या दोन अमेरिकन महिलांनी भारताच्या देवी विरोधी लढ्याला यश मिळवून दिलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


काही दशकांपूर्वीचीच गोष्ट आहे, भारतात देवीची साथ पसरली होती. या साथीने ७०च्या दशकात अनेक लोकांचा बळी घेतला होता. एखादा व्यक्ती एकाएकी आजारी पडायचा, त्याला भयंकर ताप यायचा आणि काही काळातच तो व्यक्ती मृत्युमुखी पडायचा. हा आजार त्या विशिष्ठ भागात वाऱ्याच्या वेगाने पसरायचा आणि असंख्य लोक आपल्या प्राणांना मुकायचे.

लोकांचा असा ग्रह होता की हा आजार देवीच्या कोपाने होतो त्यामुळेच याला देवी असे म्हणत. या आजाराचे सर्वात मोठे लक्षण होते अंगावर येणारी पुरळ आणि त्यातून होणारा स्त्राव. हा आजार जसा जसा बळावत जायचा तशी लोकांच्या अंगावरील पुरळ वाढत जायची आणि लोक वेदनेने असहाय्य होत. या आजारामुळे ताप, डायरिया अशा व्याधी होत अखेरीस शरीरातील रोगप्रतिकार क्षमता मंदावल्याने लोक मृत्युमुखी पडत.

१९७४ साली देवीच्या साथीने भारतातील घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात थैमान घातले होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात या आजाराने मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडत होते. काही प्रसंगी तर अख्खं गाव देवीच्या साथीने उजाड व्हायचं.

अनेक लोक आपल्या गावात देवीचा रुग्ण सापडला की गाव सोडून पलायन करत होते. सुरुवातीला एकदोन करत सुरु झालेला हा देवीचा प्रकोप लाखो लोकांचा जीव घेऊन थांबला होता. आजच्या कोरोनापेक्षा कैकपटीने जास्त भीतीदायक साथ देवीची होती.

खरंतर, तत्कालीन सरकारने देवीची लस अनेकांना दिली होती. परंतु कालांतराने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ झाल्यामुळे, हा आजार पसरला. १९७० साली देवीच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले होते, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. याच नियमावलीच्या बळावर भारत सरकारने देवीची साथ रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

भारत सरकारने देवीच्या साथीच्या उच्चाटनासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यास सुरुवात केली. यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे प्रकल्प राबवले गेले. यासाठी विदेशी संस्थांचे देखील सहाय्य घेण्यात आले. भारत सरकारच्या प्रयत्नांना यश आले आणि १९७७ साली भारत देवीच्या आजारापासून कायमचा मुक्त झाला.

१९८० साली भारत हा पूर्णपणे देवीच्या साथीने मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली.

भारताच्या या लढ्यात अनेक आरोग्य सेवकांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. परदेशातून देखील अनेक लोक देवीच्या उच्चाटनाच्या कार्यासाठी व अभ्यासासाठी भारतात दाखल झाले होते, यात अनेक महिला अभ्यासक देखील होत्या.

यापैकीच दोन अमेरिकन महिला अभ्यासकांनी भारताच्या देवीच्या साथीच्या विरोधातील लढ्याला मोठे यश मिळवून दिले होते. या दोन महिला अभ्यासक कोण होत्या व त्या भारतात कशा आल्या व त्यांनी इथे कसे कार्य केले हे जाणून घेणे फार रंजक आहे.

१) मेरी गिनान

मेरी गिनान यांचा जन्म १९३९ साली न्यू यॉर्क शहरात झाला. लहानपणापासूनच त्यांना एक अंतराळवीर होण्याची इच्छा होती. परंतु, त्यांनी ज्यावेळी अमेरिकेच्या नासामध्ये त्या पदासाठी अर्ज केला त्यावेळी त्यांची मागणी “नासामध्ये स्त्री असेल तर इतर लोकांना काम करता येणार नाही”, असे कारण देऊन नामंजूर करण्यात आली.

पण मेरी यांनी हार मानली नाही. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले. त्यांनी वैद्यकीय प्रशिक्षण घेतल्यावर एपिडेमिक इंटेलिजन्स सर्व्हिसचं दोन वर्षांचं ट्रेनिंग पूर्ण केलं. अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिव्हेन्शनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना भारतातील देवीच्या साथीची माहिती मिळाली. त्यांनी भारतात स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज केला.

परंतु, सलग दोन वर्षे त्यांचा अर्ज नाकारला गेला. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची महिलांप्रतीची असलेली भूमिका कारण म्हणून समोर ठेवण्यात आली. खरंतर भारत सरकारच त्यावेळी महिला स्वयंसेवकांना भारतात संधी देण्याच्या बाबतीत अनुकूल नव्हतं.

