शत्रू राष्ट्रांच्या टप्प्यात असूनही दिल्लीलाच भारताची राजधानी का निवडण्यात आलं…?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नैऋत्येकडील आरवली पर्वतरांगा आणि पूर्वेकडील यमुनानदीच्या बरोबर मध्यभागी वसलेल्या दिल्लीला पुराण काळापासून विशेष महत्व आहे. अगदी महाभारतातही दिल्लीचा उल्लेख आढळतो. त्याकाळी या प्रदेशाला इंद्रप्रस्थ म्हटले जायचे. इंद्रप्रस्थ ही पांडवाची राजधानी होती.

उत्खननात सापडलेल्या मानवी अवशेषांच्या पुरावाच्या आधारे असे म्हटले जाते की, इ.स.पू. दोन हजार वर्षापूर्वीपासून इथे मानवाची वस्ती होती. परंतु इ.स.पू. ३०० पासून म्हणजे मौर्यकाळापासून या शहराचा विकास होऊ लागला. महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्लीचे शेवटचे हिंदू सम्राट होते, असे मानले जाते.

इ. स. १२०७ नंतर खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी अशा अनेक वंशांनी या शहरावर राज्य केले. पुरातन काळी अनेक सम्राटांनी या शहराला राजधानी मानून संपूर्ण भारतवर्षावर राज्य केले. दिल्लीत स्थलांतरीत होणाऱ्यांची संख्या वाढत गेल्याने या शहराचे सांस्कृतिक आणि बौद्धिक महत्व वाढत गेले.

आजही बुद्धीजनांचे माहेरघर म्हणून दिल्लीला ओळखले जाते.

विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे भारतातून, विशेषत: वायव्य भारतातून, परकीय सत्तेशी होणाऱ्या व्यापारात दिल्लीने आपले वर्चस्व राखले.

दिल्ली भारताची राजधानी आहेच पण, हे शहर एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळही आहे. भव्य ऐतिहासिक इमारती आणि इतर सांस्कृतिक आणि धार्मिक स्थाळांमुळेही आजही दिल्ली आकर्षणाचा बिंदू ठरली आहे.

परंतु ब्रिटीशांच्या काळात मात्र दिल्ली ही भारताची राजधानी नव्हती. समुद्र मार्गाने व्यापार करणाऱ्या ब्रिटिशांनी आधी कलकत्त्याला आपली राजधानी बनवले होते. नंतर जॉर्ज पंचमने ११ डिसेंबर १९११ रोजी दिल्ली हीच भारताची राजधानी असेल अशी घोषणा केली. त्यानंतर प्रत्यक्षात दिल्लीतून कारभार सुरु व्हायला वीस वर्षांचा अवधी जावा लागला.

१३ फेब्रुवारी १९३१ रोजी दिल्लीचा पुन्हा एकदा भारताची राजधानी म्हणून मिरवण्याचा कालखंड सुरु झाला.

आधुनिक कालखंडात भारताची राजधानी म्हणून दिल्लीचा प्रवास सुमारे ८९ वर्षापूर्वी सुरु झाला. १३ फेब्रुवारी या तारखेचे महत्व फक्त व्हँलेटाइन वीकमधील किस्स डेपुरते मर्यादित नाही. भारतीयांच्या दृष्टीने या तारखेला एक वेगळे महत्व आहे. याच दिवशी दिल्लीला अधिकृतरित्या भारताची राजधानी घोषित केले गेले आणि भारताचा राज्यकारभार दिल्लीतून नियंत्रित केला जाऊ लागला.

तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगने ऑगस्ट १९११ मध्ये कोलकता ऐवजी दिल्लीला राजधानी बनवण्यावर जोर दिला होता. त्यानंतर दिल्लीला राजधानीचे रूप देण्यात वीस वर्षाचा कालावधी जावा लागला. १३ फेब्रुवारी १९३१ रोजी तत्कालीन व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन याने दिल्लीचे राजधानी म्हणून औपचारिक उद्घाटन केले.

दिल्लीला राजधानी बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटीश आर्किटेक्ट सर एडविन लुटीयन आणि सर हर्बट बेकर यांच्यावर दिल्लीला राजधानीचे स्वरूप देण्याची जबाबदारी सोपवली होती.

