ज्याच्या विचारावर चीन आज उभा आहे तो कन्फ्युशिअस कोण होता..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगभरात मनुष्य जातीच्या उगमापासूनच त्यांना त्यांच्या जीवनातील दुःखं ही एक मोठी समस्या राहिली आहे. आपण दुःखी का असतो? आणि दुःख नेहमी आपल्याच वाट्याला का येतात? आपल्या समाजात इतक्या मोठ्या प्रमाणावर संघर्ष का सुरू आहे? मनुष्य म्हणून आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय? यासारख्या असंख्य प्रश्नांनी असिमीत बुद्धीचे वरदान प्राप्त असलेली मनुष्य सततच चिंताग्रस्त असतो. या चिंतेतून आणि त्यावर होणाऱ्या चिंतनातून तत्वज्ञानाचा उगम होतो. या तत्वज्ञानातून झालेली दर्शनशास्त्राची निर्मिती पुढे ‘धर्म’ व्यवस्थेला आकार देते.

आजच्या आधुनिक चीनमध्ये बहुसंख्य लोक हे बौद्ध आहेत, असा सर्वत्र समज असला तरी चिनी संस्कृतीचा पाया हा बौद्ध धर्माचा नाही. बौद्ध धर्म तिथे फार नंतर जाऊन पोहचला, त्याअगोदर चिनी संस्कृतीला अस्तित्वासाठी ज्या तत्वज्ञानाचा पाया होता.

ते तत्वज्ञान हे कन्फ्युशियसवर आधारित होते. आजही चीनमधील जनमानसात कन्फ्युशियसचे दैवी तत्वज्ञान लोकप्रिय आहे. तिथल्या लोकांच्या मनात कन्फ्युशियस बद्दल प्रचंड आदर भाव आहे. पण हा कन्फ्युशियस नेमका कोण होता की ज्याने विशालकाय चीनला एक सांस्कृतिक ओळख मिळवुन दिली होती?

इसवी सन पूर्व ५५० वर्षांपूर्वी भारतात भगवान महावीर आणि भगवान बौद्ध यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार होत होता त्यावेळी चीनमध्ये शानदोंग येथे एका सुधारकाचा जन्म झाला, ज्याचे नाव होते कन्फ्युशियस.

हा सुधारक जन्माला आला त्यावेळी चीनमध्ये झोऊ राजवंश सत्ता चालवत होता. या राजवंशाने चीनमध्ये अनेक राज्ये निर्माण केली, ज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष होत होता.

इतिहासकारांच्या मते कन्फ्युशियसचे वडील एक सैनिक होते. त्यांच्या वडिलांनी आपल्या पत्नीला फक्त मुलगा होत नाही, म्हणून त्यागले होते. परंतु त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या पोटी एका विक्षिप्त मुलाने जन्म घेतला. अखेरीस कन्फ्युशियसच्या वडिलांनी त्यांच्याच गावातील एका १५ वर्षीय तरुणीशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले ज्यातून कन्फ्युशियसचा जन्म झाला. त्यांच्या आई वडिलांच्या लग्नाचे कुठलेच दृश्य पुरावे उपलब्ध नसल्याने कन्फ्युशियस यांना अनैतिक संबंधांची उत्पत्ती मानले जाते.

कन्फ्युशियसच्या वडिलांचा एका युद्धात मृत्यू झाला. काही वर्षातच त्यांच्या आईनेही देह ठेवला. कन्फ्युशियस बालपणापासून आपल्या आईच्या सानिध्यात वाढल्याने तिच्याबद्दल त्यांच्या मनात खूप जिव्हाळा होता. आई गेल्यामुळे त्यांना दुःखाने घेरले. ते मातृवियोगाने तडफडत होते, त्याचवेळी त्यांच्या मनात आयुष्याला अर्थ देण्याची इच्छा निर्माण झाली व ते ज्ञान प्राप्तीच्या मार्गावर चालू लागले.

ज्ञान मिळवण्याचा अट्टहासाने त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त केले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्यांना ज्ञान मिळवण्याचा अट्टहास काही केला कमी होत नव्हता. ज्ञानप्राप्तीच्या ओढीने त्यांनी समाज, इतिहास, अर्थशास्त्र आणि धार्मिक विचार यांचा अभ्यास सुरू केला.

