असं काय कारण आहे ज्यामुळे आजही बक्सरच्याच दोरीने गुन्हेगारांना फासावर लटकवलं जातं..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


वर्षभरापूर्वी निर्भया कांडातील आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ज्यावेळी ही फाशी देण्यात आली त्यावेळी बक्सर जिल्ह्यातील जेलला फाशीसाठी दोरी पाठवण्याचा ऑर्डर देण्यात आले. या जेलमध्ये दोरी बनवण्यात आली आणि त्या दोरखंडावर निर्भयाचे गुन्हेगार फासावर लटकले होते.

देशभरात कुठेही कोणाला फाशीची शिक्षा देण्यासाठी बक्सरमधल्या दोरखंडाचाच वापर केला जातो.

कुठल्याही आरोपीला फाशी देण्याच्या दोन महिन्याअगोदरच बक्सर जेलला दोरखंड बनवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येते, परंतु फाशीच्या आधीच्या पंधरा वीस दिवसांत या दोरखंडावर शेवटचा हात फिरवला जातो.

फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीच्या दोन महिन्याअगोदर बक्सरच्या कारागृहाला दोरखंड बनवण्याची ऑर्डर मिळते.

गेल्या दशकभरात ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनवण्यात आली आहे, त्यांना फाशी देण्यासाठी बक्सरचा दोरखंड वापरण्यात आला आहे. पुण्याच्या जेलमध्ये फासावर गेलेला अजमल कसाब असो की दिल्लीतील अफजल गुरु अथवा कोलकात्याचा धनंजय चटर्जी, या सर्वांना फासावर लटकवण्यात आले ते बक्सरच्या दोरखंडावर!

या बक्सरच्या दोरखंडाची विशेषता अशी आहे की हा दोरखंड मजबूत पकड निर्माण करून ठेवतो आणि अत्यंत वजनदार वस्तू सहज पेलू शकतो. तो कधीच तुटत नाही, इतका तो मजबूत असतो. यासाठीच हा दोरखंड पूल बांधणे, ओझे वाहणे यासारख्या कामासाठी देखील वापरला जातो.

बक्सारच्या कारागृहात १९३० सालापासून या दोरखंडाची निर्मिती केली जात आहे, आजवर तयार केलेल्या दोरखंडापैकी एकही अपयशी ठरलेला नाही.

बक्सरमध्ये तयार केल्या जाणारा हा दोरखंड ‘मनिला’ प्रकारातला असून या दोरखंडासाठी फिलीपाईन्स देशातील एका विशिष्ट झाडाच्या बुंध्याचा वापर केला जातो. हा दोरखंड जाड असतो, पाण्याचा या दोरखंडावर काही विशेष परिणाम होत नाही. उलट हा दोरखंड पाण्याला शोषून घेतो. या दोरखंडाने मारलेली गाठ अत्यंत मजबूत असते.

बक्सरमध्ये अशा प्रकारच्या दोरखंडाची निर्मिती करू शकणारे तज्ञ कारागीर आहेत, इथल्या कैद्यांना अशा प्रकारच्या दोरखंडाची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

सुरुवातीला या दोरखंडाच्या निर्मितीसाठी लागणारा जे ३४ हा कापूस पंजाबमधील भटिंडा येथून मागवला जात होता. पण आता पटनामधील काही खाजगी कंपन्या हा कापूस पुरवतात. दोरखंडाच्या निर्मितीसाठी इथे एक दालन तयार करण्यात आले आहे.

बक्सरमधील वातावरणाचा वेगळाच प्रभाव या दोरखंडावर पडत असतो, यामुळे दोरखंडामुळे याला एक वेगळीच मजबुती येत असते. गंगेच्या प्रवाहामुळे या भागातील आर्द्रता या दोरखंडावर वेगळा परिणाम करत असते.

फाशीसाठी लागणाऱ्या दोरखंडाच्या निर्मितीसाठी एका विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. या दोरखंडाच्या निर्मितीसाठी मेणाचा वापर केला जातो. दोरखंडाच्या निर्मितीसाठी सुताचे धागे, फेविकोल, पितळाचे बुश, पैराशुटची दोरी इत्यादींचा वापर केला जातो. 

जेलमध्ये यंत्रमाग असून त्या ठिकाणी सुताचे धागे वेगवेगळे करून ७२०० धाग्यांचाच उपयोग दोरखंडासाठी केला जातो.

जेव्हा कारागृहाला फाशीच्या दोरीच्या निर्मितीची ऑर्डर मिळते, त्यावेळी लगेचचं त्यावर काम सुरु होते, प्रामुख्याने जेलमध्ये ६ मीटर लांबीचा दोरखंड तयार केला जातो. पण बऱ्याचदा दोरखंडाची लांबी गुन्हेगाराच्या लांबीवर अवलंबून असते. या दोरखंडाचे वजन चार किलो पेक्षा जास्त असते.

या एका दोरखंडाची किंमत एक हजार रुपये ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान असते. या दोरखंडाच्या निर्मितीत जो सामान लागतो, त्याच्या उपलब्धतेवर या दोरखंडाची किंमत अवलंबून असते. 

या दोरखंडावर व्हेट देखील आकाराला जातो.

असं मानलं जातं की या दोरखंडाच्या मदतीने ८० किलोच्या माणसाला सहज फाशी देण्यात येते. या दोरखंडाच्या योग्य वापरासाठी फाशी देणाऱ्याला त्यावर कमीतकमी चार दिवस सराव करावा लागतो, कारण फाशीच्या दिवशी कुठलीही चूक होणे स्वीकार्य नसते.

या फाशीच्या दोरखंडाचा लूप कसा तयार करायचा आणि त्याने व्यवस्थितपणे गुन्हेगाराच्या गळ्यावर प्रेशर पडेल अशी व्यवस्था कशी करावी, याची संपूर्ण तयारी फाशी देणाऱ्याला करावी लागते.

बक्सरमध्ये तयार होणाऱ्या या दोरखंडाने भगत सिंह व त्याच्या क्रांतीकारकांपासून ते निर्भयावर अत्याचार करणाऱ्या नराधमापर्यंत अनेकांना फाशी देण्यात आली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!