आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
त्याच्या बहिणीने २३ वर्षं त्याच्यासाठी लढा दिला, पत्नी अनेक वेळा गुरुद्वाऱ्यात जाऊन आली, मुली आपल्या पित्याला बघण्यासाठी तरसल्या होत्या, पण तो कधीच परतुन आला नाही. ही गोष्ट त्या सरबजीतची आहे, ज्याला अशा गुन्ह्याची शिक्षा मिळाली, जो त्याने कधी केलाच नव्हता. त्याचा गुन्हा इतकाच होता की त्याने बेशुद्ध अवस्थेत देशाची सीमा ओलांडली होती.
२०१६ साली सरबजीत यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट देखील येऊन गेला. चित्रपटात सरबजीतची करूण कहाणी जरी प्रेक्षकांसमोर ठेवण्यात आली होती, तरी अशा असंख्य बाबी होत्या, ज्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आले नव्हते. आज आपण तेच पैलू समजून घेऊ..
सरबजीतचा जन्म पंजाबच्या भिखीविंड गावात झाला होता. हे गाव भारत पाकिस्तानच्या सीमेवर तरण तारण जिल्ह्यात आहे. त्याच्या घरची परिस्थिती इतकीही चांगली नव्हती. मोठा झाल्यावर तो पारंपरिक शेतीचा व्यवसाय करू लागला. सरबजीतच्या शरीराचा बांधा उत्तम होता. त्याला कुस्ती खेळण्यात फार रस होता.
योग्य वय झाल्यावर त्याचा सुखप्रीत कौर नावाच्या युवतीशी विवाह झाला, त्याला स्वप्नदीप आणि पूनम नावाच्या दोन कन्यारत्नांची प्राप्ती झाली. सरबजीत अत्यंत हसत खेळत आपले आयुष्य जगत होता. पण एक दिवस त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याची त्याने कधीच कल्पना देखील केली नव्हती.
एके दिवशी तो आपल्या घरी परत येत होता, त्यादिवशी त्याने दारू पिली होती. सूर्यास्त झाल्यानंतर सर्वत्र अंधार पसरला होता. याच अंधारात ते नजरचुकीने सीमारेखा ओलांडून पाकिस्तानात जाऊन पोहचला. एका छोट्याशा चुकीची त्याला मोठी शिक्षा भोगावी लागली होती.
या चुकीमुळे तो त्याच्या परिवारापासून लांब गेला. सरबजीतला पाकिस्तानी सैनिकांनी सीमा ओलांडण्याच्या गुन्ह्यात अटक केली.
सरबाजीतची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. त्याला मनजित सिंह या नावाने भारताला लागून असलेल्या कौसर सीमेवर अटक केली. त्याच्यावर लाहोर आणि फैजलाबाद येथे बॉ*म्बस्फो*ट घडवण्याचा आरोप करण्यात आला. या बॉ*म्बस्फो*टात १४ लोकांचा मृत्यू झाला होता. मनजित, खरा आरोपी ज्याने हे बॉ*म्बस्फो*ट घडवून आणले होते, तो मात्र फरार होता.
पाकिस्तानने सरबाजीत ‘रॉ एजंट’ असल्याची बतावणी केली. सरबजीत त्यांना सांगत होता की, तो कोणत्याही प्रकारचा गुन्हेगार नाही. तो सामान्य शेतकरी आहे. पण पाकिस्तान त्याची गोष्ट ऐकण्याचा मनस्थितीमध्ये त्यावेळी नव्हता. त्याच्यावर द*हश*तवादी असल्याचा ठपका ठेवत मानसिक-शारीरिक अ*त्याचार करण्यात आले.
पाकिस्तानने सरबजीतला त्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले होते, ज्यात तो सहभागी तर नव्हताच पण त्याबद्दल त्यांना साधी कल्पना देखील नव्हती.
इकडे, सरबजीतच्या परिवाराला याची कल्पना देखील नव्हती की तो सीमापार करून पाकिस्तानात जाऊन पोहचला आहे. बेपत्ता म्हणून त्याचा भारतात शोध घेतला जात होता. काही महिन्यांनी जर सरबजीतचे पत्र घरी आले नसते तर त्यांना तो पाकिस्तानात असल्याची भनकसुद्धा लागली नसती. सरबजीतचे पत्र वाचून त्याच्या कुटुंबियांचा पायाखालची जमीनच हादरली. पाकिस्तानने केलेल्या अ*त्याचारांची कहाणी त्या पत्रात सरबजीतने लिहिली होती. त्याला पाकिस्तानी सैन्याच्या कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सूनवण्यात आली होती. काही काळाने ही शिक्षा स्थगित करण्यात आली.
