आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
लहानपणीपासूनच आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं, आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडेही धनाची भरभराट असावी, बालपणातून युवावस्थेत प्रवेश करताना आयुष्यात काय काम करायचं हे जरी ठरलं नसलं किंवा त्याबद्दल अंधुक कल्पना असली तरी धनार्जन करणं हे मात्र निश्चितच सगळ्यांचं अंतिम ध्येय असतं. यात काही वावगं किंवा कमीपणाचं आहे असं मुळीच नाही. पण व्यक्ती धनार्जन कोणत्या मार्गाने करतो यावर मात्र त्याची/तिची नितिमत्ता दिसून येते. थोडक्यात, “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे!”
आर्थिक प्रगती हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक. याशिवाय माणूस आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. एका माणसाची आर्थिक प्रगती झाल्याने त्या आर्थिक प्रगतीची साखळी तयार होते आणि नकळत देशाच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळते.
म्हणूनच गेली काही वर्षे भारत सरकार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर, कौशल्य विकासावर भर देत आहे. स्टार्टअप इंडिया, इन्व्हेस्ट इंडिया, इज ऑफ डूइंग बिजनेस यांसारख्या संकल्पना आणल्या जात आहेत.
अर्थचक्राचा मूलभूत आणि प्रमुख घटक म्हणजे उद्योग-धंदे. त्यांना चालना मिळाली तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यावर लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढेल (परचेसिंग पॉवर), जेणेकरून आणखी उद्योगांना चालना मिळेल, आणि हे अर्थचक्र सुरळीत सुरू राहून अंतिमतः स्थूल एत्तद्देशीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग स्थिर राहत वाढेल. म्हणूनच सगळ्याच देशांमध्ये उद्योगाला चालना दिली जाते, आणि विविध सरकारी योजनांद्वारे किंवा स्वतःहून अनेक गुंतवणूकदार अनेक विविध उद्योगांत गुंतवणूक करतात.
असाच एक प्रसिद्ध गुंतवणूकदार, जॉर्ज सोरोस. अर्थशास्त्र, उद्योग, वगैरे क्षेत्रातील असाल तर हे नाव तुम्हांला परिचित असेलच.
तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे एक नाव हल्ली प्रत्येकाच्या जिभेवर असतं ते म्हणजे टेस्ला मोटर्स. स्वयंचलित मोटार कार्स तयार करणारी टेस्ला मोटर्स ही जगातील पहिलीच कंपनी. अशीच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अविरत प्रगती करणारी कंपनी म्हणजे सोलर-सिटी, ही कंपनी सौरऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक अत्याधुनिक तावदानांची (पॅनेल्स) निर्मिती करत होती.
२०१६ मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंटच्या निर्देशानुसार क्वांटम स्ट्रेटजिक पार्टनर गुंतवणूक कम्पनीबरोबर संलग्न असलेल्या एका खाजगी कंपनीने सोलर सिटी या कम्पनीत ३०.५ करोड अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली, म्हणजे साधारणतः २२ अब्ज, ७७ कोटी, ६१ लाख, ३४ हजार, २५० रुपये इतकी इतकी मोठी गुंतवणूक. पुढे, सोलर सिटी कम्पनी इलोन मस्कच्या टेस्ला मोटर्स या कंपनीने विकत घेतली. २०१६ नंतरची टेस्ला मोटर्स कंपनीची प्रगती लक्षात घेण्यासारखी आहे.
सोरोस फंड मॅनेजमेंट कंपनीकडे जस्टीफाय या शर्यतीच्या घोड्याची एस.एफ. ब्लडस्टॉक आणि एस. एफ. रेसिंग ग्रुप या कंपन्यांद्वारे १५% मालकी आहे असे रिपोर्ट्स होते. जस्टीफाय हा घोडा घोडा शर्यतींसाठी सर्वोत्तम मानला जातो.
