The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लई भारीसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट करूनही या मराठी दिग्दर्शकाचं नाव फार कुणाला माहिती नव्हतं

by सोमेश सहाने
18 August 2020
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


2020मधल्या दुर्दैवी घटनांची यादी वाढतच चालली आहे. काल, १७ ऑगस्ट रोजी पंडित जसराजसारखा आवाज हरवला, आणि त्याच्या काही तास आधीच निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी आली होती. त्याचं दुःख दुर्दैवाने जास्तं लोकांना झालं नाही. पण जेव्हा नेमकं हा माणूस होता तरी कोण हे शोधायला त्यांनी त्याचं नाव गुगलवर टाकलं तेव्हा मात्र सगळ्यांनीच निशिकांतच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली असणार.

सिनेमाच्या रूपानं आपण एक समांतर वास्तव जगतो. त्यातले सुंदर क्षण आपल्या आयुष्याचा भाग असतात आणि म्हणूनच निशिकांतच्या रूपानं ते समांतर विश्व तयार करणारं एक केंद्र हरवलं.

दृश्यम, फोर्स, रॉकी हँडसम या सिनेमामुळं निशिकांतने स्वतःचं एक महत्वाचं स्थान निर्माण केलं होतं. हे दुःख अजून मोठं होतं जेव्हा आपल्याला बातम्यांतून हे समजतं की निशिकांत कामत हे बॉलिवूडमधलं सगळ्यात यशस्वी मराठी नाव होतं.

भारतीय सिनेमाची सुरुवात जरी महाराष्ट्रात, मराठी माणसांनी केली असली, तरी दादासाहेब फाळके, दादा कोंडके आणि सध्या आशुतोष गोवारीकर यांच्यानंतर काही एक दोन सिनेमे करणाऱ्या दिग्दर्शकांशिवाय बॉलिवूडमध्ये मराठी दिग्दर्शक सापडत नाही.

राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस दिग्दर्शक असला म्हणजे अभिनय, लेखन, म्युजिक, कॅमेरा, एडिटिंग यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांना संधी मिळते. आपल्या घराजवळच्या गोष्टी सिनेमात दिसतात.



आतापर्यंत महेश मांजरेकरमुळे सचिन खेडेकर, प्रिया बापट, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, यांना अनेक चांगले पात्र मिळाले. निशिकांत कामत हे नाव आता बॉलिवूडमधलं एक मोठं प्रस्थ बनलं होतं. त्याच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या सिनेमाविश्वाचीसुद्धा खुप मोठी हानी झाली आहे.

निशिकांत कामत यांनी 2006ला राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या डोंबिवली फास्ट या मराठी सिनेमातून स्वतःच्या प्रवासाला सुरुवात केली. एक सामान्य आदर्शवादी गृहस्थाची भ्रष्ट व्यवस्थेने आणि बेईमान माणसांनी केलेली दशा यात दाखवली आहे.

मुंबईच्या झगमगाटा पलीकडची वास्तववादी परिस्थिती आणि आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेली घुसमट यात दिसते. मराठी सिनेमाविश्वासाठी हा चित्रपट खूपच वेगळा होता, पण संदीप कुलकर्णीच्या दमदार अभिनयाच्या साथीने निशिकांतचा चित्रपट सामान्य लोकापर्यंत पोहोचला. त्याने नंतर हाच सिनेमा आर माधवनला घेऊन तामिळ भाषेतही बनवला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

त्याने हिंदी सिनेमासृष्टीतली सुरुवात “मुंबई मेरी जान” या सिनेमातून केली. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्ब हल्यांच्या घटनेवर आधारित हा सिनेमा आजही कित्येक लोकांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत असतो.

मुंबईच्या लोकांची जीवनपद्धती, ब्लास्टचा भावनिक परिणाम, तपास यंत्रणेतील आणि आरोपींमधील मानवीपण या सगळ्या वास्तववादी दृष्टीमुळे समीक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं होतं. या दोनही सिनेमांतूनच निशिकांतचं मुंबईप्रेम स्पष्ट दिसतं. त्याचं शिक्षण मुंबईतच झालं, बालपण पोलीस कॉलनी जवळच्या एका गल्लीत गेलं. त्यातुन त्याला दिसलेली मुंबई त्याने त्याच्या सिनेमातून आपल्याला दाखवली.

