आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनाचा उगम कुठून आणि कसा झाला आता यावर बऱ्याच चर्चा सुरू असतात. अमेरिकेने चीनवर कोरोनाच्या उगमाचे आणि प्रसाराचे भांडे फोडत एका रिपोर्टच्या माध्यमातून चीनवर कोरोना संबंधित सत्य लपवल्याचा आरोप केला.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी चीनने गेल्या २० वर्षांत पाच गंभीर महामारी सदृश्य आजार दिल्याचा दावा केला आहे. त्यात ते म्हणतात की चीनमधून जगासाठी येणारी आपत्ती आता वेळीच थांबवणे गरजेचे आहे.
त्यांनी चीनमधून पसरलेल्या पाच रोगांना नमूद केले त्यात सार्स, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू आणि कोविड-19 या रोगांचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यांचा हा दावा तांत्रिकदृष्ट्या काही बाबतीत चुकीचा असला तरी या दाव्यात थोडेफार तथ्य देखील आहे. स्वाईन फ्लूचा उगम चीनमध्ये झालेला नसला तरी इतर आजारांप्रमाणे त्याचा चीनच्या मांस विक्री बाजाराशी संबंध असल्याचे या अगोदर देखील उघड झाले आहे.
कोरोना व्हायरसचा उगम देखील अशाच एका मांसविक्री बाजारातून झाल्याचे बोलले जात आहे. परंतु हा व्हायरस लॅबमध्ये तयार करण्यात आला, या दाव्यात काही तथ्य नसल्याचे मत देखील शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.
चीनमधून आतापर्यंत कोणकोणते आजार जगभरात पसरले आणि त्याचा एकूण परिणाम काय झाला ते आपण जाणून घेऊया..
सार्स
२००२ च्या नोव्हेंबरमध्ये चीनमधून सार्सचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. सर्वप्रथम दक्षिण चीनच्या गुओंगडाँग भागात हा व्हायरस आढळला होता. नोव्हेंबर २००२ च्या मे आणि २००३ च्या जुलै महिन्यापर्यंत याचा मोठा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यात देखील शेकडो लोकांचा जीव गेला होता.
तब्बल ३७ देशांत या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता आणि तब्बल ९.६ टक्के इतका या व्हायरसचा मृत्युदर होता. आजपर्यंत या आजारावर कुठलाच औषधोपचार सापडलेला नाही.
सार्सच्या वेळी देखील चीनच्या मांस विक्री बाजाराशी संबंधित अनेक गोष्टी व्हायरल झाल्या होत्या. अनेक तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस आधी वन्यजीवांमध्ये तयार झाला असावा आणि पुढे त्यांच्या मांसभक्षणातून हा आजार मानवी शरीरात आला. चीनचा मांस विक्रीचा बाजार हा या आजाराचे केंद्र बनला होता, याठिकाणी साध्या जनावरांबरोबरच विषारी प्राण्यांचे मांस देखील खाल्ले जाते, यामुळेच असे रोग याठिकाणी वेगाने पसरतात.
बर्ड फ्लू
एवीयन इन्फ्लुएनजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा आजार कोंबडीमध्ये आढळला आणि त्यातूनच हा आजार पसरला होता. या रोगाने ग्रस्त असलेल्या कोंबडीला खाल्ल्यामुळे तसेच श्वसनावाटे हा मनुष्याच्या शरीरात दाखल झाला होता. या व्हायरसला H5N1 म्हणून ओळखले जाते. याचा उगम देखील चीनमध्येच १९९६ साली झाला होता. साल २००० नंतर हा रोग जगभर पसरला, ह्यानंतर अशा प्रकारचे अनेक रोग चीनमुळे जगभरात पसरले.
स्वाईन फ्लू
स्वाईन फ्लू अर्थात H1N1 फ्लू म्हणून ओळखला जाणारा हा आजार आधी डुकरांमध्ये होता पण डासांच्या माध्यमातून तो माणसामध्ये आला आणि पसरतच गेला. हा आजार अत्यंत धोकादायक होता यामुळे अनेक रुग्ण दगावल्याचा घटना देखील घडल्या होत्या. भारतात देखील हा विषाणू चांगलाच पसरला होता. परंतु वेळेत यावर औषध शोधून काढण्यात यश आल्याने आजाराचा फैलाव रोखता आला.
अमेरिकेच्या मते, हा व्हायरस चीनमधून आला नसून याचा उगम वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या देशात झाला होता. फिलिपाईन्समध्ये याचा मोठा प्रादुर्भाव निर्माण झाला होता.
कोरोना व्हायरस
चीनच्या वुहान शहरात तयार झालेला कोरोना व्हायरस हा देखील त्या मांस विक्री बाजारातूनच आला असून अनेक लोक तो लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा करतात. कोरोना हा या शतकातील सर्वांत गंभीर आजार असून आज त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि पाश्चात्त्य देशांची झालेली अवस्था आपल्यासमोर आहे.
चीनचा मांस विक्री बाजार या सर्व रोगांच्या प्रादुर्भावाला जबाबदार असून चिनी लोकांच्या अत्यंत विचित्र अशा अन्न पदार्थांच्या आवडीमुळे निसर्गचक्र विस्कळीत होऊन हे निरनिराळ्या प्रकारचे विषाणू आपल्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. प्राण्यांच्या माध्यमातून एड्स, स्वाईन फ्लू यांच्यासारखे आजार पसरत असतात, सार्स आणि बर्ड फ्लू ही त्याच प्रकारचे आहेत, यामुळे या मांस विक्री बाजारात प्राण्यांवर केले जाणारे अत्या*चार रोखणे गरजेचे झाले आहे.
केवळ चीनच्याच नाहीतर जगभरातील वन्य प्राण्यांचे मांसभक्षण करणाऱ्या बाजारांवर बंदी घालणे अत्यावश्यक आहे. पाळीव पशु वगळता इतर प्राण्यांच्या सेवनामुळेच आज ही आपत्ती आपल्यासमोर निर्माण झाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.