मे २०१९ मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंटने हे जाहीर केले, जी.ए.एम इन्व्हेस्टमेंट या मालमत्ता नियोजन करणाऱ्या कम्पनीमध्ये ३ टक्क्याचे भांडवलदार आहेत. आता आपल्याला वाटेल ३% म्हणजे काहीच नाही, पण व्यवसाय आणि वाणिज्य भाषेत सांगायचं झालं तर जितकं भांडवल एखादी कम्पनी दुसऱ्या कंपनीत गुंतवेल, त्या गुंतवलेल्या भागातून आलेला सगळा नफा हा त्या भांडवलदाराचा असतो, म्हणजेच या इन्व्हेस्टमेंटवर उत्तम रिटर्न्स मिळण्याची शक्यता कैक पटीने वाढते.
याच प्रकारे जून २०१९ मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंटने व्हाइस मिडीया ग्रुप या कॅनेडियन आणि अमेरिकन पत्रकारिता आणि बातमीदार संस्थेत २५० मिलियन अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक केली. ऑगस्ट २०१९ मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंटने मॅनोलीट पार्टनर्स या कंपनीतील आपल्या भांडवलदारीची टक्केवारी वाढवून ११.६७ टक्क्यांवर नेली.
२०१९च्या ऑगस्ट पर्यंत सोरोस फंड मॅनेजमेंटकडे लिबर्टि ब्रॉडबँड, विसी प्रॉपर्टीज, सेसर एंटरटेनमेंट अशा पाश्चिमात्य देशातील काही मोठ्या कंपन्यांची भांडवलदारी होती. वॉल स्ट्रीट जर्नल या न्यु यॉर्कमधील वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सोरोस फंड मॅनेजमेंट कंपनी २०१७ मध्ये ८.९%, २०१८ मध्ये ०.९% तर २०१९ च्या पूर्वार्धात १.९% वाढली.
एप्रिल २०२० मध्ये जहाजांच्या ताफ्यांसाठी बॅटरिज् तयार करणाऱ्या अँपलाय पॉवर या कम्पनीला सोरोस मॅनेजमेंट फंड, सीमेन्स, काँग्रुएंट व्हेंचर्स, पिपल फंड, ऑबव्हियस व्हेंचर्स या कंपन्यांनी १३.२ मिलीयन अमेरिकन डॉलर दिले.
नोव्हेंबर २०२० मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंटने ‘पॅलांटिर टेक्नॉलॉजीस्’मध्ये आपले अ दर्जाचे १% भांडवल असल्याचे जाहीर केले, आणि ‘पॅलांटिर टेक्नॉलॉजीस्’शी व्यावसायिक मतमतांतरं असल्याने भांडवलाचे भाग (शेअर्स) विक्रीसाठी काढले.
जानेवारी २०२० मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंटचा मालक असलेल्या जॉर्ज सोरोस याने जागतिक आर्थिक मंचावर (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) बदलत्या हवामाना बद्दलच्या शिक्षण आणि संशोधनासाठी तसेच हुकूमशाही सरकारांविरुद्ध लढण्यासाठी १ बिलियन अमेरिकन डॉलर देण्याचे जाहीर केले, यातून हवामान बदलाच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन केलं जाईल.
सोरोस फंड मॅनेजमेंटसारखी गुंतवणुकीला चालना देणारी कम्पनी सुरू करणं, त्यातून अनेक कंपन्यांना गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा मिळवून देणं, स्वत: नफा कमावणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनी आणि व्यवसाय नेणं, हवामान बदलासारख्या जटील आणि जगातील प्रमुख आठ प्रश्नांपेकी एक असलेल्या विषयावर संशोधनाला चालना देणं या खरंच कौतुकास्पद बाबी आहेत.
पण, “हुकूमशाही सरकरांविरुद्ध लढ्याच्या” नावाखाली निधीची देवाणघेवाण करून सरकारं स्थापन करणं, देशांच्या आणि सरकारांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये बिनधास्त हस्तक्षेप करणं, या गोष्टी मात्र जॉर्ज सोरसला खलनायक बनवतात. पण त्याला याचं काय? तो नफ्यासाठी काम करतो.
