या निवडणूक आयुक्तांनी सगळ्या राजकारण्यांना सरळ केलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातील यूपीएससी ही परीक्षा जगातील सगळ्यात अवघड परीक्षांपैकी एक समजली जाते. या परीक्षेच्या काही ठराविक जागाच निघतात त्यासाठी दरवर्षी तीन लाखाहून जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतात.

या परीक्षेत पास झालेले लोक भारताची प्रशासकीय व्यवस्था सांभाळतात. अनेकदा असे होते की “स्टील फ्रेम” तोडायला उतरलोय असे मुलाखतीमध्ये सांगणारे लोकंच या स्टील फ्रेमचा एक भाग बनून जातात आणि भ्रष्टाचाराचा मार्ग निवडतात. त्यांना त्यांचे मुलाखतीतले वायदे पूर्ण करता येत नाहीत. त्यांना स्वतःलाही कळत नाही की ते या भ्रष्ट सिस्टिमचा भाग कधी बनले.

याउलट काही झुंजार, तडफदार आणि जिंदादिल अधिकारी असतात ज्यांच्यामध्ये खरंच या पोलादी सिस्टीमला वाकवण्याची ताकद असते. कशाचाही विचार न करता, प्रसंगी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता असे अधिकारी ही यंत्रणा चालवतात. स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा यंत्रणेवर पाडून जातात.

आज अशाच एका अधिकार्‍याची आपण माहिती बघणार आहोत. ते म्हणजे आपल्या भारताचे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन.

टी एन शेषन हे 1955 साली यूपीएससीच्या परीक्षेमध्ये देशात पहिले आले होते.

शेषन यांचे संपूर्ण नाव तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन. शेषन यांची निवडणूक आयुक्त म्हणून कारकीर्द प्रचंड गाजली. स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही पद्धत अवलंबली आहे. देशामध्ये सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून सरकार निवडले जाते. परंतु खेदाची गोष्ट अशी की या मतदान प्रक्रियेत अनेक घोळ होते.

अनेक वेळा मंत्र्यांचे पाळलेले गुंड गावोगावी जाऊन लोकांना बंदुकीच्या धाकावर मतदान करायला लावायचे. मतपेट्या फोडल्या जायच्या, बदलल्या जायच्या त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी नव्हती.

टी एन शेषन हे जेव्हा निवडणूक आयुक्त बनले तेंव्हा त्यांनी देशाला निवडणूक आयोगाच्या ताकदीची जाणीव करून दिली. टी एन शेषन जेव्हा निवडणूक आयुक्त होते तेव्हा असे बोलले जायचे की भारतीय राजकारणी केवळ दोन जणांना घाबरतात. एक म्हणजे देवाला आणि दुसरे- शेषन.

टी एन शेषन हे देशाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते.

१९९० मध्ये मुख्य आयुक्त बनल्यानंतर त्यांचे ‘आय इट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट’ हे वाक्य खूप चर्चेत राहिले.

शेषन यांची शिस्त अत्यंत कठोर होती त्यामुळे त्यांना लोक ‘अल-कायदा’वरून ‘अल-शेषन’ या नावाने ओळखायचे.

टी. एन. शेषन यांचा जन्म १५ डिसेंबर १९३२ साली केरळच्या पलक्कड जिल्ह्यात झाला. शालेय शिक्षण पलक्कड इथे घेतल्यानंतर त्यांनी मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यांना मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉब करण्याची संधी कॉलेजच्या प्रशासनाने दिली.

तिथे नोकरी करत असतानाच त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ते एडवर्ड एस. मेसन फेलोशिपवर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेले. तेथे सुब्रमण्यम स्वामी त्यांचे सीनियर होते.

भारतात परत आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी शेषन यांच्यावर कॅबिनेट सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही काळ ते भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य देखील होते.

राजीव गांधींच्या कार्यकाळात शेषन अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहत. राजीव गांधी जेंव्हा बाहेर पडत त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी शेषन यांच्या टीमवर असे.

पंतप्रधान यांनी प्रोटोकॉल मोडू नये म्हणून शेषन दक्ष असत. त्यावेळी राजीव गांधींची लोकप्रियता टिपेला पोहचली होती. नुकतेच इंदिरा गांधी यांचे निधन झालेले होते आणि त्यांचे वारस म्हणून राजीव गांधींकडे लोक आशेने बघत होते.

राजीव गांधी अनेक वेळा बाहेर पडल्यानंतर प्रोटोकॉल मोडून लोकांना भेटायचे. हस्तांदोलन करायचे. याविषयी शेषन यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.

एकदा त्यांनी राजीव गांधींच्या तोंडातून बिस्कीट खाता खाता काढून घेतले होते. पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्‍तीने परीक्षण न झालेला कोणताही पदार्थ सहज तोंडात टाकता कामा नये असे शेषन यांनी त्यावेळी राजीव गांधी यांना बजावले होते.

