९० वर्षात पहिल्यांदाच या डेथ व्हॅलीचं तापमान एवढं वाढलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. या ठिकाणाला डेथ व्हॅली असे नाव पडलेले आहे, ही एक प्रकारची खचदरी आहे आणि मान्यता अशी आहे की सुमारे साडेचार करोड वर्षांपूर्वी हिचा उगम झाला. तेव्हापासून हा भाग भुगर्भामध्ये खाली खाली खचत चाललेला आहे.

अठराव्या शतकात अमेरिकेमध्ये एक मोठी अफवा पसरली होती ती म्हणजे या दरीमध्ये सोन्याचे साठे सापडत आहेत. संपूर्ण अमेरिकेतून त्यासाठी लोकांच्या रांगा या दरीच्या पलीकडे जाण्यासाठी लागलेल्या होत्या. परंतु या ठिकाणचे तापमान प्रचंड उष्ण अशा स्वरूपाचे आहे.

त्यामुळे जे जे लोक या ठिकाणी सोन्याचा शोध घेण्यासाठी गेले होते ते आपला सोन्यासारखा बहुमोल जीव मात्र गमावून बसले. त्या प्रसंगानंतरच या ठिकाणाला डेथ व्हॅली असे नाव पडले.

ही खचदारी पॅनामिंट आणि ॲमार्गोसा पर्वतश्रेणीं दरम्यानच्या भागात वसलेली आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी कार्टून नेटवर्कवर द रोड रनर शो नावाचे कार्टून नेहमी बघत असाल. त्याच्यामध्ये रोड रनर नावाचा एक वेगाने धावणारा पक्षी आणि त्या पक्षाला मारून खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या रचणारा, कोल्ह्यासारखा दिसणारा कायोटी नावाचा प्राणी तुमच्यापैकी अनेक जणांच्या ओळखीचा असेल.

आता डेथ व्हॅली आणि या कार्टूनचा काय संबंध? तर हे जे दोन कार्टून दाखवले गेले होते त्याच्या पाठीमागचा सगळा जो प्रदेश आहे तो डेथ व्हॅलीवरूनच इन्स्पायर्ड होता.

अर्थात संपूर्ण परिसर हा काही वैराण वाळवंट नाही. अकरा हजार फूट उंच अशा पर्वत रांगा आणि त्याखाली तीनशे फूट खोल अशी पाण्याची तळी इतकी विपुल जैवविविधता या परिसरामध्ये आढळते. एकीकडे इथे ओसाड वाळवंट आहे. दुसरीकडे पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या नद्या देखील आहेत.

एकीकडे काही काही भाग बर्फाच्छादित दिसतो. तर दुसरीकडे फक्त मिठामुळे क्षार युक्त झालेली भेगाळलेली जमीन हजारो मैलाच्या टापूमध्ये पसरलेली आहे. अशा प्रकारची संपन्न जैवविविधता क्वचितच जगातल्या दुसऱ्या कुठल्या भागांमध्ये आढळत असेल त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी प्रचंड पर्वणीचे ठिकाण असते.

या डेथ व्हॅलीच्या अगदी उत्तर दिशेला जवळपास 800 फूट उंच अशा वाळूच्या टेकड्या आहेत. सुमारे दोन मैल भागांमध्ये हा पट्टा पसरलेला आहे.

फक्त वाळूच्या टेकड्या इतकीच ह्याची खासियत नाही. उन्हाळ्यात जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा अगदी या टेकड्यांच्या उंच भागातील वाळूचे कण खाली खाली घसरून येतात आणि घसरण होत असताना ते एकमेकांवर आदळले जातात. आदळल्या नंतर विशिष्ट प्रकारची कंपने त्यातून निर्माण होतात आणि एक वेगळ्याच प्रकारचे संगीत त्यातून ऐकू येते. ही अशा प्रकारची गाणारी वाळू बघण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक उन्हाळ्यामध्ये या परिसराला भेट देत असतात.

या डेथ व्हॅलीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथला रेस्ट्रॅक पाया. पायाचा अर्थ होतो सरोवर. या ठिकाणी जे सरोवर आहे ते सरोवर पाण्याचे नाही तर चक्क दगडांचे आहे. ही भूमी वर्षानुवर्षे कोरडी ठक्कर होती. अधेमधे थोडासा तुरळक पाऊस पडत होता परंतु इतर वेळी तापमान प्रचंड कोरडे त्यामुळे या सरोवरामध्ये पाणी कधीही शिल्लक राहिले नाही.

