मुसोलिनीची सुरुवात वेगळी असली तरी त्याचा शेवट इतर हुकुमशहांसारखाच झाला

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


जगाच्या इतिहासात आजवर अनेक हुकुमशहा होऊन गेले. काही हुकुमशहा हे परंपरागत वारसाहक्काने गादीवर आले तर काही हुकुमशहा हे अगदी सामान्य स्तरातून वर आले. या सामान्य लोकातून येऊनही राष्ट्राचा हुकुमशहा होणे ही काही सामन्य बाब निश्चितच नाही. जागतिक पटलावर असाच एक हुकुमशहा उदयास आला होता जो समाजातील अगदी सामान्य स्तरातील होता.

जगातील सर्वात क्रूर हुकुमशहांच्या यादीत मोडणारं एक नाव म्हणजे इटलीचा मुसोलिनी.

दडपशाहीने मुसोलिनीने इटलीवर सुमारे वीस वर्षे हुकुमत गाजवली. मुसोलिनीला सत्तेचा हा वारसा परंपरागत पद्धतीने मिळालेला नव्हता तर त्यासाठी त्याने स्वतः मेहनत घेतली होती. मुसोलिनीचा सामान्य नागरिक ते राष्ट्राचा हुकुमशहा हा प्रवास नक्कीच जाणून घेतला पाहिजे.

मुसोलिनीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्याचे वडील व्यवसायाने लोहार होते आणि त्याची आई शिक्षिका होती. इतक्या सामान्य परिस्थितीतून पुढे जाऊन मुसोलिनीने संपूर्ण देशावर हुकुमत गाजवण्याइतकी क्षमता प्राप्त केली.

मुसोलिनीचा जन्म २९ जुलै, १८८३ रोजी इटलीतील ईशान्येकडील भागात झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव अलेसांद्रो मुसोलिनी आणि आईचे नाव रोसा मुसोलिनी होते. मुसोलिनीच्या वडिलांवर मेक्सिकन राष्ट्रपती बेनीटो जुआरेज यांचा खूपच प्रभाव होता, म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव बेनीटो मुसोलिनी ठेवले. वडिलांवर सुधारणावादी विचारसरणीचा प्रभाव असल्याने साहजिकच मुसोलिनी देखील या विचारसरणीशी परिचित झाला.

बेनीटोचा अभ्यासातील कल पाहून वडिलांनी त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी बोर्डिंग शाळेत प्रवेश घेतला. घराची आर्थिक स्थिती अगदी बेताचीच होती. तशाही परिस्थितून बेनीटोने आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्याने अध्यापन क्षेत्रातील डिप्लोमा मिळवला. यानंतर त्याने काही काळ अध्यापनाचे काम केले. काही काळाने त्याने हे काम सोडून राजकारणात प्रवेश केला.

१९व्या शतकात जागतिक पटलावर अनेक विचारधारांचा उदय झाला होता. धर्म आणि राजकारण यांच्यातील सांगड एकीकडे स्पष्ट दिसत होती. मुसोलिनीने मात्र आपली पावले सोनेरी भविष्याच्या दिशेने वळवली. १९०२च्या दरम्यान मुसोलिनी समाजवादी विचारसरणीशी जोडला गेला.

तो काही काळ स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला. यादरम्यान त्याने स्वतःला एक चांगला पत्रकार म्हणून सिद्ध करण्याची धडपड केली. पत्रकार म्हणून त्याला तितके यश मिळाले नाही जितकी त्याला अपेक्षा होती. अवंती नावाच्या एका वर्तमानपत्रातून त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

पहिल्या महायुद्धाच्या काळात इटलीच्या परराष्ट्र धोरणाचा या वर्तमानपत्रातून खरपूस समाचार घेतला जाई. इटलीच्या पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याच्या कारणावरूनही या वर्तमानपत्रातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

पुढे त्याने वर्तमानपत्र सोडून देशसेवेकडे मोर्चा वळवला. यावेळी तो सैन्यात भारती झाला. परंतु वारंवार जखमी होण्याच्या कारणाने तो सैन्यात जास्त काळ टिकू शकला नाही.
१९१८च्या दरम्यान त्याने सैन्यातून निवृत्ती स्वीकारली.

सैन्यातून माघारी आल्यावर त्याने लोकांमध्ये सरकार विरोधात जागृती निर्माण करण्याचे काम सुरु केले. तो पूर्णवेळ राजकीय चळवळीत सक्रीय झाला. सरकार विरोधी भूमिका घेतल्याने त्याला वरचेवर जेल वारी करावी लागली.

सातत्याने सरकार विरोधी भूमिका मांडल्याने आणि त्यासाठी तुरुंगवास भोगल्याने एक समाजवादी नेता म्हणून त्याची ख्याती सर्वदूर पसरली. सरकारवर टीका करताना तो म्हणत असे, “सरकार एखाद्या खऱ्या आणि जिंदादिल व्यक्तीच्या हातात एकवटले पाहिजे, असा व्यक्ती ज्याच्याकडे काम करण्याची भरपूर क्षमता आणि उर्जा असेल.”

