण झाले नाही.

त्यानंतर नागदेवाचार्यांना वाटले की या आठवणी ज्या व्यक्तिच्या संदर्भातील आहेत त्या व्यक्तिंना विचारून आठवणींची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.

त्यानंतर नागदेवाचार्यांच्या आज्ञेनुसार म्हाइंभट हे लीळा शोधण्याचे काम सुरू करतात. त्यामधील एक आठवण सांगितली जाते. गोदावरी तीरावरील डखले या नावाचे श्रीचक्रधरांचे अनुयायी होते. त्यांच्याकडे म्हाइंभट गेले तेव्हा ते औत हाकत होते. त्यांच्या कामात व्यत्यय न आणता म्हाइंभट हे डखले यांना आठवणी विचारायचे.

या आठवणी नमस्कारुनी घेत. त्यानंतर गावामध्ये जाऊन भिक्षा मागून नदी काठी जाऊन जेवण करायचे. डखले यांचे अन्न घेत नव्हते. या आठवणीतून म्हाइंभटांची वृत्ती आणि निष्ठा दिसते.

अशाप्रकारे लीळांची खात्री झाल्यावर त्यातील शब्दांची खात्री नागदेवाचार्यांकडून करून घेतली. वाक्यांची, प्रसंगातील विसंगती काढून टाकली. कालक्रमानुसार सुसंगत मांडणी केली. त्यानंतर ग्रंथाचे दोन भाग केले. नागदेवाचार्यांनी श्रीचक्रधरांना अनुसरण्यापूर्वीच्या भागाला पूर्वार्ध असे नाव ठेवले आणि नागदेवाचार्यांनी श्रीचक्रधरांना अनुसरल्या नंतरच्या भागाला उत्तरार्ध असे नाव ठेवले.

हे सर्व पाहिले की म्हाइंभटांचे कर्तृत्त्व स्पष्ट होते. श्रीचक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर नागदेवाचार्य हे श्रीचक्रधरांच्या लीळा स्मरण करीत असतात. या लीळा लेखनबद्ध व्हाव्यात असे म्हाइंभट यांना प्रथम वाटते. नागदेवाचार्य आणि म्हाइंभट दोघे सोबत भिक्षा मागायचे. नागदेवाचार्य सांगायचे, म्हाइंभट ऐकायचे. म्हाइंभट वाजेश्वरीला लेखन करतात. कच्चा खर्डा तयार झाल्यानंतर लीळांचा शोध घेतात. अनेक शिष्यांना भेटतात. लीळा अधिकृत व्हाव्यात म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करतात. लीळांची निवड, त्यांची रचना, कथनाची पद्धत, लीळांची सत्यता, सौंदर्य अशा अनेक बाबींमध्ये म्हाइंभट कमालीचे कष्ट उपसतात. आज मराठी भाषा, व्याकरण, वाङ्मयीन सौंदर्य, इतिहास, धर्म, संस्कृती, समाज, भूगोल अशा अनेक विषयांनी ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ अजोड ठरतो. चरित्रलेखनाचे कसलेही निकष प्रस्थापित नसताना म्हाइंभटांनी एक श्रेष्ठ, आदर्शवत ठरावा अशा ग्रंथाची निर्मिती केली. तोही मराठीच्या प्रारंभ काळात!

आज हे अविश्वसनीय वाटत असले तरी हे एक सत्य आहे. म्हणून म्हाइंभट हे फक्त पहिले मराठी लेखक ठरत नाहीत तर त्याचबरोबर ते मराठीतील पहिले संशोधक, चरित्रकार आणि तत्त्वज्ञ ठरतात.

अशा या सराळे गावी म्हाइंभटांच्या वास्तव्याच्या काही खुणा सापडतात काय? श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरीच्या तीरावर सराळे हे गाव आहे. गावाजवळ गोदावरी नदीला वळण आहे. नदीच्या उजव्या तीरावर सराळे गाव होते. कारण, मूळ गावाचे पुनर्वसन झाले आहे. आता तेथे काटवन आहे.

या गावाची आणखी ओळखीची खूण सांगायची झाल्यास या गावाशेजारी सरला बेट आहे. या बेटावर सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान (ट्रस्ट) आहे. या संस्थानच्या वतीने सध्या महंत रामगिरी महाराज हे एक भव्य मंदिर उभारत आहेत. या संस्थानच्या अखंड हरीनाम सप्ताहाला १७० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. आसपासच्या तीन-चार जिल्ह्यातील माणसांचे हे श्रद्धास्थान आहे. आज सराळे हे गाव श्रीगंगागिरीजी महाराज संस्थानामुळे सर्वत्र ओळखले जाते. तर मूळ सरला गावाचे पुनर्वसन झाले आहे. सध्या दिसणारे मूळगाव अर्धे असावे कारण या गावाच्या ठिकाणी गोदावरीला तीव्र वळण आहे.

