आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या मानवाप्रमाणेच केळीलाही साथीच्या रोगाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला ही स्थानिक समस्या असल्यासारखी दिसते, परंतु संपूर्ण जगाला वेठीस धरण्यासाठी ही समस्या, भौगोलिक सीमा आणि महासागर देखील ओलांडते. तर आज आपण “फुसेरीयम विल्ट ट्रॉपिकल रेस 4″/ TR4 या बुरशीविषयी जाणून घेणार आहोत आणि ही TR4 बुरशी केळीच्या पिकाचे कसे नुकसान करतो हे ही समजून घेणार आहोत.
आज या TR4 बुरशीमुळे कॅव्हेंडिश ही केळीची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जर TR4मुळे होणारा संसर्ग वेळेत थांबवला गेला नाही तर जगातील 25 अब्ज डॉलर्सचा केळी उद्योग नष्ट होऊ शकतो.
केळी हे सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ आहे आणि आतंरराष्ट्रीय बाजारात विकली जाणारी 99% केळी ही कॅव्हेंडिश प्रजातीची आहेत. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला, मलेशिया आणि इंडोनेशिया देशातील शेतकऱ्यांना हे दिसले की त्यांची कॅव्हेंडिश केळीची लागवड ही अज्ञात रोग जनकांमुळे मरत आहे आणि हा रोग आश्चर्यकारक वेगाने इतर केळी लागवडींमध्ये पसरतो आहे. ही साथ पसरायला सुरुवात झाली की केळीच्या झाडांची पाने कोमेजून पिवळी पडतात.
एका वर्षात हा रोग सगळीकडे पसरतो आणि त्यामुळे सर्व केळीची लागवड नष्ट होते. TR4 ही जमिनीत राहणारी बुरशी आहे जी अनेक दशके जमिनीत टिकून राहते आणि या बुरशीवर कीटकनाशकांची फवारणी करून ही काही उपयोग होत नाही.
चीन, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, तुर्की, या देशात TR4 बुरशीचा वेगवान प्रसार झाला. 2013 साली, मोझांबिकमधील एका शेतात TR4 बुरशीचे अंश सापडले. 2019 साली, TR4 बुरशी कोलंबियामध्ये पोचली आणि तिथल्या केळी लागवडींचे नुकसान केले, हे नुकसान इतकं प्रचंड होते की तिथल्या सरकारला TR4 बुरशीची समस्या हाताळण्यासाठी फायटो सॅनिटरी इमर्जन्सी घोषित करावी लागली.
कॅव्हेंडिश प्रजातींची केळी TR4 बुरशीचा प्रतिकार करू शकत नाही, आणि TR4 बुरशीचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. जेव्हा TR4 बुरशीचा केळीच्या लागवडीत पसरते त्यावेळी TR4 बुरशीला रोखण्यासाठी कोणताही उपाय नसल्याने शेतकऱ्यांना ती जमीन सोडून दुसरीकडे केळीची लागवड करावी लागते.
बुरशीला रोखता आले नाही म्हणून जमीन सोडावी लागली हे काही पहिल्यांदा झाले नाही, 20व्या शतकाच्या मध्यात TR1 बुरशीने अशाच पद्धतीने केळींच्या लागवडींचे नुकसान केले होते. त्यावेळी TR1 बुरशीचा प्रसारही झपाट्याने झाला, हा प्रसार रोखता येत नाही हे पाहून शेतकऱ्यांनी अखेर कॅव्हेंडिश केळींची लागवड करायला सुरुवात केली.
आज जगात 1000 पेक्षा जास्त केळींच्या प्रजातींची लागवड केली जाते. परंतु या सर्व प्रजातींचा खप हा फक्त स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित असतो. पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फक्त कॅव्हेंडिश केळींची विक्री होते.
आता फक्त कॅव्हेंडिश केळींचाच खप का होतो बाकीच्या प्रजातींचा का होत नाही हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला केळी लागवडीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. 7000 वर्षांपासून माणूस केळींची लागवड करतो आहे. शेतकऱ्यांनी मुसा अक्युमिनाटा आणि मुसा बालबीसियाना यासारख्या वन्य केळीच्या प्रजातींचे आंतरप्रजनन केले.
केळीच्या प्रजातींचे आंतरप्रजनन केल्यामुळे बियाविरहीत केळ्यांचे घड तयार झाले व त्यांना भरपूर मागणी मिळाली. ही नवीन प्रजातींची केळी बियाविरहीत असल्याने, यांची लागवड करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या केळींच्या नमुन्यातील कलम घेऊन ती उगवता येऊ शकतात, या प्रक्रियेला वनस्पतीजन्य प्रजनन असे म्हणतात.
वनस्पतीजन्य प्रजनन प्रक्रिया वापरून एका झाडापासून हजार झाडे निर्माण करता येतात. आज ज्याला आपण कॅव्हेंडिश केळी म्हणून ओळखतो त्याचा उगम हा दक्षिण चीनमध्ये झाला. व्यापाऱ्यांमार्फत हे कॅव्हेंडिश केळीचे झाड हे मॉरिशसला आणण्यात आले.
1814 साली ब्रिटनने मॉरिशसवर आपला ताबा मिळवला आणि तिथून कॅव्हेंडिश केळीचे झाड हे ब्रिटनला पाठवून दिले. डेव्हनशायरचा सहावा ड्युक विलियम कॅव्हेंडिश याने 1834 मध्ये इंग्लंडमधील ग्रीनहाऊसमध्ये हे मॉरिशसवरून आणलेले केळीचे झाड वाढवले आणि त्यामुळे ड्युकच्या सन्मानार्थ या केळीचा झाडाला कॅव्हेंडिश हे नाव दिले गेले.
जेव्हा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी काही पिकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. ज्या प्रजातींमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती जास्त असते अशा प्रजातींचे अन्य प्रजातींबरोबर प्रजनन केले जाते आणि नवीन प्रजाती तयार केल्या जातात. पण कॅव्हेंडिश प्रजातीचे इतर अन्य प्रजातींसोबत प्रजनन होऊ शकत नाही कारण कॅव्हेंडिश प्रजातीचा निर्माण हा वनस्पतीजन्य प्रजनन क्रियेने होतो. त्यामुळे भविष्यात TR4 बुरशीला प्रतिकार करणारी प्रजाती जरी निर्माण झाली तरीही तिचे कॅव्हेंडिश प्रजातीसोबत प्रजनन होऊ शकत नाही.
आज कॅव्हेंडिश प्रजातीला वाचवणे हेच एकमेव आव्हान वैज्ञानिकांसमोर नाही. भविष्यात TR4 बुरशीचा प्रतिकार करणारी कॅव्हेंडिश प्रजाती जरी निर्माण झाली तरीही ती प्रजाती मानवाला सेवन करण्यासाठी योग्य आहे की नाही हे पहावे लागणार आहे. त्यामुळे जीन एडिटिंग प्रकिया वापरून TR4 बुरशीचा प्रतिकार करणारी कॅव्हेंडिश प्रजाती जरी निर्माण झाली तरीही त्या प्रजातीला कठोर चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सध्या वैज्ञानिकांसमोर कॅव्हेंडिश प्रजातीला वाचवणे व कॅव्हेंडिश प्रजाती मानवासाठी खाण्यायोग्य बनवणे ही दुहेरी आव्हाने आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.