सरबजीतचा परिवार शेवटपर्यंत तो निर्दोष आहे, हेच सांगत राहिला. त्याची बहीण दलजीत कौर हिने आपल्या भावाच्या सुटकेतेसाठी मोठा संघर्ष केला होता. ती रोज घरातून भावाला सोडवून आणण्याचा संकल्प घेऊन अनेक स्तरावर लढाई लढत असे. तिने तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची भेट घेऊन सरबजीतच्या सुटकेची मागणी केली. पी व्ही नरसिंहराव यांनी तिला आश्वासन दिले होते की ते सरबजीतला परत आणणार आहेत. पण २००६ पर्यंत काहीच हालचाल झाली नाही.
एक दिवस अचानक पाकिस्तान कोर्टाने सरबजीतची याचिका खारीज करत त्याला मृत्युदंडाची शिक्षा सूनवल्याची बातमी आली. यानंतर सरबजीतची बहीण दलबीर कौरने २००८ साली पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ, यांच्याकडे दया याचना केली, त्यांनी ती याचना धुडकावून लावली.
एक दिवस बातमी आली की, सरबजीतला १ एप्रिलला फाशी देण्यात येणार आहे, पण पुढे ती फाशी पुढे ३० एप्रिलला देण्यात येईल अशी बातमी आली. दलबीरच्या प्रयत्नांना यश येत होते, ती पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री अन्सार बार्नि यांच्याकडे सरबजीतची दया याचिका घेऊन गेली. त्यांनी सरबाजीतला फाशी न देता जन्मठेप द्यावी अथवा सुटका करावी अशी मागणी केली.
२००९ साली ब्रिटिश वकील जस उपल यांनी सरबाजीतच्या सुटकेसाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती. त्यांनी मानवाधिकार संस्थांना यात दखल देण्यास सांगितले होते.
पाकिस्तानी वकील ओवैस शेख यांनी या अभियानाचे समर्थन केले होते. सरबाजीतच्या बाजूने त्यांनी निःशुल्क खटला लढवला होता. २०११ मध्ये हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात येऊन पोहचले. इथे ओवेस शेख यांनी मनजित सिंह या मूळ आरोपीच्या विरोधातील पुरावे उपस्थित करून सरबाजीत निर्दोष असल्याचे सांगितले. त्यांनी मनजितची शिक्षा सरबजीत भोगतोय असे न्यायालयाला सांगितले.
अखेर दीर्घकाळ चालु असलेल्या या लढ्याला यश मिळताना दिसत होते. सरबजीतच्या फाशीला जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आले. काही अधिकारी म्हणाले की, कैद्यांच्या अदला बदलीवेळी सरबाजीतला मुक्त करता येईल. पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी सुरजित सिंह या माजी भारतीय गुप्तहेराला मुक्त करण्यात आले, हा गुप्तहेर ८०च्या दशकापासून तिथे कैद होता.
२०११ साली दलजीत कौर सरबजीतला भेटायला पाकिस्तानच्या जेलमध्ये गेल्या, त्यावेळी तिने सरबजीतला तिथेच राखी बांधली. तिने आपला भाऊ लवकर घरी परत येईल अशी कामना केली होती. पण नियतीला हे मंजूर नव्हते.
२०१३ साली सरबजीतवर तुरुंगातील काही अपराध्यांनी ह*ल्ला केला. त्याला वीट आणि धारदार शस्त्राने जखमी करण्यात आले. गंभीर जखमा झाल्यामुळे तो कोमात गेला व लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत केलेल्या एका चुकीने त्याच्याकडून त्याचे आयुष्य हिरावून घेतले होते.
२०१६ साली सरबजीतच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटात रणदीप हुड्डा याने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री ऐश्वर्या रायने दलबीर कौरची भूमिका साकारली होती. दोघांच्याही भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले होते.
याचवर्षी, १४ एप्रिल २०२४ रोजी सरबजीतच्या मारेकऱ्यांना शोधून काही “अज्ञात” व्यक्त्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गेल्या काही महिन्यांपासून असे “अज्ञात लोक” भारताच्या शत्रूंना संपवत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.