पाकिस्तानातील लष्करी हुकुमशाहीने झुल्फिकार भुट्टोचा बळी घेतला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पाकिस्तान हा देश किती वादग्रस्त गोष्टींनी भरलेला आहे, याची कल्पनाही करता येणे शक्य नाही. कोणत्याही देशात पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन पदांवरील व्यक्तींकडे सर्वोच्च आदराने पहिले जाते. या पदावरील व्यक्तींवर एखादा आरोप करण्यापूर्वी हजारदा विचार केला जातो. याच पदावरील काय पण, कोणत्याही व्यक्तीवर एखादा आरोप केला गेला असेल तर त्यावर निर्णय देतानाही कित्येक बाबींचा सारासार विचार केला जातो.

कसाबसारख्या दहशतवाद्या विरोधात खटला चालवतानाही त्याला वकील नेमण्याचा आणि त्याची बाजू ऐकून घेण्याचा त्याचा मानवी अधिकार भारताने अबाधित राखला. पण, पाकिस्तानमध्ये मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्तीवर आरोप लावताना आणि त्याला फाशीची शिक्षा देताना त्याच्या मानवी अधिकाराच्याही पार चिंधड्या उडवून टाकल्या.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संस्थापक असलेल्या, दोनदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद आणि एकदा राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या या व्यक्तीचे नाव होते झुल्फिकार अली भुट्टो. 

पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टोचे वडील. ज्यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानमधील एक प्रभावी नेते होते. पण, पाकिस्तानमधील लष्करी हुकुमशाहीने झुल्फिकार अली भुट्टोंचा नाहक बळी घेतला. त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्याच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप लावण्यात आला. मात्र, झुल्फिकार भुट्टो यांनी सातत्याने या आरोपाचे खंडन केले. 

जेंव्हा त्यांना फाशी देण्यात आली तेंव्हा त्यांचे अखेरचे शब्द होते, “मी निरपराध आहे, हे खुदा मला माफ कर.”

भुट्टोंना अटक करण्यात आली तेंव्हाही लष्कराने त्यांना खूप मारहाण केली. बेनझीर भुट्टो यांनी अंगावर काटा उभे करणाऱ्या त्या क्षणांचे वर्णन असे केले आहे, “उठा उठा जाग्या व्हा, कपडे घाला लवकर” माझी आई ओरडत आमच्या खोलीत आली. मला आणि बहिणीला उठवण्यासाठी.

लष्कराने घराभोवती गराडा घातला आहे. थोड्याच वेळात मी माझ्या आईच्या खोलीत गेले. मला काहीच कळत नव्हते, नेमकं काय झालंय.. हल्ला? इथे कसा काय हल्ला होऊ शकतो? पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि विरोधी पक्ष यांच्यात आताच तर समझोता झाला आहे. कालचीच तर गोष्ट आहे. आणि जर लष्करांनी सत्ता उलथवून टाकली असेल, तर मग लष्करातील ते बडे बडे अधिकारी आतापर्यंत काय फक्त नाटक करत होते? जनरल जिया आणि लष्करातील इतर अधिकारीही दोनच दिवसांपूर्वी इथे माझ्या वडिलांजवळ येऊन आपल्या प्रामाणिकपणाची शपथ देऊन गेले होते.”

पुढे बेनझीर लिहितात, “माझे वडील लष्कर प्रमुख जनरल जिया आणि इतर मंत्र्यांशी बोलत आहेत. तोपर्यंत तर लष्कर इथे दाखल झाले होते. सैनिक आले आणि माझ्या वडिलांना मारहाण करत बाहेर घेऊन गेले.

बाहेर सैनिकांच्या सिगारेटी चमकत होत्या आणि त्यांच्या मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आतपर्यंत येत होता. मी माझ्या बहिणीशी बोलत होते. माझे वडील गव्हर्नर जनरलशी बोलत होते इतक्यात फोन कट झाला.

भीतीने माझ्या आईचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. त्याआधी लष्कर आमच्या पंतप्रधान निवासाभोवती घेराव करत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने पहिले. स्वतःच्या जीवावर उदार होऊन, कसाबसा लपून छपून तो घराच्या दरवाज्यापर्यंत आला.

