स्वतंत्र पाकिस्तानची “फर्स्ट लेडी” एक हिंदू ब्राह्मण होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पाकिस्तानचा जन्म भारताच्या जन्माच्या फक्त एक दिवस अगोदरचा. जन्मापासूनच पाकिस्तान भारतासाठी एक डोकेदुखी बनला आहे. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून कायदेआझम महंमद अली जिन्ना यांनी लियाकत अली खान याची निवड केली होती.

या लियाकत अली खानने मोहम्मद अली जिन्ना यांना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी भरपूर सहयोग दिला होता. या लियाकत अली खानचे कुटुंब गर्भश्रीमंत होते. इंग्रजांबरोबर या कुटुंबाचे चांगले संबंध होते.

स्वातंत्र्यपूर्वकाळात लियाकत अली खान भारताचा वाणिज्य मंत्री देखील होते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जिन्नांनी त्यांच्यावर पंतप्रधानासारखी मोठी जबाबदारी टाकावी याच्यात काहीही नवल नव्हते.

लियाकत यांच्या पत्नीचे नाव होते राणा लियाकत अली खान. राणा लियाकत अली खान पाकिस्तानची फर्स्ट लेडी म्हणून ओळखली जाते. तिने सिंध प्रदेशाची राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे राणा लियाकत अली खान दोन पिढ्यांपूर्वी हिंदू ब्राह्मण होती.

लियाकत अली खानप्रमाणे बेगम लियाकत अली खानचे आयुष्य देखील वादळांनी भरलेले होते. 13 फेब्रुवारी 1905 रोजी राणाचा जन्म उत्तर प्रदेशातील अलमोडा या गावी झाला. तिने लखनऊ विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवलेली होती.

राणा हिचे आजोबा तारादत्त पंत हिंदू ब्राह्मण होते परंतु 1874 त्यांनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला या कारणामुळे त्यांना जातीमधून बहिष्कृत करण्यात आलेले होते. इतकेच नाही तर त्या काळात त्यांच्या जात बांधवांनी त्यांचे जिवंत श्राद्ध करून त्यांना मृत देखील घोषित केले होते.

राणाचे लग्नापूर्वीचे नाव होते आयरीन शीला रूथ पंत. राणाचा स्वभाव पहिल्यापासून धाडसी होता. घरचे लोक पुरोगामी विचारांचे असल्यामुळे तिला तिचे शिक्षण पूर्ण करण्यास कुठलाही अडथळा आला नाही तिने अर्थशास्त्रामध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. त्यावेळी अर्थशास्त्राच्या वर्गामध्ये ती एकटी महिला होती.

एमएची डिग्री करत असताना राणाची भेट लियाकत अली खान यांच्याबरोबर झाली. त्यांच्या भेटीचा किस्सा देखील मजेशीर सांगितला जातो.

राणा जेव्हा कॉलेजला शिकत होती तेव्हा बिहारमध्ये पूर आला होता. बिहारच्या पुरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी रानाच्या कॉलेजच्या लोकांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाची तिकिटे लखनऊ विधानसभेमध्ये देण्यासाठी राणा स्वतः गेली होती.

पहिले तिकीट देण्यासाठी तिने लियाकत अली खानच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि खान साहेबांना आपल्या कार्यक्रमाला येण्याची विनंती केली.

लियाकत अली खान यांनी पहिल्यांदा राणाचे म्हणणे उडवून लावले. परंतु तिच्या आग्रहापुढे त्यांचा नाईलाज झाला आणि लियाकत अली खान रानाच्या कॉलेजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

त्यानंतर राणाने स्वतःची पदवी पूर्ण केली ती दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राची प्राध्यापिका म्हणून काम करू लागली. त्या काळात तिला बातमी समजली की लियाकत अली खानची निवड लखनऊ विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे. त्यावेळी लियाकत अली खानला शुभेच्छा देण्यासाठी तिने एक पत्रही लिहिले होते.