या सरोवरामध्ये फक्त दगड आहेत आणि हे दगड एका ठराविक मार्गावरून अगदी सरकत सरकत पुढे निघून जातात जिवंत पाण्याच्या प्रवाहासारखे! इतक्या वजनदार दगडांना खेचून नेणारी कुठली शक्ती आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधक या सरोवरावर लक्ष ठेवून आहेत.

अगदी आखीव रेखीव ठरलेल्या मार्गाने प्रचंड वजनाचे दगड पाण्यासारखे सरकत पुढे जात राहतात हा नजारा बघण्यासारखा असतो.

इथे वाहणाऱ्या नद्या भूगर्भातले मीठ पृष्ठभागावर घेऊन येत असल्यामुळे पांढर्‍याशुभ्र अशा दिसतात. संपूर्ण डेथ व्हॅलीमध्ये बॅड वॉटर बेसिन या एकाच भागामध्ये फक्त पाऊस पडतो. हे एक पाण्याचे तळे आहे. आता या भागामध्ये पाऊस जरी पडत असला तरी अत्यंत उष्णतेमुळे पाणी आटून जाते आणि शेवटी बाष्पीभवनामुळे उरते ते मीठ त्यामुळे हे संपूर्ण तळे हे मिठाचे तळे म्हणून ओळखले जाते.

इथले मीठ खाण्यासाठी योग्य असले तरी पाणी मात्र पिण्यासाठी योग्य नाही म्हणूनच याला बॅड वॉटर बेसिन असे नाव पडलेले आहे.

या डेथ व्हॅलीचे जैवविविधतेच्या दृष्टीने असणारे महत्व लक्षात घेऊन 1994 साली अमेरिकन सरकारने कॅलिफोर्निया डेझर्ट प्रोटेक्शन ॲक्ट हा नवीन कायदा पास केला. या कायद्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर नॅशनल पार्क म्हणून घोषित करून टाकला.

हा परिसर जगातील सगळ्यात उष्ण परिसर म्हणून ओळखला जातो. जगातील सगळ्यात मोठ्या तापमानाची नोंद याच परिसरामध्ये झालेली आहे.

2020मध्ये डेथ व्हॅली पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली. ऑगस्ट महिन्यामध्ये या परिसरामध्ये उच्चांकी 54.44 अंश सेल्सिअस इतक्या उष्ण तापमानाची नोंद झाली. हे गेल्या 90 वर्षातील उच्चांकी तापमान आहे. पृथ्वीवर तिसऱ्यांदा तापमानाचा पारा इतक्या उंचावर गेलाय. या परिसरामध्ये अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे संपूर्ण अमेरिका चिंतेत आहे. याचाच एक अर्थ म्हणजे पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढत आहे. क्लायमेट चेंज ही गोष्ट आपण आता गंभीरतेने घेतली पाहिजे हे यातून सूचित होते.

यापूर्वी 1913 मध्ये याच परिसरात 56.19 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली होती. परंतु त्या काळात तापमान मोजण्याची साधने आजच्या इतकी प्रगत नव्हती. खरोखर 56 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले असेल का याविषयी आजच्या संशोधकांना शंका वाटते.

त्यामुळे 1913 साली नोंदवल्या गेलेल्या 56 अंश सेल्सिअस तापमानाची प्रमाणता आता कोणी वापरत नाही. परंतु त्यानंतर अगदी 55 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणारे तापमान हे अलीकडच्या काळात ऑगस्ट 2020 मध्येच नोंदले गेले.

तापमान वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला अमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेली आग. या आगीमध्ये संपूर्ण पृथ्वीवरचे सुमारे 35 टक्के जैववैविध्य नष्ट झाले असा अंदाज वर्तवण्यात येतो. या आगीमुळे यावर्षी डेथ व्हॅलीमध्ये इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली असे शास्त्रज्ञ मानतात.

ही घटना पाहता 2020 वर्ष खर्‍या अर्थाने संपूर्ण मानवजातीसाठी प्रलयंकारी वर्ष ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग असेल त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेली आग असेल कोरोना असेल, तापमानवाढीच्या घटना असतील हा सगळा नजारा भविष्यकाळाची चाहूल तर देत नाहीत ना?

आतातरी मानवाने स्वतःचा हावरेपणा सोडून निसर्गाशी मैत्री केली पाहिजे, निसर्गाकडे परत वळले पाहिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीची जपणूक केली पाहिजे हा मोठा संदेश आपल्याला हे डेथ व्हॅलीचे वाढलेले तापमान देत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!