गांधीजींचा मोठा मुलगा त्याच्या वडिलांच्या हत्येच्या सुडाने पेटून उठला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या विरोधातील लढा जिंकले असले तरी आयुष्यातील एका लढाईत मात्र ते अपयशी ठरले होते. ती लढाई होती त्यांचा मोठा मुलगा हरीलाल याला सन्मार्गावर आणायची.

महात्मा गांधी आणि त्यांचे जेष्ठ पुत्र हरीलालचे संबंध सुरुवातीपासूनच अत्यंत तणावाचे होते. असे असूनही जेव्हा नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली तेव्हा हरीलाल क्रोधाने पेटून उठला, इतका की त्याने गांधी हत्येचा सूड घेण्याची तयारी सुरू केली होती.

हरीलालचा पुतण्या, म्हणजेच महात्मा गांधींचा मुलगा देवदास गांधी याचा पुत्र गोपालकृष्ण गांधी, त्याच्या “गांधीज लास्ट जेम” लिहितो की, “हरीलाल यांच्या मनात पित्याविषयी जितका राग होता तेवढाच पित्याबद्दल अभिमानदेखील होता.”

ज्यावेळी गांधींची हत्या करण्यात आली त्यावेळी हरीलाल मुंबईमध्ये होते. त्यांना गांधी हत्येची बातमी कळाली आणि त्यांनी संतापून घोषणा केली होती की मी माझ्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेईल. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात त्यांना हरीलालच्या नातीने एका जुन्या गुजराती वृत्तपत्रातील एक कात्रण दाखवले, ज्यात लिहले होते की “ज्यावेळी गांधी हत्येची बातमी हरीलाल यांना समजली, ते संतापाने लालबुंद झाले आणि ते जोरात ओरडले की जोपर्यंत मी माझ्या पित्याचा हत्येचा प्रतिशोध घेत नाही, मी शांत बसणार नाही, मी माझ्या पित्याची हत्या करणाऱ्याला यमसदनी धाडल्याशिवाय शांत बसणार नाही, माझे पिता या पृथ्वीवरचे एकटे संत आणि महात्मा होते.”

हरीलाल कधीच नथुराम गोडसेची तुरुंगात जाऊन भेट घेऊ शकले नव्हते. परंतु गांधींचे लहान पुत्र देवदास गांधी नथुरामला जेलमध्ये जाऊन भेटले होते.

गांधींचे चौथे पुत्र रामदास गांधींनी नथुरामला फाशीची शिक्षा सुनावली गेली त्यावेळी त्याला एक भावनिक पत्र लिहले होते. या पत्रात नथुरामला त्याने किती मोठी चूक केली, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न रामदास यांनी केला होता.

ज्यावेळी गांधी यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार होते त्यावेळी हरीलाल मुंबईत होते. त्यावेळी ते तडक दिल्लीला गेले देखील होते पण कोणीच त्यांना ओळखू शकले नव्हते. देवदास गांधींनी हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्रात लिहले होते की “गांधी हत्येच्या चार दिवसांनी हरीलाल घरी आले होते, त्यांना शोक सभेत सहभागी व्हायचे होते. ते त्यावेळी आजारी होते, आपल्या उपचारावर लक्ष देण्याची गरज त्यांना होती. त्यांचा चेहरा अगदी बापूंसारखा दिसत होता. त्यांच्या आवाजात एक वेगळीच उदासीनता होती, जी त्या आधी कधीच कोणीच अनुभवली नव्हती.”

गोपाळकृष्ण गांधी यांच्यानुसार हरीलाल यांचा चांगला आवाज होता, त्यांना सर्व भजनं तोंडपाठ होते जे महात्मा गांधींच्या आश्रमात गायले जायचे. हरीलाल हे ज्यावेळी आपल्या मुलांनासुद्धा हे भजनं म्हणून दाखववायचे. हरीलाल यांची नात नीलम पारीख आपल्या “गांधीज लास्ट ज्वेल : हरीलाल” या पुस्तकात लिहले होते की हरीलाल हे असे गांधी होते जे आपल्या पित्यासारखे बनू शकले असते, पण त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना भडकवत राहिले आणि हरीलाल त्या लोकांच्या हातचे भावले बनून राहिले.

हरीलाल यांची जीवनकथा ही फार विचित्र आहे. महात्मा गांधींना एकेकाळी त्यांच्यावर गर्व होता. त्यांना वाटायचे की ज्याप्रकारे त्यांचा मुलगा त्यांना साथ देतो आहे, ते बघता तो भविष्यात लोकांसाठी एक उदाहरण बनेल. दक्षिण आफ्रिकेत हरीलाल हे आपल्या पित्यासोबत ‘सत्याग्रहा’त फार हिररीने सहभागी झाले होते, ते १९०८ ते १९११ या काळात तब्बल ६ वेळा जेलमध्ये जाऊन आले होते.