त्याने आमचा नोकर उर्सला घाबऱ्या आवाजात, हळूच सांगितले भुट्टो साहेबांना कळव की त्यांना मारण्यासाठी इथे लष्कर पाठवण्यात आले आहे. त्यांना तातडीने एखाद्या सुरक्षित ठिकाणी लपून बसायला सांग.”

माझ्या वडिलांनी अत्यंत धैर्याने ही बातमी ऐकली आणि ते म्हणाले की, माझी जिंदगी आता खुदाच्या हातात आहे. ते उर्सला म्हणाले की, लष्कराला माझा जीवच घ्यायचा असेल तर त्यांना घेऊ दे. मी लपून बसण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हीही कुणी त्यांना अडवू नका. त्याचीही काही गरज नाही. त्यांना आत येऊ द्या.”

माझ्या वडिलांनी जियांना फोन लावला. जिया माझ्या वडलांना म्हणाले, “सर मला खूप खेद वाटतो पण, मी हतबल आहे. हे मला करावे लागत आहे. फक्त काही काळासाठी आत्ता मी तुम्हाला अटक करणार आहे. परंतु तीन महिन्यानंतर मी दुसऱ्यांदा निवडणूक लावीन तेंव्हा तुम्हीच पुन्हा पंतप्रधान असाल. तेंव्हा मी तुम्हाला सलाम करेन. जे काही होत आहे, त्यामागे कुणाचा हात आहे, हे आता माझ्या वडलांना पूर्णत: कळून चुकले.”

“फोन ठेवला तेंव्हा माझ्या वडलांचा चेहरा अगदी कठोर झाला होता. माझे भाऊ मीर आणि शाहनवाज घाईघाईने तिथे पोहोचतात. मीर म्हणतो, आपण लढू. वडील म्हणतात नाही, लष्कराशी कधीही पंगा घेऊ नका. जनरलला मला मारायचे आहे. त्यासाठी आपण त्यांना कसलेही कारण देता कामा नये. मला दोन वर्षापूर्वी झालेली मुजीबची हत्या अजूनही आठवते.”

“आईने माझ्या भावांना काही पैसे दिले आणि त्यांना सांगितले सकाळीच तुम्ही कराचीला निघून जा. आम्ही संध्याकाळ पर्यंत तिथे आलो नाही तर, तुम्ही पाकिस्तान सोडून बाहेर निघून जा.”

शेवटी जुल्फिकार भुट्टोंना अटक करण्यात आली. बेनझीर भुट्टो ओरडत होत्या, “अलविदा पापा,” भुट्टो यांनी एकदा तिच्याकडे वळून पहिले आणि ते मंद हसले.

१९७७ च्या ऑक्टोबरमध्ये भुट्टोंच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला. हा खटला थेट उच्च न्यायालयातच दाखल झाला. उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचाच निकाल कायम ठेवला.

भुट्टो यांना माफी दिली जावी. त्यांची फाशी रद्द करावी. त्यांच्यावर दया दाखवली जावी. अशी मागणी अनेक देशातून करण्यात आली. 

भारतात तेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार होते. त्यांनी ही पाकिस्तानची अंतर्गत बाब असल्याचे सांगून यात लक्ष घातले नाही. 

पण, इंदिरा गांधीनीही जनरल जिया यांच्याकडे भुट्टोंना दया दाखवण्यासाठी शिफारस केली होती.

न्यायालात आपली बाजू मांडताना झुल्फिकार भुट्टो म्हणाले, “फक्त मला जगण्यासाठी आणखी चार दिवस मिळावे म्हणून मला माझी बाजू मांडायची नाही. पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक हाडामांसाच्या प्राण्याला कधीतरी पृथ्वीवरून जायचेच आहे. परंतु हा खटला म्हणजे अन्यायाचा क्रूर चेहरा आहे. मला न्याय हवा आहे. मी न्याय मागत आहे.”

भारतातही भुट्टो यांचे अनेक समर्थक होते. भुट्टोंचा जन्मच भारतात झाला होता. ५ जानेवारी १९२८ रोजी सिंध प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. मुंबईच्या कॅथेड्रल स्कूल आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मधून त्यांचे शिक्षण झाले.