खाँसाहेबांनी या पत्राचे उत्तर दिले आणि तिथूनच त्यांच्यामध्ये पत्रांचा सिलसिला सुरू झाला. पुढे गाठीभेटी देखील वाढल्या आणि याची परिणीती 1933 मध्ये दोघांनी विवाह करण्यात झाली.

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती. लियाकत अली खान आणि राणाच्या वयामध्ये दहा वर्षांचे अंतर होते. याशिवाय लियाकत अली खानचे पहिले लग्न झाले होते. खाँसाहेबांनी आपली आतेबहीण जहांआरा खान हिच्याबरोबर आपले पहिले लग्न लावले होते. या लग्नापासून त्यांना विलायत खान नावाचा एक मुलगा देखील होता.

मुसलमानांमध्ये चार लग्ने वैध असतात. त्यामुळे लियाकत अली खान आणि राणाला या गोष्टीचे फारसे काही वाटले नाही हेच त्यांच्या लग्नावरून दिसून येते. लग्न करण्यासाठी रानाला अर्थातच आपला ख्रिश्चन धर्म बदलावा लागला.

मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर तिचे लग्न मुसलमानी रिवाजानुसार लियाकत अली खानबरोबर झाले. लग्नामध्ये आयरीन रूथ पंथ हिचे नाव गुल-ए-राणा लियाकत अली खान असे ठेवण्यात आले.

राणाच्या घरच्यांचा या लग्नाला फारसा विरोध नव्हता. त्यावेळी लियाकत अली खान उत्तर प्रदेश मध्ये उदयाला येणारे नाव होते. त्यांना मोहम्मद अली जिन्ना यांचे जवळचे साथीदार म्हणून त्यांना ओळखले जात होते.

पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर लियाकत अली खानबरोबर राणा पाकिस्तानला निघून गेली. जाण्याअगोदर त्यांनी आपला बंगला पाकिस्तान सरकारला दान देऊन टाकला. आजही या बंगल्यात पाकिस्तान उच्च आयुक्तांचे कार्यालय पाहायला मिळते. लियाकत अली खानने आपल्या सर्व चीजवस्तू पाकिस्तान सरकारला देऊन टाकल्या होत्या.

लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी राणाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये महिला आणि अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री बनवले. त्यानंतर चारच वर्षांनी लियाकत अली खानची रहस्यमय रीतीने हत्या झाली.

रावळपिंडी येथील एका बागेत एका सभेमध्ये त्यांचे भाषण चालू असताना त्यांना अज्ञात इसमाने गोळी घालून ठार मारले. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध आजपावेतो लागला नाही. या हत्येच्या पाठीमागे महंमद अली जिन्नांचा हात होता असे बोलले जाते परंतु तसे पुरावे कधी समोर आले नाहीत.

लियाकत अली खानची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानमधील सर्व लोकांना वाटले की आता राणा ही भारतामध्ये परत निघून जाईल. परंतु राणा पतीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्येच राहिली.

पतीच्या मृत्यूच्या वेळी राणाचा बँक बॅलन्स केवळ 300 रुपये होता. स्वतःच्या दोन मुलांच्या पालनपोषणाचा खर्च तिच्यासमोर उभा होता. पाकिस्तान सरकारने तिला दरमहा 2 हजार रुपये वेतनाची व्यवस्था केली.

त्यानंतर काही वर्षांनी हॉलंडला पाकिस्तानची राजदूत म्हणून तिची नेमणूक करण्यात आली. राणाने पाकिस्तानमध्ये ऑल पाकिस्तान वूमेन असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती.

राणाने पाकिस्तानच्या राजकारणात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या निभावल्या. तिने इटली आणि पाकिस्तानची राजदूत म्हणून देखील काम पाहिले. सिंध प्रांताची राज्यपाल म्हणून देखील राणाची निवड झाली होती. एवढेच नाही तर मादरे पाकिस्तान या पाकिस्तानच्या एका मोठ्या पुरस्काराने राणाला सन्मानित करण्यात आलेले आहे.

वयाच्या 86 व्या वर्षी पाकिस्तानमध्ये राणाने शेवटचा श्वास घेतला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!