बिजू पटनायकांच्या बहादुरीचे किस्से इंडोनेशियात आजही ऐकवले जातात

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातील काही नेत्यांनी जागतिक स्तरावर कीर्ती कमावली, या भारतीय नेत्यांना जेवढं प्रेम भारतात मिळालं तितकंच प्रेम परदेशात मिळालं. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री या नेत्यांना भारताप्रमाणे परदेशात देखील प्रेम मिळालं. या नेत्यांच्या यादीत एक अजून एक नाव आहे ते आहे ‘बिजयानंद उर्फ बिजू पटनायक’ यांचं. ओडिसाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या बिजू पटनायक यांनी इंडोनेशियाला नेहरूंच्या सांगण्यावरून मदत केली होती. त्या मदतीसाठी इंडोनेशियन सरकारने त्यांचा मोठा सन्मान केला होता.

ओडिसाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या बिजू पटनायक यांना राजकारणी म्हणून तर ओळखलं जातंच पण त्याहीपेक्षा जास्ती ओळखलं जातं ते त्यांनी एक वैमानिक म्हणून पार पाडलेल्या अनेक साहसी मिशन्ससाठी. दुसरं महायुद्ध असो की १९४८ मध्ये काश्मीरमधून पाकिस्तानची केलेली हकालपट्टी असो बिजू पटनायक यांच्या साहसकथांची कमी नाही. 

ओडिसाच्या गंजम जिल्ह्यात ५ मार्च १९१६ साली बिजू पटनायक यांचा जन्म झाला. बिजू पटनायक यांचे वडीलदेखील एक स्वातंत्र्य सेनानी होते. बिजू यांनी देखील त्यांच्या पावलावर पाउल टाकले आणि ब्रिटीश विरोधी आंदोलनात उडी घेतली.त्यांचं प्राथमिक शिक्षण कटकच्या मिशन स्कूलमध्ये झालं आणि नंतर त्यांनी १९२७ मध्ये रेवनशा महाविद्यालयात प्रवेश घेतला.

त्यांना आधीपासूनच विमान वाहतूक शास्त्रात रस होता. त्यांनी तसं प्रशिक्षण देखील घेतलं होतं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भारतात खाजगी विमान वाहतूक सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांना रॉयल एयर फोर्समध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने करत नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली होती.

पुढे १९४८ साली पाकिस्तानी घुसखोर काश्मीर खोऱ्यात श्रीनगरपर्यंत चालून आले आणि नेहरूंनी तत्काळ लष्कराची एक तुकडी त्यांना हद्दपार करण्यासाठी पाठवली होती. या तुकडीला ज्या विमानातून घेऊन जात होते त्या विमानाचे पायलट बिजू पटनायक होते. बिजू यांनी वेळीच विमान श्रीनगरला उतरवलं म्हणून काश्मीरमधील आक्रमण सैन्याला थोपवता आलं.

 बिजू पटनायक यांनी स्थापन केलेल्या कलिंगा एयरलाईन्सला भारत सरकारने १९५३ साली विकत घेतले आणि तिचे नामकरण ‘इंडियन एयरलाईन्स’ असे करण्यात आले.

बिजू पटनायक हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निकटवर्तीय होते. नेहरूंच्या सांगण्यावरून पार पाडलेल्या इंडोनेशियन मिशनसाठी इंडोनेशियन सरकारने त्यांचा मोठा सत्कार केला होता. 

झालं असं होतं की नेहरू हे सुरुवातीपासूनच वसाहतवादाच्या विरोधात होते. त्यांना इंडोनेशियामध्ये डच लोकांच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ बिजू यांना बोलावणे धाडले होते आणि त्यांना इंडोनेशियातील स्वतंत्र्यता आंदोलनाचे प्रमुख असलेल्या नेत्यांचा मुक्ततेसाठी इंडोनेशियाला रवाना केले. नेहरूंच्या सांगण्यावर ते विमान घेऊन इंडोनेशियाच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी ज्ञानवती देखील होती. त्यांचा मुलगा नवीन यावेळी फक्त एक महिन्याचा होता.

ते आधी सिंगापूरला गेले आणि त्यांनी तिथून इंडोनेशियाच्या दिशेने उड्डाण केले. इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत त्यांचे विमान पोहचल्यावर त्यांनी आधी धावपट्टीवर शत्रूचा ताबा नाही ना याची पाहाणी करायला सुरूवात केली इतक्यात त्यांच्यावर एका डच वायू सेनेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना चकवा देऊन बिजू पटनायक विमान इंडोनेशियाच्या आनन फाननच्या धावपट्टीवर घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांनी इंडोनेशियन बंडखोर डॉ.सुकार्नो आणि सुलतान शाहरयार यांना एयरलिफ्ट केले आणि त्यांना घेऊन ते दिल्लीला गेले.

दिल्लीला सुकार्नो यांनी नेहरूंची भेट घेतली. बिजू पटनायकांच्या कामगिरीवर खुश होऊन त्यांना सुकार्नोनी इंडोनेशियाची नागरिकता प्रदान केली. १९९६ साली इंडोनेशियाच्या ५०व्या स्वतंत्र्यता दिनी त्यांना इंडोनेशियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बिजू पटनायक यांनी १९६० साली ओडिसाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुढे १९६२ युद्धावेळी त्यांनी अनेक गोपनीय कार्यक्रमात नेहरूंना मदत केली होती.

बिजू पटनायक यांना आणीबाणी वेळी इंदिरा गांधींना विरोध केला म्हणून तुरुंगवास देखील झाला होता. पुढे १९७७ साली निवडून आलेल्या मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाच्या शासनकाळात त्यांनी मंत्रीपद सांभाळलं आणि जनता दलाकडूनच त्यांना ओडिसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं.

असं म्हणतात, बिजू पटनायक हे दूरदृष्टी असणारे राजकारणी होते. त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलामांना त्या काळात क्षेपणास्त्र विकसित करण्याचा सल्ला दिला होता, ज्यावेळी कोणी अब्दुल कलामांना ओळखत देखील नव्हते. कलामांना चीनला भेदू शकेल अशा क्षेपणास्त्राच्या निर्मिती करण्याची सूचना त्यांनी दिली होती.

बिजू पटनायक यांचा पत्नी ज्ञानवती या त्यांच्या प्रमाणेच धाडसी होत्या, त्या टेनिस खेळाडू होत्या, त्यांची आणि बिजू यांची ओळख टेनिस कोर्टवरच झाली होती. त्यांना भेटण्यासाठी बिजू खास मोटार विमान घेऊन लाहोरला १९३९ मध्ये गेले होते. त्यांना नवीन आणि गीता ही दोन आपत्ये होती. 

नवीन पटनायक आज ओडिसाचे मुख्यमंत्री असून त्यांची बहिण गीता मेहता एक प्रसिद्ध लेखिका आहे. बिजू पटनायक हे एक फार थोर नेते आणि एक अत्यंत कुशल वैमानिक होते. ओरिया जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. १९९७ साली त्यांचा मृत्यू झाला, पण आजही त्यांचे नाव भारतात आणि इंडोनेशियात फार सन्मानाने घेतले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!