जामिन नाकारल्यानंतर चिदंबरमना आठवलेले रंगा-बिल्ला कोण होते..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आयएनएक्स मिडिया आणि मनी लॉंडरिंग केस मध्ये तुरुंगात गेल्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उच्च न्यायालयात जमीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र आर्थिक हेराफेरी सारख्या गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला जर सहज जामीन मिळाला तर याचा खूप चुकीचा अर्थ घेतला जाईल असे भाष्य करत दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

यावर पी. चिदंबरम यांनी मी म्हणजे काय रंगा-बिल्लासारखा अट्टल गुन्हेगार आहे का? असा प्रश्न करून जामीन न मिळण्यामागचे कारण विचारले तेंव्हा न्यायालयाने यावर फेरविचार करून त्यांना काही अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला.

पण, पी. चिदंबरम यांनी ज्यांचा उल्लेख अट्टल क्रूर गुन्हेगार असा केला ते रंगा बिल्ला होते तरी कोण? त्यांनी कोणता गंभीर गुन्हा केला होता ज्यामुळे तब्बल ४० वर्षांनतरही अत्यंत क्रूर गुन्हेगार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते ?

जाणून घेऊया रंगा-बिल्ला यांच्या भयाण कारनाम्याची क्रूर कथा.

संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या या घटनेला तब्बल ४० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. २६ ऑगस्ट १९७८ रोजी ऍडमिरल मदन मोहन चोप्रा आणि त्यांची पत्नी आपल्या मुलांची आतुरतेने वाट पाहत होते. संध्याकाळी ऑल इंडिया रेडीओवर मुलाखत देण्यासाठी म्हणून गेलेली त्यांची दोन मुले गीता आणि संजय रात्रीचे अकरा वाजले तरी घरी परतले नव्हते.

अनेक शंकाकुशांकानी घेरलेल्या पालकांनी शेवटी मुलांची चौकशी करण्यास सुरुवात केली. रेडीओ केंद्रावरून त्यांना सांगण्यात आले की ते दोघेही तिथे पोहोचलेच नाहीत. मग, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी असा सगळीकडे शोध सुरु झाला. हरेक ठिकाणी चौकशी करूनही मुलांचा काहीच पत्ता लागत नसल्याने घाबरलेल्या पालकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन तीन दिवस झाले तरी गीता आणि संजय यांची काहीच माहिती मिळत नव्हती. २९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी रिंग रोडवर दोन मुलांची प्रेते सापडल्याची बातमी चोप्रा कुटुंबियाला दिली.

जीव मुठीत घेऊन आणि धडधडत्या काळजाने जेंव्हा ऍडमिरल चोप्रा आणि त्यांची पत्नी खात्री करून घेण्यासाठी रिंगरोडवर पोहोचले तेंव्हा समोरचे दृश्य बघून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. आपल्या दोन्ही मुलांची रक्ताने न्हालेली प्रेते पाहून त्या दोघांनाही मोठा धक्का बसला.

१७ वर्षांची गीता आणि संजय यांचा अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण दिल्ली शहर हादरून गेले. वर्तमानपत्रांनी या घटनेवरून प्रशासनाला शहरातील असुरक्षिततेच्या प्रश्नावरून धारेला धरले. सगळीकडून पोलिसांवरील दबाव वाढत होता. त्यामुळे या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनाही कंबर कसावी लागली.

दिल्लीच्या क्राईम ब्रँचने या घटनेचा तपास सुरु केला. संजय आणि गीता गायब होण्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना एका फोनद्वारे अशी माहिती मिळाली होती की, एक फियाट कारमध्ये एक मुलगी ओरडत होती आणि त्या गाडीच्या काचा बंद करण्यात आल्या होता. ही गाडी अगदी वेगाने रस्त्यावरून पळत होती.

गाडीचा नंबर होता HRK 8930. याच प्रकारचा फोन राजेंद्र नगर पोलीस स्टेशनमध्येही आला. फोनवरील व्यक्तीने माहिती दिली की, फियाट कारमध्ये एक मुलगी आणि मुलगा होता जे समोर बसलेल्या दोघांशी हाणामारी करत होते, ओरडत होते. या गाडीचाही नंबर HRK 8930 असाच होता. दोन व्यक्तींनी माहिती दिल्यावर या फियाट कारचा शोध घेणे अनिवार्य बनले.

संजय आणि गीताच्या खुनाशी या कारचा नक्कीच काहीतरी संबंध असला पाहिजे, असा पोलिसांचा तर्क बनला आणि त्यांनी या फियाट कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. या कारला शोधण्यासाठी पोलिसांनी शहरातील कोपरा न कोपरा पालथा घातला. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना गाडीबद्दल थोडीफार माहिती मिळाली.

शहरातील ट्रान्सपोर्ट विभागातील माहिती नुसार त्या नंबरची गाडी पानिपतमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची होती. पण, ते जेंव्हा पानिपतमध्ये पोहोचले तेंव्हा त्यांची मतीच गुंग झाली. कारण HRK 8930 या नंबरची गाडी तर तिथे होती पण ती फियाट कार नव्हती आणि ती दिल्लीतून फिरू शकेल अशा अवस्थेत तर अजिबात नव्हती. ही गाडीतर नादुरुस्त होती.

पोलिसांना जी फियाट हवी होती त्यावर कदाचित नकली नंबर प्लेट लावला गेला होता.

फियाट आणि त्या दोन मुलांचा खून यातील गुंतागुंत आणखी वाढत चालली होती. चौकशी दरम्यान पोलिसांना अशीही माहिती मिळाली की दोन दिवस आधीच गीताची एका लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाशी काही वादावादी झाली होती. संशयाची सुई त्याच्या दिशेने फिरल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले पण, त्याच्याविरोधात कसलेच पुरावे न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले.

