आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आयपीएलमुळे अनेक भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावतात. इंडियन प्रीमिअर लीगचे अफाट यश पाहून अनेक देशांनी त्यांच्या स्वतःच्या लीग्स सुरु केल्या आहेत. पण जी प्रसिद्धी आणि यश आयपीएलला मिळाले आहे ती आजवर इतर कुठल्याच लीगला मिळालेली नाही.
पण तुम्ही एक गोष्ट बघितली आहे का? बीसीसीआयच्या इंडियन प्रीमिअर लीगमधून इतर देशांचे खेळाडू खेळताना दिसतात मात्र आपले खेळाडू कधीच कोणत्याही परदेशी लीगमधे खेळताना दिसत नाहीत.
भारतीय खेळाडूंचे चाहते जगभर विखुरलेले आहेत. त्याच्या चाहत्यांची वाढती संख्या पाहता परदेशी लीग्जना देखील वाटते की, भारतीय खेळाडूंनी त्यांच्या लीगमधून खेळावे. बीसीसीआयच्या नियमानुसार मात्र भारतीय खेळाडूंना अशा परदेशी लीगमध्ये खेळता येत नाही.
अनेक खेळाडूंनी आपल्याला परदेशी टी-20 मधे खेळण्याची परवानगी मिळावी यासाठी बीसीसीआयला विनंती केली आहे. किमान नॉन-कॉन्ट्रॅक्टेड खेळाडूंना तर परदेशी टी-20 आणि टी-10 मध्ये खेळण्याची मुभा मिळावी अशी मागणी सुरेश रैनाने देखील केली होती.
“किमान दोन परदेशी लीगमध्ये खेळण्याची जरी मुभा मिळाली तरी आमच्यासाठी ही एक चांगली संधी असेल. सगळ्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अशा प्रकार परदेशी लीगमधे सहभाग नोंदवला आहे. बीसीसीआयने याबाबतच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा,” असे सुरेश रैनाचे मत आहे.
२०१९ साली हरभजनसिंगने चेन्नई सुपर किंग्जसोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यामुळे त्याला हंड्रेड ड्राफ्ट्समधून आपले नाव मागे घ्यावे लागले. तर २०१३ पर्यंत राष्ट्रीय संघापासून दूर असलेल्या इरफान पठाणला कॅरिबियन प्रीमिअर लीगमधून आपले नाव मागे घ्यावे लागले होते. युवराज सिंग आणि मनप्रीत गोनी यांना तर त्यांनी ब भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतरच त्यांना परदेशी लीगसाठी खेळता आले.
आता प्रश्न हा आहे की बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशी लीगमधून का खेळू देत नाही?
कारण, भारतीय खेळाडूंनी इतर कोणत्याही लीगमधे भाग घेतला तर ते त्या लीगचे प्रमोशन करताहेत असा अर्थ होतो. जर भारतीय खेळाडू बाहेरच्या लीगचे प्रमोशन करू लागले तर टी-20मधे आयपीएलचे जे वर्चस्व आहे त्याला बाधा निर्माण होईल. मुळात आयपीएलच्या यशाचे गमकच भारतीय खेळाडूंच्या खेळात दडलेले आहे. भारतीय खेळाडू म्हणजे कोणत्याही लीगसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरणार. ज्या लीगमधे हे खेळाडू जातील त्या लीगचे पारडे जड होईल.
टी-20 मध्ये जे आपली एकहाती सत्ता आहे तिला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये याच विचाराने बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या परदेशी लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. मात्र बीसीसीआय फर्स्ट क्लास क्रिकेट आणि लिस्ट ए प्रकारच्या क्रिकेटसाठी अशा प्रकारची बंदी घातलेली नाही. कारण, हा प्रकार तसा फारसा लोकप्रिय नसल्याने हा खेळ पाहण्यास होणारी गर्दीही कमीच असते.
सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, आणि इतरही जे नॉन-कॉन्ट्रॅक्टेड खेळाडू आहेत त्यांनाही बीसीसीआय परदेशी लीगमधून खेळू देत नाही. कारण, भारतीय खेळाडूंकडे गर्दी खेचण्याचे कसब आहे आणि याचा फायदा इतर देशांना होऊ शकतो.
म्हणूनच सुरेश रैनासारखे खेळाडू बीसीसीआयकडे परदेशी लीगसाठी खेळण्याची परवानगी मागत आहेत. मात्र सध्या तरी बीसीसीआय अशा प्रकारची परवानगी देण्यास इच्छुक आहे असे वाटत नाही.
आश्चर्य म्हणजे बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने इंग्लंडच्या टी-20 स्पर्धेतूनच आंतरराष्ट्रीय खेळात पुनरागमन केले होते. त्याने ग्लॅमॉर्गनकडून या स्पर्धेत भाग घेतला होता. या आधी युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ आणि दिनेश मोंगिया हे खेळाडू देखील पूर्वी इंग्लंडकडून या स्पर्धेसाठी खेळले होते. पण, २००८ पासून बीसीसीआयने आपल्या या नियमात बदल केला आहे. तेव्हापासून कोणीही भारतीय खेळाडू परदेशी लीगसाठी खेळू शकत नाही.
सुरेश रैनासोबतच रॉबिन उथप्पाने देखील बीसीसीआयच्या वरिष्ठ मंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली आहे. अशा प्रकारे भारतीय खेळाडूंना इतर लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारण्याचा निर्णय खूपच दुर्दैवी असल्याचे रॉबिनला वाटते.
आता सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे तर नक्कीच या निर्णयाचा फेर विचार केला जाईल आणि भारतीय खेळाडूंना न्याय दिला जाईल असेही त्याला वाटते. कारण, गांगुलीने नेहमीच भारतीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटर यांच्या हिताला पाठींबा दिला आहे. उलट आज भारतीय क्रिकेट ज्या उंचीवर पोहोचले आहे, त्याचा पाया कधीकाळी सौरव गांगुलीनेच घालून दिला आहे. त्यामुळेच आता भारतीय खेळाडूंच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
बीसीसीआयचा हा निर्णय तुम्हाला कितपत योग्य वाटतो? भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमधे खेळण्याची परवानगी दिली गेली पाहिजे का? तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.