लॉर्ड होर्डिंगला अपेक्षा होती की फक्त चारच वर्षात दिल्लीला राजधानीचे रूप मिळेल आणि चार वर्षात दिल्लीतून कारभार सुरु होईल. पण पहिल्या महायुद्धाने यासगळ्या मनसुब्यावर पाणी फिरवले. दिल्लीच्या उभारणीचे काम दिवसेंदिवस रखडत गेले. त्यात लॉर्ड कर्झन यांना दिल्लीत राजधानी हलवण्याचे अजिबात पटले नव्हते. या घोषणेबाबत तेही नाराज होते.

कलकत्ता हे बंदर राजधानी म्हणून ब्रिटीशांसाठी तरी अत्यंत योग्य होते. मग त्यांनी दिल्लीला राजधानी हलवण्याचा निर्णय का बरं घेतला असेल?

यामागे पहिले कारण असे होते की प्राचीन काळापासून भारतात जी काही मोठमोठी साम्राज्ये होऊन गेली त्या सर्वांची राजधानी दिल्लीच होती. दिल्लीतून शासन करणारे सर्वात शेवटचे साम्राज्य होते मुघल साम्राज्य. दुसरे कारण म्हणजे उत्तर भारतातील दिल्लीचे भौगोलिक स्थान. ब्रिटीशांच्या मते दिल्लीतून भारतावरील सत्ता नियंत्रित करणे अधिक सोपे जाईल.

लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी घोषित केल्यापासून बंगाल आणि आसपासच्या प्रांतात ब्रिटीश सरकार विरुद्धचा रोष टिपेला पोहोचला होता. बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने वातावरण चांगलेच तापले होते.

वंगभंग आंदोलनाने चांगलच जोर पकडला होता. अशा अस्थिर वातावरणापासून दिल्ली बरीच दूर होती. त्यामुळे त्यांना त्यांचा कारभार सुरुळीतपणे चालू ठेवण्यास कोणताही विशेष अडथळा येणार नव्हता.

राजधानी म्हणून दिल्ली हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण होते.

बंगालच्या फाळणी नंतर दक्षिण भारतात अशांतता माजली होती. सर्वत्र हिंसाचार उफाळला होता. बंगालमधून स्वातंत्र्याच्या मागणीला जास्त जोर लावण्यात येत होता.

आर्किटेक्ट लुटीयन आणि बेकर यांनी दिल्ली शहराची रचना कशी असावी याचा आराखडा आखला. त्यासाठी त्यांनी शाहजहानाबाद नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि दिल्लीपासून थोड्या अंतरावर असाणाऱ्या मैदानी प्रदेश वापरात आणला.

स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. १९९१ मध्ये ६९व्या घटना दुरुस्ती अंतर्गत त्याला पुन्हा राजधानीचा दर्जा देण्यात आला.

पुराण काळापासून आजपर्यंत कित्येक सत्ताधीश आले गेले. साम्राज्ये बदलली पण दिल्लीचे महत्व कमी झाले नाही. उलट उत्तरोत्तर या शहराचे महत्व वाढत आहे. किती तरी सरकारे आली आणि गेली. या सगळ्यांचा एक मूक साक्षीदार बनून दिल्ली मात्र आहे तिथेच उभी आहे.

आजही तिच्याबद्दलचा आदर, कुतूहल, ओढ, कमी होत नाही. भारताची राजधानी म्हणून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर या शहराचे नाव आहे.

दिल्ली शिक्षणाच्या दृष्टीनेही एक प्रमुख ठिकाण बनले आहे. आज दिल्लीत अनेक दर्जेदार महाविद्यालये, संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्था आहेत. सरासरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हे शहर देशातील सर्वात श्रीमंत शहर असल्याचे म्हटले जाते.

बहुराष्ट्रीय कंपन्याही हळूहळू दिल्लीकडे आकर्षित होत आहेत. अनेक बड्याबड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दिल्लीतही आपल्या शाखा उभारल्या आहेत. या सगळ्या बाबींमुळे दिल्लीला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!