ईश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न विधवेशी लावून दिलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९व्या शतकात भारतीय स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. बालविवाहाच्या प्रथेमुळे लहान वयातच संसाराचा भार पेलावा लागत असे. सतीप्रथा, विधवा पुनर्विवाहाला बंदी अशा अनेक कुप्रथेमुळे स्त्रियांना खडतर जीवन जगावे लागत होते. अशा काळात पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्त्रियांच्या प्रश्नावर आवाज उठवला.

त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर इंग्रज सरकारने १८५६ साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला. मुलींच्या शिक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला.

आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांना आज समाजात सन्मानाचे स्थान मिळत आहे. समाजात हे परिवर्तन घडवण्यामागे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा मोठा वाटा आहे.

तत्कालीन रूढीप्रिय आणि परंपरावादी समाजाशी लढून झगडून त्यांनी स्त्रियांसाठी उन्नतीच्या वाटा खुल्या केल्या. त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारतातील स्त्रियांनी कायम त्यांच्या ऋणात राहिले पाहिजे.

ईश्वरचंद्र विद्यासागर हे १९ व्या शतकातील एक महान तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि लेखक होते. बंगाल प्रांतातील मदिनापूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १८२० रोजी त्यांचा जन्म झाला. ते संस्कृत पंडित होते. विद्यार्थी जीवनातच आपल्या बुद्धिमत्तेने सर्वांवर आपली छाप पडली होती.

संस्कृत विषयात आणि हिंदूधर्मशास्त्राच्या अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवल्याने त्यांना ‘विद्यासागर’ ही उपाधी देण्यात आली. त्यांचे बालपणीचे नाव ईश्वरचंद्र बंदोपाध्याय असे होते. पण, पुढे विद्यासागर ही त्यांना मिळालेली पदवीच त्यांची ओळख बनली आणि त्यांचे नाव ईश्वरचंद्र विद्यासागर झाले.

त्यांनी गावातच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते आपल्या वडिलांसोबत कलकत्त्यात आले. घरची परिस्थिती फारशी सधन नव्हती. अशा हालाखीच्या दिवसांतही त्यांनी जिद्दीने अभ्यास केला. घरात दिवे लावणे परवडत नसल्याने त्यांनी रस्त्यातील खांबांवरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. त्यांची बुद्धी तल्लख होती. त्यांना शिक्षणसाठी स्कॉलरशिपदेखील मिळाली होती.

१८३९ साली त्यांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर १८४१ साली त्यांना फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले, यावेळी ते फक्त २१ वर्षांचे होते. पुढे याच कॉलेजमध्ये ते प्रिन्सिपल पदापर्यंत पोहोचले.

सरकारी शिक्षण खात्यात त्यांनी शिक्षण निरीक्षकापर्यंत बढती मिळवली. यावेळी इतर जातीतील विद्यार्थ्यांना संस्कृत शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. त्यांनी या नियमात बदल केले आणि सर्व जातीय विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सुरु केले.

मुलींना शिकता यावे म्हणून त्यांनी सरकारी खात्यात असताना मुलींसाठी ३५ नव्या शाळा सुरु केल्या.

त्यांनी कलकत्त्यात एक मेट्रोपॉलिटन कॉलेजही सुरु केले, या कॉलेजमध्ये सर्व जातीय मुलांना प्रवेश दिला. संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठीही त्यांनी खूप काम केले. त्यांना आधुनिक बंगाली गद्याचे जनकही म्हंटले जाते.

बंगालमध्ये राजाराममोहन रॉय यांनी सुरु केलेली धर्मसुधारणेची चळवळ विद्यासागर यांनी आणखी पुढे नेली. राजारामोहन रॉय यांनी सती बंदीचा कायदा पारित करून घेतला तसाच विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाचा. महिलांना समाजात दिली जाणारी वागणूक आणि त्यांची होणारी पिळवणूक पाहून विद्यासागर यांना प्रचंड दु:ख होत असे.

