या मराठी माणसामुळे भारतीय शेअर बाजाराचं चित्रच बदललं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पैसे गुंतवण्यासाठी शेअर मार्केट हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जातो. २०१४ च्या अहवालानुसार भारतातील स्टॉक एक्सचेंज म्हणजेच भारतातील शेअर बाजारात होणारया उलाढालीचा आकडा आहे तब्बल ४०० बिलियन अमेरीकन डॉलर्स.

भारतीय रुपयांत हाच आकडा २८,६९२ बिलियन रुपये एवढा होतो. या एवढ्या अवाढव्य बाजाराची व्यवस्था नेहमीपासूनच अगदी सुयोग्य पद्धतीने हाताळली जात नव्हती.

९०च्या दशकात मोठमोठे दलाल या शेअर बाजारावर आपले वर्चस्व गाजवत होते. त्यातच ३५०० करोड रुपयांचा हर्षद मेहता घोटाळा यामुळे भारतीय शेअर बाजारास अवकळा लागण्याची वेळ आली होती.

अशा वेळी भारतीय शेअर बाजाराला या दलदलीतुन बाहेर काढण्यासाठी नव्या उपाययोजना आणि कठोर नियमावलीची गरज होती. भारतीय शेअर बाजाराचे हे चित्र पालटण्याचे श्रेय दिले जाते ते डॉ. रामचंद्र ह. पाटील यांना.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (National Stock Exchange) निर्मीतीचे श्रेय सुद्धा त्यांनाच दिले जाते. आज आपण याच आर. एच. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

डॉ. पाटील यांचा जन्म कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात असलेल्या नांदगड या ठिकाणी झाला. नांदगडमधील महात्मा गांधी विद्यालयात त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून धारवाडच्या कर्नाटक कॉलेजमध्ये त्यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात केली.

पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी पदवी शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर बॉम्बे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात पीएचडी पुर्ण केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी RBI आणि IDBI इथे काम केले. त्याच वेळी भारतीय शेअर बाजारात चाललेल्या गदारोळात नवीन शेअर बाजाराची स्थापना करण्याची आवश्यकता आहे असा अहवाल यूनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्याधिकारी असलेले एम जे फेरवाणी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिला होता.

या अहवालात नमुद केल्यानुसार नविन शेअर बाजाराच्या निर्मीतीसाठी आर. एच. पाटील यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी ते IDBI बँकेत कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. डॉ. पाटील यांच्या दुरदृष्टीने १९९३ राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना करण्यात आली.

शेअर बाजारातील अनागोंदी कारभारास आळा घालण्यासाठी त्यांनी नविन नियमावली बनवली. सदस्यत्व घेण्यासाठी बॉम्बे शेअर बाजारातील शुल्क त्यावेळी जवळ-जवळ १ करोड किंवा त्यापेक्षाही जास्त होते.

डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे सदस्यत्व मिळवण्याचे शुल्क भरण्याची पद्धत बदलली. शेअर बाजारातील सगळी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑटोमेटिक करुन सगळे ट्रेडिंगचे केंद्र V-SAT तंत्रज्ञानाचा वापर करून जोडण्यात आले.

डॉ. पाटील यांनी फक्त राष्ट्रीय शेअर बाजाराच्या स्थापनेतच मोठा हातभार लावला होता असे नाही. त्याच बरोबर त्यांनी नॅशनल सिक्युरिटीज डीपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि क्लेअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) यांच्या स्थापनेत मोठा हातभार लावला.

प्रमाणपत्रित शेअर्सच्या वितरणात होणाऱ्या चुका NSDLमुळे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्या. खोट्या सह्या आणि बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे फसवणूक केली जात असताना NSDLची स्थापना हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे आणि उपयुक्त असे कार्य होते.

२००१ ते २००४ च्या दरम्यान Disinvestment Commission of Govt of India चे ते अध्यक्ष होते. UTI Assess Management कंपनीमध्ये २००६ पर्यंत त्यांनी अध्यक्ष म्हणुन काम केले. भारतीय रोखे बाजाराच्या सुरक्षेची पाहणी आणि कार्यप्रणाली ठरवण्यासाठी नियुक्त केलेल्या गटाचे ते सदस्यसुद्धा होते.

नविन कल्पनांचा स्वीकार करण्यास पाटील नेहमी तयार होते असे २००८-२०११ दरम्यान सेबीचे कार्याध्यक्ष असलेले सी. बी. भावे सांगतात. शेअर बाजारातील बरेच दिग्गज आणि त्यांचे सहकारी त्यांना अतिशय स्वभावाचे व्यक्ती म्हणुन ओळखतात.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, जे राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना करणाऱ्या समूहात होते, डॉ. पाटील यांच्या विषयीचा एक किस्सा सांगताना ते म्हणतात की, “राष्ट्रीय शेअर बाजारासाठी आलेले कंप्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जकातीच्या कारणामुळे अडवले गेले असताना डॉ. पाटील यांनी जकात निरिक्षकास फोन करुन लगेच ते साहित्य सोडवून घेतले होते.”

१९९५ मध्ये मुंबई महानगरपालिकेचा एक संघ राष्ट्रीय शेअर बाजाराचे काम सुरु असलेल्या एका इमारतीची नासधुस करायला आलेले असतानाही बाजाराचे काम अगदी शांतपणे सुरु होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स येथील प्राध्यापक अजय शहा यांच्या मते डॉ. पाटील यांचा कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगण्याचा जो गुण होता त्याचाच हा परिणाम होता. आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही भुरळ घातली होती.

एकदा कामानिमीत्त कोचीला गेले असता त्यांनी एका मोठ्या फाईव स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय धुडकावून आईडीबीआई बँकेच्या १०० रुपये दराच्या एका खोलीत राहणे पसंद केले होते. त्यांचे साधे राहणीमान सांगताना हा किस्सा त्यांचे सहकारी आवर्जुन सांगतात.

त्यांचे जवळचे सहकारी त्यांना नवीन तरुणांना संधी उपलब्ध करुन देणारे म्हणुन ओळखतात.

स्वत:च्या निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या जागी रवी नारायण यांची नियुक्ती केली, ज्यांनी नंतर तब्बल १२ वर्षे त्यांचे पद भुषविले. नविन संकल्पना आणि तरुण बुद्धीला त्यांनी विशेष प्राधान्य दिले.

आपल्याबरोबरच दुसऱ्या संस्थांमध्येही गुणवत्तेचा विकास व्हावा म्हणुन त्यांनी प्रयत्न केले. आपल्याला आपला दर्जा वाढवण्यासाठी आपले प्रतिस्पर्धी मोलाची भूमिका बजावतात असे त्यांचे मत होते.

हुशार, अनुभवी आणि बोले तैसा चाले या वृत्तीस साजेसे असणाऱ्या डॉ. आर. एच. पाटील यांचा मृत्यू २०१२ मध्ये ३ वर्ष फुफ्फुसाच्या कर्करोगाशी लढा देता देता झाला. मृत्यूच्या वेळी ते NSDL च्या आणि CCI च्या अध्यक्षपदी होते.

जीवनभर त्यांनी सर्वोत्कृष्टतेचा पाठलाग केला. एकानंतर एक यशाचे शिखर पादाक्रांत करत गेलेले डॉ. आर. एच. पाटील भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात राष्ट्रीय शेअर बाजाराचे जनक म्हणुन कायमच ओळखले जातील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!