गोदावरीने सराळे गावाच्या बाजूने खणन केल्यामुळे आजवर गावाची बरीच झीज झाली असावी. काळाच्या ओघात गावाचा काही भाग नष्ट झाला असावा.

त्याविषयीचा एक पुरावा सापडतो. सराळे गावाजवळ गोदावरीच्या पात्राच्या मध्यभागी दगडी बांधकामाच्या खुणा सापडतात. तसेच या पात्रात एक खापरी विहीर सापडते. या खुणा स्पष्टपणे सांगतात की पूर्वी तेथे गाव होते. साडेसातशे वर्षांच्या काळामध्ये नदीच्या प्रवाहामुळे निम्मे अधिक गाव वाहून गेले असावे. मात्र आज दिसत असलेल्या गावामध्ये म्हाइंभटांच्या वास्तव्याच्या खुणा सापडत नाहीत.

अशा या लेखकाच्या ग्रंथनिर्मितीचे स्थळ महानुभवियांनी सांप्रदायिक निष्ठेतून रिद्धपूरला जतन केले. मात्र, ग्रंथनिर्मात्याच्या जन्मगावाची उपेक्षा केली तशीच इतर मराठी भाषकांनीही म्हाइंभटांच्या जन्मगावाची उपेक्षा केली. कदाचित म्हाइंभट हे महानुभवीय असल्याने पंथाने विचार करावा असे असू शकते. मात्र म्हाइंभट हे काही एका पंथाचे नाहीत. म्हाइंभटांनी पंथीय निष्ठेतून का होईना पण मराठीतून साहित्यलेखन परंपरेला प्रारंभ केला.

एक संस्कृत पंडित लोकभाषेत, मराठीत साहित्यनिर्मिती करतो ह्या घटनेला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ह्या ग्रंथाने ग्रंथलेखनाचा आदर्श निर्माण केला हे विसरून कसे चालेल?

अशा या ग्रंथ निर्मात्याविषयी सार्वत्रिकरित्या ऋण व्यक्त करावेत किमान मराठी भाषकांनी ग्रंथकर्त्याचे गावी एखादा स्मृतीस्तंभ उभारावा. तेही जाऊ द्या या गावी म्हाइंभटांच्या नावाने एखादा फलक लावावा असे आजवर कोणाला वाटले नाही किंवा असे वाटणे सार्वत्रिक होत नाही. तेही जाऊ द्या, चुकून असे वाटले तर ते फक्त एखाद्या निमित्तापुरते, निमित्त सरले की आपण विसरून जातो. म्हणून एखाद्याची उपेक्षा किती व्हावी याला काही एक मर्यादा असते. म्हाइंभटांच्या, मराठीतील पहिल्या लेखकाच्या जन्मगावाची ही शतकांची उपेक्षा मनाला अस्वस्थ करून जाते. म्हाइंभटांनी माय मराठीची सेवा केली. त्यांची जडणघडण ज्या गावी झाली त्या गावी म्हाइंभटांविषयी आजही नाही चिरा, नाही पणती.


लेखक : प्रा. डॉ. शिरीष लांडगे
(साहित्य चपराक दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. |

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘पद्म पुरस्कार’ कोणाला द्यायचा हे सरकार कसं ठरवतं, त्याचे निकष काय आहेत..?

Next Post

स्वतःची एअरलाईन्स सुरु करायची म्हणून जेआरडी स्वतः पायलट बनले होते

Related Posts

विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
वैचारिक

१५ वर्षाच्या मुलीने लिहिलेली प्रौढ कादंबरी ‘द आउटसायडर्स’ इंटरनॅशनल बेस्ट सेलर बनलीय

11 November 2024
इतिहास

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

14 January 2025
विश्लेषण

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी महान शास्त्रज्ञ ‘निकोला टेस्ला’सुद्धा प्रभावित झाला होता

21 September 2025
इतिहास

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

28 January 2025
वैचारिक

थोर तत्वज्ञ प्लेटोला राजकारणात यायचं होतं पण…

26 December 2023
Next Post

स्वतःची एअरलाईन्स सुरु करायची म्हणून जेआरडी स्वतः पायलट बनले होते

राष्ट्रगीताचा आग्रह धरला म्हणून या मुस्लीम शिक्षकाला जीव मुठीत धरून जगावं लागतंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.