आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या हॉलीवूडमधील अनेक ए-लिस्टर्स कलाकारांनी स्वत:ला मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स आणि डीसीईयूशी जोडून घेतलेलं आहे. सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन, स्पायडर मॅन, कॅप्टन अमेरिका, थॉर, ब्लॅक विडो, लोकी, हल्क, डॉक्टर स्ट्रेन्ज अशी कितीतरी पात्रं हॉलीवुडमधील नावाजलेल्या कलाकारांनी साकारली आहेत. कारण आता सुपरहिरो चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत असून त्यांचं बजेट देखील जास्त आहे.
अशा चित्रपटांमध्ये अगदी लहानशी भूमिकासुद्धा एखाद्या कलाकाराला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देते. या परिस्थितीमध्ये जर एखाद्या कलाकाराला पहिला-वहिला सुपरहिरो असलेल्या ‘सुपरमॅनची’ भूमिका देऊ केली तर त्यानं काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? नक्कीच तुमच्यापैकी प्रत्येकजण म्हणेल की, त्यानं ती भूमिका डोळे झाकून स्विकारावी! मात्र, हॉलीवूडमध्ये असा एक नावाजलेला अभिनेता आहे ज्यानं दाराशी आलेली सुपरमॅनची भूमिका नाकारली. सुपरमॅनची भूमिका नाकारणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे, ‘विल स्मिथ’!
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये स्मिथनं स्वत: याविषयी माहिती दिली होती. त्याला ‘सुपरमॅन रिटर्न्स’मध्ये सुपरमॅनची भूमिका देण्यात आली होती, परंतु ती त्यानं नाकारली. जर त्यानं सुपरमॅन बनण्याचा निर्णय घेतला असता, तर डीसी चित्रपट आणि हॉलीवूडमध्ये नक्कीच ही गोष्ट क्रांतीकारी समजली गेली असती. विल स्मिथ हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि निर्माता म्हणून त्याला जगभरात ओळखलं जातं.
आतापर्यंत त्याला पाच वेळा गोल्डन ग्लोब आणि दोन अकॅडमी अवॉर्ड्साठी नामांकनं मिळाली आहेत. याशिवाय त्यानं चार वेळा ग्रॅमी अवॉर्ड देखील मिळवला आहे. विल आपल्या भूमिका निवडण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आहे, हे त्याचं आतापर्यंतचं काम पाहून आपल्याला अंदाज आला असेल. मात्र, तरी देखील त्यानं सुपरमॅनसारखी मोठी संधी का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर देखील विलनं लगेच दिलं होतं.
अमेरिका आणि हॉलीवूडमध्ये आजही काही प्रमाणात वर्णभेद मानला जातो. कृष्णवर्णीय अभिनेत्यांना अनेकदा लोकांची टीका सहन करावी लागली आहे. लोकांच्या मनात ‘सुपरमॅन’ची प्रतिमा एक श्वेतवर्णीय सुपरहिरो अशी आहे. जर विलनं सुपरमॅनची भूमिका केली असती तर नक्कीच हे लोकांना रुचलं नसतं. त्याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला असता.
कारण पूर्वीचा एक अनुभव त्याच्या गाठीशी होता. त्यानं ‘वाइल्ड वाइल्ड वेस्ट’मध्ये जिम वेस्टचं पात्र साकारलं होतं. विलच्या अगोदर हे पात्र, श्वेतवर्णीय कलाकारानं साकारलं होतं. विलनं त्याची जागा घेतलेलं लोकांच्या फारसं पचनी पडलं नव्हतं. त्याला टीकेचा देखील सामना करावा लागला होता. पुन्हा तसा अनुभव घेण्याची आपली इच्छा नव्हती, असं विलचं म्हणणं होतं.
