आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता तेंव्हा भाज्यांचे भाव बरेच वधारले होते. लॉकडाऊन मध्ये दिलेल्या शिथिलतेनंतर आता भाज्यांचे दर थोडे आवाक्यात आले आहेत. पण, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुन्हा कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षीच सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान कांद्याचे भाव अगदी गगनाला भिडतात. कांद्याच्या वाढत्या किमतीवरून सर्वत्र चर्चा आणि विवादांना उत येतो. यावर्षी कांद्याच्या या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.
सध्या तर कांद्याचे दर ५०-६० किलोपर्यंत पोहोचले आहेत. परंतु दरवर्षी याच दिवसात कांद्याचे भाव इतके का वाढतात? यामागे कोणती कारणे आहेत? असे प्रश्न पडणे साहजिक आहे.
फक्त कांदा साठवण्याची सोय नाही म्हणून असे होते की यामागे आणखीही काही कारणे दडली आहेत? कांद्याच्या किमती वाढू लागताच सरकारची डोकेदुखीही वाढू लागते. कारण कांद्याच्या किमतीवरून सरकार कोसळण्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे घरात सामान्य लोकांना रोज रडवणारा कांदा या दिवसात राजकारण्यांच्या डोळ्यातूनही टिपे गळतो.
कांद्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी त्यात सरकारला यश मिळत नाही.
यावर्षी ज्या राज्यांत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते तिथे जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने अक्षरश: हैदोस घातला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर आणि पर्यायाने कांद्याच्या दरावरही दिसून येत आहे.
दरवर्षी कांद्याच्या किंमती वाढू नयेत म्हणून सरकार शक्य ती सर्व काळजी घेते. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणे, कांद्याच्या साठवणुकीवर बंदी घालणे, सरकारी संस्थाकडून कमी दरात कांद्याची विक्री सुरु करणे असे अनेक उपाय योजले जातात. इतके उपाय करूनही कांद्याच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जातात.
कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यात सरकार दरवर्षी अपयशी ठरत आहे. यावर्षीचे चित्रही फारसे वेगळे नाही.
कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील खरीप हंगामातील कांदे याच काळात बाजारात येतात. पण, यावर्षी या सर्व राज्यात अतिपावसामुळे सुमारे ५०% पिकाची नासाडी झाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिपावसामुळे कांद्याच्या जुन्या स्टॉकवरही परिणाम झाला आहे. म्हणूनच कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जवळील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. इथे गेल्या पंधरा दिवसात कांद्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. ऑगस्टच्या शेवटीपर्यंत कांद्याचा दर १२०० रुपये प्रती क्विंटल होता. तोच दर वाढून ३२०० रुपये प्रती क्विंटल झाला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसत आहे.
नोव्हेंबरच्या दरम्यान जेंव्हा कांद्याचे नवे पिक बाजारत येईल तेंव्हाच हे दर कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र या किमती वाढतच राहणार, असे दिसते.
१९८० साली कांद्याच्या किमतीत भरपूर वाढ झाली होती. कांदा विकत घेणे सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली होती. त्यानंतर १९९८ मध्ये पुन्हा एकदा कांद्याचा दर गगनाला भिडला होता. दिल्लीत तर यावरून राजकीय वातावरणही ढवळून निघाले होते.
२०१०मध्ये पुन्हा एकदा कांद्याने अशीच उचल खाल्ली होती. २०१३ मध्ये तर काहीकाही ठिकाणी कांदा १५० रु. किलोवर पोहोचला होता. २०१५ मध्ये पण हीच स्थिती होती. यानंतरही दरवर्षी कांद्याच्या किंमती वाढल्याचे दिसते.
अतिपावासामुळे किंवा पाऊस न झाल्यामुळे कांद्याच्या पिकावर परिणाम होतो. पण, कांद्याच्या किमती वाढण्यामागे फक्त हेच एकमेव कारण नाही. दरवर्षी सणासुदीचे दिवस सुरु होण्यापूर्वी कांद्याचा बेकायदेशीर साठा करण्याकडे कल वाढतो. साठेबाज लोक दरवर्षी याच दिवसात कांद्याची साठवणूक करून ठेवतात. म्हणूनही कांद्याच्या किंमतीत वाढ होते.
महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटकसह, मध्यप्रदेश, आंध्र, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि बंगालमध्येही कांद्याचे पिक घेतले जाते. भारतात कांद्याची पेरणी वर्षातून तीन वेळा केली जाते. पहिल्यांदा खरीप हंगामात, मग खरीपानंतर आणि तिसऱ्यांदा रब्बी हंगामात. खरीप हंगामातली पेरणी जुलै-ऑगस्टच्या दरम्यान केली जाते. हे पिक ऑक्टोंबर-नोव्हेंबरपर्यंत तयार होते.
दुसऱ्यांदा ऑक्टोंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी होते. हे पिक जानेवारी ते मार्चच्या दरम्यान काढणीला येते. तिसऱ्यांदा म्हणजे रब्बी हंगामात डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पेरणी होते जे मार्च पासून मे पर्यंत काढले जाते. म्हणजे वर्षभर कांद्याचे उत्पादन सुरू असते. परंतु ६५% पिक हे रब्बी हंगामातच घेतले जाते.
मेमध्ये बाजारात कांदा आला की त्यानंतर नवा कांदा थेट ऑक्टोंबरमध्येच येतो. या दरम्यान ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये कांद्याची आवक थोडी कमीच होते. म्हणूनही याकाळात कांद्याच्या किमती वाढतात. नवे पिक यायला अजून नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी असतो.
भारतात कांद्याच्या साठवणुकीसाठी पुरेशा आणि योग्य सुविधांची कमतरता आहे. भारतात कांद्याची साठवणूक करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत फारशी प्रभावी नाही.
भारतात कांदा साठवण्याची क्षमता फक्त २% आहे. उरलेला ९८% कांदा हा असाच उघड्यावर साठवला जातो. म्हणून पाऊस वगैरे पडल्यास या कांद्याची नासाडी होते. कांद्याच्या किमती वाढण्यामागे कांदा साठवणूक करण्यासाठी पुरेशी सोय उपलब्ध नसणे हेही एक कारण आहे.
भारतात जेवढी कांद्याची मागणी आहे, तेवढे उत्पादन होत नाही. भारतात दरवर्षी २.३ टन कांद्याचे उत्पादन केले जाते. यातही एकट्या महाराष्ट्रात ३६% कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर नंबर लागतो मध्यप्रदेशचा. इथे १६% उत्पादन घेतले जाते. कर्नाटकमध्ये १३%, तर बिहार आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ५ ते ६% उत्पादन घेतले जाते.
भारतात कांदा खाणाऱ्या लोकांचे प्रमाणही खूप आहे. भारत सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार एक हजार व्यक्तीमागे ९०८ लोक कांदा खातात. मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही पद्धतीच्या जेवणात कांदा हमखास वापरला जातो. त्यामुळे कांद्याचा खपही जास्त आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने भारतात दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान कांद्याच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.