जाणून घ्या गणितात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही…

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नोबेल पुरस्कार हा जगातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. जागतिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी  हा पुरस्कार दिला जातो. दरवर्षी सहा क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना (ज्यांनी त्या-त्या क्षेत्रात आपले अमुल्य योगदान दिले आहे), त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

परंतु गणितासाठी एकही नोबेल पुरस्कार कधी दिल्याचे पाहण्यात आलेले नाही. गणितात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला कधीच नोबेलने सन्मानित करण्यात आले नाही.

दरवर्षी साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र आणि औषधी आणि शरीरशास्त्र अशा सहा क्षेत्रांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. मग, गणिताचाच का नाही? कधी विचार केलाय का यावर?

कारण इतक्या विषयात नोबेल दिले जात असेल तर फक्त गणितातच का नाही हा प्रश्न पडणे साहजिक आहे. यामागे नेमके काय कारण असावे?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना खूप गमतीशीर उत्तरे मिळाली आहेत. स्वीडिश व्यावसायिक, रसायनशास्त्रज्ञ, इंजिनियर, आणि संशोधक असणाऱ्या आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. परंतु त्याने हा पुरस्कार कोणत्या कोणत्या क्षेत्रात दिला जावा याची काही विशिष्ट वर्गवारी निश्चित केली नव्हती. त्यामुळे जाणून बुजून नाही तर चुकून त्याच्याकडून गणित क्षेत्रात नोबेल घोषित करण्याचे राहून गेले, असेही उत्तर काही जणांनी दिले.

अनेक मजेदार, गमतीशीर कयास याबाबत लावले जातात. या सगळ्या माहितीला तथ्याचा आधार मात्र नाही. पण, याबाबत चर्चा मात्र केली जाते. जाणून घेऊया गणितासाठी नोबेल न देण्यामागे कोणकोणते तर्क आजवर लढवले गेले आहेत.

गणिताला नोबेल पारितोषिक न देण्यामागे एक कारण जे सांगितले जाते ते आल्फ्रेड नोबेलच्या खाजगी आयुष्याशी संबधित आहे.

आल्फ्रेडला गणितज्ञ आवडत नव्हते. कारण एका गणितज्ञाचे त्यांच्या मैत्रिणीसोबत अफेअर होते असे म्हटले जाते. 

आल्फ्रेड नोबेल हे अविवाहित होते. स्वीडिश गणितज्ञ गोस्टा मितग-लेफ्लर याचे आणि आल्फ्रेडची मैत्रीण सोफी हेस हिचे संबंध होते, असा त्यांना संशय होता. जर गणितात नोबेल पुरस्कार सुरु केला तर गोस्टाला निश्चितच हा पुरस्कार मिळेल असे त्यांना वाटत होते.

गोस्टाला हा पुरस्कार मिळू नये म्हणून आल्फ्रेडने या पुरस्काराच्या यादीत गणितज्ञांना स्थानच दिले नाही. आल्फ्रेड आणि सोफी हेस यांचे प्रेमसंबंध बरीच वर्षे टिकून राहिले. परंतु इतिहासकरांना या दाव्यात काही तथ्य आहे असे वाटत नाही. कुठल्या तरी गणितज्ञाचे सोफीशी अफेअर होते म्हणून आल्फ्रेडने गणितासाठी नोबेल पारितोषिक घोषित केले नाही, याबद्दल कुठलेही पुरावे आढळत नाही.

गोस्टा आणि आल्फ्रेड यांच्यातील वैयक्तिक संबंध चांगले नव्हते. त्यांचे आपसात पटत नसे. या कारणानेही आल्फ्रेड यांनी नोबेलसाठी गणित विषयाचा विचार केला नसेल असे म्हटले जाते.

एखाद्या क्षेत्रातील नवा शोध मांडणाऱ्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार दिला जावा अशी नोबेल यांची इच्छा होती. परंतु या शोधाचा मानवी जीवनावर काही सकारात्मक परिणाम होणेही अपेक्षित होते. 

मानवी जीवन सुकर करणारे जे शोध असतील त्यासाठीच हा पुरस्कार दिला जावा अशी याची मूळ कल्पना होती.  

आल्फ्रेड नोबेल यांना वाटत होते की गणित हा विषय खूपच सैद्धांतिक आहे. याचा फारसा व्यावहारिक उपयोग होत नाही. त्यामुळेही त्यांनी गणिताकडे दुर्लक्ष केले असावे असेही म्हंटले जाते.

आल्फ्रेड यांनी स्वतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात संशोधन केले होते. साहित्य आणि औषधशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांनी डायनामाइटचा शोध लावून मानव जातीला एका हिंस्र आयुधाची भेट दिली म्हणून त्यांच्यावर ‘मरणाचा व्यापारी’ अशी टीका चारी बाजूंनी होऊ लागली होती.

आपली ही नकारात्मक प्रतिमा सुधारण्यासाठी जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या शांतीदूतांनाही हा पुरस्कार मिळावा म्हणून यात शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचा समावेश करण्यात आला. गणितात मात्र त्यांना विशेष रस नव्हता.

आणखी एक विशेष बाब म्हणजे, त्याकाळी नोबेलच्याच तोलामोलाचा एक पुरस्कार फक्त गणित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जात होता. मग गणितासाठी आधीच एक पुरस्कार असताना दुसरा कशाला? असाही विचार यामागे असावा. 

किंग ऑस्कर द्वितीय हे स्वतः एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. त्यांनी गणिताच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांसाठी ‘मॅथ अवॉर्ड’ सुरु केला होता. 

गणितासाठी आधीच हा पुरस्कार असताना आणखी वेगळ्या पुरस्काराची आवश्यकता नाही, असा विचार करून नोबेलच्या यादीतून गणित विषय वगळण्यात आला असावा असाही कयास बांधला जातो.

आल्फ्रेडने नोबेल पुरस्काराच्या रकमेसाठी आपल्या मृत्युपत्रात खास तरतूद करून ठेवली आहे. १८९७ साली त्याचा मृत्यू झाला तेंव्हा हे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले. चार वर्षानंतर हे मृत्युपत्र कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले.

या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीतील एक हिस्सा या पारितोषिकासाठी राखून ठेवण्यात आला होता. हा निधी सुरक्षित ठेवीमध्ये गुंतवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७०% रकमेचे पाच समान भाग करून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला ही रक्कम पुरस्काराच्या स्वरुपात दिली जाईल अशी तरुतूद नोबेलनेच आपल्या मृत्यूपत्रात करून ठेवली होती.

पूर्वी हे पारितोषिक पाच क्षेत्रांसाठी दिले जायचे. १९६९ पासून स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने यात अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहाव्या नोबेल पारितोषिकाचा समावेश केला. १९०१ साली पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता.

प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिक जाहीर करण्यासाठी आल्फ्रेड नोबेलने स्वीडन मधील त्या-त्या क्षेत्रातील संबंधित वेगवेगळ्या संस्थांकडे ही जबाबदारी सोपवली आहे. आपल्या मृत्युपत्रात त्याने कुठले पारितोषिक कुठल्या संस्थेने जाहीर करावेत याचे स्पष्ट निर्देशही दिले आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!