गांधीजींच्या सगळ्या मुलांमध्ये हरीलाल सर्वात साहसी आणि बुद्धिमान होते. असं असून देखील त्यांची हि दशा झाली.

महात्मा गांधींच्या निधनानंतर एका वर्षाने ते मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये अकस्मात निधन पावले होते. त्यांना रस्त्यावर पडलेलं बघून मुंबई महानगरपालिकेने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे ते चार दिवस जीवन मृत्यूचा संघर्ष करत होते. त्यांना टीबीची लागण झाली होती. जास्त दारू पिल्याने त्यांचं यकृत खराब झालं होतं, त्यांना गुप्तरोगाने ग्रासले होते.

हरीलाल यांनी कोणालाच त्यांची ओळख सांगितली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वांना समजले की ते महात्मा गांधींचे पुत्र आहेत.

१९११ पासून गांधीजी आणि हरीलाल यांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांना लंडनला जाऊन बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यापासून रोखले होते. महात्मा गांधींचे मत होते की पाश्चात्य शिक्षण घेणे चुकीचे आहे, ज्या ब्रिटनने आपल्या देशाला गुलाम बनवले होते, तिथे जाऊन शिक्षण घेणे हे अयोग्य आहे.

गांधींच्या या भूमिकेमुळे नाखूश होऊन हरीलाल आपली पत्नी चंचल हिला घेऊन भारतात परतले होते.

हरीलाल यांनी कधी गांधींशी संबंध जोडले तर कधी तोडले, ते गांधींच्या कधीच जवळ गेले नाहीत. त्यांनी आयुष्यभर असेच कृत्य केले, ज्यामुळे गांधींना आपली मान खाली घालावी लागली होती. तणावपूर्ण संबंध असले तरी गांधी आणि हरीलाल यांच्यात कायमच पत्रव्यवहार होत होता. त्यात गांधी त्यांना नेहमी सुधारणेचे उपदेश करत होते.

हरीलाल हे बालपणापासूनच महात्मा गांधींपासून दुरावले होते, ते जन्माला आले त्यावेळी गांधी लंडनला आपले वकिलीचे शिक्षण घ्यायला गेले होते. ते कस्तुरबांसोबतच दीर्घकाळ राहिले. पित्याचा सहवास त्यांना तसा कमीच मिळाला.

हरीलाल यांना पाच अपत्ये होती. काही काळाने त्यांनी आपल्या मुलांकडेसुद्धा पाठ फिरवली. गांधीजी व कस्तुरबा यांनी त्या मुलांचे पालन पोषण केले. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते फार कष्टी झाले होते. हरीलालची आपली साळी कुमी आदलाजा हिच्याशी पुनर्विवाह करण्याची इच्छा होती. ती बालविधवा होती त्यांनी त्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले. पण बापू आणि कस्तुरबा यांनी या विवाहाला मान्यता दिली नाही. यानंतर तर  ते अजूनच दुखी झाले, व्यसनांच्या आहारी गेले.

१९३५ साली खुद्द महात्मा गांधींनीच त्यांच्यावर बेवडा व व्यभिचारी असल्याचा ठपका ठेवला होता.

तेव्हा सर्वत्र याची खुप चर्चा रंगली होती.

१९३६ साली तर एक स्फोटच झाला. गांधीजींना अशी खबर मिळाली की हरीलाल यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे व आपले नाव अब्दुला गांधी असे ठेवले आहे. गांधींना याचे दुःख झाले होते व ते हरीलाल यांना म्हणाले होते की ते यामुळे स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. पुढे कस्तुरबांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून पुन्हा शुद्धी करुन घेत हिंदू धर्मात पुनरागमन केले. यावेळी त्यांना हिरालाल गांधी हे नवे नाव प्रदान करण्यात आले.

१९४४ मध्ये जेव्हा कस्तुरबा आजारी होत्या त्यावेळी हरीलाल त्यांना भेटायला गेले होते, त्यांना बघून कस्तुरबांना फार आनंद झाला परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही, दोनच दिवसांनी हरीलाल यांनी दारू पिऊन खूप मोठा तमाशा केला होता, ज्याने कस्तुरबा अधिकच व्यथित झाल्या होत्या.

महात्मा गांधींनी आयुष्यात अनेक युद्ध जिंकले पण त्यांच्या मुलात सुधारणा घडवून आणण्यात मात्र ते सपशेल अपयशी ठरले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!