मारुतीच्या 800ने सामान्य भारतीयाचं चारचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


१९८०-९०च्या दशकातील काही गोष्टी भारतीय लोक कधीच विसरू शकणार नाहीत. जसे की, पार्ले बिस्कीट, दूरदर्शनवरील पौराणिक मालिका, मर्फी रेडीओ, आणि मारुती 800. मारुती 800 ही भारतीय बनावटीची पहिली गाडी होती. या कंपनीचा पाया राजीव गांधी यांनी रचला होता.

१४ डिसेंबर १९८३चा तो दिवस. पांढऱ्या रंगाची आणि ‘६४७९’ नंबर प्लेट असणारी मारुती 800 फुलांनी सजवलेली होती. हरपाल सिंग यांना या मारुतीच्या चाव्या खुद्द इंदिरा गांधींजींच्या हस्ते देण्यात आल्या. हरपाल सिंग आणि त्यांची पत्नी गुलशनबीर कौर यांनी ही गाडी ताब्यात घेतली. त्यावेळी मारुती गाडी घेणारे हरपाल सिंग आणि गुलशनबीर कौर हे सेलिब्रिटीच झाले होते.

मारुती 800 भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर भारतीयांच्या जगण्याची दिशाच बदलून गेली. ‘मेरा सपना, मेरी मारुती’ ही पंचलाईन घेऊन बाजारात आलेल्या या छोट्या कारने खरोखर भारतीयांची स्वप्नेच बदलून टाकली.

प्रगती पथावर चालण्याची इच्छा बाळगणाऱ्या मध्यमवर्गीय भारतीयांच्या स्वप्नांना पंख फुटले. भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्याआधी ही गाडी बाजारपेठेत आली होती. या गाडीच्या उत्पादनामुळे “मेक इन इंडिया”सारख्या प्रकल्पाने जोर धरला होता.

भारताची मारुती उद्योग लिमिटेड आणि जपानच्या सुझुकीने संयुक्त प्रकल्पाद्वारे १९८२पासून एकत्रितरित्या गाड्यांचे उत्पादन करण्याचा करार केला होता.

ही देशातील पहिली छोटी कार होती. थोड्याच कालावधीत तिने बाजारपेठेवर कब्जा मिळवला. ही गाडी म्हणजे अनेकांसाठी इच्छा, अभिमान, आणि काहींसाठी तर जादू ठरली. त्यावेळी अँबेसिडर कार आणि फियाट पद्मिनी या दोन गाड्या भारतात होत्या पण, त्यांची किंमत सर्वसामान्य भारतीयांना परवडणारी नव्हती. म्हणूनच ५०,००० रुपयात मिळणारी मारुती ८०० ग्राहकांच्या बदलत्या स्वप्नांना पूर्ण करण्यास हातभार लावणारी एक जादू ठरली.

चांगल्या प्रतिष्ठित राहणीमानाची स्वप्ने बघायला लावणाऱ्या मारुती ८०० ही अनेक भारतीयांसाठी अभिमानाचा विषय बनली होती. काही वर्षांपूर्वी आलेल्या टाटाच्या नॅनोने आपल्या किमतीबाबत ज्या चुका केल्या त्या मारुतीने अजिबात केल्या नव्हत्या.

मारुती कंपनी आणि गांधी घराण्याचा जवळचा संबध होता. १९७१ साली संजय गांधी यांच्या प्रेरणेने मारुती लिमिटेड या कंपनीची सुरुवात करण्यात आली. पण, गाड्यांच्या निर्मितीत या कंपनीला फारसे यश आले नाही. १९७७ साली जनता सरकारच्या काळात तर कंपनी दिवाळखोरीत निघाली.

संजय गांधी यांच्या निधनानंतर एक वर्षानी कंपनीने सुझुकीसोबत करार केला आणि कंपनीचे काम पुन्हा पूर्ववत सुरु जाले. याचाच रिझल्ट म्हणजे बाजारात आलेली पहिली मारुती 800. मध्यमवर्गीय भारतीयांच्या गरजा आणि स्वप्ने यांच्या दृष्टीने ही कार अगदी सही ठरली.

मारुती हे कंपनीचे नाव देखील कंपनीसाठी खूपच फायद्याचे ठरले. कंपनीचे नाव भारतीय होते आणि त्यात फ्लुअर गिअरसारखे आधुनिक तंत्रज्ञान देखील होते. शिवाय, लाल कलरच्या मारुती 800 सोबत केलेली जाहिरात तर अधिकच प्रभावी ठरली.

“मेरा सपना मेरी मारुती” या पंचलाईनने तर मध्यमवर्गाला प्रचंड आकर्षित केले.

