सगळ्यांच्या कॉलेजच्या आठवणीत असणारी आरएक्स-१०० पुन्हा रस्त्यावर धावणार आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज भारतात इतक्या बाईक्स उपलब्ध आहेत पण या सगळ्यांमध्ये यामाहा आरएक्स100 ची जादू आजही कायम आहे. वाहनांच्या तंत्रज्ञानात बदल होतील तसे कंपन्या आपापल्या जुन्या मॉडेलमध्ये बदल करून नवनव्या मॉडेल्स बाजारात आणतात. या सगळ्या कंपन्यांमध्ये यामाहाच्या बाईक्सना पहिली पसंती मिळते. या कंपनीने भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे.

१९८५ साली आलेल्या यामाहा आरएक्स100 बद्दल लोकांमध्ये जी क्रेझ आहे तशी आजच्या कुठल्याही बाईकबद्दल पाहायला मिळत नाही. बॉलीवूडच्या हिरोपासून ते अगदी चोरदरोडेखोरांपर्यंत सगळेच हीच बाईक वापरायचे.

आज बाजारात एकापेक्षा एक मजबूत बाईक्स आहेत, पण यापैकी कुणालाच यामाहाआरएक्स-100 ची सर येणार नाही.

आजही लोकांचे यामाहावरील प्रेम कमी होत नाही, याची अनेक कारणे सांगता येतील. यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, या गाडीचे शक्तिशाली इंजिन. ही बाईक अतिशय मजबूत असूनही याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातील होती.

शक्तिशाली आणि मजबूत असूनही ही बाईक बोजड नव्हती. हलकी आणि वेगवान असल्याने ही बाईक अनेकांच्या पसंतीस उतरत असे. विशेषत: कॉलेजच्या तरुणांमध्ये तर या बाईकचे विलक्षण आकर्षण होते.

फक्त कॉलेजच्या तरुणाईतच नाही तर रेसिंगची आवड असणाऱ्यांमध्ये देखील या बाईकचे प्रचंड वेड होते.

१९७३ साली जपानच्या यामाहा या अग्रणी बाईक निर्माता कंपनीने आरडी-350 नावाने एक मोटारबाईक भारतीय बाजारपेठेत आणली. ही बाईक रेसिंगसाठी अगदी फीट होती. भारतात रेसिंगची आवड असणारे आणि स्पर्धेत उतरणारे खेळाडू होते. पण, इतर देशाच्या तुलनेत भारतातील अशा खेळाडूंची संख्या तशी कमीच होती.

राजदूत-350 ही यामाहानेच आणलेली बाईक मजबूत तर होती पण ही गाडी अतिशय महाग होती. शिवाय अत्यंत दणकट अशी ही बाईक खास स्पोर्ट्सचा विचार करूनच बनवण्यात आली असल्याने सामान्य माणसाला या बाईकमध्ये अजिबात रस नव्हता. याच्या किमतीही सामन्यांच्या आवाक्या बाहेरच्या असल्याने या बाईकला भारतात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्याकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा सगळा भार कृषीक्षेत्रावरच होता. शेतीप्रधान व्यवसाय असणाऱ्या लोकांना अव्वाच्यासव्वा किंमत देऊन बाईक घेणे परवडणारे नव्हते. या बाईक त्यांच्यासाठी उपयुक्त नव्हत्याच. त्यामुळे राजदूत-350 भारतात तरी फारशी चालली नाही.

भारतीय ग्राहकांना त्यांच्या उपयुक्ततेनुसार आणि परवडेल अशा दरात बाईक देण्यासाठी यामाहाने भारतात आरएक्स-100 च्या रुपात नव्या बाईक्स आणल्या.

१९८५ च्या आसपास या बाईक्स भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्या. नव्वदच्या दशकात तर या बाईकने भारतीयांच्या घराघरात स्थान मिळवले. ही बाईक हाताळायला अगदी सोपी होती. भारतीयांचे प्रेम आणि विश्वास जिंकण्यात या बाईकला सहजच यश मिळाले.