1990 साल ई टी एन शेषन यांना भारताच्या निवडणूक आयोगाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी घेण्यास शेषन फारसे उत्सुक नव्हते कारण त्यांच्या अगोदर हे पद डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांना देण्यात येणार आहे अशी कुणकूण त्यांना लागलेली होती.

अमेरिकेत हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना सुब्रमण्यम स्वामी त्यांना सीनियर होते. त्यामुळे स्वामींना हे पद न जाता आपल्याकडे येत आहे याची खंत त्यांना थोडीशी वाटली. परंतु नंतर स्वतः सुब्रमण्यम स्वामी यांनीच शेषन यांना या पदाचा अधिभार घेण्यास प्रोत्साहित केले.

1990 साली मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर भारतात एका वादळी पर्वाची सुरुवात झाली. शेषन यांनी निवडणूक आयोगामध्ये आणि कारभारामध्ये पारदर्शकता आणली.

त्यांनी निवडणूक आयोग हा स्वतंत्र असला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. जोपर्यंत निवडणूक आयोग स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मी भारतामध्ये एकही निवडणूक होऊ देणार नाही हे त्यांनी राजकारण्यांना ठणकावून सांगितले.

निवडणूक प्रक्रियेतील गैरकारभार रोखण्यासाठी त्यांनीच सर्वप्रथम मतदार कार्ड ही संकल्पना आणली होती. 1993 पासून भारतामध्ये मतदार याद्या बनवण्याचे आणि त्यानुसार मतदान कार्ड तयार करण्याचे काम सुरू झाले होते. परिणामी आज भारतातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे स्वतःचे मतदार कार्ड आहे. हे मतदान कार्ड भारतातील अनेक प्रक्रियांमध्ये ओळख म्हणून वापरले जाते.

भारतातील बिहार राज्यात सर्वाधिक मतदान घोटाळे आजही चालतात. त्यावेळी टी एन शेषन यांनी बिहारमधील निवडणूक प्रक्रियेच्या वेळी संपूर्ण राज्यात केंद्रीय पोलिस दल तैनात केले होते. त्यांच्यामध्ये आणि लालूप्रसाद यादव यांच्यामध्ये अनेक खटके उडत असत.

1995 साली भारतातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लालूप्रसाद यादव विरुद्ध टी एन शेषन यांचा कलगीतुरा रंगवण्यात आलेला वाचण्यास मिळत असे. एखाद्या राज्याच्या निवडणुकीमध्ये गैर प्रक्रिया घडली आहे अशी शेषन यांना थोडी जरी शंका आली तर ते निवडणूक रद्द करायचे.

जेव्हा लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यात निवडणुका लागल्या. लालूप्रसाद यादवच्या गुंडाराजमुळे सर्वाधिक बोगस मतदान आणि बूथ कॅप्चर करण्याच्या घटना बिहारमध्ये घडल्या. त्यावेळेस संतापलेल्या शेषन यांनी निमलष्करी दलाला राज्यात पाचारण केले. संपूर्ण बिहार राज्य लष्कराने ताब्यात घेतले आणि झालेल्या निवडणुका रद्द करून पुन्हा एकदा तिथे निवडणुका घ्यायला लावल्या.

लालूप्रसाद यादवसारख्या शक्तिमान आणि भ्रष्ट अशा राजकारण्याला शेषन सारखा तडफदार अधिकारी पुरून उरला.

शेषन यांनी खऱ्या अर्थाने निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार संपवला. निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनवली. याच कारणामुळे शेषन सर्वात  आजवरचे सर्वात शिस्तप्रिय निवडणूक आयुक्त म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाला सर्वाधिक अधिकार मिळाले. त्याचबरोबर निवडणूक सुधारणाही अस्तित्वात आल्या. शेषन यांनी निवडणुकीच्या काळातील आचारसंहिता कशी असावी या संदर्भात काटेकोर नियम घालून दिलेले होते. जे उमेदवार आचारसंहितेचे पालन करणार नाही त्यांच्यावर खटला भरण्याची तरतूद देखील त्यांनी या नियमावलीमध्ये केलेली होती. त्यामुळे त्यांच्या काळापासून आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरवात झाली.

आजही शेषन यांनी घालून दिलेल्या नियमांमुळेच निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आचारसंहितेचा भंग करता येत नाही. शेषन यांच्यामुळे बोगस मतदानाचे प्रमाण कमी झाले.

1990 ते 1996 अशी सहा वर्षे टी एन शेषन यांनी निवडणूक आयोगाचे काम सांभाळले. आज भारतीय निवडणूक आयोगाला जो दर्जा आहे, जी स्वायत्तता आहे आणि जो दरारा आहे त्याचे एकमेव शिल्पकार म्हणजे टी एन शेषन.

अशा स्वाभिमानी आणि तडफदार अधिकाऱ्याला पोस्टमन टीमकडून मानाचा मुजरा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!