आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आजच्या या ओटीटीच्या जमान्यात झी फाइव्हने नेटफलिक्स आणि ॲमेझॉनच्या बरोबरीने आपलाही प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्यांची वार्षिक मेंबरशीप १९४९/- रुपयांची आहे. पण याशिवायही मोफत बघता येतील असे दर्जेदार सिनेमेसुद्धा झी फाइव्हवर उपलब्ध आहेत. त्यातल्या सर्वोत्तम सिनेमांची ही यादी खास पोस्टमनच्या वाचकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत.
बियॉन्ड द क्लाउडस्
कोरोनाच्या डिप्रेसिंग काळात आशावाद जिवंत ठेवायला प्रेरणा देणारा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचा बियॉन्ड द क्लाउडस्. ईशान खट्टर “धडक” आणि “अ सुटेबल बॉय”मधून प्रसिद्ध झाला, पण त्याच्या दर्जेदार अभिनयाची पहिली छाप अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पडली ती याच सिनेमामुळे.
निर्दोष बहिणीला वाचवायला धडपडणारा भाऊ मृत्यूशी झगडत असणारा आरोपी आणि त्या आरोपीवर अवलंबून असणारा परिवार यांच्यावर ही कथा बेतलेली आहे.
या कथेत शिकऱ्याची हालत पण शिकाराइतकीच वाईट असते, पण तरीही माणुसकी न सोडणाऱ्या प्रेरणादायी पात्रांची ही गोष्ट आहे. “होप स्टील लिव्हस” म्हणायला ही कथा भाग पाडते.
एलिझाबेथ एकादशी
मराठीत बनलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे हा लहान मुलांनी भरलेला विनोदी पण गंभीर आशयाचा सिनेमा म्हणजे एलिझाबेथ एकादशी! कर्ता पुरुष वारल्यानंतर पंढरपूरमध्ये राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या संघर्षाची ही कथा.
सगळ्या कुटुंबाची जबाबदारी शिवणकाम करून भागवत असताना तीच शिवणकामाची मशीन हफ्ते थकल्याने कंपनी घेऊन जाते. ती परत मिळवायला घरची कर्ती महिला आणि आजी प्रयत्न करत असतात.
पण यात आपल्या वडिलांची शेवटची खुण असलेली सुंदर सायकल विकली जाऊ नये म्हणून लहानगा ज्ञानेश्वर आणि घेवडा काहीतरी करायचं ठरवतात. त्यांचा निरागस प्रयत्न, त्याचे परिणाम आणि यातून होणारी त्यांच्या परिवाराची होणारी ताणाताण, याची ही कथा. मांडणी विनोदी आणि निरागस असली तरी रुपकांमधून आणि ज्ञानाच्या बाल कीर्तनातून एक अनोखा गंभीर आशय आपल्या वाट्याला येतो.
गो गोवा गॉन
भारतात बनणाऱ्या दर्जेदार विनोदी सिनेमांच्या यादीत नाविन्यपूर्ण प्रयोग “दिल्ली बेल्ली”पासून सुरू झाले. यात भारतातील पहिलाच झॉंबीज असणारा विनोदी सिनेमा म्हणूनही याकडे बघता येईल. झॉंबीज, चांगले अडल्ट जोक्स, गोव्याबद्दलचे फॅसिनेशनस्, ड्र*ग्स, अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींमुळे हा सिनेमा बघणं एक सहाजिक चॉईस आहे. सैफ अली खानला एका वेगळ्याच रुपात बघणं छान वाटतं. गोवा फिरायला गेलेल्या मित्रांचं रशियन पार्टीचं फॅसिनेशन त्यांना नडतं आणि तिथून पुढे एक छान विनोदी थ्रिलर आपल्याला बघायला मिळतो.
वॉन्टेड
“राधे” या अत्यंत अनवॉन्टेड भाईगिरीमुळे सलमानबद्दल राग येत असेल तर सलमानला या उंचीवर पोहोचविणाऱ्या वॉन्टेड सिनेमाला पुन्हा एकदा बघाच! दाक्षिणात्य मारधाडीच्या रिमेक्सने १०० कोटीचा गल्ला करण्याची सुरुवात या सिनेमामुळे झाली. वॉन्टेड इतका जुना सिनेमा असला तरी अजूनही यातले ट्विस्ट, हिरोगीरी, विनोद, एकंदर स्क्रिप्टच भन्नाट आहे. शेवटपर्यंत सगळ्या घटना कशा एकमेकांशी जुळलेल्या आहेत हे बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.
हा ऍक्शन सिनेमा असला तरी तो मनोरंजक बनतो तो यातल्या सॉलिड कथेमुळे. यातल्या सहाय्यक पात्रांची पण आपली एक चांगली ओळख असते, त्यांचे स्वतंत्र सिनही बघू वाटतात. बदलणारे पॉवर सेंटर आहेत, मारधाडीत पण नावीन्य, कल्पकता आहे. जर सलमानच्या नवीन चित्रपटांना वैतागून तुम्ही हा सिनेमा इग्नोर केला असेल तर पुन्हा एकदा वॉन्टेडला संधी द्याच!
राधे किंवा फ्रेंड्स रियुनियन बघायला तुम्ही झी फाइव्हची पेड मेंबरशीप घेतलीच असेल तर त्यातले इतर चांगले आणि मनोरंजक सिनेमे कुठले याची यादीही इथे जोडतोय. अनुराग कश्यपचे अग्ली आणि मनमरझिया हे दोन उत्तम सिनेमे आहेत. लाल बहादूर शास्त्रींच्या संशयीत मृत्यूला राजकीय उजव्या गटाच्या नजरेतून बघणारा पॉलिटिकल सिनेमा “ताशकंद फाईल्स”. नक्षलवादावर उत्तम भाष्य करणारा आणि मजबूत कथा असलेला “चक्रव्यूह”.
शूटआउट ऍट लोखंडवालाच्याही आधी गुन्हेगारी विश्व आणि गॅंगवॉरवर आधारित काही उत्तम सिनेमे आले होते. यातले कंपनी, रक्तचरित्र हे दोन सिनेमे इथे आहेत. आताचे सुपरहिट सिनेमे उरी आणि सिम्बा ही आहेत.
पण न चुकता आजच बघावा असा सिनेमा म्हणजे ओमेर्टा. राजकुमार राव आणि हंसल मेहता या नियमित दर्जेदार सिनेमे बनविणाऱ्या जोडीचा हा अजून एक उत्तम सिनेमा. ओमर सईद शेख या दहशतवाद्यावर आधारित हा सिनेमा या जगाचं कधी न समोर आलेलं खरं, जास्त क्रूर रूप आपल्याला दाखवतो. राजकुमार रावला पात्रात अक्षरशः सामावून गेलेलं बघणं एक अजब भीतीदायक अनुभव आहे. इरफाननंतर भारताला मिळालेला सर्वोत्तम अभिनेता आपण यात बघतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