गीता आणि संजय यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार संजयच्या शरीरावर २१ जखमा होत्या. आणि गीताच्या शरीरावर ६ जखमा होत्या. याहून भयानक गोष्ट म्हणजे गीताचा खून करण्यापूर्वी त्या निष्पाप कोवळ्या मुलीचा बलात्कार करण्यात आला होता. या माहितीने तर पोलीसही हादरून गेले.

जिथे या दोघांचे शव मिळाले त्याठिकाणी मिळालेले रक्ताचे डाग, मातीचे नमुने, केस यांची तपासणी करण्यात आली. त्यावरून हे लाजिरवाणे कृत्य दोघा व्यक्तींनी मिळून केल्याचे स्पष्ट झाले. पण, या दोन हरामखोर व्यक्ती होत्या कोण हे मात्र अजूनही उघड झाले नव्हते.

नंतर ३१ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना माहिती मिळाली की, उत्तर दिल्लीच्या मजलिस पार्क परिसरात एक बेवारीस फियाट कार उभी आहे. फियाट कार म्हणताच पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. प्रश्न हा होता की मुसळधार पावसात त्या फियाट कारमध्ये सगळे पुरावे व्यवस्थित सापडतील का?

परंतु तरीही पोलिसांनी त्या गाडीची तपासणी सुरु केली. तेंव्हा गाडीत त्यांना काही नकली नंबर प्लेट्स आढळल्या. ज्यात एक नंबर प्लेट HRK 8930 होती. यावरून पोलिसांना हवी असणारी फियाट कार ती हीच असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्या नंबर प्लेट्सची तपासणी करण्यासाठी त्यांना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले गेले.

गाडीतील बोटांचे ठसे देखील तपासासाठी घेतले गेले. गीता आणि संजय यांना याच गाडीतून पळवून नेण्यात आले होते. या खुन खटल्याचा गुंता आत्ता काहीसा सुटत होता. या गाडीत मिळालेले बोटांचे ठसे पोलीस रेकॉर्डवरील कुठल्या गुन्हेगारांशी जुळतात का याची माहिती तपासली जाऊ लागली.

पोलिसांनी सगळ्या फाईल्स चाळून काढल्या तेंव्हा त्यांना एक फाईल सापडली. ही फाईल मुंबईतील दोन अट्टल गुन्हेगारांची होती. ज्यांचे नाव होते रंगा आणि बिल्ला.

या दोघांवरही अपहरण करून खंडणी वसूल करणे आणि मोटार गाड्या चोरणे असे अनेक गुन्हे नोंदवले गेले होते. मुंबई पोलीस देखील या दोन बदमाशांचा शोध घेत होतीच. गाडीतील बोटांचे ठसे हे रंगा आणि बिल्लाचेच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या दोघांचेही पोस्टर शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लावले.

एके दिवशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दोन व्यक्ती सापडल्या ज्यांचा चेहरा रंगा आणि बिल्लाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता असल्याचे दिल्ली पोलिसांना कळवण्यात आले. दिल्ली पोलीस रेल्वे स्टेशनच्या तुरुंगात पोहोचले. रेल्वे पोलिसांच्या हाती लागलेल्या त्या दोन व्यक्ती इतर कुणी नसून रंगा आणि बिल्ला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु केल्यावर त्यांनी गीता आणि संजय यांच्या खुनाची कबुली दिली.

२६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ऑल इंडिया रेडीओच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी गीता आणि संजय चोप्रा बसची वाट पाहत स्टॉपवर उभे होते. तेंव्हा एक फियाट कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. गीताला पाहून त्या दोघांच्याही मनात वाईट विचार आला. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी दोघांना कारमध्ये बसवले.

परंतु गाडी ऑल इंडिया रेडीओच्या ऑफिसऐवजी एका निर्जन रस्त्याकडे वळली. गीता आणि संजयने धोका ओळखला आणि ते सुटण्यासाठी आरडाओरडा करू लागले. रंगा आणि बिल्लाला मारहाण करू लागले. अगदी निर्मनुष्य ठिकाणी पोहोचल्यानंतर गाडी थांबली. त्यांनी गीताला गाडीतून बाहेर ओढले.

गाडीत काही हत्यारे होती. संजयने त्यातील एक तलवार उचलली आणि त्याने रंगा आणि बिल्लावर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांच्या ताकदीपुढे संजयचा निभाव लागला नाही. आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी त्याने खूप धडपड केली. पण, त्या दोघा नराधमांनी त्याच तलवारीने त्याच्यावर अनेक वार केले आणि त्यातच संजयचा मृत्यू झाला.

संजयचा खून केल्यानंतर गीतावर दोघांनीही बलात्कार केला आणि त्याच तलवारीने तिचाही खून केला.

पोलिसांना आता या दोन नराधमांविरोधात पुष्कळ पुरावे मिळाले होते. कोर्टात केस सुरु झाली. ७ एप्रिल १९७९ रोजी त्या दोघांनाही कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. ३१ जानेवारी १९८२ रोजी दोघांनाही तिहारच्या जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले.

संजय आणि गीता यांनी आपल्यावर ओढवलेल्या संकटाचा बहाद्दूरीने मुकाबला केला होता. त्या दोघांना मरणोपरांत कीर्तीचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. तेंव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनादिवशी १६ वर्षाखालील मुलांना त्यांच्या धाडसी कृत्यासाठी शौर्य पुरस्कार दिला जातो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!