आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी, धार्मिक, वांशिक तेढ निर्माण करणं. त्यासाठी कोणत्याही थराला जाणं, दंगेधोपे घडवणं, कोणत्या तरी दुर्घटना घडवून आणणं किंवा जे काही घडेल त्याचं खापर कुणावर तरी फोडणं; या बाबी सध्या भारतात आणि जगभरातही चर्चेत आहेत. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र, या बाबी काही आताच घडत नाहीत. पुरातन काळापासूनचा जगभरातला इतिहास अशाच घटनांनी भरलेला आहे.
अमेरिकेच्या शिकागो शहरावरही दि. ८ ऑक्टोबर १८७१ रोजी असंच संकट कोसळलं. शिकागो इलिनॉयच्या नैऋत्य बाजूला असलेल्या एका कोठारात आग लागली. या आगीने विक्राळ स्वरूप धारण केलं आणि मध्यभागापासून इतर भागांना आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. २४ तासाहून अधिक काळ चाललेल्या या अग्नितांडवात ३०० जणांचा बळी गेला तर ९० हजार लोक म्हणजेच शहराची एक तृतीयांश लोकसंख्या बेघर झाली.
आगीचं थैमान सुरू असतानाच आलेल्या पावसानं आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत ४ मैल लांब आणि १ मैल रुंद क्षेत्र जळून खाक झालं होतं. आगीमुळे १७ हजार इमारती ७३ मैलांचा रस्ता नष्ट झाला. केवळ १२० मृतांचे मृतदेह बाहेर काढता आलं.
या अग्निकांडानंतर जसं शहराच्या पुनर्बांधणीचं काम वेगाने सुरू झालं तसाच या आगीच्या कारणांचा तपास करण्याचं कामही वेगाने सुरू झालं. पोलीस आणि अग्निशामक यंत्रणा आपापापल्या परीने तपास करत असतानाच वृत्तपत्रांनी समांतरपणे ‘शोधपत्रकारिता’ करत आपापले निष्कर्ष मांडायला सुरुवात केली.
त्यात एका प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार कॅथरीन ओ’ लेरी ही महिला तिच्या गायीचं दूध काढत होती. त्यावेळी तिच्या गाईने कंदिलावर लाथ मारली. त्यामुळे गोठ्यातली गवताची गंजी आणि बाजूचं धान्याचं कोठार पेटलं आग लागली. याच आगीने शहराला विळखा घातला असं नमूद करण्यात आलं होतं.
कॅथरीन ओ’ लरी आणि तिचं कुटुंब आयर्लंडमधून चांगल्या जगण्याची संधी शोधात अमेरिकेत आलं. तिचे पती पॅट्रिक यांनी इंग्लंडविरुद्ध गृहयुद्धात महत्वाची कामगिरी केली होती. त्यांनी डेकोव्हन स्ट्रीट येथे ५०० डॉलरमध्ये एक घर, गोठा आणि धान्याचं कोठार विकत घेतलं. त्यांनी घराचा काही भाग दुसऱ्या कुटुंबाला भाड्याने दिला. त्यांच्याकडे सहा गायी, एक घोडा आणि गाडी होती. त्यांचा दूधविक्रीच्या व्यवसायात बऱ्यापैकी जम बसला होता. मुलंही चांगल्यापैकी शिकत होती. सर्वसामान्य स्थलांतरित कुटुंबांपेक्षा हे कुटुंब बऱ्यापैकी सधन होतं.
आग लागली त्या दिवशी रात्री मी झोपायला गेले असताना माझा नवरा आणि एक जण माझ्याकडे आले. त्यांनी मला कोठाराला आग लागल्याचं सांगितलं. आम्ही जाऊन पाहतो तर संपूर्ण कोठार जळून खाक झालं. होतं. बस्स. आगीबद्दल मी एवढंच सांगू शकते, असं कॅथरीनने तिच्याकडे चौकशीला आलेल्या पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांना सांगितलं.
तपास अधिकाऱ्यांना या आगीसाठी कॅथरीन किंवा तिची गाय जबाबदार असल्याचे कोणतेही पुरावे कसून तपास करूनही मिळू शकले नाहीत. मात्र, वर्तमानपत्रांनी कॅथरीनला दोषी ठरवणं सुरूच ठेवलं. तिची, तिच्या गाईची, कंदिलाची आणि आगीची असंख्य चित्रही प्रसिद्ध होत राहिली.
