आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नॉर्वे हा उत्तर युरोपातील एक समृद्ध देश आहे. आर्थिकदृष्ट्या तसेच राहणीमानाच्या दृष्टीने नॉर्वे जगातील इतर देशांच्या तुलनेत एक प्रगत राष्ट्र आहे.
नॉर्वे देशाचं हवामान हे अगदी प्रतिकूल असं असून उत्तर गोलार्धात असल्याने त्याठिकाणी वर्षातून काही दिवस फक्त रात्र असते, तर काही दिवस फक्त ‘दिवस’ असतो. तिथे सदैव बर्फाचे आच्छादन असते.
नॉर्वे तेथील सुप्रसिद्ध अश्या नॉदर्न लाईट या चमत्कारिक नैसर्गिक प्रकाश किरणांच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो प्रसिद्ध आहे समृद्ध जीवन जगणाऱ्या नॉर्डीक लोकांसाठी, पण या नॉर्वेच्या लोकांचं आयुष्य इतकं समृद्ध का आहे ?
नॉर्वे ही काही बलाढ्य महासत्ता नाही पण तरी तिथे सर्वात सुखी आणि समृद्ध जीवन जगणारे लोक का आहेत? या मागे पाच कारणं आहेत, ती पाच कारणं कोणती ते आपण जाणून घेऊया .
१) आर्थिक संपन्नता
नॉर्वे या देशातील राहणीमान उच्च दर्जाचे असण्याचे श्रेय जाते तेथील सर्वांगिणदृष्ट्या सशक्त असलेल्या अर्थव्यवस्था रचनेला. तिथे अरबी देशांनंतर जगात तृतीय क्रमांकाचे सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायूचे साठे आहेत, यामुळे तेथील अर्थव्यवस्था स्थिर असते.
नॉर्वेत याबरोबरच पेट्रोलियमचे मोठ्या प्रमाणावर साठे आहे. १९७० च्या दशकात नॉर्वेने पेट्रोलियम उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धनसंचय केला आहे. याबरोबरच नॉर्वे मध्ये मोठ्या प्रमाणावर सी फूड्चे साठे आहेत, हायड्रो पॉवर, मिनरल्स आणि ताज्या पाण्याच्या भांडवलावर चालणारे मोठे उद्योग आहेत.
२) नसलेली ‘बेरोजगारी’
एकीकडे भारतासारख्या देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असतांना, नॉर्वेत मात्र नाममात्र बेरोजगारी असून जवळ जवळ प्रत्येक नॉर्वेजियन व्यक्तीच्या हाताला काम आहे. नॉर्वेत लोकांना पुरेसे व्यवसाय व उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध आहेत.
इतर देशांच्या तुलनेत नॉर्वे हा मोठ्याप्रमाणावर उत्पादन करणारा देश असून तिथे लोकांसाठी त्यांच्या कलागुणांनुसार मोठया प्रमाणात काम उपलब्ध आहे. तिथे सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांतंर्गत मोठ्या प्रमाणावर कामाच्या संधी उपलब्ध आहेत.
३) श्रीमंत व आनंदी नॉर्वेजियन लोक :-
१९७० पासून आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि संपन्न असलेल्या नॉर्वेची जनता ही श्रीमंत आहे. तिथे जनतेला आपल्या गरजा व्यवस्थितपणे भागवता येतात सोबतच त्यांना आपली हौस पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक संपन्नता आहे.
नॉर्वेतील लोक जगात सर्वात जास्त भटकंती करणारे लोक असून, त्यांचे बहुतांश तरुण हे जागतिक पर्यटन स्थळांना भेट देत असतात.
नॉर्वेची समाजरचना ही देखील पुढारलेली असल्याने तिथे पर्यावरण संरक्षण व पर्यटन क्षेत्रांच्या संगोपनाची पुरेपूर काळजी घेतली जाते व त्यावर सरकारद्वारे मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो.
४) मोफत शिक्षण व आरोग्य
श्रीमंत नॉर्वेजियन लोक हे आपल्या सरकारला खूप मोठ्या प्रमाणावर ‘कर’ देत असतात. त्या मोबदल्यात सरकारकडून लोकांना चांगल्या सुविधा मिळतात.
नॉर्वेत शिक्षण व आरोग्य या दोन व्यवस्था अत्यंत दर्जेदार असून, या बहुतांश तेथील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याबरोबरच येथे अत्यंत दर्जेदार रस्ते व सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध असून खाजगी वाहतूक नाममात्र प्रमाणावर अस्तित्वात आहे. यामुळे तेथील जनता समाधानी आहे.
५) कमी लोकसंख्या
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ५ टक्के इतकी आहे. ११ कोटी ही जर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तर नॉर्वेची लोकसंख्या ही केवळ ५२ लाख आहे.
या अत्यल्प लोकसंख्येमुळे सुविधा पुरवण्यासाठी सरकारवर ताण पडत नाही. लोकांना राहायला व आपले काम करायला मुबलक वेळ मिळतो.
नॉर्वेजियन लोक हे आपला थोडा वेळ कामात आणि बाकी उरलेला वेळ आपल्या परिवाराच्या, मित्रांच्या सानिध्यात घालवतात यामुळे जगातील आनंदी लोकांच्या यादीत नॉर्वेजियन लोकांचे स्थान हे खूप वरचे आहे.
नॉर्वेत शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्यातील विषमता अस्तित्वात नाही. सर्वत्र समान सुविधा असल्याने फक्त लोकवस्तीच्या आधारावर वर्गीकरण करण्यात येते. मोठ्या प्रमाणावर कर अदा करून देखील आज नॉर्वेतील लोकांच्या समस्या फार थोड्या आहेत.
येथे लोकांची वस्तू खरेदीची क्षमता जास्त असल्याने येथे इतर देशांच्या तुलनेत महागाई प्रचंड आहे पण तरी इथल्या लोकांना त्याचा फटका बसत नाही.
आज नॉर्वे सर्वार्थाने एक प्रगत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि निम्न समस्या असणारा एक आनंदी लोकांचा आदर्श विकसित देश म्हणून उभा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.