तर त्याच्या असं बिनधास्त असण्याचं कारण काय? तो एक उद्योगपती असून देशादेशांच्या अंतर्गत राजकारणात कशा प्रकारे हस्तक्षेप करतो?
हा बहुरंगी जीवनपट सुरू होतो सन १९३० मध्ये. युरोपातील हंगेरी राज्यातील बुडापेस्ट शहरात एका ज्यू परिवारात जॉर्जचा जन्म झाला. वडील तिवादार, पेशाने वकील, त्याचबरोबर एस्परँटो भाषा बोलण्यात पारंगत असलेला आणि एस्परँटो साहित्यावरील “लिटरातुरा मोंडो” या मासिकात संपादकीय लेखन करणारा भाषाविद्ध माणूस होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात तिवादार युद्धकैदी बनून रशियात राहिला होता.
जॉर्जची आई एलिझाबेथ ही रेशीम कपड्याचा व्यापार करणाऱ्या कुटुंबातील होती. तिवादार आणि एलिझाबेथ १९२४ मध्ये विवाहबद्ध झाले. पुढे १९३६ मध्ये ज्युं विरुद्ध तयार होत असलेल्या वातावरणाला लक्षात घेऊन तिवादारच्या कुटुंबाने आपलं मुळ आडनाव स्क्वार्ट्झवरून सोरोस करवून घेतलं. तिवादारला नवं आडनाव त्याच्या विशिष्ट अक्षररचनेमुळे आणि अर्थामुळे आवडत. इंग्रजीत सोरोस हा शब्द कसाही, उलटसुलट वाचा, तरी सारखाच राहतो. तर हंगेरीयन भाषेत सोरोस शब्दाचा अर्थ “नियुक्त असलेला उत्तराधिकारी” असा होतो तर एस्परँटो भाषेत सोरोस शब्दाचा अर्थ “वर चढणे” किंवा “उडणे” असाही होतो.
मार्च १९४४ मध्ये जॉर्ज १३ वर्षांचा असताना नाझी जर्मनीने हंगेरी देश जिंकून घेतला. नाझींनी ज्यू मुलांना शाळेत जाण्याचा प्रतिबंध घातला, हे पाहून जॉर्ज आणि त्याच्या वर्गमित्रांनी ज्युइश कौन्सिलकडे तक्रार केली.
सोरोस कुटुंबाने ते ख्रिश्चन असल्याची खोटी कागदपत्रं खरेदी केल्याने ते वाचले. तिवादारने फक्त स्वतःचंच नाही तर अनेक हंगेरीयन-ज्युइश कुटुंबाचं रक्षण केलं होतं. नंतर जॉर्ज एके ठिकाणी लिहितो, “१९४४ हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी वर्षं होतं”, याच वर्षी जॉर्जने आपल्या वडिलांचा पराक्रम याची देही याची डोळा अनुभवला होता.
१९४५ मध्येही सोरोस कुटुंब बुडापेस्टच्या वेढ्यातून बचावलं होतं, या वेळी सोव्हिएत आणि जर्मन सैन्य शहरामधून लढले होते.
सन १९४७ मध्ये जॉर्ज आणि त्याचं कुटुंब लंडनमध्ये आले, जॉर्ज लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी बनला. थोर तत्वज्ञ कार्ल पोपरचा शिष्य असलेला सोरस रेल्वे पोर्टर आणि वेटरची नोकरी करत, आणि एकदा एका दानातून त्याला ४० युरो मिळाले होते.
वडिलांकडून अनेक गोष्टी शिकून आलेला जॉर्ज सोरोस अनेकदा “स्पीकर कॉर्नर”वर उभा राहून आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एस्परँटो भाषेतून व्याख्यान देत.