दरवर्षी आग लागली होती तो दिवस आला की पत्रकार कॅथरीनला शोधत तिची मुलाखत घ्यायला यायचे. ती त्या दिवशी लपूनच राहायला लागली. अखेर ओ’ लॅरी कुटुंबाने त्या घरातून आपला गाशाच गुंडाळला. कॅथरीन ओ’ लेरीच्या मृत्यूनंतर तब्बल १०० वर्षांनी शहर प्रशासनाने अधिकृतपणे तिला निर्दोष ठरवले. आगीचे खरे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.
मग या घटनेसाठी कॅथरिनावर ठपका का ठेवण्यात आला?
कारण ती आयरीश होती. याच्या मागे स्थलांतरित आणि स्थानिकांचा संघर्ष हे कारण आहे. ती कॅथलिक होती. ती एक स्त्री होती. तिने व्यवसायात जम बसवला होता. एखादी स्त्री कंदील आणून गाईच्या पायाजवळ ठेवण्याइतकी मूर्ख असेल का? असा सवाल शिकागोच्या कोलंबिया कॉलेजचे इतिहासाचे सन्मान्य प्राध्यापक डॉमिनिक पॅसिगा यांनी केला. स्थलांतरितांना काही ना काही कारणाने लक्ष्य करणं आणि त्यांचा छळ करणं हे त्या काळात सर्रास घडत होतं, असंही ते म्हणाले.
सन १८४० आणि ५० च्या दशकात स्थलांतरितांनी पहिल्यांदा शिकागोमध्ये मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात केली. त्यावेळी, शिकागोमध्ये येणारे बहुतेक स्थलांतरित हे आयरिश होते, बटाट्याचं दुर्भिक्ष्य आणि इंग्लंडबरोबरचा संघर्ष या कारणाने जर्मन लोकही स्थलांतर करून आले.
त्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या एक षष्ठांश होती. शिवाय स्कॅन्डिनेव्हियन, बोहेमियन आणि काही कृष्णवर्णीय स्थलांतरितही शिकागोमध्ये आले. सन १८७० मध्ये शहराची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या स्थलांतरितांची होती.
या स्थानिक आणि स्थलांतरित वादाला धर्मांतर्गत भेदभावाचीही एक किनार आहे. अमेरिकन प्रोटेस्टंट लोकांनी स्थलांतरित आयरिश कॅथलिकांना रोम आणि पोप यांच्याशी एकनिष्ठ म्हणून त्यांना नाकारले. ते एकनिष्ठ अमेरिकन बनण्यास लायक नाहीत, अशी त्यांची भावना होती. वास्तविक, कॅथलिक स्थलांतरित आणि त्यांचं चर्च आणि आगीनंतर शहराची नव्याने उभारणी करण्यासाठी मदत करत होते. होली फॅमिलीचे संस्थापक फादर अरनॉल्ड डॅमन हे नव्या शहराचे निर्माते होते, अशी नोंद इतिहासकार स्केरेट यांनी करून ठेवली आहे.
आगीनंतर नव्याने उभ्या राहिलेल्या नव्या शिकागोने कात टाकली. निम्मं शहर बेचिराख होण्यासारखा प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी गृहबांधणीचे नियम कडक करण्यात आले. इमारती बांधताना अग्निरोधक साधनसामुग्रीचा वापर अनिवार्य करण्यात आला. हे सगळं योग्यच असलं तरी त्यातही एक मेख होती.
अनेक गरीब शिकागोवासीयांना; अर्थात स्थलांतरित रहिवाशांना पुनर्बांधणीसाठी अग्निरोधक साहित्य किंवा कुशल गवंडी परवडत नव्हते. त्यांच्यापैकी अनेकांनी दुर्घटनेपूर्वी विमा काढला नव्हता. ज्यांचे विमे होते त्यांच्या पॉलिसीज आगीत जळून खाक झाल्या. त्यांच्या मालमत्तेची पुनर्बांधणी किंवा विमा काढण्याचे साधन नसल्यामुळे हजारो; बहुतेक स्थलांतरित नागरिक आणि त्यांचे लहान व्यवसाय शिकागोच्या बाहेर फेकले गेले.
आज अमेरिका हा स्थलांतरितांनी घडवलेला देश असं म्हटलं जात असलं आणि ते बिरुद अमेरीका अभिमानाने मिरवत असली तरी स्थानिक आणि स्थलांतरित हा वाद जगाच्या सगळ्या भागात आणि सर्व काळात चालत आला आहे हे खरं आहे.
खुद्द अमेरिकेत अगदी काही काळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना हा वाद पुन्हा चिघळला होता आणि त्याला ट्रम्प प्रशासनाची फूस होती. स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर काढण्याचे नियम लागू करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती आणि आजही जागोजागी स्थलांतरितांवरचा राग या ना त्या प्रकारे व्यक्त होतो ही वस्तुस्थिती आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.