अधिक मजबूत, साधा आणि थेट संदेश ही मारुतीच्या जाहिरातीची वैशिष्ट्ये मारुतीच्या यशात अधिक परिणामकारक ठरली. एका जाहिरातीत छोटा सरदार मुलगा छोट्या मारुती सोबत खेळताना दाखवला होते. ही जाहिरात फारच लोकप्रिय ठरली होती. या जाहिरातीमुळे मारुती थेट लोकांच्या मनात घुसली.

अँबेसिडर आणि प्रीमियर पद्मिनीच्या तुलनेत महिलांसाठी मारुती कार चालवायला जास्ती सोपी होती. स्वतःची चारचाकी घेण्याचे त्यांचेही स्वप्न मारुतीने पूर्ण केले.

मारुतीच्या अनेक जाहिरातीत जोडपी आणि त्यांचे आई-वडील दाखवण्यात येत. छोट्या विभक्त कुटुंबांसाठी ही कार खूपच फायद्याची ठरली. दोन चाकी चालवणाऱ्यांना ही गाडी बाजारात आल्याने चारचाकी घेण्याचे स्वप्न पडू लागले.

सुरुवातीला या गाड्यांचा खप इतका होता की, गाडी विकत घेण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागत असे. घरात मारुती कार असणे हे मध्यमवर्गीयांसाठी त्याकाळी स्टेटस सिम्बॉल बनले होते. या गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत होती. देशात २.८७ दशलक्ष गाड्यांचे उत्पादन करण्यात आले होते. यातील २.६६ दशलक्ष गाड्या भारतातच खपल्या. उरलेल्या गाड्या नेपाळ, बांगलादेश आणि पश्चिम युरोपमधील हंगेरीसारख्या देशांत निर्यात केल्या गेल्या.

उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या धोरणानंतर इतर अनेक गाड्या बाजारपेठेत आल्या. बाजारात चारचाकी गाड्यांची आवक वाढली. नवनव्या गाड्यांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा, प्रगत तंत्रज्ञान यामुळे मारुतीचे स्थान थोडे खाली घसरले.

२००४ पर्यंत मारुती भारतातील बेस्ट सेलिंग कार होती. २०१० पर्यंत मात्र कंपनीला गाड्यांचे उत्पादन करणे अधिक जिकीरीचे काम होऊन बसले. यावर्षी मारुतीने दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई आणि मुंबईसह इतर १३ शहरातील कार विक्री बंद केली. त्यानंतर हळूहळू या कंपनीने नव्या कारचे उत्पादन कमी केले.

मारुती 800मध्ये ७९६ सीसी, ३ सिलिंडर आणि F8D पेट्रोल इंजिन होते. पुढे अल्टो 800 बाजारात आली ज्यात हेच इंजिन वापरण्यात आले होते. या इंजिनचा मेंटेनन्स खर्च खूपच कमी होता. मग अल्टो 800 चा लुक आणि त्या गाडीसोबत मिळणारे फीचर्स या तुलनेत मारुती 800 मागे पडत गेली.

१८ जानेवारी २०१३मध्ये मारुती सुझुकीने आपल्या मारुती 800 चे उत्पादन पूर्णतः बंद केले. २०१४ साली मारुती 800 एका शिलॉंग व्यापाऱ्याकडे हस्तांतरित करण्यात आली.

भारतीयांना एकेकाळच्या या आपल्या आवडत्या गाडीला निरोप देणे भाग पडले. या कारने लाखो भारतीयांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. ३० वर्षाहून अधिक काळ ही गाडी बाजारात टिकून राहिली. अँबेसिडर आणि फियाट पद्मिनीसारख्या बड्या गाड्यांना या कारने आव्हान दिले. किंमत आणि मायलेज या दोन्ही बाबतीत मारुती या दोन्ही मोठ्या गाड्यांपेक्षा सरस होती.

गाडीचे उत्पादन बंद झाले असले तरी ही गाडी आजही भारतीय रस्त्यावरून धावत आहे. विशेष म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी निवडणूक आयोगाकडे सदर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे मारुती 800 असल्याचा उल्लेख केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान देखील आजही १९९६चे मारुती 800चे मॉडेल वापरतात.

सध्या मारुती सुझुकी पुन्हा नव्या रुपात दोन नव्या गाड्या लॉंच करणार आहे. यात मारुती 800 ही असेल जिच्यात आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदल केलेले असतील. मारुती जर पुन्हा कमी दरात चांगल्या इंजिनची गाडी बाजारात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीयांसाठी नक्कीच ही एक आनंदाची बातमी ठरेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!