सोनं शोधणाऱ्या या शास्त्रज्ञाने प्रयोग सिद्ध करण्याच्या आधीच आपलं आयुष्य संपवलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आतापर्यंतचं प्रत्येक शतक आपली वेगळी छाप जगावर पाडून पुढे गेलं. प्रत्येक वेळी काळाच्या कपाळावर काहीतरी नवीन लिहून गेलं. पण त्यातल्या त्यात 18 वं शतक हे मोठं गेम-चेंजर ठरलं.

गुलामगिरी, वेठबिगारी विरुद्ध पहिल्यांदाच युद्ध सुरू झालं; तर दुसरीकडे निर्विवाद महासत्ता असणाऱ्या इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं जाऊ लागलं, आणि त्यातून अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, हैतीयन राज्यक्रांती झाल्या. एकूणच स्वतंत्रतेचं वारं जगभर वाहू लागलं होतं.

याच दरम्यान कुठेतरी देशांच्या राजकीय सीमा आखण्याची सुरुवात झाली होती, तर जेम्स वॅटचं वाफेवरचं इंजिन फुरफुरायला लागलं होतं. अनेक ठिकाणी युद्धं होत होती, आणि नवनवीन सत्ताधीश निर्माण होत होते.

सगळे संशोधक माणसाचं आयुष्य सोपं करण्यासाठी झटून कामाला लागले होते. त्यातून औद्योगिक क्रांती बाळसं धरत होती, आणि इंधनासाठी तेलाचा वापर करता येतो, ही गोष्ट काही जणांच्या लक्षात येऊ लागली होती.

एकूणच तो भारलेला काळ होता.

अठराव्या शतकाच्या मध्यात 1752 साली सर्वशक्तिमान आणि सत्ताधीश असणाऱ्या इंग्लंडमध्ये एक अजब रसायन जन्माला आलं होतं.

जेम्स प्राईस.

कधीकधी काही गोष्टी पूर्णपणे अकालनीय असतात. माणसांचं पण तसंच. अशी माणसं जगासाठी गूढ बनून राहतात. हाही त्यातलाच एक. जन्माने जेम्स हजीनबॉथम. पण मृत कुटुंबियांच्या इच्छेनुसार नाव बदलून जेम्स प्राईस झाला.

याच्या रक्तातच जन्मापासून केमिस्ट्री. वयाच्या 25व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठातून आर्टस्ची पदवी घेतली खरी, पण त्याचं केमिस्ट्रीमधलं काम बघून विद्यापीठाने त्याला ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ बनवलं. त्यावेळच्या जगातली सगळ्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी सर्वोत्तम संशोधन संस्था असणाऱ्या ‘रॉयल सोसायटी’चा तो सभासद झाला, तो ही वयाच्या फक्त 29 व्या वर्षी.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तो केमिस्ट तर होताच, पण सोबत अल्केमिस्ट पण होता. अल्केमी हा उर्दू शब्द (अल + किमिया) याचा अर्थ होतो ‘देवाची किमया’. धातूंचे (Base Metals) रूपांतर सोने किंवा चांदीमध्ये (Precious Metals) करणे, म्हणजे ही प्रक्रिया म्हणजे अल्केमी.

तर झालं असं की, जेम्स प्राईसच्या एका शोधानं जगभर खळबळ माजवली होती. पाऱ्याचं (Mercury) रूपांतर सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये केलं असल्याचा त्याचा दावा होता. 

प्राईसने दोन पावडर तयार केल्या होत्या. एक लाल रंगाची आणि दुसरी पांढऱ्या रंगाची. बोरॅक्स, नायट्रेट आणि लाकडी कोळसा, इत्यादी गोष्टींचं ठराविक प्रमाणात केलेलं मिश्रण एका विशिष्ठ आकाराच्या भांड्यात असलेल्या ठराविक वजनाच्या पाऱ्यात मिसळून त्याला उष्णता द्यायची. उष्णता देत असताना त्याला सतत ढवळत राहायचं. काही वेळाने जर लाल रंगाची पावडर घातली असेल, तर सोनं तयार व्हायचं, आणि पांढरी पावडर असेल तर चांदी तयार व्हायची अशी साधारण ती प्रक्रिया होती.

त्याने या प्रयोगावर शोध निबंध सादर केला. समाजतल्या त्यावेळच्या अनेक प्रतिष्ठित लोकांसमोरही हा प्रयोग करून दाखवला. एवढंच नाही, तर या प्रयोगातून मिळालेलं सोनं त्याने इंग्लंडचा राजा तिसरा किंग जॉर्जला भेट म्हणूनही दिलं.

प्राईसला त्याच्या या अद्भुत संशोधनामुळे थेट रॉयल सोसायटीचं सभासदत्व मिळालं. रॉयल सोसायटीच्या नियमानुसार नवीन सभासदाला त्याचा प्रयोग जुन्या आणि जेष्ठ सभासदांसमोर सिद्ध करावा लागत असे. त्यानुसार जेम्स प्राईसला सर्वांनी आपला प्रयोग सिद्ध करण्याची विनंती केली.

पण या प्रयोगाला खूप वेळ लागतो, प्रयोग खूप खर्चिक आहे, याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात, अशी कारणं सांगून तो टाळाटाळ करू लागला. पण रॉयल सोसायटीचे प्रेसिडेंट सर जोसेफ बँक्स यांनी दबाव आणल्यावर प्राईस प्रयोगासाठी शेवटी तयार झाला.

पण सगळं नीट झालं तर कसं…

ठरलेल्या दिवशी तीन शास्त्रज्ञ प्राईसच्या घरी गेले. प्राईस त्यांना बाहेरच्या खोलीत बसवून स्वतः प्रयोगशाळेच्या खोलीत गेला. काही वेळाने बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात सरबताचे ग्लास होते. त्याने ते सरबत सर्वांना प्यायला दिलं. त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं की प्राईसच्या सरबताचा रंग वेगळा आहे. त्याला विचारणार तोवरच तो जागेवर मरण पावला.

त्याने अत्यंत विषारी असं हायड्रोजन सायनाईड (पृसिक ऍसिड) प्यायलं होतं. प्रयोगशाळेत फक्त हायड्रोजन सायनाईड आणि आत्महत्या करत असल्याची चिट्ठी सापडली. अशा प्रकारे एका संशोधकाचा वयाच्या फक्त 31 व्या वर्षी करुण अंत झाला होता, पण अनेक प्रश्न पुढे ठेवून गेला.

प्राईस असा का वागला ?
त्याच्या प्रयोगाचं पुढं काय झालं ?
पाऱ्याचं रूपांतर खरंच सोन्यात होऊ शकतं का ?
हे सगळे प्रश्न कायमचे अनुत्तरितच राहिले.

पण बाकीचं सगळं बाजूला ठेवलं, तरी पिरिओडिक टेबलमधली पाऱ्याची जागा बघता, पाऱ्याचं सोन्यात रूपांतर केमिकली पॉसीबल वाटतं. दोघेही एकमेकांच्या शेजारी आहेत. दोघांच्या अनेक प्रॉपर्टीज समान आहेत. ऍटोमिक नंबर पण जवळचे आहेत.

त्याच्या या एका प्रयोगानं एका क्षणात सोन्याचं भवितव्य ठरणार होतं. कदाचित अजूनही तो प्रयोग पुढे मागे सिद्ध होऊ शकेल. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून त्याच्या मागे आहेतच. पण प्राईसच्या अचानक जाण्याने सोनं ‘प्राईस’लेस होता होता राहिलं, एवढं मात्र नक्की.


या माध्यमावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकाची असतात, संपादक मंडळ त्याच्याशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!