कन्फ्युशियस १७ वर्षांचे होते त्यावेळी त्यांना सरकारी नोकरी मिळाली, पुढे वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी क्यूगोंग यांच्याशी विवाह केला. त्यांना वर्षभरातच काँग ली नावाच्या मुलीचा जन्म झाला. असं म्हणतात की त्यांना दोन मुली झाल्या होत्या पण त्यापैकी एका मुलीचे जन्मताच निधन झाले होते.

कन्फ्युशियस यांनी काही वर्ष नोकरी केल्यावर त्यांचा नोकरीवरून विश्वास उडाला व त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. त्यांचा बहुतांश वेळ पुस्तकांच्या गारड्यात जात होता.

ते पुस्तक वाचायचे आणि त्यात मिळवलेले ज्ञान आपल्या शिष्यांना सांगायचे. कन्फ्युशियस तेव्हा ‘ली’ या नावाने ओळखले जात होते. पुढे त्यांना ‘ड्युक ऑफ लुन’ या किताबाने सन्मानित करण्यात आले.

इसवी सन पूर्व ४९८ मध्ये कन्फ्युशियसने आपल्या घराचा त्याग केला आणि ते चीनच्या भ्रमंतीसाठी घर सोडून निघून गेले. या काळात त्यांचा चीनमधील लोकांच्या आयुष्यातील दुःखांशी जवळून संबंध आला. लोकांचे दुःखी व कष्टी जीवन बघून कन्फ्युशियसने त्यांना सकारात्मक आयुष्य जगण्याचे उपदेश करण्यास सुरुवात केली. लोकांना त्यांचे सिद्धांत पसंत पडले व त्यांच्या पद्धतीने लोक आपले आयुष्य व्यतित करू लागले.

हळूहळू कन्फ्युशियसच्या चाहत्यांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होऊ लागली. त्यांचे शिष्य निर्माण होऊ लागले, त्यांच्या लोकप्रियतेचा डंका सर्वदूर वाजत होता. एकीकडे कन्फ्युशियस यांच्या तात्विक जीवनपद्धतीचे लोक अनुयायी होत असताना दुसरीकडे त्यांच्या विरोधात देखील अनेक लोकांचे आवाज येत होते. अनेक देशात व राज्यात तर कन्फ्युशियस यांना प्रवेशसुद्धा निषिद्ध करण्यात आला. त्यांच्या तत्वज्ञानाचा धिक्कार करण्यात आला होता. परंतु याचा कन्फ्युशियसवर कुठलाच परिणाम झाला नाही, त्यांची लोकप्रियता वाढतच गेली.

एकदा कन्फ्युशियस आपल्या शिष्यांच्या बरोबरीने ताई डोंगरावरून फिरत होते त्यावेळी त्यांना कोण्या स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ते लगेच त्या आवाजाचा मागोवा घेत त्याच्या दिशेने निघाले व ते त्या स्त्रीच्या समोर येऊन उभे ठाकले जी धायमोकलून रडत होती. कन्फ्युशियसने त्या स्त्रीला शांत होण्याची विनंती करत, रडण्याचे कारण विचारले? ‘माझ्या मुलाचा रानटी श्वापदाने फडशा पाडल्याने मी दुःखी आहे’ असं स्त्री उत्तरली. ती पुढे म्हणाली की, तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला देखील त्याच श्वापदाने ठार मारले आहे. कन्फ्युशियसला त्या महिलेच्या अवस्थेवर दया आली आणि त्यांनी तिला हे भयानक जंगल सोडून लांब कुठल्या सुरक्षित ठिकाणी निघून का जात नाही? असा प्रश्न केला.

त्यावर ती स्त्री म्हणाली की कुठल्या अत्याचारी शासकाचे या जंगलावर राज्य नसल्याने ती याठिकाणी राहते आहे.

तिचे बोलणे ऐकून कन्फ्युशियस स्तब्ध झाले. मग त्यांनी त्यांच्या शिष्यांना उपदेश केला की एक अत्याचारी राजा हा एखाद्या रानटी श्वापदापेक्षा अधिक क्रूर असतो, त्यामुळे त्याच्या राज्यात राहण्यापेक्षा जंगलात राहणे कधीही उत्तम आहे, कारण इथे अत्याचारी शासकाचे भय नसते. ज्या समाजात शासकाचे भय असते तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही.