त्यांचे वडील जुनागढच्या नवाबाकडे दिवाण होते. जुनागढच्या नवाबासोबत या कुटुंबानेही पाकिस्तानात राहण्याचा निर्णय घेतला. खरेतर त्यांचे वडील शाहनवाज भुट्टो यांनीच नवाबाला पाकिस्तानात जाण्याविषयी सल्ला दिला होता.

परंतु झुल्फिकार अली भुट्टो यांना मात्र भारत सोडून जायचे नव्हते. शाहनवाज भुट्टो यांची चौथी पत्नी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांची आई हिंदू होती. त्यांची मुंबईतही भरपूर संपत्ती आणि मालमत्ता होती. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता, मात्र जुनागढचे नवाब आणि त्यांचे वडीलही पाकिस्तानला निघून गेल्याने त्यांच्या भारतीय नागरिकत्वाच्या अर्जावर विपरीत परिणाम झाला. त्यांचा हा अर्ज कित्येक वर्षे सर्वोच्च न्यायालयात पडून होता.

१९४७ साली भारताची फाळणी झाली तेंव्हा ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. १९५० मध्ये ते भारतात परत आले. पण, त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता धूसर झाली होती.

पुढे ते वैतागून आपल्या वडिलांकडे पाकिस्तानात निघून गेले. तिथेच त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करू लागले.

उच्च शिक्षित असल्याने पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात त्यांना सहज प्रवेश मिळाला. ते उत्तरोत्तर आपल्या प्रभावाने राजकारणात यश मिळवत राहिले. जनरल आयुब खान पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले तेंव्हा भुट्टोंची वर्णी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात लागली. त्यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्वही केले होते. 

चीनशी मैत्री करण्यातही त्यांनीच पुढाकार घेतला. वारंवार भारताबद्दल पाकिस्तानमध्ये भडक प्रचार करून त्यांनी तिथे बरीच लोकप्रियता मिळवली होती. एकेकाळी पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठे वजन असलेल्या या नेत्याला पाकिस्तानी लष्करानेच फाशीवर लटकवले.

भुट्टो यांचे चरित्रकार सलमान तासीर यांनी आपले पुस्तक ‘भुट्टो’मध्ये लिहिले आहे, “भुट्टो यांच्या तुरुंगातील सुरुवातीच्या दिवसात, टॉयलेटमध्येही त्यांच्यासोबत एक गार्ड पाठवला जाई. भुट्टो यांना याबद्दल प्रचंड वाईट वाटे. याच कारणाने त्यांनी तुरुंगात असताना खाणेपिणे टाळले. जेणेकरून टॉयलेटला जाण्याची वेळच येऊ नये.

काही दिवसांनी त्यांच्यावरील हा पहारा सैल करण्यात आला आणि त्यांच्या कोठडीच्या बाहेरच त्यांच्यासाठी एक वेगळे टॉयलेट बसवण्यात आले.

३ एप्रिल रोजी म्हणजे त्यांना फाशी देण्यात आली त्याच्यापूर्वी काहीच तास आधी त्यांना कळवण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीच्या शिक्षेविरुद्धची याचिका फेटाळली आहे आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम केली आहे.

तेंव्हा भुट्टो जेल अधीक्षकाला म्हणाले की, अजूनही या आदेशाबद्दल माझ्याकडे कोणतीही लिखित प्रत नाही, तेंव्हा मला माझ्या वकिलांशी भेटण्याची संधी द्यावी. पण, त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेतले नाही. त्याच दिवशी मध्यरात्री २ वाजता त्यांना फाशी देण्यात आली.

त्यावेळी रावळपिंडीच्या तुरुंगात गुप्तचर अधिकारी असलेले कर्नल रफीउद्दीन यांनी ‘भुट्टो के आखिरी ३२३ दिन’ या पुस्तकात त्यांना फाशी देण्यात आली त्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. “अधिकाऱ्यांनी जेंव्हा भुट्टोना त्यांच्या फाशीची सूचना दिली तेंव्हा त्यांचे अंग थरथरत होते. ते म्हणाले की त्यांच्या पोटात दुखत आहे.