 

Mary Guinan

मेरी मात्र मागे हटायला तयार नव्हत्या, त्यांनी सरळ भारताच्या तत्कालीन महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयाला साकडे घातले आणि आपल्या कामकाजात सहभागी करून घेण्याची विनंती केली. फक्त काही महिन्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची परवानगी त्या मागत होत्या.

अखेरीस प्रधानमंत्री कार्यालयाने त्यांना तीन महिन्यासाठी उत्तर प्रदेशात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची परवानगी दिली.

१९७५ साली मेरी गिनान भारतात आल्या आणि त्यांनी उत्तर प्रदेशात गावोगावी भटकंती केली, तिथल्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, महिला असो वा पुरुष यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यात देवीच्या आजाराविषयक जनजागृती निर्माण करण्यास सुरुवात केली.

त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होईल असे अनेक उपाय त्या लोकांना सुचवले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे लसीकरण प्रक्रिया राबवली. त्या पुन्हा मायदेशी परतल्यानंतर केवळ एका महिन्यांनी उत्तर प्रदेश कोरोनामुक्त झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहचली.

भारतातील त्यांचा अनुभवाने त्यांना खूप काही शिकायला मिळाले, याच अनुभवाच्या बळावर अमेरिकेत त्यांनी एड्सवर नियंत्रण मिळवण्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी केलेल्या कामावर चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली आहे.

आज गिनान यांचे वय ८० वर्ष इतके आहे आणि त्या अमेरिकेच्या स्कुल ऑफ कम्युनिटी हेल्थ सायन्सच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

२) कोर्नेलिया डेव्हिस

१९७५ साली आपलं बालरोगावरील वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर कोर्नेलिया यांनी लोकांसाठी काम करण्यासाठी स्वतःला वाहून दिले. जागतिक आरोग्य संघटनेने डॉ. पॉल व्हेरले यांच्या नेतृत्वाखाली भारतात पाठवलेल्या डॉक्टरांच्या टीममध्ये कोर्नेलिया या एकट्या महिला होत्या.

भारतात आल्यावर त्यांनी दिल्लीत काही आठवडे प्रशिक्षण घेतले व त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या जबलपुरीमध्ये करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालच्या कुचबिहार भागात करण्यात आली.

कृष्णवर्णीय असल्याने त्यांना भारतात अनेक प्रकारच्या सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला, त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर आणि त्यांचे इतर भारतीय सहकारी त्यांच्यापासून वेगळं बसायचे. त्यांना सापत्न वागणूक दिली जात होती. अखेरीस एकेदिवशी त्यांनी त्या दोघांना खडेबोल सुनावले. परंतु काही परिणाम झाला नाही, कालान्तराने एकत्र वेळ घालवल्यावर ते एकमेकांचे मित्र झाले.

 

पश्चिम बंगालमध्ये असताना कोर्नेलिया यांनी युद्धपातळीवर काम केले. त्याआधी त्या एक किलोमीटरच्या परिसरात घरोघरी जाऊन लसीकरण करायच्या आणि १० किलोमीटरच्या परिसरात कुठला बाधित वा आजराची लक्षण असलेला रुग्ण तर नाही ना, याचा शोध घ्यायच्या.

त्या भारतात ६ महिन्यांसाठी आल्या होत्या. परंतु, पुढील दोन वर्ष थांबून पश्चिम बंगालनंतर राजस्थान व इतर भागातील आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. नंतर त्या मायदेशी परतल्यावर त्यांना ‘गॉडेस ऑफ स्मॉलपॉक्स’ म्हटले जाऊ लागले.

मायदेशी त्या बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या, परंतु आफ्रिकन देशातील विविध आजरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विविध देशात साथीचे आजार रोखण्यासाठी कार्यरत आहेत. सध्या त्या कम्बोडियात मलेरियाविषयक जनजागृती करत आहेत.

त्यांनी आपल्या भारतातील देवीच्या उच्चाटन कार्यक्रमावर ‘सीताला माता : रॅडिकॅटिंग स्मॉलपॉक्स इन इंडिया’ नावाने ग्रंथ देखील लिहला आहे,

मेरी गिनान आणि कोर्नेलिया डेव्हिस या दोन्ही अमेरिकन महिलांनी भारतातच नव्हे तर जगभरात गंभीर साथीच्या आजाराच्या उच्चाटनासाठी असंख्य प्रयत्न केले आहेत आणि अनेक प्राण वाचवले आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची तुलना शक्य नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!