अत्याचारी शासकाच्या विरोधात विद्रोह करणे हे जनतेसाठी अत्यावश्यक आहे. जनतेने कुठलेही शासन कुशासन होणार नाही, यासाठी सजग असले पाहिजे. त्यांचा हा उपदेश आजच्या आधुनिक लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

इसवी सन पूर्व ४८४ पर्यंत कन्फ्युशियस यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यांना त्यांच्या मूळगावी ‘लु’ ला परतण्याची त्यांच्या शिष्यांनी विनंती केली. तिथे परतल्यावर कन्फ्युशियस यांना तिथल्या राजाने मंत्रिपद बहाल केले. त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळताना अनेक सुधारणा घडवून आणल्या. ते कधीही गुन्हेगाराला शिक्षा करण्याऐवजी त्याच्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत. त्यांनी आपल्या शिष्यांना सत्य, प्रेम आणि न्याय या तत्वांचा संदेश दिला.

कन्फ्युशियसने उपदेश दिला की शासकाचे प्रथम कर्तव्य आहे आपल्या प्रजेचे कल्याण करणे आणि त्यांना सुख व आनंदाची प्राप्ती होईल यासाठी प्रयत्न करणे. कन्फ्युशियसने मंत्रिपदावर असताना आपल्या व्यवहारातून शासकांना एक आदर्श घालून दिला. त्यांनी त्यांच्या चरित्रातुन शासकांना व शिष्यांना नैतिकतेची दीक्षा दिली.

कन्फ्युशियसच्या बाबतीत प्रचलित असलेल्या एका आख्यायिकेनुसार त्यांच्या हातात जर कसला कारभार सोपवला जायचा त्यावेळी ते सर्वप्रथम प्रत्येक गोष्टीचे नामकरण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यायचे. हे करण्यामागे त्यांचा एक उद्देश असायचा तो म्हणजे लोकांच्या मनात पदाविषयाचा मोह कमी करणे.

त्यांना वाटायचे की जर कोणी योग्य प्रकारे पद भूषविले तर त्या पदाला त्याचे नाव प्रदान करण्यात यावे जेणेकरून एक मापदंड कायम बनलेला राहील.

कन्फ्युशियसने त्याकाळी शासकांकडे मागणी केली होती की जर कुठल्या शासकाने त्यांना त्यांचा सल्लागार म्हणून नियुक्त केले तर ते राज्याला १२ महिन्यात एका सुशासक राज्यात परावर्तित करतील इतका कन्फ्युशियस यांना त्यांच्या तत्वज्ञानावर विश्वास होता. कन्फ्युशियसने विभिन्न संस्कृतींचा, धार्मिक ग्रंथांचे वाचन करून ज्ञान प्राप्ती केली तरी त्यांनी कधीच आपले तत्वज्ञान लेखी स्वरूपात प्रस्तुत केले नाही. त्यांनी ते मौखिक पद्धतीनेच पसरविले. ते म्हणायचे माझं तत्वज्ञान एक विचार आहे जो वायू प्रमाणे पसरत रहावा, तो विचार शतकानुशतके असाच प्रसारित होत रहावा. तो विचार मी निर्माण केला नाहीये, मी फक्त त्याचे वहन करतो आहे.

कन्फ्युशियसने जरी त्यांचा विचार मौखिक स्वरूपात प्रसारित केला तरी त्यांच्या शिष्यानी मात्र ते विचार लिहून काढले आणि यातूनच ‘डिसीपलीन ऑफ कन्फ्युशियस’ ‘बुक ऑफ डॉक्यूमेंट’, ‘दा विस्डम ऑफ कन्फ्यूशियस’ आणि ‘चायनीज लिट्रेचर’ आदी पुस्तकांची निर्मिती झाली.

इतिहासकार मानतात की कन्फ्युशियस यांना त्यांच्या मृत्यूचा आधीच आभास झाला होता. असं म्हणतात की ४८० इसवी सन पूर्व मध्ये त्यांनी एका हरिणाला त्यांच्या समोर मृत्युमुखी पडताना बघितले आणि तेव्हाच ते त्यांच्या शिष्याला म्हणाले की माझा अंत समय निकट आला आहे. त्यांनी ही भविष्यवाणी केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.

कन्फ्युशियसचा मृत्यू जरी अद्भुत होता तरी तो कधीच देवत्व आणि चमत्काराच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. त्यांचा फक्त शिक्षण, धर्मशास्त्र, इतिहास आणि भ्रष्ट व्यवहार सुधारणा या ऐहिक गोष्टींवर भर होता. ते याच सिद्धांतांवर जगले आणि मृत्युमुखी देखील पडले.

कन्फ्युशियसचे तत्वज्ञान आजदेखील आयुष्यातील असंख्य अडचणींचा सामना करण्यासाठी एक उपयुक्त मार्गदर्शक मानले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!