ही आहेत जगातील सर्वात धोकादायक विमानतळं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारतात दरवर्षी सरासरी १०% मृत्यू हे अपघातामुळे होतात. सध्या देशभरात कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गेल्या चार-पाच महिन्यात अपघाताचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. अपघातात होणारी आर्थिक आणि जीवितहानी कधीही भरून न येणारी असते. केरळच्या कोझिकोड विमानतळावर ७ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.

केरळचे कोझिकोड विमानतळ हे टेबलटॉप विमानतळ आहे. टेबलटॉप म्हणजे डोंगराच्या उंच पठारावर असेलेली धावपट्टी. जिच्या एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी असते. एरव्ही ही याठिकाणी विमान लँड करणे धोक्याचेच आहे.

परंतु पावसाळ्याच्या दिवसात तर ही धावपट्टी अधिक धोकादायक बनते. ढगांमुळे एकतर आजूबाजूचे स्पष्ट दिसत नाही त्यातच पावसाचे पाणी साठून धावपट्ट्या देखील निसरड्या होतात.

कोझिकोडमध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाचे पाणी धावपट्टीवर जमा झाल्याने विमान धावपट्टीवरून निसटून खोल दरीत कोसळले. दरीत कोसळल्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. तुकडे झालेल्या विमानाचे फोटो पाहिल्यास हा अपघात किती भीषण होता हे समजेल.

या अपघातात पायलटसह १८ प्रवासी मृत्युमुखी पडले असून दीडशे प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. अरुंद धावपट्टी, त्यात पावसाच्या पाणी साचलेले असल्याने पायलटचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान बाजूच्या ३० फुट खोल दरीत कोसळलं.

या आधी दहा वर्षापूर्वी मेंगलोरच्या विमानतळावरही असाच भीषण अपघात झाला होता. टेबलटॉप विमानतळावर विमानाचे लँडिंग करणे तसे धोक्याचेच समजले जाते.

टेबलटॉप धावपट्टी म्हणजे अशी धावपट्टी जी डोंगरावर किंवा पठारावर असते. एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला खोल दरी असते.

अशा धावपट्टीवर विमान उतरवताना कधीकधी असाही भ्रम निर्माण होतो की, धावपट्टी दरीच्या टोकापर्यंत वाढलेली आहे. त्यात पाऊस सुरु असेल तर अजूनच अस्पष्ट दिसते त्यामुळे अशा विमानतळावरून उड्डाण करताना किंवा विमान उतरवताना फारच काळजी घ्यावी लागते.

देशात आणि जगभरही अशी अनेक विमानतळं आहेत जे त्यांच्या भौगीलिक स्थितीमुळे धोकादायक समजले जातात. भारतात कोझिकोड प्रमाणेच आणखी दोन विमानतळ आहेत.

मंगळुरू विमानतळ आणि मिझोरममधील लेंगपुई विमानतळ.

मंगळूरूच्या विमानतळावर दहा वर्षापूर्वी म्हणजे २०१०मध्येच याहूनही भीषण अपघात घडला होता. ज्यामध्ये १६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दुबईहून मंगळूरूला येणाऱ्या या विमानात एकूण १६८प्रवासी होते यातील फक्त ८ प्रवाशांनी हवेत उड्या घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता.

नेपाळच्या तेनजिंग हिलेरी विमानतळ हे जगातील सर्वात जास्त धोकादायक विमानतळ म्हणून ओळखले जाते. हे विमानतळ लुक्ला विमानतळ या नावानेही ओळखले जाते.

हिमालयाच्या बर्फाळ डोंगर रांगांत माउंट एव्हरेस्टच्या जवळ हे विमानतळ वसलेले आहे. हे विमानतळ ९,३२५ फुट उंचीवर आहे. याची धावपट्टीही खूपच अरुंद आहे. त्यामुळे इथे फक्त छोटी विमाने उतरवली जातात. या विमानतळावर जाणाऱ्या पायलटने थोडी जास्त सावधगिरी बाळगावी लागते.