सन १९५१ मध्ये विज्ञान स्नातक पदवीधर झाला, आणि १९५४ मध्ये विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. १९५४ मध्ये शिक्षण पूर्ण करून सोरोसने आपली आर्थिक कारकीर्द लंडन येथीलच सिंगर अँड फ्रेडलँडर या बँकेतून सुरू केली, तिथे तो कारकून म्हणून काम करायचा आणि त्यानंतर शेअर बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार पाहणाऱ्या विभागात स्थलांतरित झाला. रॉबर्ट मेयर या त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून जॉर्जने न्यू यॉर्क येथील एफ.एम. मेयर या दलाली काम करणाऱ्या कम्पनीत नोकरीसाठी अर्ज केला.
१९५६ मध्ये सोरोस न्यू यॉर्कमध्ये आला, जिथे त्याने शेअर बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार सांभाळणाऱ्या व्यापाऱ्याचं काम केलं (आजच्या भाषेत यालाच ट्रेडिंग म्हणतात), तो युरोपीय स्टोक्सचे व्यवहार करण्यात निपुण होता, कोळसा आणि स्टील उद्योगाच्या उदयानंतर युरोपियन स्टोक्स अमेरिकन गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध होते.
तीन वर्षे एफ.एम. मेयरमध्ये काम केल्यावर १९५९ मध्ये सोरोसने वरथीम अँड कम्पनी या कम्पनीत कामाला सुरुवात केली, आणि इथे ५ वर्षं काढायची या निश्चयात तो होता, जेणेकरुन त्याला पाच लाख डॉलर जमा करता येणार होते. हे पैसे त्याला इंग्लडमध्ये तत्वज्ञानाच्या अभ्यासाच्या बदल्यात परत करायचे होते.
१९६३ पर्यंत त्याने ‘युरोपियन सेक्युरिटीज्’मध्ये विश्लेषक म्हणून काम केलं.
याच काळात सोरोसने आपला प्रतिक्षिप्तपणाचा सिद्धांत मांडला, हा सिद्धांत त्याच्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधील शिक्षकाच्या कल्पनेचंच स्थूल स्वरूप होतं. बाजाराचे भाव हे फक्त अर्थशास्त्रातील मूळ सिद्धांतांनुसार ठरत नाहीत तर अनेकदा त्या बाजारात सहभागी असणाऱ्यांच्या गोंधळाच्या स्थितीमुळेही भाव ठरतात. कल्पना आणि प्रत्यक्ष घटना एकमेकांवर प्रतिक्षिप्तपणे प्रभाव टाकत असतात.
जॉर्जच्या मते ही प्रक्रिया बाजारभावाच्या अत्यंत चांगल्या असण्याच्या आणि अत्यंत वाईट असण्याला कारणीभूत ठरते.
इसवी सन १९६३ पासून पुढची १० वर्षे जॉर्ज सोरोसने अरनॉल्ड अँड एस. ब्लेचरॉईडर या कम्पनीत उपाध्यक्ष पदावर नोकरी केल्याने त्याचा काम करण्याचा उत्साह वाढला. इंटरेस्ट इक्वालिजेशन टॅक्समुळे व्यवसायांत शिथिलता आली, आणि याचमुळे सोरोसच्या यूरोपीय भांडवलाच्या व्यापाराची व्यवहार्यता कमी झाली.
१९६३ ते १९६६ या वर्षात त्याने आपल्या तत्वज्ञानावरील निबंधांवर लक्षं केंद्रित केलं. १९६६ मध्ये याच कंपनीचे १,००,००० डॉलर वापरून त्याने आपल्या भांडवलाच्या व्यापार तंत्रांचे प्रयोग सुरू केले.
या यशस्वी प्रयोगांनन्तर १९७० सोरोसने सोरोस फंड मॅनेजमेंट कम्पनीची स्थापना केली. पुढे २० वर्षं या कम्पनीने आपली यशस्वी वाटचाल अविरतपणे सुरू ठेवली.
सरकारच्या आर्थिक धोरणांकडील दुर्लक्षामुळे ब्रिटिश पाउंडची किंमत घसरली, मात्र याकडे संधी म्हणून पाहत सोरोसनी आपल्या संपत्तीत तब्बल एक अब्ज डॉलर्सची भर टाकली, यामुळेच त्याला “द मॅन हू ब्रोक द बँक ऑफ इंग्लंड” अशी ओळख प्राप्त झाली.