मुसोलिनीच्या बोलण्याचा नागरिकांवर खूप खोलवर परिणाम होत असे. १९१९साली त्याने इटलीतील मिलान शहरातील युद्धात सहभागी झालेल्या समाजवादी क्रांतीकारकांना एकत्र केले आणि इटालियन कॉम्बॅट स्क्वॉड लीगची स्थापना केली. देशात फॅसिस्टवादी सरकार स्थापन करणे हेच या पक्षाचे उद्दिष्ट होते. या पक्षाचे समर्थक काळा शर्ट घालत असत आणि राष्ट्रवाद तसेच समाजवादी विचारसरणीला विरोध करणाऱ्या आदर्शांचा स्वीकार करत. साम्यवाद्यांना आणि कामगारांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी या पक्षाचे समर्थक एकत्र येऊन अडथळे निर्माण करत.

या पक्षाच्या माध्यमातून इटलीच्या ग्रामीण भागातील घराघरात मुसोलिनी पोहोचला. लोकांना त्याच्यात आशेचा किरण दिसू लागला. त्याच्या वक्तृत्व कौशल्यामुळे तो सर्वसामान्यांचा नेता बनला होता. इटलीत राष्ट्रवाद वाढीस लागण्यास त्याची भाषणेच जबाबदार होती.

दुसऱ्या महायुद्धामुळे इटलीला खूप नुकसान सोसावे लागले. यामुळे इटलीतील अंतर्गत व्यवस्थादेखील कोलमडून गेली होती. त्यातच इटलीतील सरकार अगदीच हतबल झाले होते. सरकारच्या दुबळेपणामुळे जनतेला मुसोलिनीच्या तडफदार भाषणात एक आश्वासक भविष्य दिसत होते. मुसोलिनीची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती.

याच परिस्थितीचा फायदा घेत मुसोलिनीने देशातील जनतेला उज्वल भविष्याची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली. आपल्या भाषणातून त्याने साम्यवादी संकट पळवून लावण्याचा नारा दिला. त्याची लोकप्रियता इतकी वाढत होती की, ज्या पक्षात सुरुवातीला फक्त १७ हजार समर्थक होते तिथे दोनच वर्षात ५ लाखापेक्षा समर्थक तयार झाले.

१९२१ साली झालेल्या निवडणुकीत त्याच्या पक्षाला आश्चर्यकारक विजय मिळाला. राष्ट्रीय गौरव आणि राष्ट्राचा सन्मान अशा बिरुदावल्या प्रदान करत मुसोलिनीला इटलीचा राष्ट्रीय नेता बनण्याची संधी देण्यात आली. देशभरातून मुसोलिनीला अभूत्पुर्व समर्थन मिळत होते.

याच समर्थनाच्या जोरावर मुसोलिनीने २८ ऑक्टोबर रोजी रोममध्ये प्रवेश केला. व्हिक्टर तिसरा याने मुसोलिनीला देशाचा पंतप्रधान घोषित केले. ३० ऑक्टोबर, १९२१ रोजी मुसोलिनीने आपले सरकार स्थापन केले आणि तो इटलीचा सर्वेसर्वा बनला. १९२३मध्ये मुसोलिनी इटलीचा प्रमुख नेता बनला.

इटलीच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय क्षण होता. कारण यानंतर मुसोलिनीने इटलीसह संपूर्ण जगाचाच इतिहास बदलून टाकला.

यश मिळवण्यासाठी मुसोलिनी सातत्याने आपल्या विरोधकांवर टीका करत असे. त्याच्या कामात कुणीही नाक खुपसण्याचा प्रयत्न केल्यास मुसोलिनी सरळ त्याला फाशीची शिक्षा देत असे. सत्ता टिकवण्यासाठी तो नेहमीच नवनव्या योजना बनवत असे आणि त्या अंमलात आणत असे.

स्पेनच्या गृहयुद्धात देखील मुसोलिनीचा हात होता आणि त्याने फ्रांकोला मदत केली असल्याचेही म्हटले जाते. मुसोलिनीच्या हस्तक्षेपामुळे या युद्धात लाखो लोक बळी पडले होते.

हळूहळू मुसोलिनी विरोधात देशातील वातावरण पेटत गेले. जनतेच्या मनात त्याच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला. त्याने दाखवलेली स्वप्ने फोल ठरल्याने जनतेच्या मनातील त्याच्या प्रतिमेला तडे गेले. संपूर्ण देशात मुसोलिनीविरोधात आंदोलने आणि निदर्शने केली जाऊ लागली.

एक दिवस आंदोलकांनी मुसोलिनीला स्वतःच्या ताब्यात घेतले आणि २८ एप्रिल १९४५ रोजी आंदोलकांच्या हातूनच मुसोलिनीला मृत्युदंड देण्यात आला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!