एकीकडे उंच डोंगर आणि दुसरीकडे ६०० मीटर खोल दरी. याठिकाणी सहसा कुणी जात नाही. एव्हरेस्ट सर करण्याची मनीषा बाळगणारेच या विमानतळावर जाण्याचे धाडस करतात.

Lukla: The World's Most Dangerous Airport
Lukla: The World’s Most Dangerous Airport

 

भूतानमधील पॅरो विमानतळ याहूनही अधिक धोकादायक विमानतळ समजले जाते. इथून उड्डाण करण्यासाठी आणि विमान उतरवण्यासाठी विमानचालकांना आधी परवानगी घ्यावी लागते. आजपर्यंत फक्त १७ वैमानिकांनाच या ठिकाणाहून उड्डाण घेण्यास आणि विमान उतरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या विमानतळाच्या चोहोबाजूंनी १८,००० फुट उंच पर्वत आहेत. या पर्वतांचे सुळके थेट आकाशात घुसल्याचा भास होतो.

इथे धावपट्टी ६,५०० फुट लांब आहे. चोहोबाजूनी पर्वतांनी वेढलेला असल्याने या धावपट्टीवर दुपारपासूनच अंधार होऊ लागतो. इथे फक्त दिवसाच्या प्रकाशातच उड्डाण केले जाते किंवा विमान उतरवले जाते.

कॅरेबियाइ द्वीपसमूहातील Juancho E. Yrausquin Airportवर विमान उतरवणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखेच आहे. ही समुद्रातील एका रुंद खडकावर बनवण्यात आली आहे. या धावपट्टीच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. त्यात ही धावपट्टी सामान्य धावपट्टीहून अतिशय लहान आहे.

या धावपट्टीची लांबी ३९६ मीटर आहे, तर सामान्य धावपट्टी ही २००० ते २५०० मी लांब असते. म्हणूनच ज्या विमानाचा वेग पटकन कमी होऊ शकतो अशी विमानेच या धावपट्टीवर उतरवली जातात.

न्यूझीलंडमधील वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टीही भर समुद्रात बनवली गेली आहे. या धावपट्टीची लांबीही खूपच कमी आहे. या धावपट्टीवर विमान मागे वाळू शकत नाही. कारण धावपट्टी अतिशय अरुंद आहे.

Wellington Airport

एका बाजूने समुद्र दुसऱ्या बाजूने पर्वत असल्याने या पट्ट्यात नेहमी वादळ सदृश्य वारे घोंघावत असतात. या ठिकाणाहून विमानाचे उड्डाण करणे आणि विमान उतरवणे दोन्हीही धोकादायक आहे.

हॉंगकॉंगमध्ये तर असे विमानतळ आहे ज्याचे नावच धोकादायक आहे. हॉंगकॉंगमधील काई टाक विमानतळही अशाच धोकादायक विमानतळामध्ये गणले जात होते. हे विमानतळ नागरी वस्तीत बांधण्यात आले होते. या विमानतळाच्या चारीबाजूंनी वस्ती होती. त्यामुळे वैमानिकांना विमान उतरवताना खूपच भीती वाटत असे. 

भीषण अपघातांमुळे हे विमानतळ १९९८ मध्येच बंद करण्यात आले. या विमानतळावर विमान उतरवणे म्हणजे जीवाला धोकाच. विमान उतरताना प्रवाशांना आजूबाजूच्या घरातील खिडक्यांमधून आत डोकावताही येत होते.

अशा धोकादायक विमानतळांवरून उड्डाण करताना किंवा विमान उतरवताना वैमानिकांना स्वतःवर किती नियंत्रण ठेवावे लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी. वैमानिकाकडून थोडीही चूक झाली तर वैमानिकासह प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून अशा ठिकाणी धाडसी आणि जीवावर उदार होण्याची हिंमत असणाऱ्या वैमानिकांनाच पाठवले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!