असे अगणित चढ-उताराचे टप्पे पार करून आज ‘फोर्ब्स’च्या मते, जॉर्ज सोरोस हा जगातील १६२व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनलाय, त्याचं उत्पन्न सुमारे ८.३ बिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. त्याने आपल्या संपत्तीचा ६४% वाटा दान करण्याचं ठरवलंय, तर आतापर्यंत १५ बिलियन अमेरिकन डॉलर आपल्या सामाजिक संस्थांमधून अनेक समाजोपयोगी कार्यांसाठी वापरले आहेत.
हंगेरीच्या राज्याला साम्यवादातून शांततामय मार्गाने बाहेर काढून लोकशाही पद्धतीकडे नेण्यात सोरोसने महत्वाची भूमिका बजावली आणि बुडापेस्ट येथील सेंट्रल युरोपीय विद्यापीठाला मुक्तहस्ते देणगी बहाल केली.
अशा या दानशूर समजल्या जाणाऱ्या जॉर्ज सोरोसला न्यू स्कुल फॉर सोशल रिसर्च, ऑक्सफर्ड विद्यापीठ, कोर्निवस विद्यापीठ (बुडापेस्ट), याले विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेटनी सन्मानित केलं आहे. तर बॉलोग्ना विद्यापीठातून सोरोसला १९९५ मध्ये अर्थशास्त्रातील पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे.
जॉर्ज सोरोसला पाईप बॉम्बने मारण्याचा प्रयत्न झाला, पण एफ.बी.आयने तो प्रयत्न निष्फळ ठरवला.
जॉर्ज सोरोसने आपल्या आयुष्यात अनेक मोठी कामं केली, आणि अर्थशास्त्रात मोठं संशोधनही केलं, आज ज्याला प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग म्हटलं जातं, जॉर्ज सोरोस हा त्यातला आइन्स्टाइन आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण सर्वांनीच स्कॅम १९९२ ही वेब सिरिज पाहिलीच असेल, तितक्याच कुतुहलाचं, आणि आश्चर्यांनी भरलेला जॉर्ज सोरोसचा हा जीवनपट!
सोरोससारख्या माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यात कष्ट आणि बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर मानव इतिहासात एक महत्वाचा स्थान प्राप्त केलंय, पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसंच आधी सांगितल्याप्रमाणे जॉर्ज सोरोससुद्धा काही बाबतीत अयोग्य ठरतो. अनेक देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करणं हे कितपत नितीमत्तेचं लक्षण आहे?
गेल्या काही वर्षांत भारतात नव्याने आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांबद्दल काहीही माहिती नसताना फक्त इतभर लोकांना समाधान वाटावं या साठी अथवा काही अन्य आर्थिक कारणांसाठी त्याने आक्षेपार्ह वक्तव्यं केली. चुकीची माहिती देऊन आणि चुकीची वक्तव्य देऊन लोकांची माथी भडकावून देणे हा गुन्हाच म्हटला पाहिजे.
अशा या बहुरंगी जॉर्ज सोरोसकडून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं याचा निर्णय करायला राजहंसारखं जे हवं ते घेऊन नको ते वेगळं करता यायला हवं.
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या (मायक्रो इकॉनॉमिक्स) दृष्टीने संपत्तीत भर पडण्यासाठी व्यवसाय-उद्योग फायदेशीर ठरतोच, पण स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्राच्या (मॅक्रो इकॉनॉमिक्स) दृष्टीने देशाच्या आर्थिक विकासातही व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र मोठी भूमिका बजावतात, आणि यांमध्ये यशस्वीपणे काम करायचं असेल तर कठोर परिश्रम, तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि संशोधन यांच्यासारखे रामबाण उपाय नाहीत हे निष्कर्ष सुद्धा काढता येतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