स्वतःच्या नोंदी एवढ्या कलात्मक पद्धतीने, बारकाव्यांसह साकारता येणं हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम त्याने सहज वाटावं असं सादर केलं. एवढा वैयक्तिक दृष्टिकोन घेऊन, कसलाही प्रस्थापित फॉर्म्युला (फायटिंग, गाणी, हिरो-हिरोईन) न वापरता 2006मध्ये सिनेमा बनवणं हे कल्पनेपलीकडचं होतं.

कोणीही गॉड फादर नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर मोठं झालेल्या अनुराग कश्यप टाईप लोकांपैकी निशिकांत एक. स्क्रीन मिळत नाही म्हणून रडणाऱ्या आत्ताच्या मराठी दिग्दर्शकांना बघून कळतं की निशिकांत या रडक्या कलाकरांपेक्षा किती धाडसी होता.

निशिकांतने फक्त स्वतःलाच मोठं केलं नाही, त्याच्यामुळे आज आपल्याला कित्येक चांगल्या कलाकारांना प्रस्थापित होताना बघता येतंय. यातलं सर्वात मोठं नाव “विद्युत जामवाल”. फोर्स सिनेमा करताना जॉन इब्राहिमसारख्या प्रभावी कलाकारासमोर तितकाच प्रभावी वाटेल असा व्हिलन उभा करणं हे सिनेमा पाहिजे तसा बनविण्यासाठी खूप गरजेचं होतं.

विद्युत जामवाल तोपर्यंत सिनेमा सृष्टीत आला होता, पण फोर्समुळं त्याची एक असामान्य ओळख तयार झाली. आपल्याला आपला फेव्हरेट व्हिलन मिळाला, तो निशिकांतमुळं.

2001ला “रेहना है तेरे दिल मे” या सिनेमाला म्युजिक दिलेल्या “हॅरिस जयराज”ने तब्बल 10 वर्षानंतर हिंदी सिनेमात म्युजिक दिलं ते 2011ला आलेल्या फोर्स सिनेमासाठी. हॅरिसने असंख्य दाक्षिणात्य सिनेमे केले, पण निशिकांतने त्याला हिंदी सिनेमा करायला लावला आणि आपल्या वाट्याला “चाहूं भी तो मे कैसे कहू”, “दिल की है तमन्ना” ही अत्यंत फ्रेश फील असणारी दर्जेदार गाणी आली.

फोर्स मधले जेनेलिया आणि जॉनचे सीन्स तर कितीही बघितले तरी परत बघावे वाटतात. मेन स्ट्रीम मसाला सिनेमात पण निशिकांतने स्वतःची अशी एक खास शैली यात आणली.

फोर्सनंतर त्याने अशाच मसाला थ्रिलर प्रकारातील “दृश्यम” सिनेमा केला. अजय देवगण, तब्बू यांसारख्या मुरलेल्या अभिनेत्यांकडून त्याने दर्जेदार काम करून घेतलं. यातल्या ड्रॅमॅटिकपणामुळे समीक्षकांनी सिनेमाची थोडी चिरफाड केली पण प्रेक्षकांनी मात्र त्याला कमालीचा प्रतिसाद दिला.

आजही फोर्स, दृश्यम टीव्हीवर आले की आपण आवर्जून बघतो. निशिकांतने या दोन सिनेमांतून प्रेक्षकांचा आणि निर्मत्यांच्या विश्वास जिंकला होता. बॉलिवूडच्या सर्वोत्तम लोकांसोबत त्याने काम केलं होतं. आणि नेमकं हा संघर्ष संपल्यावर उमेदीच्या काळात तो निघून गेला.

निशिकांतमध्ये भ्रष्ट व्यवस्थेविषयी असणारी चिड “डोंबिवली फास्ट” नंतर “मदारी” या सिनेमातून बाहेर पडली. “मुंबई मेरी जान”मध्येसुद्धा त्याने इरफान खान सोबत काम केलं होतं. मदारी सिनेमानंतरच्या एका मुलाखतीत इरफान बोलला बोलला होता की निशिकांत कितीही चांगला नट असला तरी त्याने ते करू नये, कारण हा उत्तम दिग्दर्शक गमवायचा नाहीये.

