राईट बंधू नाही तर या मराठी माणसाने विमानाचा शोध लावला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण पुस्तकात वाचत आलो आहोत की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. विमानाच्या शोधानंतर मनुष्याला आकाश गमन करणे सहज शक्य झाले. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात राईट बंधूंना विमानाचे जनक म्हणून ओळखले जाते. परंतु या दोन बंधूंच्या अगोदर भारतात एक अवलिया होता ज्याने या विमानाने उड्डाण भरले होते, पण त्याची कथा इतिहासाच्या पानात हरवली.

विमानाचा शोध लावणारा पहिला माणूस हा मराठी होता. शिवकर बापूजी तळपदे असे त्या अवलियाचे नाव होते.

१८६४ मध्ये मुंबईत जन्माला आलेले शिवकर बापूजी तळपदे हे महर्षी दयानंदांच्या आर्य समाजाचा चळवळीचे एक सदस्य होते. ते प्रचंड विद्वान होते आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते. त्यांचा बहुतांश वेळ संस्कृत भाषेतील वैदिक आणि पौराणिक ग्रंथ यांच्या अध्ययनात खर्ची व्हायचा.

पुराणकथा वाचताना विमानाचा उल्लेख नेहमी त्यांच्या वाचनात येत होता. विमानात बसून परमेश्वर पृथ्वीवर अवतरायचे आणि त्यातून पुनश्च अवकाशी उड्डाण करायचे याच्या पुराणकथा वाचताना भारतात हजारो वर्षांपूर्वी हवेत उड्डाण करणारे विमान होते, याची माहिती शिवकर तळपदेंना मिळाली. त्यांनी वेद पुराणातील असंख्य श्लोक आणि रचनांमध्ये विमानाचा उल्लेख बघितला. रामायण आणि महाभारत यांच्यासारख्खा अनेक ग्रंथात देखील या विमानांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे,हे त्यांच्या ध्यानात आले.

इतरांनी या कथा पौराणिक आणि कल्पनाविलास म्हणून सोडून दिल्या पण शिवकर तळपदे यांचं असं नव्हतं. त्यांनी ठरवलं की भारताच्या इतिहासातील एक असामान्य ठेव लोकांसमोर आणूनच रहायचं!

वस्तुतः ते एका पूर्ण विमानाची निर्मिती करू इच्छित होते, ज्यात मनुष्य देखील पक्षांप्रमाणे उड्डाण करू शकेल. हाच विचार घेऊन ते विमान निर्मितीच्या कार्यात गुंतले. त्यांनी आपले सर्वस्व या विमानाच्या निर्माणासाठी पणाला लावले होते. त्यांनी असंख्य पुस्तके पालथी घातली, एक एक क्षणाचा उपयोग करून विमान कसे लवकरात लवकर पूर्ण करता येईल यासाठी ते झटत राहिले.

त्यांना हे काम करताना इंग्रजांना देखील तोंड द्यायचे होते कारण जर कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांच्या कामाची माहिती जरी मिळाली असती तर त्यांना मोठे गंभीर परिणाम भोगावे लागले असते, त्यामुळे विमान निर्माणाचे काम त्यांनी अगदी गुपचुप सुरू ठेवले.

त्यांनी विमानाच्या निर्मितीसाठी बांबूच्या लाकडांचा वापर केला होता, बांबू वजनाने हलका असल्याने उड्डाण सहजपणे घेता येईल याची त्यांना शाश्वती होती. आपले पैसे आणि मेहनत त्यांनी या विमानाच्या निर्मितीवर खर्च केली होती. या मेहनतीतुन त्यांनी विमान साकारले होते. ते विमान फारसे दिसायला सुंदर नसले तरी त्यात उड्डाण करण्याची क्षमता होती, अशी अपेक्षा तळपदे बाळगून होते.

शिवकर बापूजी तळपदेंचं विमान तयार झालं, फक्त आता फक्त ते विमान आकाशात उडवायचे राहिले होते. त्यांनी या विमानाचे नामकरण मरुत्सखा असे केले होते. त्यांनी त्यांच्या विमानाला सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि काही काळातच ते विमान जमिनीपासून वर आकाशात तरंगण्यास सुरुवात झाली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीना आश्चर्याचा धक्का बसला होता. १५०० फूट उंचीवर तळपदे यांचे विमान उडत होते. पण थोड्या वेळाने ते विमान खाली आदळले, विमान खाली येताना बघून बघणारे निराश झाले होते.

शिवकर बापूजी तळपदे विमान उडवण्यास असमर्थ ठरले असले तरी त्यांनी हार मानली नव्हती. त्यांनी पुन्हा एकदा विमानाची निर्मिती करण्याचा चंग बांधला, पुन्हा अध्ययन केलं, नवीन विमानाची रचना केली, फक्त यावेळी त्यांच्या समोर एक नवीन आणि काहीशी गंभीर स्वरूपाची अडचण होती, ती अडचण होती पैशाची!

सगळ्या गोष्टींचे सोंग करता येते पण पैशांचे करता येत नाही. हातात पैसे नसताना विमानात सुधारणा घडवून त्याची पुन्हा एकदा निर्मिती कशी करावी? हा प्रश्न तळपदे यांना सतावत होता. विमानासाठी ते दारोदार भटकले.

बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे देखील त्यांनी आर्थिक पाठबळासाठी विचारणा केली, पण त्यांनी देखील हात वर केले. अनेक सावकार, शेठ आणि बँका यांच्याकडे पैशाची याचना करून दमल्यावर शिवकर तळपदे थकले आणि त्यांनी आपल्या या विमान निर्मितीच्या प्रयोगाला तिलांजली देण्याचं ठरवलं. तसं पाहिलं तर त्यांचा प्रयोग पुर्णपणे फसला नव्हता, कदाचित तो यशस्वी झाला असता पण शेवटी आर्थिक अडचणींच्या पुढे त्यांना देखील गुडघे टेकावे लागले. हे प्रकरण तिथेच दाबले गेले.

१९०३ साली राईट बंधूंनी पहिले विमान उडवले असा सर्वत्र गाजावाजा झाला. पुढे विमान संशोधनाच्या बाबतीत त्यांचेच नाव अगदी भारतीयांनी घेतले पण अनेकांना शिवकर बापूजी तळपदे यांच्या प्रयत्नांविषयी माहिती नव्हते. कुठल्याही आधुनिक विज्ञानाच्या पाठबळाशिवाय आकाशात उडवलेल्या त्या विमानाची कथा विस्मृतित गेली.

गेल्या काही वर्षात मात्र शिवकर तळपदे यांचे पुन्हा चर्चेत आले, एका वृत्तवाहिनीने त्यांच्या विमान प्रवासावर केलेल्या स्पेशल रिपोर्टमुळे सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा यांच्या मुख्य भूमिकेत ‘हवाईजादा’ नावाचा सिनेमा शिवकर तळपदेंच्या आयुष्यावर तयार करण्यात आला, याद्वारे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

शिवकर बापूजी तळपदे यांच्या विमानावर आज देखील वाद विवाद रंगतात, अनेकांचे मत आहे ते विमान उडालेच नव्हते तर अनेक लोक म्हणतात की ही एक आख्यायिका आहे. तळपदे यांच्या या विमान उड्डाणाचा इतिहास अजूनही गूढ असला तरी तो भारताचा इतिहासातील एक सहासी दुर्लक्षित प्रयोग होता, हे मात्र नक्की म्हणता येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!