त्यांना नेहमी वाटे स्त्रियांची हे अवस्था सुधारली पाहिजे. महिलांनाही समाजात आदराचे स्थान मिळाले पाहिजे. त्यांना घरातून बाहेर पडण्याची, शिकण्याची संधी मिळाली पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यातही विधवांचे जीवन तर नरकाहूनही भयानक होते.

विधवा स्त्रीला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाई. पतीनंतर विधवेचे जगणे फारच अवघड होऊन जाई. हे सगळे पाहिल्यानंतर त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली.

विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी ब्रिटीश सरकारकडे याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करावा अशी मागणी केली. ही गोष्ट तितकीशी सोपी नव्हती. पण, ते मागे हटले नाहीत.

ते स्वतः धर्मशास्त्रांचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी पाराशर स्मृतीचा दाखला देत, विधवा पुनर्विवाह शास्त्रसंमत असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या या दाव्याच्या आधारेच ब्रिटिशांनी १८५६ साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला.

त्यांनी आपल्या मुलाचा विवाह एका बालविधवेशी लावून दिला. हे पाहून तर लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. कट्टर धर्म समर्थकांना मात्र त्यांचे हे सुधारणा कार्य अजिबात पटत नव्हते. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांना प्रचंड त्रास दिला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला. परंतु तरीही ते विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थन करत राहिले.

त्यांनी स्वतःच्या मुलाचेच बाल विधवेशी विवाह लावून दिल्याने इतर लोकही त्यांच्या या कृतीचे अनुकरण करू लागले. समाजात विधवांकडे बघण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलू लागला. बंगालमधील सामाजिक वातावरण बदलू लागले. एकंदरीत स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला.

विद्यासागर यांनी खूप धन कमावले पण, त्यांनी कधीच याचा बडेजाव केला नाही. त्यांची राहणी अगदी साधी होती. स्वतः मिळवलेले धन ते दु:खी, कष्टी, गरीब, दलित लोकांमध्ये वाटून टाकत. देव, धर्म, अध्यात्म अशा गुंतागुंतीच्या विचारसरणीत त्यांनी स्वतःला कधीच अडकवून ठेवले नाही. ते प्रखर बुद्धिवादी होते.

सामाजिक सुधारणेच्या बाबतीत तर राजा राममोहन रॉय यांचे वारसदारच होते. ते फक्त बोलके सुधारक नाही तर कर्ते सुधारक होते. म्हणूनच आपल्या मुलाचा विवाह त्यांनी एका विधवेशी लावून दिला.

आपल्या मुलींचाही बालविवाह करण्यास त्यांनी नकार दिला. मुली चौदा-पंधरा वर्षांच्या झाल्यावरच त्यांनी त्यांचे विवाह लावून दिले.

त्यांची आणखी एक गोष्ट खूपच अनुकरणीय आहे. ती म्हणजे ते प्रचंड वक्तशीर होते. याबाबत त्यांचा लंडनमधील एक किस्सा आवर्जून सांगितला जातो. एकदा लंडनमध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्या सभागृहामध्ये त्यांचे व्याख्यान होते, तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की सभागृहाबाहेर भरपूर गर्दी जमली आहे.

जमलेल्यांपैकी काही जणांना त्यांनी याचे कारण विचारले. तेंव्हा एकजण म्हणाला की, “सभागृहाची स्वच्छता करणारे कर्मचारी आलेले नसल्याने सभागृह अस्वच्छ आहे.” मग ते आत गेले आणि त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला. थोड्याच वेळात त्यांनी सभागृहाची पूर्ण स्वच्छता केल्यानंतर आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या त्या वर्तनाने भलेभले लोक त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी कुठल्याही कामाची लाज बाळगली नाही. कोणतेही काम मोठे किंवा हलके नसते हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून पटवून दिले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!