छोटे छोटे रोल वगळता “रॉकी हँडसम”मध्ये निशिकांतने सिनेमा दिग्दर्शित करण्यासोबतच यातल्या मुख्य खलनायकाचं पात्रंसुद्धा साकारलं आहे. बळाने नाही तरी डोक्याने समोरच्याला त्रास देणारा, विनोदी खलनायक साकारून त्याने आपला दर्जेदार अभिनय सिद्ध केला. रॉकी सिनेमा एका कोरियन सिनेमाचा रिमेक आहे. रॉकी हँडसममुळे भारताला “चांगच्या ऍक्शन सिंक्वेन्सचं” उदाहरण द्यायला एक तरी सिनेमा मिळाला.

एकार्थाने ऍक्शन या जॉनरमध्ये रिस्क घेऊन काहीतरी दर्जेदार साध्य करण्याचा आत्मविश्वास निशिकांतने दिला. करिअरची सुरुवात चौकटी मोडणाऱ्या अपारंपरिक प्रकारच्या सिनेमांनी करणाऱ्या निशिकांतने एका नंतर एक यशस्वी मसाला सिनेमे बनवले.

त्याच्या मते हे काम ही आर्ट सिनेमा बनवण्याइतकंच अवघड आहे. या जॉनरमध्ये ही स्वतःच्या वैयक्तिक, वास्तववादी दृष्टीतून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. त्याचा सिनेमा ओळखता येईल इतका विशेष होऊ लागला.

मराठी सिनेमासृष्टीमध्ये आधी येणाऱ्या चार दोन सभ्यता शिकविणाऱ्या, एक दोन पुरस्कार मिळविणाऱ्या पण जवळजवळ फ्लॉफ सिनेमांच्या गर्दीने भरली होती. मराठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे बघितल्याशिवाय प्रगती शक्य नाही हे स्पष्ट होऊ लागलं.

म्हणूनच रितेश देशमुखने बिग बजेट ऍक्शन मराठी सिनेमा बनविण्याची जबाबदारी निशिकांतवर सोपवली, आणि “लय भारी” हा सिनेमा आपल्या वाट्याला आला.

त्यानंतर लय भारीचं रेकॉर्ड तोडणारा एखादा सिनेमा दरवर्षी येऊ लागला. अशा प्रकारे या डुबत चाललेल्या व्यवस्थेला निषिकांत एक प्रेरणा देणारं केंद्रं होतं.

“खुपते तिथे गुप्ते” या मुलाखतीच्या कार्यक्रमात निशिकांत, संजय जाधव या त्याच्या मित्रासोबत आला होता. तेव्हाच्या चर्चेत तो म्हणाला की त्याला फक्त कथा महत्वाची असते म्हणून तांत्रिक गोष्टीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा राग येतो. पुढे तो असंही म्हणाला की सिनेमा ही एक कला आणि व्यवसाय दोन्ही आहे. पण व्यवसाय जेव्हा कलेच्या पुढे जातो ते त्याला आवडत नाही.

मला वाटतं की प्रेक्षक म्हणून आपण निशिकांतच्या आठवणीत “सिनेमा” या कलाप्रकाराबद्दल जास्तं सजग होऊयात. फक्त स्टार, हिरो, कथा हेच न बघता सर्वांगी सिनेमा बघायला शिकूया.

कुठे व्यवसाय कलाकाराच्या आवाजाला मारत असेल, तर डोंबिवली फास्टमधला माधव आपटे बनुयात. कुठे ही व्यवस्था आणखी एखाद्या निशिकांतला त्रास देत असेल तर त्यासाठी मदारीमधल्या निर्मलला बाहेर काढुयात.

नेमकं कसं हे माहीत नाही, पण निशिकांतला आपल्यात जिवंत ठेऊयात. त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त करणाऱ्या लेखातसुद्धा तो कोण होता, आणि का महत्वाचा होता हे सांगावं लागतंय हे एक वेगळंच दुर्दैव. म्हणून यानंतर सिनेमाला जाताना दिग्दर्शकाचं नाव वाचायची सवय लागली तरी खूप झालं.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जेम्स बॉण्डने कॅडबरी जेम्सला कोर्टात खेचलं होतं

Next Post

गंगेच्या किनाऱ्यावरचं झुलतं मंदिर : भारतीय शिल्पकलेचा असामान्य नमुना

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

गंगेच्या किनाऱ्यावरचं झुलतं मंदिर : भारतीय शिल्पकलेचा असामान्य नमुना

या आफ्रिकन हुकुमशहाने भारतीयांना अल्लाहच्या आदेशावरून हाकलून लावलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.