भुट्टोंनी आपले सहाय्यक अब्दुर रहमान याला बोलावून घेतले आणि त्याला दाढी करण्यासाठी गरम पाणी घेऊन येण्यास सांगितले. मग भुट्टोंनी रफीला विचारले, “रफी हे काय नाटक चालू आहे? रफी शांत राहिले. भुट्टोंनी पुन्हा तोच प्रश्न विचारला तेंव्हा, त्यांना स्पष्ट सांगितले गेले की, “त्यांना आजच फासावर लटकवण्यात येणार आहे. हे ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची लकेर उमटली.

ते म्हणाले, “सगळं संपलं… ठीक आहे, सगळं संपलं.”

फाशी देण्यापूर्वी त्यांना हातपाय बांधून स्ट्रेचरवर झोपवण्यात आले आणि त्यांना फाशीच्या ठिकाणी नेले गेले. भुट्टोंना फासी देण्यासाठी जल्लाद तयारच होता. घड्याळात २ वाजून ४ मिनिटांचे ठोके पडताच जल्लाद भुट्टोंच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि त्याने खटका ओढला. भुट्टो अर्धातास फाशीवर लटकत होते. त्यानंतर एका डॉक्टरने भुट्टोंची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले.

भुट्टोंना फासी दिल्यानंतर कित्येक तासांनी, जेंव्हा सकाळी एका स्थानिक वृत्तपत्राने याबाबतची बातमी छापली तेंव्हा कुठे पाकिस्तानी नागरिकांना भुट्टोंच्या फाशीबद्दल कळाले. नंतर ही बातमी संपूर्ण जगभर पसरली.

कर्नल रफीउद्दीन यांनी आपल्या पुस्तकात पुढे लिहिले आहे की, “भुट्टोंना फाशी दिल्यानंतर गुप्तचर संस्थेच्या एका फोटोग्राफरने भुट्टोंच्या गुप्तांगाचे फोटो घेतले होते. भुट्टोंचा इस्लामिक पद्धतीने खतना झाला आहे की नाही, याची प्रशासनाला खात्री करून घ्यायची होती. पण, फोटो घेतल्यानंतर प्रशासनाला याबाबत कसलीही शंका उरली नाही.

भुट्टो यांना ज्या रात्री फाशी देण्यात आली त्याच दिवशी दुपारी बेनझीरने त्यांची तुरुंगात भेट घेतली होती. बाहेरच्या देशातून कोणीकोणी त्यांच्या माफीसाठी शिफारस केली आहे, याचीही माहिती तिने त्यांना दिली. पण, ही त्यांची शेवटची भेट ठरेल याची कल्पना त्यावेळी दोघांनाही नव्हती.

शेवटच्या क्षणी आपल्या वकिलांना भेटण्याची इच्छा भुट्टो यांनी बोलून दाखवली होती, मात्र तिचीही दखल घेण्यात आली नाही.

आपल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत भुट्टोंनी पाकिस्तानच्या राजकीय पुनरुत्थानाचे स्वप्न पाहिले. भारताचा कट्टर विरोध, चीन आणि अमेरिकेशी जवळीकता आणि इस्लामी राष्ट्रांशी घनिष्ठ मैत्री या गोष्टींवर त्यांनी अतोनात भर दिला.

पाकिस्तानमध्ये त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. 

फुटीरतावादी शक्तींना आवर घालण्यासाठी त्यांनी अर्थव्यवस्थेची नव्याने घडी बसवली. मोठ्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण, लोकपाल व प्रशासकीय न्यायालयाची स्थापना, १० वी पर्यंत मोफत शिक्षण, हुंडा बंदी, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार, कमाल व किमान जमीनधारणा कायदा अशा अनेक महत्वाच्या सुधारणा त्यांनी अंमलात आणल्या.

त्यांच्या मृत्युनंतर तब्बल ३९ वर्षांनी म्हणजे २०१८ साली त्यांच्या फाशीबाबत एक मोठा निर्णय देण्यात आला होता. सिंध उच्च न्यायालयाने भुट्टो यांना शहिदाचा दर्जा दिला आणि त्याच्या नावापुढे ‘शहीद’ जोडण्यात आले. न्यायालयाच्या मते, ‘भुट्टो हुकुमशाहीचे नाहक बळी ठरले होते.’


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!