विल स्मिथनं सुपरमॅनची भूमिका स्विकारली असती तर नक्कीचं त्यात वेगळपण आलं असतं यात वाद नाही. केवळ तो कृष्णवर्णीय अभिनेता आहे म्हणून नव्हे तर त्याचं अभिनय कौशल्य देखील सुपरमॅनच्या वेगळेपणाला कारणीभूत ठरलं असतं. क्रिस्टोफर रीव्ह, ब्रॅन्डन राउथ आणि हेन्री कॅव्हिल यांनी आतापर्यंत सुपरमॅन साकारलेला आहे. ज्या प्रकारे सुपरमॅन असणं अपेक्षित होतं, त्याला न्याय देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न या तिघांनी केलेला आहे.
पण, विल स्मिथचा विचार केला तर तो एक अतिशय एक्सप्रेसिव्ह अभिनेता आहे. त्यानं तोंडातून डायलॉग जरी नाही बोलले तरी त्याचा चेहरा आणि शरीर दोन्ही बोलून जातं. याबाबतीत नक्कीच त्याचा हात कुणी धरू शकत नाही. जर विलनं सुपरमॅन साकारला असता तर, त्याचे काही ट्रेडमार्क गुण नक्कीचं सुपरमॅनमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला असता. कल्पना करा विलनं साकारलेला सुपरमॅनच्या तोंडून ‘ओह हेल नो!’ हा डायलॉग बाहेर पडतोय. हे पाहणं नक्कीचं मजेशीर ठरलं असतं. विलनं जवळपास आपल्या प्रत्येक चित्रपटात ‘ओह हेल नो!’ हा डायलॉग वापरलेला आहे किंबहुना त्याला तो दिलाच जातो.
ज्यावेळी विल स्मिथला सुपरमॅन रिटर्न्स ऑफर झाला होता त्यावेळी तो बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरीची हमी देणारा कलाकार होता. त्यानं ‘मेन इन ब्लॅक’ आणि ‘इनडिपेन्डन्स डे’सारख्या मोठ्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तो आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होता. अशा परिस्थितीमध्ये सुपरमॅन साकारून मोठ्या कष्टानं उभी केलेली प्रतिमा संकटात जाण्याची भीती नक्कीच विलच्या मनात होती.
सुपरमॅन रिटर्न्सला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरला होता. २० कोटी डॉलरचं बजेट थिएटरमध्ये दुप्पट करण्यात चित्रपट अयशस्वी ठरला होता. नवोदित ब्रॅन्डन रूथऐवजी स्मिथनं चित्रपटात भूमिका केली असती तर कदाचित सुपरमॅन रिटर्न्सला मोठा फायदा झाला असता. सुपरमॅन रिटर्न्सच्या अपयशामुळं डीसीला आपल्या ड्रॉइंग बोर्डवर परत जावं लागलं. त्यांनी सुपरमॅन चित्रपटांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना झॅक स्नायडर्स मॅन ऑफ स्टील आणि त्यानंतर डीसीईयूची निर्मिती करावी लागली.
जर विलं स्मिथनं सुपरमॅन रिटर्न्समध्ये अभिनय केला असता तर आताचा डीसी मूव्हीजचा परिपेक्ष पूर्णपणे भिन्न असला असता. सुपरमॅन रिटर्न्समध्ये भूमिका करून जर विल स्मिथनं ती हिट केली असती तर साहजिक पुढील सिक्वल्समध्ये विलचीचं वर्णी लागली असती. इतकंच काय डीसीईयुची देखील निर्मिती झाली नसती.
कदाचित बॅटमॅन आणि सुपरमॅन अजूनही स्क्रीन शेअर करताना आपल्याला दिसते असते. विल स्मिथ आणि ख्रिश्चन बेलच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळाली असती. चॅडविक बोसमॅनच्या ब्लॅक पँथरनं क्रांती घडवून आणली. मात्र, विल स्मिथच्या हातात अशी क्रांती करण्याची संधी एका तपापूर्वीचं आली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.