त्याकाळी भारतात रेसिंगसाठी बाईक्समध्ये फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे रेसिंगची आवड असणाऱ्यांमध्ये तर या बाईकला पहिला क्रमांक दिला जात असे.

100 सीसीच्या पॉवर असणाऱ्या या बाईकला टू स्ट्रोक इंजिन होते. ज्यामुळे या बाईकची ताकद वाढत असे. याची बॉडीही दणकट होती. तरीही ही बाईक वजनाने हलकी होती. ४ स्पीड गिअरबॉक्स असणारी ही बाईक १०० किमी प्रतीतास या वेगाने पळत असे.

चालवायला हलकी असल्याने गुन्हेगारी जगतातही ही बाईक विशेष लोकप्रिय होती. चोरी केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणाहून छुमंतर होण्यासाठी या बाईकची चांगलीच मदत होत असे.

सुरुवातीला या गाडीची किंमत १९ हजारच्या आसपास होती. आजच्या काळात हीच रक्कम साठ हजार पर्यंत जाऊ शकते. परंतु त्याकाळी 100सीसीची बाईक खरेदी करण्यासाठी ही काही फार मोठी रक्कम नव्हती. शिवाय, बाईक्समध्ये जास्त पर्यायही उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही बाईक फार महाग आहे असा विचार केला जाण्याची शक्यताच नव्हती.

त्याच काळी हिरो होंडाने देखील सीडी100 बाईक लॉंच केली होती. मात्र यामाहाच्याच बाईक्सला सर्वात जास्त पसंती दिली जात असे. या बाईकविषयी आजही लोकांच्या मनात प्रेम आहे, म्हणूनच जेंव्हा यामाहा आरएक्स-100 पुन्हा लॉंच करणार अशी अफवा पसरली तेंव्हा अनेकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या.  आजही ज्यांच्याकडे या मॉडेलची जुनी गाडी आहे, त्यांना यामाहावरून सैर करताना आपले कॉलेजचे दिवस नक्कीच आठवत असतील.

या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, याचा युनिक आवाज. तेलगु फिल्म निर्माता अजय भूपथी यांना एका उद्धट तरुणाच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी एक चांगले आणि आकर्षक नाव हवे होते. तेंव्हा त्यांनी या चित्रपटाला ‘आरएक्स-100’ हेच नाव दिले. त्यांच्या मते या गाडीचा आवाज, हा मग्रुरी, अहंपणा आणि अलगपणा याचेच प्रतिक आहे.

चित्रपटसृष्टीपासून ते क्रीडाजगतापर्यंत सगळीकडे या बाईकचे चाहते पाहायला मिळतात. काला चित्रपटात रजनीकांतलाही हीच बाईक चालवताना दाखवले आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीदेखील या बाईकचा चाहता आहे. धोनीने २००३ मध्ये आपल्या एका मित्राकडून यामाहा बाईक विकत घेतली होती. 

१९८५ पासून १९९६ पर्यंत सुमारे एक दशकभर तरी या बाईकने भारतीय रस्त्यांवरून आपली एकाधिकारशाही गाजवली. नंतर कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने याची निर्मिती बंद करणे भाग पडले. प्रदूषण उत्सर्जनासाठी सरकारने आणलेल्या नियमावलीत या गाडीचे इंजिन न बसल्याने या गाडीची निर्मिती बंद करण्याचे आदेश काढण्यात आले.

या बाईकची निर्मिती कंपनीने बंद केली असली तरी आजही ही बाईक तुम्हाला रस्त्यावरून धावताना दिसेल. ज्यांना बाईकवरून दूरच्या प्रवासाचा आनंद लुटण्याची इच्छा आणि हौस आहे, अशा लोकांची आजही यामाहा आरएक्स100लाच पहिली पसंती आहे.

यामाहाने आरएक्स-100 चे नवे व्हर्जन भारतीय बाजारपेठेत आणले आहे. ज्याची किंमत लाखाच्या घरात आहे. पण, भारतीयांच्या मनात या बाईकला असे काही स्थान आहे, की या बाईकसाठी भारतीय आजही लाख रुपये खर्चायला मागे पुढे पाहणार नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!